तिसऱ्या दिवशी आम्ही प्रकाशा ला पोहोचलो. श्री क्षेत्र प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. इथे पुष्पदंतेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन मैयाची पूजा आरती केली. हे मंदिर तापी नदीच्या काठावर पूर्वाभिमुख असून यात महादेवाची स्वयंभू पिंड आहे. एक राजा या मंदिरात रोज पूजा करायचा. एकदा पूजा करताना त्याच्याकडे पूजेसाठी फुलं नव्हती मात्र पूजेत खंड पडू नये म्हणून त्याने आपला दंत काढून महादेवाला अर्पण केला. तर त्या दंताचं पुष्प झालं. तेव्हापासून या मंदिराला पुष्पदंतेश्वर हे नांव पडलं अशी एक आख्यायिका आहे. इथे तापी, गोमती, पुलिंदा या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. हा संगम, केदारश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर यांच दर्शन घेतलं. तसचं इथं ऋणमुक्तेश्वराचंही मंदिर आहे. आपलं कर्ज फिटावं म्हणून लोक या मंदिरात नवस बोलतात आणि ५,७,११ वेळा अमावस्येला दर्शन घेतल्यानंतर कर्जमुक्ती होते अशी श्रद्धा आहे.
त्यानंतर आम्ही पोहोचलो शुलपाणेश्वर मंदिरात. परिक्रमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा. इथं पूर्वी खूप मोठं घनदाट जंगल होतं. त्यात भिल्ल लोकांचं वास्तव्य होतं. पायी परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी हे जंगल पार करणं कष्टदायक आणि जोखमीचं होतं. इथले भिल्ल प्रत्येक भाविकाला लुटत. अगदी अंगावरल्या वस्त्रासहित सारं काही काढून घेत असत. त्याचं कारण इतकं अपरिमीत दारिद्रय तिथं नांदत होतं. नंतर सरदार सरोवर प्रकल्पात हे जंगल बरंचसं धरणाखाली गेलं. भिल्लांचा त्रास बंद झाला तरी त्या मार्गाने चालणं अधिक कष्टदायी झालं. तिथलं मूळ मंदिर आता वरच्या बाजूला बांधण्यात आलं आहे.अतिशय रमणीय असा हा परिसर आहे. आम्ही इथं पोहोचलो तेच सूर्यास्तसमयी. त्यामुळे सूर्यास्ताचं अप्रतिम दृश्य आम्हाला अनुभवायला मिळालं. इथे दर्शन घेऊन राजपिपला इथं आम्ही मुक्कामासाठी पोहोचलो.
खरंतर याच दिवशी कठपोर ते मीठीतलाई या समुद्र तरणासाठी रात्री २ वाजताची वेळ आम्हाला मिळाली होती. पण त्यामुळे शूलपाणेश्वर आणि भालोद ही परिक्रमेतील २ महत्वाची स्थानं करणं आम्हाला अवघड होतं. जसं हे आम्हाला कळलं तसं आम्ही सारेच नाराज झालो. पण दुसऱ्या क्षणीच मैयाला मनोमन प्रार्थना केली की कसंही करुन तू आम्हाला या दोन्ही स्थानांचं दर्शन घडव. मनापासून प्रार्थना केली तर मैया इच्छा पूर्ण करते असा अनुभव ऐकत आलो होतो. त्यामुळे मैया आपली इच्छा नक्की पूर्ण करणार असा विश्वास होता. अखेर कठपोरला संपर्क साधून बोलणं करुन दुसऱ्या दिवशीच्या रात्री २ वाजताची वेळ ठरवण्यात आली आणि आमची इच्छा पूर्ण झाली. मैयाने खूप छान अनुभूती दिली होती. मन समाधानानं भरुन पावलं होतं.
चौथ्या दिवशी सकाळी लवकर निघून मार्गातील मंदिरांचं दर्शन घेऊन पोइचा ला पोहोचलो. नर्मदा नदीच्या काठावर १०५ एकरात उभारलेलं निळकंठधाम स्वामी मंदिर. अतिशय देखणं विशाल असं हे मंदिर. या मंदिरात महादेवाची नटराज स्वरुपातील भव्य मूर्ती आहे. मंदिर इमारतीच्या भोवती जलाशय असून अनेक देवदेवतांची लहान मोठी मंदिरे आहेत. हे सारं पाहून दर्शन घेऊन पुढे निघालो.
मनाला ज्याची ओढ लागली होती त्या भालोद या स्थानी पोहोचलो. नर्मदा परिक्रमेत श्री दत्तप्रभुंची मोजकीच मंदिरं आहेत. जबलपूर, नर्मदापुरम (होशंगाबाद), गरुडेश्वर, राजघाट आणि भालोद. त्यातील भालोदच्या दत्तमंदिरात आम्ही पोहोचलो होतो. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी १४००व्या शतकातील एकमुखी दत्तात्रेयांची मूर्ती जी अंधारात किंवा उजेडात कशीही पाहीली तरी पोटावर गोमुख दिसतं. प.पू.वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या कृपेने प.पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन परिक्रमा पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोदला वास्तव्य करण्याचा आदेश मिळाला. याचदरम्यान बडोदा येथे काशीताई निरखे यांच्याकडे असलेली पुरातन दत्तमूर्ती प.पू.प्रतापे महारांजाकडे आली आणि भालोदला दत्तमंदिर स्थापन झालं. मुळात काशीताईंच्या आजोबांना श्री दत्तगुरुंनी स्वप्नदृष्टांत दिला आणि 'मी नर्मदेच्या जळात आहे, मला तू घेऊन जा' असं सांगितलं. त्याप्रमाणे ही दत्तमूर्ती बडोद्याला आणून तिथे मंदिर स्थापन केलं. नंतर मुलाने आणि त्यानंतर काशीबाईंनी वयाच्या ८५ वर्षांपर्यंत सेवा केली. पण मग या दत्तमूर्तीचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळीही श्री दत्तगुरुंनी स्वप्नदृष्टांत देऊन 'उद्या सकाळी मंदिरात येणाऱ्या पहिल्या व्यक्तीला मला दे' असं सांगितलं. सकाळी प्रतापे महाराज त्या मंदिरात गेले आणि ती दत्तमूर्ती त्याच्याकडे आली. ही मूर्ती एकमुखी आणि शाळिग्रामाची आहे. अतिशय रेखीव अशी ही मूर्ती आहे.
श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन प्रतापे महाराजांना भेटलो. खरंतर नर्मदा परिक्रमेविषयी त्यांच्याकडून काही ऐकायची खूप इच्छा होती. पण वेळेअभावी ते शक्य झालं नाही. पण माझं त्यांच्याशी अगदी थोडंसं का होईना गुरुचरित्राबद्दल बोलणं झालं आणि मनाला समाधान लाभलं. आश्रमाचा सारा परिसर सुंदर आहे. समोरच मैयाचं विशाल पात्र आहे. परिक्रमावासींची इथं उत्तम व्यवस्था केली जाते. खरंतर तिथून निघावसंच वाटत नव्हतं. अखेर तिथून निघालो आणि कठपोरला पोहोचलो.
कठपोरला पोहोचायला रात्रच झाली होती. तिथल्या विमलेश्वर मंदिराजवळच आमची व्यवस्था केली होती. रात्री २.३० वाजल्यानंतर समुद्र तरणासाठी निघायचं होतं. तोपर्यंत आम्ही त्याठिकाणी थांबलो होतो. सारं आवरुन साधारण सव्वा तीन वाजता आम्ही तिथून निघालो. विमलेश्वर मंदिराच्या बाजूनेच नावेपर्यंत जायचा लहानसा रस्ता आहे. जवळपास ३ किमी इतकं अंतर चालून जावं लागतं. किंवा छोट्या वाहनानेही जाता येतं. आमच्यापैकी काही जणं वाहनाने तर आमच्यासह काही जण चालत निघालो.
आम्ही सगळ्यांबरोबर चालायला सुरुवात केली. मिट्ट काळोख होता. रस्त्यावर एकही दिवा नव्हता.सारं अंतर अंधारातच चालायचं होतं. एवढंच काय जिथं नावा थांबल्या होत्या तिथही अंधारच होता. भ्रमणध्वनीच्या आणि छोट्या वाहनांच्या दिव्यांच्या उजेडातच सारी लगबग सुरु होती.
आम्ही चालायला सुरुवात केली आणि पुढच्या पाच मिनिटांतच माझ्या लक्षात आलं की बाजूने कुणीतरी चालतंय कारण अंधारात फक्त डोळे चमकत होते. अर्थात अंदाज आला होताच पण भ्रमणध्वनीच्या उजेडात बघितलं आणि दिसला एक छान काळ्या रंगाचाच एक श्वान. आमच्या बाजूनेच जणू काही आमची काळजी घेतच चालत होता तो. मधेच ७-८ पावलं पुढे जाई आणि थांबे, मधेच मागे पुढे असलेल्या सगळ्या लोकांच्या बाजूने चाले आणि परत आमच्याजवळ येई. जणू त्या मिट्ट काळोखात आमची काळजी घेण्यासाठी स्वयं श्री दत्तगुरुंनीच पाठवलं होतं त्याला. कारण आम्ही अगदी नावेत चढेपर्यत तो आमच्या जवळच उभा होता. आम्हाला नावे पर्यंत पोहोचल्यावर तास दिड तास रस्त्यावरच अंधारात थांबावं लागलं होतं. समुद्राच्या भरतीचं पाणी तिथं येईपर्यंत नावा निघू शकत नाहीत. पण तेवढावेळ आमचं रक्षण तो श्वान करत होता असंच म्हणायला हवं. वाटेत चालताना त्याने माझ्याकडून छान गोंजारुनही घेतलं होतं. आणि छायाचित्रही काढू दिलं होतं.
समुद्र तरण दिवसा होणार कि रात्री ते पौर्णिमा अमावास्या यावर ठरतं. १५ दिवस दिवसा आणि १५ दिवस रात्री समुद्र तरण होतं. आदल्या दिवशी किती लोकं समुद्र तरणासाठी आली आहेत ते नोंद करुन त्याप्रमाणे नावा सोडतात. आधी दलदलीसारख्या जागेतच नावा लागलेल्या असतात. भरतीचं पाणी हळूहळू चढायला सुरुवात झाल्यावर आमच्या नावाड्यांनी हाकारा केला आणि आम्ही नावेजवळ गेलो. जमिनीपासून नावेत जाण्यासाठी आधी थोडी तीव्र उताराची जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एवढीच वाट आणि पुढे थोडा बांबूच्या पट्ट्यांचा अरुंद साकव अशी स्थिती होती. त्यावरुन तोल सावरत भीतभीतच नावेत जाऊन बसलो. नांवेत अनवाणी पायाने चढावं लागतं. एकतर आपल्या जवळ पिशवीत चपला घ्यायच्या किंवा किनाऱ्यावरच सोडायच्या. आम्ही अर्थातच आधीच पिशवीत चपला काढून ठेवल्या होत्या. सारे नावेत बसल्यावर थोड्याच वेळात नाव निघाली. आणि सुरु झाला आमचा समुद्र प्रवास. अजूनही उजाडलं नव्हतं. त्यामुळे अंधारात समुद्र दिसत नसला तरीही आता आपल्या आजूबाजूला फक्त पाणी आणि अंधार आहे या विचारानेच मन थोडं अस्वस्थ होतं. पण थोड्याच वेळात पूर्वदिशेला सोनकेशर रंगाची पखरण होऊ लागली. आणि सहस्त्ररश्मीची स्वारी दिमाखात आकाशी अवतरु लागली.
अतिशय अप्रतिम दृश्य होतं ते. इतकं सुंदर दृश्य छायाचित्रात बध्द करण्यासाठी माझ्यासहित सगळ्यांचीच गडबड उडाली. रवीराजाचं प्रतिबिंब सागरात दिसू लागलं आणि सागराचं पाणीही चमचम करु लागलं. साऱ्या सृष्टीला जाग आली. आमच्या नावेवरुन खूप सारे समुद्रपक्षी उडू लागले. आणि मग सुरु झाला एक छान खेळ.आम्ही त्यांना खाऊ घालत होतो आणि आम्ही हवेत उंच फेकलेला खाऊ ते समुद्र पक्षी वरच्यावर चोचीत पकडत होते. खूपच छान वातावरण होतं. रात्रीचं अंधारातलं चालणं, कसरत करत नावेतलं चढणं, आजूबाजूला पसरलेला अथांग सागर सारं विसरुन सगळे नौकानयनचा छान आनंद घेऊ लागले.
मैया जिथे सागराला मिळते तो संगम आला आणि आम्ही आमच्या जवळच्या नर्मदा जलाच्या कुपीतलं थोडं जल संगमात ओतून तिथलं थोडं जल कुपीत घेऊन तीर्थमिलन केलं. संपूर्ण परिक्रमेत हे प्रत्येक ठिकाणी करायचं असतंच. जवळजवळ ४ तासांचा हा रत्नासागरातला प्रवास कधी संपला ते कळलंही नाही. आम्ही मिठी तलाईला पोहोचलो तिथं मात्र उतरायला व्यस्थित धक्का बांधलेला आहे. नावेतून उतरुन पायऱ्या चढून वर जाता येतं.






- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment