पाचव्या दिवशी मिठीतलाईला पोहचून सारं आवरुन मैयाची रोजची पूजा आरती केली. आणि भोजन करुन पुढे नारेश्वरला गेलो. हा श्रीरंग अवधुत महाराजांचा आश्रम. दत्तबावन्नीचे रचयिते. हे दर्शन घेऊन करणाली येथे मुक्कामास पोहोचलो.
कुबेर भंडारी हे करणाली मधील प्रमुख मंदिर. कुबेर हा देवांचा खजिनदार. ब्रम्हदेवांनी देवतांचा धनरक्षक म्हणून कुबेराची नियुक्ती केली होती. कुबेर हा विश्रवस ऋषींचा पुत्र आणि लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊ. एकदा माता पार्वतीचा देवी लक्षमी कडून अपमान होतो. तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांकडून सुखसंपन्न सोन्याची नगरी मागते. भगवान शिव सोन्याच्या नगरीची निर्मिती करुन धार्मिक विधींसाठी विश्रवस ऋषींना पाचारण करतात. पूजा संपन्न झाल्यावर विश्रवस ऋषींना दक्षिणा मागण्यास शिव सांगतात. ते दक्षिणेत आपल्या मुलांसाठी ती सोन्याची नगरी म्हणजेच सोन्याची लंका मागतात. शिव ती नगरी दान करतात. पार्वती माता चिडून 'तुझ्या मुलांच्या अहंकारात लंकेची राख होईल' असा शाप देते. पुढे विश्रवस ऋषी त्यातली अर्धी नगरी रावणाने कुबेराला द्यावी असं सांगतात. रावण अहंकाराने ते मान्य करत नाही. तेव्हा नारदमुनी कुबेराला नर्मदा तीरी शिव शंकराची घोर तपश्चर्या करायला सांगतात. त्यानुसार कुबेराने जिथे तपश्चर्या केली तेच हे कुबेर भंडारी मंदिर. याच बरोबर गायत्री मंदिर, गीतामाता मंदिर, सोमेश्वर मंदिर यांचं दर्शन घेतलं.
सहाव्या दिवशी सकाळी गरुडेश्वरला पोहोचलो. या स्थानी पूर्वी अति बलशाली असा गजासूर नांवाचा राक्षस रहात होता. त्याने गजाचे रुप घेऊन गरुडाशी युद्ध केलं. त्यात गरुडांनी त्याला मारलं. त्याची हाडं पर्वतावरच पडून राहिली. कालांतराने ती नर्मदेत वाहून आली. गजासुराने नर्मदेत राहून १०० वर्षं तप केलं. भगवान शिव प्रसन्न झाले. हवा तो वर माग म्हणाले. तेव्हा गजासूराने हे स्थान कुरुक्षेत्राप्रमाणे प्रसिद्ध व्हावं, इथं स्नान, पूजा करणाऱ्यांना पुण्य लाभावं असा वर मागितला. तसंच आपलं कातडं शिवाने धारण करावं आणि गरुडाच्या हातून मृत्यू झाला म्हणून आपलं नांव गरुडाबरोबर जोडून इथे वास करावा असं मागणं मागितलं. भगवान शंकरानी गजासूराला तसा आशीर्वाद देऊन लिंग स्थापन करण्यास सांगितलं. तेच हे गरुडेश्वर.
श्री दत्तात्रेयांचे उपासक प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे गरुडेश्वरी उतरले होते. ते इथं असल्याचं कळताच त्यांचे भक्तगण इथं येऊ लागले. नंतर इथं दत्तमंदिर स्थापन करण्यात आलं. या मंदिरात मध्यभागी श्री दत्तप्रभु त्यांच्या उजवीकडे प.पू. आद्य शंकराचार्य आणि डावीकडे विद्यादायिनी सरस्वती देवी आहे. या तीनही मुर्तींची प्रतिष्ठापना पू. ब्रम्हानंद स्वामींनी केली आहे. १९१४ मध्ये प.पू. स्वामीजींनी गरुडेश्वर मुक्कामी नर्मदा मैयाच्या कुशीत समाधी घेतली. त्यांनी समाधी घेतली तिथे समाधी मंदिर बांधण्यात आलं आहे. आणि त्यासमोरच त्यांच्या निर्गुण पादुकांचं मंदिर आहे. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत अशी श्रद्धा आहे त्यामुळे गरुडेश्वर हे दत्तभक्तांचं श्रध्दास्थान आहे.
सातव्या दिवशी सकाळी रात्रभराचा प्रवास करुन महेश्वर येथे पोहोचलो. महेश्वर हे पुराणकाळापासून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पुराणातील कार्तवीर्य अर्जुन या सोमवंशीय क्षत्रिय राजाची राजधानी म्हणून महेश्वरचे उल्लेख आढळतात. कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन या नावानेही रामायण आणि महाभारतात ओळखला जातो. एका पुराणकथेनुसार राजा आपल्या ५०० राण्यांसह नदीतीरी फिरायला गेला. राण्यांना क्रीडा करायची लहर आली. क्रिडेसाठी मोठी जागा हवी म्हणून सहस्रार्जुनाने आपल्या हजार बाहूंनी नर्मदेचा प्रवाह रोखला. त्याचवेळी आकाशमार्गे जाणाऱ्या रावणाने नदीचे कोरडे पात्र पाहिलं आणि शिवभक्त रावणाने तिथे शिवलिंग स्थापून पूजा सुरु केली. तेवढ्यात राण्यांची क्रिडा संपली आणि राजाने नर्मदेचा प्रवाह सोडून दिला. प्रवाहात शिवलिंग वाहून गेलं. संतापलेल्या रावणाने सहस्रार्जुनाशी युध्द आरंभलं. राजाने रावणाचा सहज पराभव केला. रावणाला जमिनीवर लोळवून त्याच्या प्रत्येक डोक्यावर एकेक दिवा ठेवला. त्याची आठवण म्हणून अजूनही महेश्वरच्या सहस्रार्जुन मंदिरात ११ दिवे लावण्याची प्रथा आहे. महेश्वरचं पुरातन नांव माहिष्मती असं होतं.
अठराव्या शतकाच्या अखेरीस महेश्वर अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी म्हणून नावारूपाला आलं. मल्हारराव होळकर यांच्या स्नुषा अहिल्यादेवी कुशल शासक म्हणून ओळखल्या जात असत. अगदी लहान वयात वैधव्य आल्यावर सासरे मल्हारराव यांच्या मार्गदर्शनाखाली महेश्वरच्या राज्यकारभाराची धुरा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी सांभाळली. त्यांच निवासस्थान असलेला वाडा साधाच पण मोठा होता. त्या वाड्यातलं त्याचं खाजगी देवघर ही वाड्याची खासियत. या देवघरात अनेक देवदेवतांच्या सोन्याच्या मूर्ती होत्या. आजही त्यातली झुल्यावर बसलेली बाळकृष्णाची सोन्याची मोठी मूर्ती आपल्याला पहायला मिळते. राजवाडा आणि राजगादीवरील अहिल्यादेवींची मूर्ती पहाताना तो सगळा काळ अक्षरशः डोळ्यासमोर उभा रहातो. आणि क्षणभर तरी प्रत्येक जण नतमस्तक होतोच. अहिल्यादेवी यांनी महेश्वरमध्ये अनेक मंदिरं आणि धर्मशाळा बांधल्या. श्री काशी विश्वेश्वर मंदिर बांधलं. महेश्वरसहित अनेक ठिकाणी अतिशय सुंदर नदीघाट बांधले. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट महेश्वरला आहेत. महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा मैया इथून जाते. अहिल्यादेवींनी सुरु केलेली एक धार्मिक परंपरा म्हणजे कोटी लिंगार्चन. त्यांचा असा विश्वास होता की स्ताला जे मिळालंय ते उदंड आहे. त्याहून अधिक मिळवण्याचा आपल्याला अधिकार नाही.
त्यामुळे प्रजेच्या सौख्याला त्यांनी जास्त महत्व दिलं. त्याचा एक भाग म्हणजे कोटी लिंगार्चन ही प्रथा. रोज १०८ ब्राह्मणांनी नर्मदेतील माती आणून १०८ पाटांवर प्रत्येकी १३२५ छोटी शिवलिंग शिवमहिम्न पाठ म्हणून स्थापन करायची. त्यांची विधीवत पूजा करायची. नंतर अहिल्यादेवी स्वतः त्या शिवलिंगाची पूजा करुन प्रजेच्या सौख्याची, रक्षणाची प्रार्थना करत. सायंकाळी ती सारी शिवलिंग नर्मदेतच विसर्जित करत असत. अजूनही ही परंपरा सुरु असून ११ पाटांवर ही शिवलिंग स्थापून पूजा, अभिषेक केला जातो. आणि प्रथेप्रमाणे सायंकाळी त्यांचं नर्मदेत विसर्जन केलं जातं.
महेश्वरची खासियत म्हणजे महेश्वरी साडी. अहिल्यादेवींनी महाराष्ट्रातून कारागिर बोलावून मराठी स्त्रिया परिधान करत असलेल्या साड्या विणण्यासाठी हातमाग उपलब्ध करुन दिले. कालांतराने या महेश्वरी साड्यांची ख्याती सर्वदूर पसरली. महेश्वर मधली मंदिरंही प्रसिद्ध आहेत. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर आणि अहिल्येश्वर ही मंदिरं आवर्जून पाहण्यासारखी आहेत.










- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment