Pages

Saturday, July 5, 2025

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ

अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ

चालती वारकरी सारे वाट पंढरीची

हाती टाळ अन गळा माळ तुळशीची

सदा करती मुखाने विठ्ठलाचे संकिर्तन

नाचती घेऊन डोईवरी तुळशी वृंदावन

कळत नाही चालताना कसे सरते अंतर

फेर, फुगड्या, रिंगण खेळती दमल्यानंतर

गावोगावी दुमदुमूतो विठ्ठलाचा नामघोष

स्वागत अन पूजनाचा उत्फुल्ल जल्लोष

अवघड दिवे घाटातून पार होती लिलया

जलद होती पाऊले सावळ्यास भेटाया

चंद्रभागे स्नान करुनी दर्शना उभे भक्त

नतमस्तक होता विठुचरणी मन होते तृप्त

- स्नेहल मोडक

Thursday, June 26, 2025

संगत

किलबिल पाखरांची

पहाटसमयी जागवते

उगवत्या दिनकरासंगे

नित्य चहापान ते रंगते

     आसपास येता पाखरे

     दाणापाणी तयास देते

     चिमण्या, बुलबुल, राघू

     दयाळ, नर्तक, चानी येते

टिपून दाणे उडती पाखरे

खेळात त्यांच्या मन रमते

असली जरी भाषा वेगळी 

भावना एकमेकांस कळते

     व्यस्त जीवनी दिनरातीस

     कधी संगतीस कुणी नसते

     एकलेपण मग जरी असले

     साथ पाखरांची सदा असते

आषाढस्य प्रथम दिवसे

जसे मेघदूत सहजच स्मरते

देत आदरांजली कालिदासांसी

संगतीत पाखरांच्या मन रमते

- स्नेहल मोडक

Thursday, June 19, 2025

नक्षी

पाऊस रेशीमधारेत बरसून जातो

रेजांवरती सुंदर खूणा ठेवून जातो

     मला भिजवाया तो खिडकीत येतो

     लोलक थेंबांचे खूपसे देऊन जातो 

जणू सुरेख मोत्याची माळ भासते

मंत्रमुग्ध होऊन मी ती पहात राहते

     मौक्तिकमाला छायाचित्रात साठवते

     काही क्षणांत थेंबांची नक्षी ओघळते

- स्नेहल मोडक



Monday, June 16, 2025

मृग

पाऊस मृगाचा बेधुंद बरसतो

मृदगंधाने सारा आसमंत भरतो

चंचल सौदामिनी नभी लखलखते

मेघमृदुंगासह मग आकाश गर्जते

छतावरी अवखळ पागोळी धावते

अन भुईवरी मग सुंदर तळे साचते

बेभान वाऱ्यात तरुवेल सळसळते

भिरभिरते पर्ण त्या जळात तरंगते

कुठे वळचणीस एक पाखरु थांबते

इवले काळीज मात्र त्याचे थरथरते

मृगधारेत तृषार्त अवनी तृप्त होते

कुशीत तिच्या अलवार बीज रुजते

खेळ हा सारा मी मुग्धपणे पाहते

तुषार झेलत तनुवरी मी मोहरते

ऋतू पावसाळा जरी नेमेची येतो

प्रत्यही नवाच अन हवासा वाटतो 

एकाचवेळी सर्वत्र सारखाच बरसतो

तरी प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो

- स्नेहल मोडक

Wednesday, June 11, 2025

साथ

केशर रंगात पश्चिमा नाहते

सांज अलवार नभी उतरते

सांजसावल्या गडद होती

पाखरे घरट्यात परतती

कोलाहल सारा शांत होतो

एक अनामिक हुरहुर लावतो

मन हळवे कातर कातर होते 

अन त्या राघूसम एकले उरते

थकला रावा जरा विसावतो

एकाकी मनास अबोल साथ देतो

- स्नेहल मोडक

Tuesday, May 27, 2025

आठवण

धुंद पहाटे धुक्याची दाट दुलई ओढताना

पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकताना

  येईल का माझी आठवण 

पूर्वदिशेची सहस्ररश्मीची स्वारी दिसताना

गवतावर चमचमणारे दवबिंदू पहाताना

  येईल का माझी आठवण 

इवली फुलं पहात रानीवनी फिरताना 

विहरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे दिसताना

  येईल का माझी आठवण

शुभ्र मोगऱ्याचा मादक गंध अनुभवताना

नाजूक रातराणीच्या गंधाने रात्र मोहरताना

  येईल का माझी आठवण

शांत बसूनी गीत झऱ्याचे ऐकताना

चित्र मनातले कुंचल्याने रेखताना

  येईल का माझी आठवण

सागरतीरी फेसाळत्या लाटा बघताना

ओल्या वाळूवर पावलांचे ठसे उमटताना

  येईल का माझी आठवण

कधी अतीव आनंदाच्या क्षणी फुलताना

कधी अव्यक्त एकाकीपण जाणवताना

  येईल का माझी आठवण

  येईल का माझी आठवण

- स्नेहल मोडक

Friday, May 16, 2025

नभांगण

निसर्ग कुंचला

आकाश कागद

कुंचला फिरतो

सप्तरंग सांडतो

गुलाबी जांभळा 

पांढरा निळा

केशर पिवळा 

सुंदर रंगछटा

आभाळ रंगते

रंगरेषा बदलते

मन रंगविभोर

तरल भावरंग

मनमोहक मेघ

रंगमय नभांगण

- स्नेहल मोडक


 

  

Saturday, May 3, 2025

सोहळा

उमलती पहाट

कोवळा प्रकाश

सकाळचे सहा

मी माझ्या खिडकीत

आतुरता आगमनाची 

उगवतीवर केशर

तळाशी मेघसावळा

खगांची उडती नक्षी

किंचित केशरकोर

अलवार कोर वरती

केशरवर्तुळ पूर्ण 

मी फक्त मंत्रमुग्ध 

तरल मेघातून वर

क्षणांत कनकगोल

सोहळा सृजनाचा

नित्य नवा अनुभव 

नित्य नवा अनुभव 

- स्नेहल मोडक



Wednesday, April 23, 2025

पहाटवारा

काजळ निशेचे फिकट जाहले
झुंजूमुंजू झाले ग झुंजूमुंजू झाले
घरट्यातूनी सारे विहग जागले
किलबिलाटे सृष्टीस जागविले
पहाटवारा शीतल झुळकला
आसमंत अवघा शिरशिरला
पूर्वेस किंचित केशर उजळले
कुजन कोकिळेचे सुरु जाहले
रविराज आकाशी अवतरले
सोनकिरण सृष्टीवर पसरले
चराचर अवघे जागे जाहले
पहाटवारा पिऊनी सुखावले
पहाटवारा पिऊनी सुखावले
स्नेहल मोडक

Wednesday, April 16, 2025

उत्तर वाहिनी

             'चैत्र महिना' आणि 'उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा' हे एक वेगळंच अध्यात्मिक समीकरण आहे. 'पश्चिम वाहिनी नर्मदा मैया' काही ठिकाणी 'उत्तर वाहिनी' होते. आणि त्या भागात तिची चैत्र महिन्यात केलेली परिक्रमा ही संपूर्ण पायी परिक्रमेइतकीच पुण्यदायी असते. त्यामुळे नर्मदा मैयाचे सारे भाविक चैत्र महिन्याची आतुरतेनं वाट पहात असतात. कारण सर्वच भक्तांना मैयाची ३२०० किमीची परिक्रमा पायी करणं शक्य होत नाही. 'तिलकवाडा' ते 'रामपुरा' या भागात ही 'नर्मदा मैया' उत्तर वाहिनी होते. म्हणून या भागात तिची परिक्रमा केली जाते. 

               आम्हीही दरवर्षी प्रमाणे ९ तारखेला रात्री परिक्रमेसाठी प्रस्थान केलं. भल्या पहाटे वडोदरा इथं पोहोचलो. तिथं आमच्या दोन्ही मोठ्या गाड्या तयारच होत्या. त्या गाडीमधून आम्ही दिड तासातच आमच्या मुक्काम स्थानी पोहोचलो. मुक्कामी पोहोचून थोडं ताजतवानं होऊन लगेचच जवळच असलेल्या त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेलो. हे स्नानासाठीचं आमचं आवडतं स्थान. इथं 'नर्मदा मैया', छोटा उदयपूर येथून येणारी 'ओरसंग नदी' आणि 'गुप्त सरस्वती' असा त्रिवेणी संगम आहे. इथं आम्ही संगमजलात उतरलो, जळात थोडी मजा मस्ती करत मस्त स्नान केलं. नर्मदा मैयाच्या कुशीत शिरल्यावर येणारी अनुभूती ही वेगळीच असते. अगदी आपल्या आईच्या कुशीत शिरल्यावर ज्या भावना आपल्या मनात येतात त्याच भावना नर्मदा जळात उतरल्यावर असतात. त्यामुळं पाण्यातून बाहेर यायची इच्छा नसतानाही स्नान करुन मुक्कामी आलो. सारी तयारी करुन उत्तर वाहिनी परिक्रमा पूर्ण व्हावी यासाठी स्नान करुन येतानाच कुपीत भरुन आणलेल्या नर्मदा जलाची विधीवत संकल्प पूजा केली. पूजा करुन नाश्ता केला आणि परत दोन्ही गाड्यांनी मंदिर दर्शनासाठी निघालो.

                 सर्वात आधी आम्ही  बडोदा - राजपिपला मार्गावर नंदोड तालुक्यातील एका मंदिरात गेलो. 'श्री क्षेत्र गरुडेश्वर' हे वासुदेवानंद सरस्वती यांचं समाधी स्थान. या मंदिरात त्यांच्या पादुका आहेत तसंच श्री दत्तात्रेयांचं मंदिर आहे. नर्मदा मैयाच्या किनारी असलेल्या या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढं निघालो. तिथून आम्ही 'शुलपाणी' इथं पोहोचलो. इथल्या प्राचीन 'शुलपाणेश्वर' मंदिराची निर्मिती पांडवांनी केली असल्याचे उल्लेख महाभारतासह स्कंदपुराणात आढळतात. मात्र १९९४ मध्ये सरदार सरोवर प्रकल्पामध्ये हे मंदिर पाण्याखाली गेलं. त्यामुळं नंतर सध्या अस्तित्वात असलेलं नूतन मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिरात श्री महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढं निघालो.

                  'भालोद' एकमुखी श्री दत्तात्रेयाचं मंदिर आणि श्री प्रतापे महाराजांचा आश्रम. आमचं हे अतिशय आवडतं स्थान. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आम्ही भालोदला जातोच. इथं श्री दत्तात्रेयांच्या दर्शनानं जसं अतीव समाधान मिळतं तसंच श्री प्रतापे महाराजांना भेटल्यावरही छान सकारात्मक उर्जा मिळते. त्यामुळं इथं जाणं आमच्यासाठी खासच असतं. आम्ही इथं गेल्यावर आधी श्री दत्तगुरुंचं दर्शन घेतलं, तिथच समोरच्या औदुंबर वृक्षाच्या खोडात उमटलेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या चरणपादुका असलेल्या मोठ्या हाॅलमध्ये येऊन बसलो. ज्यांच्यांसाठी आम्ही तिथं थांबलो होतो ते श्री प्रतापे महाराज पाचच मिनिटांत तिथं येऊन स्थानापन्न झाले. त्यांना नमस्कार करुन आमचा संवाद सुरु झाला. आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ तारखेला पहाटे उत्तर वाहिनी परिक्रमा करणार असल्याचं त्यांना सांगितलं. १९४३ साली श्री जयराम दासजी ( तपस्वी बाबा) यांनी उत्तर वाहिनी परिक्रमा सुरु केली होती पण ही दासजी यांनी सुरु केलेली उत्तर वाहिनी परिक्रमा काही कारणवश बंद झाली होती. नंतर श्री प्रतापे महाराजांनी ती परत सुरु केली. त्यामुळं त्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधायला आम्हाला नेहमीच आवडतं. दरवेळी नवीन अध्यात्मिक माहिती त्यांच्याकडून मिळते. त्यांच्याशी बोलत असतानाच अजून एका छानशी घटना घडली. सायंकाळ झाली होती आणि त्याच्या आगमनाचीही वेळ झाली होती. अचानक बाहेर पायरीशी मयुराचा केकारव ऐकू आला. आणि आमच्याशी  बोलता बोलता महाराज उठले आणि त्या मयुराला बोलवू लागले. आम्ही सगळे थोडं लांब होताच त्या मयुराने अतिशय डौलाने आश्रमात प्रवेश केला. त्याला पादुकांच्या थोडं जवळच महाराजांनी खायला घातलं ते तो अगदी तल्लीन होऊन खाऊ लागला. रोज सकाळ संध्याकाळ न चुकता हा मयुर त्या आश्रमात येतो. हे आम्हाला माहित होतंच. पहिल्यांदा आश्रमात गेलो तेव्हा आम्हाला त्या मयुराचं दर्शन बाहेरच घडलं होतं. पण यावेळी मात्र प्रत्यक्ष आश्रमात अगदी जवळून त्याला पहाता आलं. अतिशय सुंदर असा अनुभव होता तो. कदाचित आम्ही बरेच जणं तिथं असल्यानं तो फार आतपर्यंत न येता खाणं खाऊन निघून गेला. पण अगदी जवळून आम्हाला हे सुंदर दृश्य पहायला मिळालं आणि खूपच आनंद झाला. नंतर महाराजांना त्यांच्या सुरु असलेल्या कार्यासाठी नेहमीप्रमाणं आमच्या कडून खारीचा वाटा अर्पण केला. मी त्यांच्या आश्रमात वारंवार होणाऱ्या कन्या पूजनात कन्यकांना देण्यासाठी काही वस्तू नेल्या होत्या. त्या महाराजांना देताच त्यांनी दोनच दिवसांनी कन्या पूजन होणार आहे तेव्हा त्या वस्तू कुमारिकांना देईन असं सांगितलं आणि मला खूपच समाधान वाटलं. कारण त्यामुळं मैयाच्या चरणी माझी सेवा रुजू होणार होती. परत एकदा दर्शन घेऊन महाराजांचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो. रात्री मुक्कामाच्या ठिकाणीच भोजन करुन लगेच निद्रादेवीच्या आराधनेसाठी गेलो. 

                    रात्री २ वाजता उठून आन्हिकं आवरुन बरोबर ३ वाजता गाडीने जिथून परिक्रमा सुरु करणार तिथं म्हणजे 'वासुदेव कुटिर' इथं निघालो. अर्ध्या तासात तिथं पोहोचलो. श्री मारुतीराया आणि श्री वासुदेवानंद सरस्वती यांच दर्शन घेऊन ४.१५ वाजता प्रत्यक्ष परिक्रमेला सुरुवात केली. 'तिलकेश्वर महादेवाचं' आणि पुढे नर्मदा मैयाचं  दर्शन घेऊन पुढं निघालो आणि हळूहळू परिक्रमा मार्गातले बदल जाणवायला लागले. गतवर्षी थोड्या सुधारणा झाल्याच होत्या. परिक्रमेचा सुरुवातीचा थोडा मार्ग म्हणजे डांबरी सडक आणि दोन्ही बाजूनी दाट हिरव्यागार केळीच्या बागा असा आहे. पण पुढं जेव्हा तो मार्ग नदीकाठी उतरतो तेव्हा सुरुवातीची काही वर्षं उंचसखल मार्ग होता. म्हणजे अक्षरशः एक पाऊल उंचावर एक पाऊल खाली असं कसरत करत चालावं लागायचं. पण गतवर्षी हा मार्ग थोडा सपाट केला होता आणि यावर्षी तिथं नीट रस्ताच तयार केलाय. त्यामुळं आता पूर्ण उत्तरतटावरची परिक्रमा सहज सोपी झालीय. मैयाच्या किनाऱ्याजवळून मैयांचं सुंदर रुप पहात, नामस्मरण करत, मधेमधे मैयाशी मनोमन संवाद करत, पहाटेची नीरव शांतता अनुभवत मी सगळ्यांबरोबर चालत होते. नर्मदा मैयाचं 'मगर' हे वाहन आहे. या मगरीचंही छान दर्शन आम्हाला नदीपात्रात घडलं. उत्तरतटावरची परिक्रमा पूर्ण करत आम्ही 'नंदी घाटा'वर पोहोचलो आणि खूप छान दृश्य पहायला मिळालं. 'नंदीघाटा' वर आधी भव्य अशी नंदीची मूर्ती होती ती २०२३ साली आलेल्या पूरात वाहून भंगून गेली होती. आता यावर्षी तिथं बारा मोठ्ठी ज्योतिर्लिंग ठेवण्यात आली आहेत. 

               यावर्षी गुजरात सरकारनं परिक्रमा मार्गावर खूप छान सुविधा निर्माण केल्या आहेत. मार्ग / रस्ता तर नीट केलाच आहे. पण जिथं तट परिवर्तन केलं जातं तिथं दोन्ही बाजूला खूपच भव्य तंबू उभारले आहेत. आतमध्ये खूप साऱ्या खुर्च्या, पंखे, प्यायचं पाणी अशी सुंदर व्यवस्था भाविकांसाठी केली आहे. तसंच छोट्या तंबूमध्ये नर्मदा स्नानाची व्यवस्था केलीय. नदीपात्रात बऱ्याच मगरी असल्यानं आता सुरक्षेच्या कारणास्तव नर्मदेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांना उतरु देत नाहीत. आम्ही ११ तारखेला परिक्रमेत होतो. त्याच्या आदल्याच सायंकाळी एका स्थानिक मच्छीमाराला पात्रातल्या मगरीनं गिळंकृत केलं होतं. त्यामुळं दुसऱ्या दिवशी पोलिस तिथं फारच लक्ष ठेवून होते. त्यामुळं नदीपात्रात उतरुन स्नान करण्याची संधी कुणालाच मिळाली नाही. तट परिवर्तन करण्यासाठी नावेतून पलिकडल्या तीरावर जावं लागतं. आम्हीही दोन नावांमधून पलिकडे पोहोचलो. त्यासाठी आम्हाला बिलकुल थांबावं लागलं नाही. यावेळी खूप गर्दी नव्हती. आम्ही नावेतून जात असताना सहस्त्ररश्मीचं आगमन झालं आणि मैयाचं जल केशररंगात चमकू लागलं. जेमतेम १० मिनिटांचा प्रवास पण  खूप छान वाटत होता. परिक्रमेला जातान आम्ही आदल्या दिवशी संकल्प पूजन केलेल्या नर्मदा जलाच्या कुपी बरोबर घेतल्या होत्या. त्यातलं थोडं जल नदीपात्रात अर्पून परत त्यात थोडं 'नर्मदा जल' भरुन घेतलं. याला 'तीर्थमिलन' असं म्हणतात. नावेतून पलिकडे आम्ही दक्षिण तटावर पोहोचलो. 

                   दक्षिण तटावरचा परिक्रमेचा बराचसा मार्ग डांबरी रस्त्यावरुनच आहे. इथं पोहोचेपर्यंत  दिवस छान उजळला होता. त्यामुळं या मार्गावर ठिकठिकाणी सेवा म्हणून साऱ्या भाविकांना लोकं आपापल्या परीनं चहा, नाश्ता, सरबत, ताक, पाणी, फळं हे सारं देत होते. अधमधे थांबत प्रसाद म्हणून घोटभर चहा किंवा भांडपर ताक पीत आम्ही पुढं चालत होतो. अखेरच्या सिताराम बाबांच्या आश्रमात पोहोचून तिथं जरासा प्रसाद घेऊन आम्ही परत पायऱ्या उतरुन नर्मदा मैयाच्या किनारी गेलो.‌ इथं उतरल्यावर जवळपास दोन किमीचा मार्ग पूर्णपणे नदीपात्रातील दगडगोट्यांमधून पार करावा लागतो. पण यावेळी इथंही छान रस्ता तयार करण्यात आलाय. त्या रस्त्यावरुन चालत आम्ही पुलाजवळ पोहोचलो. पूर्वी इथूनही तट परिवर्तनासाठी नावेतूनच जावं लागायचं. पण गतवर्षीपासून इथं पूल तयार करण्यात आलाय. इथही दोन्ही बाजूला गुजरात सरकारनं भव्य तंबू उभारले आहेत आणि त्यात भाविकांना आराम करण्यासाठी खुर्च्या, पंखे उपलब्ध करुन दिलेत. तसच इथंही छोट्या छोट्या तंबूमध्ये नर्मदा स्नानाची व्यवस्था केली आहे. आम्ही या तंबूमध्ये एकत्र बसून थोडावेळ विश्रांती घेतली गप्पा मारल्या आणि पूल पार करुन वासुदेव कुटिर कडे निघालो. इथंही नदीपात्रातल्या दगडगोट्यांमधून जावं लागायचं तिथंही छान मार्ग केलाय. वासुदेव कुटिर किनाऱ्यापासून थोडं उंचावर आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात. पण त्यापुढं मात्र घसरणाऱ्या मातीची उंच चढण चढावी लागते. आणि तिथं मला भीती वाटतेच. अक्षरशः भीतभीत, याचा आधार घेत ती चढण मी एकदाची पार करते आणि सुटकेचा निःश्वास सोडते. एकदाचा हा रस्ता पार करुन अखेर आम्ही वासुदेव कुटिरच्या प्रांगणात पोहोचलो. मंदिरात जाऊन तिथल्या महादेवाला बरोबरचं थोडं नर्मदा जल अर्पण करुन परिक्रमा पूर्ण केली. त्यानंतर वासुदेव कुटिरच्या समोरील मंडपातच कन्या पूजन केलं. सर्वजण परिक्रमा पूर्ण करुन आल्यावर परत गाडीने मुक्कामी पोहोचलो. लगेच तयारी करून परिक्रमा पूर्तीची म्हणजेच संकल्प पूर्तीची पूजा केली. यावेळी गर्दी कमी असल्यानं आणि लवकर सुरुवात केल्यानं आमची परिक्रमा अतिशय उत्तम रीतीनं पूर्ण झाली होती.

                      नर्मदा मैयानं आम्हा सर्वांना अतिशय सहज सुंदर परिक्रमा घडवली होती. मैयाया आशीर्वादानं आमच्या बरोबर असलेल्या काही ज्येष्ठ भाविकांनाही अगदी सहज, आनंदात ही परिक्रमा पूर्ण करता आली. अशा परिक्रमेच्या निमित्तानं एक सुंदर अध्यात्मिक तृप्ती आपल्याला मिळते एवढं मात्र खरं. 

                      संकल्प पूर्ती ची पूजा करुन, भोजन करुन आवरुन मुक्कामाचं ठिकाण सोडून आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली. गांधीनगर रेल्वे स्टेशन वर आम्ही पोहोचलो. स्टेशनपासून हाॅटेल लांब असल्यानं रात्रीचं भोजन तिथूनच घेऊन येऊन ट्रेनमध्ये च खाल्लं. भोजन करुन निद्राधीन झालो. अर्थात मला निद्रादेवी प्रसन्न होणं अशक्यचं होतं. कारण आता मला वेगळीच ओढ लागली होती. 

                      भल्या पहाटे आम्ही जूनागढ स्टेशन वर उतरलो. तिथून रिक्षानं तलेटीला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. वाटेत कळलं रोप वे आदल्या दिवसापासून बंद आहे. आजही सुरु होण्याची शक्यता कमी आहे. झालं, सगळ्यांच्या मनात चलबिचल सुरु झाली. पण माझं मन एकदम शांत होतं. सारी आन्हिकं आवरुन आम्ही दर्शनासाठी निघालो. 'हनुमान जयंती' असल्यानं 'लंबे हनुमानजी'च्या मंदिरात खूप गर्दी होती. नुकताच जन्मसोहळा झाला होता. पण आम्हाला सगळ्यांनाच अतिशय छान दर्शन मिळालं. नित्याप्रमाणे मारुतीरायाचं दर्शन घेऊन, प्रार्थना करून आम्ही पहिल्या पायरीचं दर्शन घ्यायला गेलो. पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोप वे जवळ गेलो. तिथं रोप वे ची ट्रायल सुरू होती. वारा नसेल तर तात्पुरता रोप वे सुरू करण्यात येईल असं आम्हाला सांगण्यात आलं. दहा पंधरा मिनिटांतच रोप वे सुरू होणार आहे असं सांगून ज्यांनी आधी तिकिटं काढली होती त्यांनाच रोप वे साठी प्रवेश देण्यात आला. पुढच्या दहा मिनिटातच आम्ही ट्रॉलीत बसलो. पायथ्याशी वातावरण जरी अगदी साधं असलं तरी वर गिरनार वर मात्र परिस्थिती वेगळीच होती. सन्नाट वारा वाहत होता आणि आमची ट्रॉली अतिशय हळूहळू वर जात होती. ट्रॉलीतून जाताना पायथ्याशी असलेल्या जंगलात बरेचदा अनेक मोर दिसतात तसे आम्हाला चार-पाच मोर पाहायला मिळाले. ट्रॉली थोडीशी वर गेली आणि एकदम धुकं दाटलं. सन्नाट वारा आणि आजुबाजुला पसरत चाललेलं दाट धुकं, छानच वातावरण होतं. ट्रॉलीतून उतरून अंबामातेच्या मंदिराशी पोहोचलो आणि मंत्रमुग्ध होऊन पहात राहिलो. सगळीकडे 'नभ उतरु आलं' अशी शुभ्र नभाची दुलई पसरली होती. अगदी जुलै, ऑगस्ट मध्ये असतं तसं दृश्य होतं. या परिस्थितीत रोपवे मात्र कुठल्याही क्षणी बंद होऊ शकत होता. पण मनात कुठलीही आशंका न येता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. गोरक्षनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन परत पुढे श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाला निघालो. इथंही कशी कुणास ठाऊक पण फार गर्दी नव्हती. आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि इतकावेळ पापण्यांआड अडवलेलं पाणी ओघळलंच. कारण तब्बल तीन महिन्यांनी श्री दत्तगुरुंचं दर्शन घडलं होतं.‌ बरोबर नेलेलं सारं अर्पण केलं आणि नतमस्तक झाले. यावेळचं हे दर्शन आमच्यासाठी जरा जास्तच महत्वाचं होतं. कारण दत्तगुरुंनी माझी एक इच्छा अनपेक्षितपणे जशीच्या तशी पूर्ण केली होती. साहजिकच त्यांच्या दर्शनासाठी मन आसुसलं होतं. दर्शन घेऊन तृप्त, शांत मनानं आम्ही मंदिरातून बाहेर येऊन थोडं खाली उतरुन तिथल्याच एका ठिकाणी बसून नेहमीप्रमाणं थोडं गुरुचरित्राचं वाचन केलं. नंतर अखंड धुनीचं दर्शन, प्रसाद घेऊन परत निघालो. गोरक्षनाथांचं परत दर्शन घेऊन अंबामातेचही दर्शन घेतलं. रोप वे जवळ आलो तर तिथले कर्मचारी घाईने निघायला सांगत होते. वारा फारच वाढल्यानं रोप वे बंद करावा लागणार होता.आम्ही ट्राॅलीत बसलो पण ती हळूहळू च जात होती. थोडं पुढे जाऊन दोन - तीन मिनिटं थांबलीच. वारा फारच जोरदार होता. पण अखेर संथगतीने ट्राॅल पायथ्याशी पोहोचली. नेहमी सारखं  दर्शन घेऊन ११ वाजता पायथ्याशी आलो होतो. श्री दत्तगुरुंच्या कृपेनं रोप वे जाऊन येऊन बिलकुल त्रास न होता अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. 

                   मुक्कामी थोडा आराम करुन दुपारी २ वाजता परत दोन मोठ्या गाड्यांनी निघून नाग मंदिर, भालका तीर्थ, गीता मंदिर, त्रिवेणी संगम आणि सोरटी सोमनाथचं दर्शन घेऊन वाटेतच ठरलेल्या हाॅटेलमध्ये जेवून मुक्कामी परत आलो. 

                   दुसऱ्या दिवशी दुपारी परतीच्या प्रवासाला लागलो.

                   खरंतर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा, गिरनार हे आमच्यासाठी नेहमीचंच आहे. पण तरीही प्रत्येक वेळी सुंदर अनुभव येतात आणि मग लेखणीतून व्यक्त व्हावंसं वाटतंच. यावेळी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेत भाविकांसाठी महाकुंभाच्या धर्तीवर खूपच छान व्यवस्था करण्यात आली होती. परिक्रमेचं हे बदलतं रुप पाहून खरंच खूप छान वाटलं. असही ही परिक्रमा गिरनारच्या तुलनेनं सोपी होतीच पण यावेळी ती अधिकच सहज सुलभ झाली. मैयानं आम्हाला  खरंच खूप छान परिक्रमा घडवली. पण त्यानंतर गेलेल्या आमच्या दुसऱ्या मोठ्या ग्रुप ला मात्र प्रचंड गर्दीचा त्रास झाला. त्यांनी १३ तारखेला परिक्रमा केली. त्यादिवशी तट परिवर्तनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे नावेतून पलिकडे जाण्यासाठी किमान तीन तास वाट पहावी लागत होती. म्हणून तटपरिवर्तनासाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तसंच यावर्षी संपूर्ण परिक्रमा मार्गावर पूर्वीपेक्षा जास्त विद्युत दिवे, व्यवस्थित रस्ता यामुळे रात्रीही भाविक परिक्रमा करत आहेत. उत्तरोत्तर भाविकांची वाढत जाणारी संख्या आणि त्या दृष्टीने गुजरात सरकारनं त्यांच्यासाठी केलेली व्यवस्था कौतुकास्पद. आता ही २१ किमी. अंतराची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा खरंच सहज सुलभ झाली असल्यानं प्रत्येकानं एकदा तरी हा अनुभव घ्यावाच. अर्थात परिक्रमेत नुसतं चालणं हा उद्देश नसावा. त्या परिक्रमेत मैयाच्या जास्तीत जास्त सहवासात रहावं, मनानं तिच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न करावा तरच ती खरी परिक्रमा ठरेल हे नक्की.

|| त्वदिय पादपंकजम् नमामि देवी नर्मदे ||

- स्नेहल मोडक

  








Thursday, April 3, 2025

अंतर्मन

प्रचंड उलथापालथ सुरु झालीय

परत एकदा अंतर्मनाच्या गाभाऱ्यात 

बदलतायत विचार अगदी क्षणोक्षणी 

हवंच असं काही क्षणात नकोसं होतं 

कुठलाच निर्णय योग्य वाटत नाहीय 

प्रपंच आणि परिवारात असुनही

मन मात्र विरक्तीकडेच धाव घेतय

दिवस सरतो कसाबसा कामात

रात्री गडद वादळात गुरफटतात 

सुखाच्या क्षणीही मन भरकटतय

काही कळत नाही असं का होतय

महाकुंभातल्या डुबकीचा परिणाम 

कि जड झालेलं अनुभवांचं गाठोडं

माहित आहेत यासाठी काही उपाय 

तरीही हे सारं असंच स्विकारलय

जसं नदीचं पाणी कधी गढुळलं तरी 

गाळ तळाशी बसल्यावर स्वच्छ होतं

अगदी तसंच अंतर्मनातलं वादळही

काही काळानं आपोआप शांत होतं

व्यक्त होते भावना जशी लेखणीतून 

शांत होते मन तसच नामस्मरणातून

घडतंच हे कधी प्रत्येकाच्या आयुष्यात 

कुणी लौकिकात कुणी विरक्तीत जगतात

- स्नेहल मोडक

Friday, March 21, 2025

स्पर्श

स्पर्श होताच पावलांस जळाचा

शिरशिरी हलकेच तनुवरी उठते

     स्पर्श होताच वीणेस अंगुलीचा

     सप्तसूरात सुमधुर ती झंकारते

स्पर्श होताच कलिकेस वाऱ्याचा

अलवार मधुगंधी सुमन उमलते

     स्पर्श होताच रंगास कुंचल्याचा

     सुरेख सप्तरंगी रचना साकारते

स्पर्श होताच शब्दांस भावनांचा

तरल मनभावन कविता उमलते

     स्पर्श होताच मनास ईशभक्तीचा

     आयुष्याचे सहजच सार्थक होते

- स्नेहल मोडक

Sunday, February 23, 2025

कोपरा

कोपरा मनाचा हळूच उलगडतो

अलगद भूतकाळात घेऊन जातो

      आठवणींचा खजिना समोर येतो

      सुखद क्षणांचा गंध मनी दरवळतो

स्वप्नपूर्तीचे स्मित अधरावर उमलते

अपुऱ्या स्वप्नांनी हळवे मन कातरते

      नात्याचे मैत्रीचे भावबंध आठवतात

      स्नेह माया मानपान पिंगा घालतात

आठवणींचा गोफ अलगद विणतो

सोडवाया मात्र सवे कुणीच नसतो

      पर्वा आपल्या मनाची कुणास नसते

      मैत्रीचे रेशमी वस्त्रही विरलेले दिसते

एकांतातला हा खजिना नकोसा वाटतो 

पापणीआड आसू रोखून कोपरा मिटतो

                   स्नेहल मोडक 


Tuesday, February 18, 2025

महाकुंभ स्नान २०२५

                'महाकुंभमेळा' १४४ वर्षांनी आलेली ही महापर्वणी. दि. १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ या काळात 'प्रयागराज' इथं होणाऱ्या महाकुंभाची तयारी सरकारने खूप महिने आधीपासून सुरु केली होती. आंतरजालावरुन आपल्याला याबद्दलची माहिती मिळत होती. प्रत्यक्ष कुंभमेळा सुरु होण्यापूर्वी काही दिवस आधीच वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू संत, अघोरी साधू, नागा साधू, किन्नर यांच्या आखाड्यातले साधू यांचं मिरवणुकीनं आगमन होऊ लागलं. आणि हळूहळू या महाकुंभाची भव्यता जाणवू लागली. महाकुंभाविषयी आंतरजालावरुन सतत सामोऱ्या येणाऱ्या बातम्या आणि अनेक चित्रफिती यामुळं याची व्याप्ती, अतिभव्यता आणि त्याचवेळी तिथं साधूसंतांच्या खूप मोठ्या लवाजम्यासह येणाऱ्या करोडो भाविकांसाठी करण्यात आलेली उत्तम व्यवस्था याची माहिती मिळत होती. प्रत्यक्ष महाकुंभ मेळा सुरु झाला, पहिलं शाही स्नान झालं आणि त्यादिवशी त्रिवेणी संगमावर करोडो भाविकांनी साधुसंतांसमवेत कुंभस्नान केलं आणि हळूहळू आपणही या पर्वकाळातच कुंभस्नानाला जावं अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. मधल्या काळात अतिप्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी यामुळं संगमावर पोहोचण्यासाठी भाविकांंना लागणारा खूपच वेळ, कितीतरी किलोमीटर पायी चालावं लागणं अशा बातम्या सातत्यानं येत होत्या. पण आपणही जायचच ही माझी ठाम इच्छा होती.

               शाही स्नान आणि अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्याच होत्या. या तारखांच्या दरम्यान भाविकांची होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी हे सारं टाळून मधल्या काळात आपण कुंभ स्नानाला जायचं असं ठरवलं. मी लगेच विमान प्रवासाच्या तिकिटांची माहिती घेतली. त्यादिवशी विमानाचे तिकिटदर फार वाढलेले नव्हते. तिथली सगळी परिस्थिती पाहता सुरुवातीला आम्ही फक्त पाच सहा जणांनीच कुंभस्नानाला जायचं ठरवलं होतं. आम्ही लेकीसह तिघंजणं नक्की जाणार होतो पण बरोबरच्या दोघा-तिघांचं जायचं नक्की होईपर्यंतच्या दोन दिवसात विमानाच्या तिकिटांचे दर एकदम वाढले. प्रयागराजमधली एकूण परिस्थिती पाहता पाच-सहा जणांनी कारने एवढ्या लांबचा प्रवास करणं याला जरा अवघडच वाटत होतं. त्याचवेळी त्या दोन दिवसांत याच्या ऑफिस मधील काही सहकारी मित्रांनी कुंभ स्नानाला जाण्याविषयी विचारणा केली. असंही विमानाची तिकीटं महाग झालीच होती. मग दुसऱ्या पर्यायचा विचार आम्ही सुरू केला. रेल्वेचीही तिकीटं उपलब्ध होत नव्हती. मग १७ सीटर ट्रॅव्हलर घेऊन एवढा मोठा प्रवास करायचा असा विचार सुरू झाला. सारं ठरवत असतानाच अजूनही काही जणांनी कुंभ स्नानाला येण्याची इच्छा व्यक्त केली. मुळात आम्ही पाच सहा जणांनीच कुंभ स्नानाला जायचं असं ठरवलं होतं पण मग गिरनार परिक्रमेसारखंच 'कारवाॅ बनता गया' आणि अखेर ४० सीटर बस घेऊन प्रयागराजला जायचं नक्की केलं. प्रवासाची तारीख आणि बसही ठरवली, प्रयत्नांती वाराणसी आणि प्रयागराज मध्ये मुक्कामासाठी व्यवस्था ही केली.

               ठरल्याप्रमाणं ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता 'श्री दत्तात्रेय' आणि 'श्री गणराया' यांच्या आशीर्वादानं साऱ्या भाविकांसह आम्ही 'प्रयागराज' ला प्रस्थान केलं. दुसऱ्या दिवशी दुपारी साधारण सव्वा बारा वाजेपर्यंत आमचा प्रवास अतिशय सुरळीत पार पडला. सव्वा बारा वाजता मात्र आमची बस वाहतूक कोंडीत अडकली. अखेर दोन तासानं पुढे प्रवास सुरू झाला आणि आम्ही सायंकाळी साडेतीन पावणेचारला 'वाराणसी' येथे पोहोचलो. प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळं मोठ्या बसेसना शहरात प्रवेश नव्हता. आम्ही आमची बस पार्किंग लॉटमध्ये उभी केली आणि तिथून रिक्षानं ४ किमी अंतरावर असलेल्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. एव्हाना सायंकाळचे ४.१५ वाजून गेले होते. हाॅटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांनी आम्हा सगळ्यांना सुगंधी गजरा, पाणी आणि सरबत देऊन अतिशय छान स्वागत केलं. रुममध्ये जाऊन सारं आवरुन लगेच दर्शनासाठी निघायचं असं ठरवलं. 

                  साऱ्यांचं आवरून निघेपर्यंत सव्वा सहा वाजले. मग आधी 'गंगा आरती' पहायची ठरवून रिक्षानं 'अस्सी घाटा'वर गेलो. घाटावर पोहोचलो आणि कळलं की  प्रचंड गर्दीमुळे 'गंगा आरती' स्थगित करण्यात आली आहे. या वेळपर्यंत पूर्ण अंधार पडला होता. घाटावर विद्युत दिवे होते मात्र 'गंगामैया'च्या काठावर बऱ्यापैकी अंधारच होता त्यामुळं पाण्याचा अंदाज येणं थोडं कठीण होतं. म्हणून प्रत्यक्ष पाण्यात न उतरता गंगाजलानं प्रोक्षण केलं, तीर्थ प्राशन केलं, काही जणांनी गंगामैयाच्या जळात दिवे सोडले आणि तिथून निघायचं ठरवलं. श्री काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं होतं. पण रस्त्यावरुन जायचं तर किमान ३ किमी चालावं लागणार होतं. वेळ जास्त जाणार होता. त्याऐवजी घाटावरुनच चालत गेलो तर लवकर पोहोचता येणार होतं. म्हणून तसं चालायला सुरुवात केली. मात्र दर्शनासाठी किती वेळ लागेल याची कल्पना नसल्यानं आधी पोटपूजा करावी असं काहीजणांचं मत होतं. दुपारी ट्रॅफिक जॅम मुळे व्यवस्थित भोजन झालं नव्हतं. बरोबर नेलेल्या थेपल्यांचाच आस्वाद सगळ्यांनी घेतला होता. त्यामुळं आता आधी भोजन करुन दर्शनासाठी गेलो तर उशीर झाला तरी चिंता नाही असा विचार पुढे आला. मग घाटावरुन परत वर चढून जेवायला हाॅटेलमध्ये गेलो. तिथे असलेली गर्दी आणि आमचा मोठा ग्रुप यामुळं जेवणासाठी फारच वेळ गेला. मग एवढ्या उशीरा दर्शनासाठी जायचं, गर्दी मुळं दर्शनासाठी काही तास लागणार, व्हिआयपी पासेसची व्यवस्था बंद आहे हा सारा विचार करता अखेर मंदिरात न जाता मुक्कामी परत आलो. दोन दिवस सलग प्रवास झाल्यानं सारेच थकले होते. त्यामुळं रुमवर आल्यावर सारेच लगेच निद्राधीन झाले. 

                 १३ तारखेला सकाळी ७ वाजता आम्ही आमच्या बसने 'अयोध्येला' 'श्री रामरायाच्या' दर्शनासाठी निघालो. प्रवास सुरु झाला अन तासाभरात बसमध्येच नाश्ता केला. जेमतेम १०० किमी पर्यंतचा प्रवास सुरळीत झाला आणि बस थांबली. अयोध्येला जाणारी सारी वाहतूक पुढे थांबवून ठेवण्यात आली होती. कारण अयोध्येमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने १०० किमी आधीच वाहतूक थांबवून ठेवली होती. सुरुवातीला थोडावेळ आम्ही बसमध्येच बसलो होतो. मात्र वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हं दिसेनाशी झाली आणि आम्ही बसमधून उतरलो. आमची बस जिथं थांबली होती तिथं २-३ छोटी हाॅटेल्स होती. पण तिथं 'वाॅशरुम' ची सोय असण्याची शक्यता नव्हती. पण निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची वेळ आली होती. अखेर तिथेच रस्त्यापासून थोडं आत असलेल्या एका घरात आम्ही गेलो. तिथं आमची ती सोय तर लगेच झाली. पण त्यानंतरचा बराच वेळ तिथं कसा गेला कळलच नाही. अतिशय साधा आणि आतिथ्यशील असा कुटुंब परिवार होता तो. त्यांच्या घराला लागूनच मोठी शेती होती. पिवळ्या मोहरीची पिवळ्या फुलांनी बहरलेली रोपं अतिशय सुंदर दिसत होती. मोहरीबरोबरच मटार, बटाटे यांचंही शेत होतं. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांच्या मुलींनी शेतातून ताजे मटार आणून आम्हाला खायला दिले. अगदी गोड आणि रसरशीत ताजे मटार खायला खूपच छान वाटलं. ताजे मटार, बटाटे आम्हाला घेऊन जायचा आग्रह ते करत होते. मात्र विनामुल्य असं काही घेणं आम्हाला पटलं नाही. पाणी प्यायला देण्याआधीही त्यांनी आम्हाला घरचा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं बनवलेला गुळ खायला दिला. त्यांच्या घरी आम्ही फक्त महिलाच गेलो होतो. मग बाकी सगळ्यांसाठी थोडा गुळ बांधून दिला. ट्रॅफिक सुटण्याचं बिलकुल चिन्ह नव्हतं. त्यांना याची कल्पना असल्यानं आधी त्यांनी आम्हाला जेवणाचाच आग्रह केला. मात्र आम्ही त्याला ठाम नकार दिल्यावर चहा करुन दिला. त्यांचं अतिशय प्रेमळ निरपेक्ष आदरातिथ्य आमच्यासाठी खरंच विशेष होतं. त्यांना मात्र हे सवयीचंच होतं. चहा पिऊन त्या सर्वांबरोबर फोटो काढून आम्ही परत बसजवळ आलो. थोड्या वेळानं तिथल्याच एका हाॅटेलमध्ये जेवणाची व्यवस्था झाली. मग तिथे जेवून आलो. थोड्या वेळानं म्हणजे जवळपास साडेतीन तासांनी वाहतूक सुरु झाली. जेमतेम अर्धा तास प्रवास झाला आणि पून्हा वाहतूक बंद झाली. पुन्हा दिड दोन तास एका ठिकाणी थांबल्यावर मुंगीच्या पावलांनी मध्ये मध्ये वाहतूक सुरु झाली. थोड्या वेळानं तेही बंद झालं आणि पुन्हा एकाच जागी वाहनं खोळंबली. असाच खेळ काही तास सुरु राहीला अखेर आम्ही वाराणसीला परत फिरायचा निर्णय घेतला. अर्थात निर्णय घेतला तरी लगेच अमलात येणं शक्य नव्हतं. कारण बस ला यू टर्न घेऊन परत फिरणंही अशक्य होतं. अखेर पाउण एक तासानं आम्हाला ही संधी मिळाली आणि यू टर्न घेऊन आम्ही परत वाराणसीला निघालो. या सगळ्या गोंधळात रात्रीचे आठ वाजले होते. तासभर प्रवास करुन वाटेतच एका हाॅटेलमध्ये जेवून पुढे निघालो. थोड्या वेळातच पुन्हा ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो. ११ वाजता ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो ते रात्री २ वाजता कोंडीमधून सुटलो. पहाटे ३.४५ वाजता 'वाराणसी'ला पोहोचलो. संपूर्ण दिवस म्हणजे १३ तास फक्त वाहतूक कोंडीत अडकून‌ अखेर श्री रामरायाचं दर्शन न मिळताच परत फिरावं लागलं. परतीच्या मार्गातही तीन तास अडकून पडावं लागलं. आणि इतके दिवस आंतरजालावर सतत पहात असलेल्या तासंतास होणाऱ्या वाहतूक कोंडींचा प्रयक्ष अनुभव घेतला.

                 'वाराणसी'ला पोहोचल्यावर बस पार्किंग लॉट मध्ये उभी करुन रिक्षाने अखेर पहाटे ४ वाजता श्री काशी विश्वेश्वर मंदिराजवळ गेलो. तिथून पुढं चालत दर्शनासाठी रांगेत उभं रहाण्यासाठी गेलो तर प्रचंड मोठी रांग जी घाटावरुन सुरु होऊन खूप लांबून फिरुन मंदिराजवळ पोहोचत होती. या रांगेतून दर्शनासाठी किमान ८-९ तास लागणार होते. व्हिआयपी दर्शनही प्रचंड गर्दीमुळं बंदच होतं. आणि रांगेतून दर्शन घेण्यासाठी आमच्याजवळ एवढा वेळच नव्हता. आम्ही ज्या मुख्य गोष्टीसाठी आलो त्यासाठी आम्हाला त्याच दिवशी 'प्रयागराज'ला पोहोचायचं होतं. आम्ही मंदिराजवळ रिक्षानी आल्यामुळं सारा ग्रुप वेगळा झाला होता. त्या साऱ्यांना एकत्र येण्यात वेळ गेला. मग तिथं  ४ नंबर गेटजवळच लावलेल्या स्क्रीनवरच श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. त्या मधल्या वेळेत काही जणं परस्पर तिथल्या पंडितांना पैसे देऊन इतर कुणाला न सांगता दर्शनासाठी निघूनही गेले. खरंतर जेव्हा आपण कुठल्याही ग्रुपबरोबर जातो तेव्हा सगळे निर्णय हे सर्वांचा, परिस्थितीचा विचार करुन एकत्र घ्यायचे असतात. आपल्या मनासारखं फिरायला आपण स्वतंत्रपणे जातच असतो. ग्रुपबरोबर असताना आपल्या वागण्यामुळं इतरांचा वेळ वाया जाणार नाही, इतर काही त्रास होणार नाही याची काळजी घेणं ही आयोजकांइतकीच प्रत्येकाची जबाबदारी असते. अखेर आम्ही बाकी सर्वजणं दर्शन न घेताच रुमवर परत आलो. अर्थात श्री रामरायाचं आणि श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा भाग नव्हता. कारण हे दर्शन कधीही घेता येऊ शकतं. आणि आमच्यासह काही जणांचं हे दर्शन आधीही झालेलं असल्यानं आम्हा कुणालाच फारसं वाईट वाटलं नाही. रुमवर येऊन सारं आवरुन  दर्शनासाठी गेलेले मेंबर्स आल्यावर रुम सोडून सामानासह आम्ही ११ वाजता रिक्षाने आमची बस जिथे थांबली होती तिथं जाण्यासाठी निघालो.

                 आम्हाला श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन घडलं नव्हतं. म्हणून आम्ही सर्वांनी 'बनारस हिंदू विद्यापीठा'च्या श्री विश्वनाथ मंदिरात जायचं ठरवलं. त्यानुसार आम्ही रिक्षानं आधी त्या मंदिरात गेलो. 'बनारस हिंदू विद्यापीठ' हे भारतानं घोषित केलेल्या आठ प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आहे. या विद्यापीठाच्या आवारात जगातील सर्वात उंच असं हे श्री विश्वेश्वराचं मंदिर बांधण्यात आलं आहे. १९६६ मध्ये हे मंदिर संकुल बांधण्यात आलंय. या शिवमंदिराचा अडीचशे फूट उंचीचा कळस हा जगातील सर्वात उंच कळस आहे. अशा या अप्रतिम मंदिराच्या गर्भगृहात आम्ही प्रवेश केला आणि मी जागच्या जागी खिळून उभी राहीले. काही क्षणांनी मी याला म्हटलं आपण या मंदिरात या आधी आलो आहोत. मात्र याने तत्काळ या गोष्टीला नकार दिला. कारण मंदिरात प्रवेश करेपर्यंत आम्हाला या आधी या मंदिराबद्दल काहीच माहिती नव्हती. पण मला मात्र त्या शिव पिंडीच्या दर्शनाने या मंदिरात आधी आल्याची जाणीव होत होती. आपल्याला असा भास का होतोय याचा विचार मी करत असताना अचानक मला जाणवलं की हे मंदिर मी स्वप्नात पाहिलय. होय, हिच शिवपिंडी जशीच्या तशी मी स्वप्नात पाहिली होती. मला मंदिर किंवा परिसर काही आठवलं नाही पण पिंडी पहाताक्षणीच खूण पटली होती. आणि एका अनामिक ओढीने मी पिडीला स्पर्श करुन नतमस्तक झाले. नैवेद्य अर्पण केला. श्री दत्तगुरुंनी मला स्वप्नात घडवलेलं शंभू महादेवाचं दर्शन आज प्रत्यक्षात घडवलं होतं. श्री काशी विश्वेश्वराचं मुख्य मंदिरात दर्शन न घडल्याची लागलेली रुखरुख क्षणात नाहीशी झाली. विश्वेश्वराच्या दर्शनाची माझी इच्छा दत्तगुरुंनी अगदी सुंदर रितीने पूर्ण केली. 

                 हे दर्शन घेऊन आम्ही सारे परत रिक्षाने बसजवळ गेलो. आणि नंतर लगेच म्हणजे १४ तारखेलाच प्रयागराजला प्रस्थान केलं. तिथंही 'प्रयागराज' च्या आधी काही किमी अंतरावर मोठ्या बसेसना प्रवेश बंद केला होता. पण आम्ही ज्याठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली होती त्यांचा एक माणूस तिथं आला आणि त्यानं वेगळ्या मार्गानं फिरवून आमची बस मुक्कामाच्या ठिकाणी नेली. तोपर्यंत सायंकाळचे पाच वाजले होते. तिथंच भोजनासाठी आम्ही येणार असल्याचं सांगून ठेवल्यानं आधी कुठं भोजन केलं नव्हतं. त्यामुळं पाच वाजता पोहोचल्यावर जेवलो. जेवून लगेच संगम घाटावर कुंभस्नानासाठी निघालो. 

             मुक्कामाच्या ठिकाणापासून संगम घाट किमान आठ ते दहा किलोमीटर दूर होता. तिथं जाण्यासाठी सर्वांना रिक्षा मिळण्याची शक्यता फारच कमी होती. अखेर चालायला सुरुवात करायची आणि जशा रिक्षा मिळतील तसं पुढे जायचं असं ठरवलं. आम्ही पाच-सहा जण तिथून जवळच उभ्या असलेल्या पोलिसां जवळ संगमावर कसं जायचं याची चौकशी करायला गेलो. त्यांनी 'इथून रिक्षा मिळणं कठीण आहे' असं सांगितलं. पण तुम्ही किमान तीन-चार किलोमीटर अंतरापर्यंत बसने जाऊ शकता असं सांगितलं. त्यांच्याशी हे बोलत असतानाच समोरून एक बस आली, पोलिसांनीच ती बस  थांबवली आणि बसचा कंडक्टर नाही म्हणत असतानाच आम्हाला त्या बसमध्ये चढायला लावलं. त्यांनं आम्हाला 'झुसी रेल्वे स्टेशन' जवळ उतरा असं सांगितलं. तो स्टाॅप येताच त्यानं बस थांबवली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानं आम्हाला विनामुल्य तिथपर्यंत सोडलं. तिथं उतरुन विचारत विचारत आम्ही पुढं निघालो तर तिथल्या एका पोलिसांनी तुम्हाला इ- रिक्षाने संगमावर जाता येईल असं सांगितलं. अन्यथा ७-८ किमी चालावं लागेल असं म्हणाला. इथंही त्याच्याशी बोलत असतानाच रिक्षा मिळाली. त्यानं आम्हाला ४-५ किमी अंतरावर असलेल्या 'ऐरावत गेट'जवळ सोडलं. आम्ही सतत बाकी सगळ्या ग्रुपच्या संपर्कात होतो त्यामुळं त्यांनाही आमच्या मागोमाग बस मिळाली. पुढं मात्र सगळ्यांना रिक्षा मिळू शकली नाही. आम्ही झुसी स्टेशन पासून पुढे थोडसं आलो आणि अक्षरशः भान हरपून पाहत राहिलो.

              आंतरजालावर दिसणाऱ्या चित्रफिती, बातम्या यातून दिसणाऱ्या महाकुंभमेळ्याचं प्रत्यक्ष दर्शन आम्ही या क्षणी घेत होतो. रिक्षानं अम्ही संगमावर जात असताना दोन्ही बाजूला केलेली अप्रतिम विद्युत रोषणाई, वेगवेगळ्या आखाड्यांचे मोठमोठे मंडप आणि राहुट्या मध्ये मध्ये असणारी वेगवेळी प्रवेशद्वारं सारंच अतिभव्य आणि डोळे दिपवणारं होतं. याच बरोबर कुठलीही माहिती देण्यासाठी, मदतीसाठी जागोजागी सदैव सावध, तत्पर असलेलं पोलिसदल, इतर कर्मचारीवृंद, भाविकांच्या क्षुधा शांतीसाठी उभारण्यात आलेले लंगर आणि नजरेच्या पल्याड असलेला अवाढव्य परिसर सातत्यानं स्वच्छ ठेवण्याचं महत्त्वाचं काम करणारा सफाई कर्मचारीवर्ग सारंच कौतुकास्पद. हे सारं पहात ,नजरेत साठवत आम्ही रिक्षानं ऐरावत द्वाराजवळ पोहोचलो. तिथून प्रत्यक्ष त्रिवेणी संगमावर स्नानाला जाण्यासाठी परत ३-४ किमी चालावं लागलं. संगमावर पोहोचण्यासाठी चौकशी करतच आम्ही ६ नंबरच्या पिपापुलावर पोहोचलो. आम्ही तिथपर्यंत जात असताना मधल्या संपूर्ण घाटांवर भाविक स्नान करतच होते. मात्र तिथं थोडी कमी गर्दी होती. 'अरेल घाटा'वरुन त्रिवेणी संगमावर जाणाऱ्या बोटी बंद करण्यात आल्या होत्या. त्या बोटींच्या मालकांनी संगमावर जाण्यासाठी प्रत्येकी अडिच हजार रु. आकारायला सुरुवात केली म्हणून सरकारनेच ही बोट सेवा बंद केली होती. त्यामुळं पिपापुलावरुनच संगमावर जावं लागत होतं. आणि आम्हाला मुख्य त्रिवेणी संगमावरच स्नान करायचं होतं. जसं आम्ही ६ नंबरच्या पिपापुलाजवळ जाऊ लागलो तशी गर्दी फारच वाढली. त्या गर्दीतूनच एकमेकांचे हात घट्ट धरुन आम्ही त्या पिपापुलावरुन पलिकडे गेलो. तिथून अजून थोडं पुढे चालत प्रत्यक्ष त्रिवेणी संगमावर पोहोचलो.

                  इथं स्नानासाठी खूपच गर्दी होती. त्याचबरोबर किनाऱ्यावर अत्यंत अस्वच्छता होती. काठावर होणारा चिखल आणि त्यात लोकांनी फेकलेला सगळ्या प्रकारचा कचरा अगदी किळसवाणं दृश्य. पण नाईलाजानं त्याकडे दुर्लक्ष केलं. गंगामैयाला प्रार्थना करुन आम्हा सहा जणांपैकी तिघंजणं आधी स्नानासाठी पाण्यात उतरले. त्यांचं  तीन डुबक्या मारुन स्नान झाल्यावर ते काठावर आले आणि आम्ही त्यातल्या त्यात जरा बरी जागा बघून तिथंच विकत घेतलेला एक प्लास्टिक कागद पसरला आणि त्यावर आमचं सामान ठेवलं. आणि आम्ही तिघीजणी परत काठावर गेलो. गंगामैयाची ओटी भरुन प्रार्थना केली आणि जळात उतरलो. आमच्यासाठी पाण्यात उतरणं ही सुद्धा कसरतच होती. काठावर वाळूची पोती रचून पाण्यात उतरण्यासाठी पायऱ्यांसारखी व्यवस्था केली होती. पण त्यावरुन पावलं सरकत होती. अगदी जपूनच आम्ही पाण्यात उतरलो आणि त्या बर्फागत गार पाण्यानं अंगावर सर्रकन काटा आला. काही क्षणांनी तो गारवा सहन होऊ लागला. मग थोडं पुढं जात आखिरकार हमने भी 'आस्था की डुबकी' लगाई. अर्थात अतिथंड पाण्यामुळं आणि खूप पुढं जायला न मिळाल्यानं पूर्ण डोकं पाण्याखाली गेलं नाही. थोडावेळ छान डुंबून थंडीनं कुडकुडत आम्ही तिघीही काठावर आलो. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वाजता आमचं कुंभस्नान झालं होतं आणि मन एका वेगळ्याच आनंदानं भरुन गेलं होतं. १४४ वर्षांनी आलेल्या या महाकुंभमेळ्याच्या पर्वकाळात आम्हाला स्नान करण्याचा योग आला होता. केवळ आणि केवळ श्री दत्तात्रेय आणि गंगामैया यांच्या कृपेमुळेच हे भाग्य आम्हाला लाभलं. ज्याक्षणी माझ्या मनात कुंभस्नानाला जायचा विचार आला त्याक्षणी मी दत्तगुरुंनाच माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना केली होती. अगदी खरं सांगायचं तर नुसती प्रार्थनाच नाही तर थोडा हट्टच केला होता. कारण प्रयागराज मधली एकूण परिस्थिती पाहता आपल्याला हे भाग्य मिळेल का याबद्दल जरा साशंकता होती. पण अखेर माझी इच्छा पूर्ण झाली होती. सहचराने आणि लेकीनेही सुरुवातीपासून माझ्या इच्छेला साथ दिली. सहचराने यात्रेची सारी तयारी, जबाबदारी त्याच्या मित्रांच्या साथीने पूर्ण केली आणि आम्हा सर्वांनाच कुंभस्नान करायला मिळालं. 

                  आमचं स्नान झाल्यावर काही वेळानंतर आमचा मागं राहिलेला  बाकी सगळा ग्रुप आला. मग त्या सर्वांचं सामान आम्ही आमच्याजवळ ठेवून त्यांना स्नानासाठी जायला सांगितलं. त्या सर्वांचं स्नान होईपर्यंत आम्ही तिथं वाफाळत्या लेमन टी चा आस्वाद घेत आजूबाजूचा परिसर पहात थांबलो. कडाक्याच्या थंडीत लेमन टी पिण्याची मजाही वेगळीच होती. सगळ्यांचं आवरेपर्यंत खूप वेळ लागला. तेवढ्यात आमचा दोनदा लेमन टी पिऊन झाला. सगळ्यांचं आवरल्यावर थोडं छायाचित्रण करुन अतिशय तृप्त मनानं आम्ही परत निघालो. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत जवळजवळ रात्रीचा एक वाजला होता. मग फ्रेश होऊन सामान बसमध्ये ठेवून आम्ही रात्री दिड वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 

                    जबलपूर जवळ 'नर्मदा मैया' वरच्या पूलावरुन पलीकडं जावं लागतं. त्यानिमित्तानं मैयाचं छान दर्शन घडतं. आमच्या मनात इथं थोडी वाकडी वाट करुन मैया किनारी जाऊन प्रत्यक्ष दर्शन घ्यावं असं होतं. आम्ही जबलपूरला पोहोचल्यावर वेळेचा अंदाज घेऊन ऐनवेळी  एखाद्या मंदिरात दर्शनासाठी जायचं ठरवलं. सगळा विचार करता तिथल्याच 'भेडाघाट' जवळच्या 'चौसष्ट योगिनी मंदिरात' जायचं ठरवलं. एव्हाना बस तिथून साधारण २५ किमी पुढे आली होती. मग परत बस फिरवली आणि मंदिरात गेलो. 

                   जबलपूर जवळच्या भेडाघाट जवळचं हे 'चौसष्ट योगिनी मंदिर' याला 'गोलकी मठ' (वर्तुळाकार) असंही म्हणतात. प्रत्यक्षात मात्र इथं ६४ ऐवजी ८१ योगिनींची स्थापना करण्यात आली आहे. सुमारे १२५ फूट व्यासाचं हे वर्तुळाकार मंदिर सर्वात भव्य आणि सर्वात प्रसिद्ध आहे. दहाव्या शतकात कलचुरी वंशाच्या शासकांनी हे मंदिर बांधलय. साऱ्या योगिनींच्या पाषाण मूर्ती आहेत. आणि सध्या त्या पूर्वी केलेल्या तोडफोडीमुळे भग्नावस्थेत आहेत. याच्या मध्यभागी शिव मंदिर आहे. यात भगवान शिव आणि पार्वती माता नंदीवर आरुढ आहेत. हि सुद्धा काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. चौसष्ट योगिनींची साधना अतिशय प्रभावशाली मानली जाते. एका कथे नुसार या योगिनी 'कालिमाते'ला समर्पित आहेत. कालिमातेने 'घोर' नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी ६४ योगिनींचं रुप धारण केलं होतं. तर दुसऱ्या आख्यायिके नुसार दुर्गामातेने‌ आपल्या देहातून ६४ योगिनींची उत्पत्ती केली होती. योगिनी मंदिर हे तंत्र विद्येचं केंद्र मानलं जातं. सायंकाळनंतर या मंदिरांमध्ये प्रवेश बंद असतो. अतिशय सुंदर असं मंदिर पाहून, दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या नर्मदा मैयाच्या घाटावर गेलो.  

                 एव्हाना सायंकाळ झाली होती. रवीराज अस्ताचलास चालले होते. पश्चिमा सुंदर अशा केशररंगात रंगली होती. आणि त्या केशर रंगात मैयाचं जल ही छान चमचमत होतं अतिशय सुंदर, चित्रासासारखं, भारावलेलं वातावरण होतं. खरंतर त्यावेळी नर्मदा स्नानाची तीव्र इच्छा झाली पण कपडे बरोबर नेले नसल्यानं स्नान करणं अशक्य होतं. मग पायऱ्यांवरुन थोडं पाण्यात उतरुन मावळत्या दिनकराला अर्घ्य देऊन प्रोक्षण केलं. थोडावेळ तिथं थांबून मैयाच्या सान्निध्यात रहाण्याचा आनंद घेतला. आणि मग मात्र परत फिरलो. 

                  रविवारी १६ तारखेला दुपारी २.३० वाजता सारा प्रवास संपवून घरी पोहोचलो. रामरायाचं आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन हा भाग आम्हा सर्वांसाठी तिथल्या एकूण परिस्थितीचा विचार करता फार महत्त्वाचा नव्हता. तरीही आम्ही प्रयत्न केला. अर्थात अतिरेकी गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळं ते दर्शन घडलं नाही. पण ज्या कुंभ स्नानासाठी अट्टाहास केला होता तो मात्र सुंदर रितीनं पूर्ण झाला. वाहतूक कोंडी आणि प्रचंड गर्दी यांची आम्ही मानसिक आणि प्रत्यक्ष तयारी ठेवली असल्यानं त्याचाही बिलकुल त्रास झाला नाही. बरोबर भरपूर खाद्यपदार्थ आणि पाणी यांचा साठा ठेवल्यानं आम्हाला कुठेच कसलाच त्रास झाला नाही. आयोजक त्यांचे सहकारी मदतनीस आणि सारे यात्रेकरु यांच्या परस्पर सामंजस्य, सहकार्य यामुळं ही खूप मोठी धार्मिक यात्रा उत्तम रितीनं सुफळ संपूर्ण झाली.

- स्नेहल मोडक








   

Thursday, January 16, 2025

अग्नी

यज्ञी समीधांतूनी प्रकटतो अग्नी

आसमंत शुध्द पवित्र करतो अग्नी 

     समईतल्या ज्योतीत तेवतो अग्नी 

     क्षणात प्रसन्न शांत मन करतो अग्नी 

चुलीतल्या सरपणात पेटतो अग्नी 

अन्नसंस्कारे क्षुधा शांत करतो अग्नी 

     होलीकोत्सवातही धगधगतो अग्नी

     अनिष्ट अमंगल सारे जाळतो अग्नी 

शुश्क जंगलातही निर्माण होतो अग्नी 

वणव्यात सारे बेचिराख करतो अग्नी 

     पंचतत्वातील एक असे विशेष अग्नी 

     बिघडवता तोल भस्मासुर होतो अग्नी 

       बिघडवता तोल भस्मासुर होतो अग्नी 

- स्नेहल मोडक

Wednesday, January 8, 2025

मी

बेधुंद जरी तू गंधात चाफा अन मोगऱ्याच्या

पुस्तकात जपलेला गुलाबी गुलाब आहे मी

यथेच्छ डुंबलास जरी तू सरिता सागरात

बागेतलं झुळझुळतं पाटाचं पाणी आहे मी

केल्यास किती गुजगोष्टी जरी मित्रमैत्रिणींशी

मनाच्या खोल गाभाऱ्यातलं गुपित आहे मी

सरले सहजच जरी तुझे दिवस महिने वर्षं

सरता न सरणारी नित्याची रात्र आहे मी

गर्दीत माणसांच्या असशील जरी तू एकाकी

परि अमूर्त स्नेहाची साथसंगत आहे मी

सुखदुःखात सामील जरी तुझ्या सगेसोयरे

कधी एकांतीच येणारी आठवण आहे मी

रंगवलस जरी तू तुझ्या आयुष्याचं इंद्रधनु

मनाच्या तळातला कोरा कागद आहे मी

केलीस जरी तू कृत्रिम दिव्यांची रोषणाई

देवघरातल्या निरांजनाची ज्योत आहे मी

- स्नेहल मोडक

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...