Pages

Thursday, June 8, 2023

गिरनार - २१

             वटपौर्णिमा जसजशी जवळ येऊ लागली तसतशी आमची गिरनार दर्शनाची ओढ वाढू लागली. आणि यावेळी ही ओढ आणि उत्साह जरा जास्तच होता. त्याला कारणही तसंच होतं.

             यावेळी पौर्णिमा सकाळी उशीरा सुरू होणार होती म्हणून आम्ही पौर्णिमेच्या दिवशीच प्रस्थान केलं. दुसऱ्या दिवशी पहाटे जूनागढला पोहोचून लगेच तलेटीला मुक्काम स्थानी गेलो.

             सारी आन्हिकं आवरुन लंबे हनुमानजी आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोप वे जवळ गेलो. गर्दी खूपच जास्त असल्याने रोप वे ने वर जायला खूप मोठी रांग लागली होती.  आम्ही ट्राॅलीमध्ये बसल्यावर पहिली ३-४ मिनिटं वातावरण अगदी छान स्वच्छ होतं. मग अचानक धुकं वाढू लागलं आणि अगदी मिनीटाभरात सगळीकडे दाट शुभ्र धुकं पसरलं. ट्राॅलीचा वेगही नेहमीपेक्षा कमी होता. त्या पूर्ण धुक्यातूनच ट्राॅली अंबाजी टुकवर पोहोचली. उतरुन बाहेर आलो आणि भन्नाट वाऱ्याने आमचं स्वागत केलं.

             अंबामातेचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर धुक्यानं वेढला होता. अंबामातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. दाट धुक्यातून चालताना खूप छान वाटत होतं. थोडंसं पुढे आलो आणि अक्षरशः खिळून उभं राहिलो. अतिशय अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारा नजारा समोर पसरला होता. शुम्र मेघ अगदी इतक्या खाली अवतरले होते की थोड्या प्रयत्नाने सहज स्पर्श करता यावा. 

             अगदी गुरुशिखरावर पोहोचेपर्यंत सारा गिरनार शुभ्र मेघांची दाट दुलई पांघरून बसला होता. सहस्त्ररश्मीचं दर्शन दूरच राहिलं पण कोवळी किरणंही मेघांमधून हळूच डोकावत नव्हती. अतिशय नयनरम्य अशा वातावरणातच आम्ही गुरुशिखरी पोहोचलो. पौर्णिमा संपायच्या खूप आधीच आम्ही मंदिरात पोहोचलो. श्री दत्तात्रेयांसमोर नतमस्तक झाले आणि इच्छापूर्तीच्या आनंदाने डोळ्यात अश्रू आले. आमचं हे एकवीसावं पौर्णिमा दर्शन होतं. मन अगदी प्रसन्न, तृप्त झालं होतं.

             अगदी पहिल्यांदा गिरनार दर्शनाला जाताना मनात अत्यंत साशंकता होती. दहा हजार पायऱ्या चढून उतरणं आपल्याला जमेल का ही काळजी मनात दाटली होती. कारण तेव्हा तर रोप वे नव्हताच. पण तेव्हा श्री दत्तात्रेयांच्या कृपेने आमचं शिखर दर्शन आणि परिक्रमा पूर्ण झाली. आणि मग परत नक्की जायचंच असं मनापासून वाटू लागलं. पण त्याआधी मात्र कुणी भविष्य सांगितलं असतं तरी आम्ही विश्वास ठेवणं अशक्य होतं. आणि म्हणूनच कल्पनेच्या पलीकडे असलेली ही गिरनार वारी वटपौर्णिमेला एकवीसाव्या दर्शनावर येऊन पोहोचली ही आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट होती. कधी रोप वे ने तर कधी दहा हजार पायऱ्या चढून असं श्री दत्तगुरुंच्या इच्छेनुसार आम्हाला गिरनार दर्शन घडतं हे भाग्यच.

             आम्ही दर्शन घेऊन खाली अखंड धुनीजवळ आलो. तिधे नेहमीप्रमाणे वाचन करुन धुनीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन परत निघालो. सारा वेळ धुकं दाटलेलच होतं. पण रोप वे सुरु होता. रोप वे ने खाली पायथ्याशी येऊन मुक्कामी पोहोचलो.

दुसऱ्या दिवशी पहाटे गिर सफारीला गेलो. अतिशय छान सफारी आहे ही. मुक्त विहार करत असलेले वाघ, सिंह, हरीण हे आपल्याला सहज पहाता येतात. सुमारे १४१२ चौरस किलोमीटर एवढं याचं क्षेत्रफळ आहे. त्यातला काही भाग राष्ट्रीय उद्यान आणि उरलेला बराच मोठा भाग वन्यजीवांसाठी संरक्षित आहे. जूनागढ पासून ६५ किमी अंतरावर असलेलं हे जंगल सिंहांचं एकमेव मुख्य निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या जंगलाला १९९५ साली अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे.

              तिथून दुपारी परत आलो. आणि परतीच्या प्रवासाला लागलो. सारा प्रवास, दर्शन अगदी मनासारखं घडलं होतं. श्री दत्तगुरु सारं काही मनासारखं घडवत असले तरीही माझ्या मनात मात्र आपली सेवा श्री दत्तगुरुंच्या चरणी रुजू होतेय की नाही असा विचार येत होता. मग नामस्मरण करत मी तो विचार करणं सोडून दिलं. 

             सकाळी लवकरच घरी पोहोचलो. ताजंतवानं होऊन नित्याप्रमाणे काही क्षण देवासमोर उभी राहिले. त्याचवेळी देवासमोर एक ज्वेलर्स ची पिशवी ठेवलेली दिसली. मनात विचार आला लेकीची काहीतरी खरेदी झालेली दिसतेय. तेवढ्यात लेकीने वाफाळत्या चहाचा कप हातात दिला. चहा घेत असतानाच तिने त्या पिशवीतून एक खोका काढून आमच्या हातात दिला. उघडून पाहिला आणि आम्ही दोघंही भान हरपून पहात राहिलो. त्यात आमच्या दोन्ही लाडक्या लेकींनी दिलेली अतिशय रेखीव सुंदर अशी श्री दत्तात्रेयांची मूर्ती होती. श्री दत्तगुरुंनी फारच मोठी अनुभूती देऊन माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याची जाणीव करुन देऊन आश्वस्त केलं होतं. डोळ्यांत दाटलेले अश्रू निग्रहाने परतवत निःशब्द झाले होते मी. आमच्याकडून अशीच सेवा अखंडपणे घडावी आणि श्री दत्तात्रेयांचा आशिष सदैव आम्हा सर्वांना लाभावा हिच प्रार्थना.


दत्त माझा अन मी दत्ताची

लागली गोडी दत्तनामाची

कुणी केले मजकडे दुर्लक्ष

असेल त्याचे मजवरी लक्ष

टोचता मज दुःखाचे कंकर

घालेल तोच अलवार फुंकर

नयनात माझिया अश्रू दाटता

होईन शांत त्याचे दर्शन घडता

एकाकी नसेन एकाही क्षणी

वसे तोच नित्य मम मनोमनी

नसता कुणी मज आप्तसखा

असेल दत्तच माझा मनसखा

कधी होता मजला हर्षोल्हास

दिसे दत्तमूर्ती तेजोमय खास

श्वासासंगे दत्तनाम मी स्मरावे

षडरिपुमुक्त तयाने मज करावे

कधी मागता दत्तदर्शन भाग्य

देई तो अनुभूतीचे मज सौख्य 

दत्त माझा अन मी दत्ताची

लागली गोडी दत्तनामाची 


- स्नेहल मोडक







Sunday, May 14, 2023

अलिप्त

             प्रत्येकाच्या आयुष्यात वरवर शुल्लक भासणाऱ्या पण मन दुखावणाऱ्या घटना अधूनमधून घडतच असतात. प्रत्येक वेळी त्यामागची कारणंही वेगवेगळी असतात. कित्येकदा आपल्या दुखावलेल्या मनाची समोरच्या व्यक्तीला जाणिवही होत नाही. पण आपण मात्र वेळोवेळी आपल्या मनाची समजूत घालतो. आणि अव्यक्त राहून नात्यात दुरावा निर्माण होऊ देत नाही. पण काही काळानंतर मात्र आपल्यालाच आपल्या मनाची समजूत घालणं अवघड होतं. मग अशावेळी आपलं अव्यक्त मन अलिप्त होऊ पहातं. पुन्हा पुन्हा असं दुखावलं जाण्यापेक्षा अलिप्त रहाणंच योग्य वाटू लागतं.

    

ठरवलंय आता अलिप्त रहायचं

एकांती राहून 'स्व' ला जाणायचं

      मैत्रीनातं मनापासूनच जपायचं

      पण अपेक्षेपासून मात्र दूर रहायचं

आपल्यातच नकळत पडतं अंतर

मग सुखदुःखही कधी कळतं नंतर

      आता ना गुंतावं न गुंतवून घ्यावं

      आयुष्य एकट्यानं अव्यक्त जगावं

शब्द स्पर्शानं नात्यास सावरावं

घावास शब्दांच्या अलगद लपवावं 

      मनातल्या मनात खूप काही सलतं

      बोलावं ठरवलं तरी ओठातच रहातं

मनात दडपावी हळवी आर्त स्पंदनं

मनभावनांना घालावी अबोल बंधनं

      ठरवलंय आता अलिप्त रहायचं

      एकांती राहून 'स्व' ला जाणायचं 

 - स्नेहल मोडक

Tuesday, April 18, 2023

कधी एकांत क्षणी

             कधीकधी निवांत एकटं असताना‌ आपलं एक मन दुसऱ्या मनाची छान समजूत घालतं. दुखावलेल्या मनावर अलवार फुंकर घालतं. नाराजी विसरायला लावतं. दुसऱ्या कुणाला जरी आपलं आनंदात असणं महत्त्वाचं असलं नसलं तरी आपण स्वतःच्या आनंदासाठी छान हसत खेळत आयुष्य जगावं अशी समजूतही एक मन दुसऱ्या मनाची घालतं. आणि म्हणूनच स्वसंवाद हा खूप गरजेचा असतो बरं. 


कधी एकांत क्षणी

.

कधीं एकांत क्षणी

विध्द जाहल्या मनास

हळुवार सावरावंसं वाटतं

        होऊनी इवलंसं पाखरु

        स्वप्नांगणी विहरावंसं वाटतं

विसरुन साऱ्या अपेक्षा

सहज मुक्त व्हावसं वाटतं

         होऊनी नाजूक रातराणी

         तिमिरातच गंधाळावं वाटतं

थांबवूनी तडफड सारी

शांत स्तब्ध व्हावंसं वाटतं

         होऊन शीत जलाशय

         सरोवरी तरंग व्हावसं वाटतं

पुसूनी साऱ्या आठवणी

मन रिक्त करावंसं वाटतं

         होऊनी कल्पनेचा कुंचला

         भावचित्र रेखावंसं वाटतं

सोडूनी सारेच राग लोभ

निर्विकार व्हावंसं वाटतं

         कुणीही नसलं जरी आपलं

         स्वानंदातच जगावंसं वाटतं

         स्वानंदातच जगावंसं वाटतं

 

- स्नेहल मोडक

Tuesday, April 11, 2023

नमामी नर्मदे

             साधारण होळी पौर्णिमा झाली की नर्मदा भक्तांना वेध लागतात ते उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचे. अर्थात या परिक्रमेचं नियोजन ३-४ महिने आधीच केलेलं असतं. पण होळी पौर्णिमेनंतर प्रत्यक्ष तयारीला सुरुवात होते. या परिक्रमेचे वेध यावेळी आम्हालाही लागले होते.

             नर्मदा नदी ही मुळात पश्चिमवाहिनी आहे. संपूर्ण मार्गात ती तीन ठिकाणी उत्तरवाहिनी होते. तिलकवाडा, मंडला आणि ओंकारेश्वर जवळील एक स्थान अशा तीन ठिकाणी नर्मदा उत्तरवाहिनी होते. पण ओंकारेश्वर जवळच्या बंधाऱ्यामुळे तीचा मार्ग बदलला आहे. मैया जिथे उत्तरवाहिनी होते त्या भागाची केलेली परिक्रमा म्हणजेच उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा. हि परिक्रमा चैत्र महिन्यातच केली जाते. चैत्र महिन्यात केलेली उत्तरवाहिनी परिक्रमा विशेष पुण्यदायी समजली जाते. तिलकवाडा - रामपुरा -तिलकवाडा अशी २१ किमी. ची ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा आहे. ज्यांना मैयाची साधारण ३,३०० किमी. अंतराची संपूर्ण परिक्रमा पायी करणं शक्य नाही त्यांनी जरी ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली तरी त्यांना संपूर्ण पायी परिक्रमेचं फल प्राप्त होतं अशी मान्यता आहे.

             गतवर्षी आम्ही वाहनाद्वारे संपूर्ण नर्मदा परिक्रमा करुन आलो होतो. खरंतर त्यानंतर लगेचच ही उत्तरवाहिनी परिक्रमा करायची इच्छा होती पण तेव्हा योग आला नाही. यावर्षी मात्र ही परिक्रमा करायचीच असं ठरवलं होतं. मैयाला 'ही उत्तरवाहिनी परिक्रमा तूच आम्हाला घडव' अशी प्रार्थना करतच होते. आमच्या नेहमीच्या पौर्णिमेच्या गिरनार दर्शनानंतर लगेचच ही परिक्रमा करायची ठरवून तसं नियोजन केलं. सुरुवातीला आम्ही नेहमी गिरनार ला जाणाऱ्या चौघांनीच उत्तरवाहिनी परिक्रमेला जायचं ठरवलं होतं. पण मग एक-एक जण वाढत मोठा ग्रुप तयार झाला. 

             होळी पौर्णिमेला नेहमीप्रमाणे गिरनार ला जाऊन आलो. आणि ५-६ दिवसांनी माझी परत गुडघादुखी सुरु झाली. सरळ चालण्या व्यतिरिक्त गुडघ्याची कुठलीही हालचाल करताना असह्य वेदना होत होत्या. सगळे उपचार सुरु होते. पण वेदना कमीच होत नव्हती. पुढची पौर्णिमा जवळ आली तरी दुखणं तसंच होतं. पण माझा गिरनार दर्शन आणि उत्तरवाहिनी परिक्रमेला जायचा निश्चय दृढ होता. मला दोन्हीही पायी करायचंच होतं म्हणून श्री दत्तगुरु आणि नर्मदा मैयाला प्रार्थना करत होते.

            ठरल्याप्रमाणे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आम्ही प्रवास सुरु केला. पहाटे जुनागढला पोहोचलो. तिथून तलेटीला मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. लगेचच सारं आवरुन दर्शनाला निघालो. नित्याप्रमाणे लंबे हनुमानजी आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवेने अंबाजी टुकवर पोहोचलो. 

            रोपवेने जाताना बदललेल्या वातावरणाचा अंदाज आला होताच. रोपवेतून उतरुन वर आलो आणि जोरदार गार वाऱ्याने आमचं स्वागत केलं. आजूबाजूचे डोंगरमाथे शुभ्रमेघांत हरवले होते. खरंतर रविराजाचं आगमन झालं होतं पण त्याचं दर्शन घडत नव्हतं. मात्र ते शुभ्र मेघ सोनेरी किनारीने सजले होते. अतिशय सुंदर नजारा होता. हे सारं दृश्य डोळ्यात आणि छायाचित्रात साठवत आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली.

            गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन पुढे निघालो. मंदिरात पोहोचायला साधारण ५०-६० पायऱ्या असताना थांबलो. आमच्यासारखे बरेचसे भाविक तिथे थांबले होते. याचं कारण म्हणजे पौर्णिमा लागायला अजून थोडा वेळ होता. आणि आम्हाला पौर्णिमेलाच दर्शन घ्यायचं होतं. साधारण अर्धा तासाने पौर्णिमा सुरु झाली आणि आम्ही दर्शनासाठी पुढे निघालो. शेवटच्या १५-२० पायऱ्या उरल्या असतानाच वातावरणातील गारवा वाढला. आणि अचानक पर्जन्यवृष्टी सुरु झाली. जणू सुंदर गुलाबपाणी शिंपडून साऱ्या भक्तांचं स्वागत झालं.

             मंदिरात प्रवेश करुन दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन तृप्त झालं पण अश्रू मात्र अनावर झाले होते. साश्रू नयनांनी उठून आधी अर्पण केलेल्या नैवेद्याचा प्रसाद घेतला आणि जाणवलं की माझ्या अगदी जवळच श्वान उभा आहे आणि त्याला तो प्रसाद हवाय. मी हातातूनच दिलेला प्रसाद त्याने खाल्लाच आणि तसाच माझ्या मागोमाग तो श्वान आला. मी त्याच्यासाठी अजून थोडा प्रसाद तिथे बाजूला ठेवला. गर्दी असल्याने मला तिथे थांबणं अशक्य होतं. त्यामुळे प्रसाद तिथे ठेवून मी निघाले. १०,००० पायऱ्यांवरील दत्तगुरुंच्या मंदिरातील त्या श्वानाचं अचानक येणं आणि माझ्या हातून प्रसाद ग्रहण करणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची घटना होती. इतक्या वेळा दर्शनाला गेलो पण ही घटना पहिलीच. याआधी एका कबुतराने माझ्या हातून प्रसाद ग्रहण केला होता. प्रत्येक वेळी श्री दत्तात्रेयांच्या कृपेने अतिशय सुंदर अशी अनुभूती येते हे मोठं भाग्यच. 

             चरण पादुकांचं दर्शन घेऊन खाली आलो. अखंड धुनीजवळ पोहोचून वाचन केलं. दर्शन घेऊन शिधा, देणगी अर्पण करुन भोजनप्रसाद घेऊन रोपवेने परत मुक्कामाच्या ठिकाणी आलो.

             थोडासा आराम करुन सोमनाथला दर्शनासाठी निघालो. वाटेत गीता मंदिर, भालका तीर्थ, त्रिवेणी संगम हे सारं पाहून सोमनाथ ला पोहोचलो. दर्शन घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो. लगेचच रात्री जुनागढहून अहमदाबाद साठी निघालो. 

             पहाटे अहमदाबादला पोहोचलो आणि आम्ही मनाने उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेतच रमलो. अहमदाबाद हून पुढे आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. कर्नाळी गावात आमचा मुक्काम होता. रुमवर पोहोचून आवरुन आम्ही त्रिवेणी संगमावर स्नानाला निघालो.

             कर्नाळी गावात आम्ही जिथे रहाणार होतो तिथून जवळच त्रिवेणी संगम आहे. नर्मदा मैया, गुप्त सरस्वती आणि छोटा उदयपूर येथे उगम पावणारी ओरसंग नदी या तिन्ही नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात तो हा त्रिवेणी संगम. अतिशय सुंदर आणि सुरक्षित असा हा संगम आहे. आम्ही मैयाच्या जलात स्नानाला उतरलो आणि त्या शीतजलाच्या नुसत्या स्पर्शानेच आमचा प्रवासाचा शीणवटा क्षणात नाहीसा झाला. पाण्यातून बाहेर यावसंच वाटत नव्हतं. वेळेअभावी आवरतं घेत मुक्कामी परत आलो.

            परत येऊन सारं आवरलं आणि पुजेच्या तयारीला लागलो. घरुन निघतांनाच संकल्प पूजेची पूर्ण तयारी नेली होती. परिक्रमा करण्याआधी ती परिक्रमा कधी, कशी, कशासाठी करणार याचा संकल्प करायचा असतो. स्नान करुन येताना प्रत्येकाने छोट्या बाटलीत नर्मदा जल भरुन आणलं होतं. त्या जलाची प्रत्येकाने षोडशोपचार पूजा करुन परिक्रमेचा संकल्प केला. यावेळी मैया सतत नजरेसमोर येत होती. 

            संकल्प करुन भोजन केलं. आणि मग आम्ही जवळच असलेल्या श्रीक्षेत्र कुबेर भंडारी येथे दर्शनासाठी गेलो. कुबेर म्हणजे इंद्राचा कोषाध्यक्ष आणि सर्व दैवी संपत्तीचा मालक. पण त्याच्या सावत्रभावाने म्हणजेच रावणाने कुबेरनगरीवर हल्ला करुन सर्व संपत्ती हिसकावून घेतली. नंतर कुबेराने श्री शंकराची नर्मदा तीरावर कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे शंकर महादेवाने प्रसन्न होऊन कुबेराला पुन्हा संपत्ती भांडार प्राप्त करवून दिले. म्हणून या ठिकाणी कुबेराला कुबेर भंडारी असं म्हटलं जातं. या संपूर्ण परिसराला कर्नाळी म्हणतात. अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे. दर अमावास्येला इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. इथला नर्मदा किनारा सुंदर आणि तपश्चर्येने पावन झालेला आहे.

            कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे तिलकवाड्याला गेलो. हे अतिशय प्राचीन ठिकाण आहे. इथे गावात असलेल्या तिलकेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. हे तिलकवाड्याचं राजघराणं तिलक यांचं कुलदैवत. तिलकेश्वराला काळे तीळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यामुळे पापाचा क्षय होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

            आम्ही तिलवाड्याहूनच परिक्रमा उचलणार होतो. त्यामुळे तिलकेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही प्रत्यक्ष परिक्रमा जिथून सुरु करतात तिथे म्हणजे वासुदेव कुटीर येथे गेलो. तो परिसर पाहून परिक्रमा मार्ग आणि इतर गोष्टी यांबद्दल माहिती घेतली. या कुटिरात छोटसं आणि सुंदर असं समर्थांनी स्थापन केलेलं मारुती मंदिर आहे. हनुमान जयंती निमित्त तिथे उत्सव होता. आम्ही मारुतीरायाचं दर्शन आणि प्रसाद घेतला.

            इथून पुढे आम्ही गरुडेश्वर मंदिराकडे निघालो. नर्मदा तीरावर असलेल्या श्रीक्षेत्र गरुडेश्वर इथे प. पू. श्री. वासुदेवनंद सरस्वती महाराजांनी समाधी घेतली आहे. याठिकाणी श्री दत्तात्रेयांचे सुंदर मंदिर असून तिथेच बाजूला समाधी मंदिर आहे. हे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.

            यानंतर आम्ही गेलो शूलपाणेश्वराच्या दर्शनासाठी. भगवान शिवाने अंधकासूर राक्षसाला त्रिशुलाने नष्ट केलं. त्यावेळी त्रिशुळाला लागलेल्या रक्ताचे डाग जात नव्हते. म्हणून शिव फिरत फिरत इथे आले त्यावेळी त्यांच्या त्रिशूळाचा भूमीवर आघात झाला आणि त्यातून जलधारा निर्माण झाली. या जळाने त्रिशूळावरील डाग स्वच्छ झाले. म्हणून या स्थानाला शुलपाणेश्वर म्हणून ओळखलं जातं. १९९१ साली सरदार सरोवर प्रकल्पात मुळ मंदिर पाण्याखाली गेलं म्हणून नंतर १९९४ साली १६० फुट उंच पहाडावर नवीन मंदिर बांधण्यात आलं.

            शूलपाणीहून आम्ही पुढे भालोदला पोहोचलो. नर्मदा तीरावरचं हे भालोद म्हणजे श्री प्रतापे महाराजांचा आश्रम आणि त्यातील एकमुखी श्री दत्तात्रेयांचं मंदिर, अतिशय सुंदर पवित्र असं हे ठिकाण. काशिताई निरखे यांच्याकडून स्वयं श्री दत्तात्रेयांच्या इच्छेने श्री प्रतापे महाराजांकडे आलेली ही एकमुखी दत्ताची मूर्ती. ही मूर्ती शाळीग्रामाची असून वक्षस्थळावर गोमुख स्पष्ट दिसतं. आश्रमासमोरच मैयाचं विशाल पात्र आहे. या आश्रमात कन्यापूजन विधी केला जातो. परिक्रमा वासींसाठी इथे रहाण्या-जेवण्याची अतिशय उत्तम व्यवस्था केली जाते. 

            मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ मयुर येतात. मुक्त विहार करुन त्यांना दिलेले दाणे टिपून निघून जातात. आम्ही आश्रमात पोहोचलो त्याआधी नुकतेच ते येऊन गेल्याने आम्हाला मात्र त्यांचं दर्शन झालं नाही. आम्ही गेल्यावर श्री प्रतापे महाराजांनी स्वतः आमचं अगत्यानं स्वागत केलं. आम्ही त्यांच्यासमोर बसलो आणि संवाद सुरु झाला. आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तरवाहिनी परिक्रमा करणार आहोत हे सांगताच त्यांनाही आनंद वाटला. परिक्रमेबद्दल त्यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं असं आम्ही सांगताच त्यांनी खूप छान माहिती दिली. तेवढ्यातच दुसऱ्या साधकांचे 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' हे शब्द कानावर आले आणि महाराजांसह आम्ही उठलो.  सायंआरतीची वेळ झाली होती. श्री दत्तात्रेयांची आणि नंतर नर्मदा मैयाची आरती झाली. या आरतीत आम्हाला सहभागी व्हायला मिळालं हे अगदी अचानक लाभलेलं भाग्य. आरती सुरु असताना माझ्या डोळ्यातून मात्र आसू ओघळत होते.

             खरंतर आम्ही जेव्हा भालोदला पोहोचलो तेव्हा आमच्या ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला होता. म्हणून श्री दत्तात्रेयांचं आणि महाराजांचं दर्शन घेऊन लगेच परत निघायचं असं ठरलं होतं. पण मला मात्र तिथं थोडावेळ तरी थांबून महाराजांशी बोलायचंच होतं. आणि श्री दत्तगुरुंनी माझी इच्छा अतिशय सुंदर रित्या पूर्ण केली होती म्हणूनच आरतीच्या वेळी माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

             भालोदहून निघून वाटेत जेवून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो. एव्हाना रात्रीचे अकरा वाजले होते. खोलीत पोहोचून प्रत्येकाने पहाटे सुरु करायच्या परिक्रमेची पूर्वतयारी केली आणि मग सगळे निद्राधीन झालो. पहाटे दोन वाजेपर्यंतच आराम होणार होता.

           सारी आन्हिकं आवरुन, वाचन करुन पहाटे सव्वातीन आम्ही तिलकवाडा इथे जाण्यासाठी निघालो. गाडीने साधारण अर्धा तास लागणार होता. त्याप्रमाणे तिलकवाड्यातील वासुदेव कुटिर येथे पोहोचलो. श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊन नर्मदा मैयाला प्रार्थना करुन परिक्रमा सुरु केली. 

           परिक्रमा सुरु केल्यावर लगेचच परत एकदा तिलकेश्वराचं दर्शन घेतलं. यानंतर तिथून जवळच असलेल्या नर्मदा मंदिरात गेलो. इथे मातेला नमन करुन प्रत्यक्ष परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा मार्ग थोडा बाजूचा आहे. नर्मदा मैया उजव्या बाजूला ठेवून आपण चालत असतो. सुरुवातीला थोडा सडक मार्ग आहे मग थोडी पायवाट आहे. साधारण दोन किमी. अंतरावर एक मंदिर दिसतं. हे मणिनागेश्वराचं मंदिर. याठिकाणीही भाविकांची रहाण्या - जेवण्याची व्यवस्था आहे. 

           मणिनागेश्वराचं दर्शन घेऊन पुढे निघालो. इथून पायवाटेने पुढे जाताना बाजूला घरं आहेत. त्यामुळे इथल्या ग्रामसंस्कृतीचं छान दृश्य पहायला मिळतं.मग पुढे बराचसा रस्ता शेतातून आणि नर्मदा तीरावरुन होतो. मैयाचं सुंदर दर्शन घडत असतं. पहाटे चार वाजता आम्ही परिक्रमा सुरु केल्याने नर्मदा किनाऱ्याने चालताना चंद्र अस्ताचलाला जाताना दिसत होता. आणि अस्ताला जाताना तो किंचित केशररंगी शशांक मैयाच्या जलदर्पणी स्वताला न्याहाळत होता. अतिशय विहंगम दृश्य होतं ते. ते दृष्य नजरेत आणि छायाचित्रात साठवत आमची परिक्रमा पुढे सुरु होती.

            मधेच परिक्रमा मार्ग, पुन्हा डांबरी रस्त्यावर वळला होता. तो पार करुन पुन्हा पायवाट सुरु झाली. शेतातून पायवाटेने जाताना उजव्या बाजूला अजून एक मंदिर लागतं ते म्हणजे कपिलेश्वर मंदिर. नाथपथी महाराजांचा इथे आखाडा असून गर्द झाडीतला हा आश्रम सुंदर आहे. इथून पुढला थोडा मार्ग नर्मदा किनाऱ्याने जातो. मैयाचं सुंदर दर्शन घडत रहातं 

            उत्तरवाहिनी परिक्रमेच्या उत्तर तटावरील शेवटचं गांव रेगण आहे. इथे परिक्रमेचा मार्ग नर्मदा किनाऱ्यावरुन परत  थोडा गावातून जात परत तीरावर येतो. हा शेवटचा थोडा मार्ग मात्र पात्रापासून थोडा उंचावर आणि उंचसखल असा आहे. त्याचबरोबर मातीचं प्रमाण जास्त असल्याने जपूनच चालावं लगतं अन्यथा पाय घसरुन आपण खाली पात्राजवळ जाण्याची शक्यता असते. हा मार्ग संपता संपता आपल्या डाव्या बाजूलाच भव्य असा शंभू महादेवाच्या नंदीचा पुतळा आहे. इथे थोडं थांबून आम्ही त्याची छायाचित्रं काढली. लगेचच पुढे आपल्याला पलिकडच्या तीरावर नेण्यासाठी नावा उभ्या असतात. इथून पलिकडच्या तीरावरचं म्हणजे रामपुरा गावाचं छान दृश्य दिसतं. 

            इथून आम्ही सगळे एकाच नावेतून पलिकडल्या तीरावर निघालो. नाव  साधारण मध्यावर येताच आमच्या जवळच्या मैयाजलातील थोडं जल त्या प्रवाहात ओतून त्यातच तिथलं जल परत भरुन घेतलं यालाच तीर्थमीलन करणं असं म्हणतात. जेमतेम ८-१० मीनीटांचा हा प्रवास अतिशय सुंदर होता. मैयाच्या जळात हात घालत खेळत प्रवास कधी संपला ते कळलंही नाही. नावेने पलिकडल्या तीरावर उतरलो आणि आमचा परिक्रमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. हा साधारण १०-११ किमी. चा मार्ग कधी पूर्ण झाला हे कळलंही नाही. सारेच जण खूपच उत्साहाने चालत होतो. 

            दक्षिण तटावरील पहिलं गाव म्हणजे रामपुरा. इथे आम्ही पोहोचलो. आणि सर्वप्रथम वाफाळत्या चहाचा आस्वाद घेतला. आदल्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर काहीच खाणंपिणं केलं नव्हतं. कारण सर्वांनाच परिक्रमेची ओढ लागली होती. जेव्हा अर्धा टप्पा पूर्ण झाला तेव्हा पहिल्यांदा सगळ्यांना याची जाणीव झाली आणि सगळेच चहा प्यायला थांबलो. 

            चहा पिऊन समोरच असलेल्या थोड्या पायऱ्या चढून प्रज्ञान आश्रमात गेलो. इथे तीर्थेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरात महादेवाला परिक्रमेत आपण आपल्या बरोबर घेतलेलं मैयाजल चढवायचं असतं. परिक्रमा पूर्तीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे अशी मान्यता आहे. त्याप्रमाणे तीर्थेश्वराला थोडं जल चढवून आम्ही पुढे निघालो.

            दक्षिण तटावरील परिक्रमेचा बराचसा मार्ग डांबरी रस्त्याने जातो. त्या मार्गाने आम्ही पुढे चालायला लागलो. मार्गावर बऱ्याच ठिकाणी सेवा म्हणून चहा, पाणी, सरबत, ताक इ. दिलं जातं. इथले गावकरी मैयाची सेवा म्हणून परिक्रमावासींना ही मोफत सेवा अगदी आग्रहाने देतात. हे आम्हाला आधीपासूनच माहीत होतं. उत्तर तटावरुन आम्ही भल्या पहाटे परिक्रमा सुरु केल्याने तिथे अशी सेवा देणारं कुणी नव्हतं. पण दक्षिण तटावरही सुरुवातीला तसं कुण दिसलं नाही. एव्हाना सहस्त्ररश्मीचं आगमन झालं होतं. आणि मार्गावर कुठेतर थंड पेय मिळावं असं मनात येत होतं.

            आपली इच्छा मैया बरोबर जाणते आणि लगेचच पूर्णही करते हा पूर्वानुभव होताच. अगदी तसंच झालं. थोडंसं चालून पुढे गेलो आणि वाटेत चहा, गोड बुंदी असा प्रसाद देणं सुरु होतं. प्रसाद म्हणून अगदी एकघोट चहा घेऊन पुढे निघालो.

            थोडं पुढे गेल्यावर लागलं ते रणछोडरायाचं मंदिर. अगदी रस्त्यालगतच असलेलं अतिशय सुंदर प्रशस्त असं हे मंदिर. शेत नांगरताना सापडलेली श्रीविष्णूची काळ्या पाषाणातील रेखीव मूर्ती इथे आहे. इथे दर्शन घेऊन पुढे निघालो.

             थोडं पुढे जाताच पुन्हा सेवेकरी उभे होते. ते मात्र सर्वांना ताक देत होते. ताक प्यायला मिळतय म्हटल्यावर सगळेच खूष. ग्लासभर थंडगार गोड ताक पिऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. मग मात्र बराचवेळ न थांबता चाललो. सगळा मार्ग डांबरी रस्त्यानेच होता. जूना रामपुरा गावातूनच हा मार्ग पुढे धनेश्वर मंदिराकडे जातो. आपल्या उजव्या बाजूला थोडंसं आत असं हे धनेश्वर महादेवाचं मंदिर आहे.

             परिक्रमा मार्गावर यानंतरचं ठिकाण म्हणजे गोपालेश्वर मंदिर. 

             यानंतरचं पुढचं ठिकाण म्हणजे मांगरोल गावातील मंगलेश्वर मंदिर. मंगळ हाही शिवशंकरांचा पुत्र आहे. याचा जन्मही नर्मदा नदी प्रमाणेच शिवशंकराच्या स्वेदापासूनच झाला आहे. उत्तर वाहिनी नर्मदा नदीच्या तीरावर या ठिकाणी त्याने शिवाची तपश्चर्या केली म्हणून या मंदिराचं नांव मंगलेश्वर आणि गावाचं नांव मांगरोल.

             इथून थोडं पुढे गेल्यावर आम्ही सगळेच  विश्रांती आणि फलाहार करण्यासाठी थांबलो. कारण सूर्योदय होऊन फार वेळ झाला नसला तरी काहिली व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे थोडं थांबून मग परत चालायला लागलो.

             मंगलेश्वर मंदिरानंतर मार्गात तीन आश्रम आहेत. तपोवन आश्रम, रामानंद आश्रम आणि शेवटचा सीताराम बाबांचा आश्रम

             आम्ही सीताराम बाबांच्या आश्रमात पोहोचलो. तिथेही परिक्रमावासींना चहा देत सेवेकरी उभे होते. पण चहापेक्षा काही थंड मिळावं असं मनात आलं आणि तिथे बाजूलाच असलेल्या कलिंगडांच्या ढिगाकडे माझं लक्ष गेलं. कलिंगड विकत घ्यावं असा विचार करत मी काही पावलं पुढे गेले आणि मैयाने माझी ही इच्छाही त्वरित पूर्ण केली. समोरच लालबुंद रसदार अशा कलिंगडाच्या फोडी परिक्रमावासींकरता ठेवल्या होत्या. खरंतर असं विनामूल्य कुणाकडून काही घेणं आपल्याला पटत नाही. पण त्यांच्या दृष्टीने ही मैयाची सेवा असल्याने ते आपल्याला आग्रहच करतात. मुळात मैयाची पायी परिक्रमा करताना पैसे जवळ ठेवायचे नसतात असा संकेत आहे. मैया आपल्याला कधीही उपाशी तर ठेवत नाहीच पण आपल्या इच्छा आकांक्षा सहज पूर्ण करते. हा अनुभव आम्हाला वाहनाने केलेल्या परिक्रमेत आणि आताच्या या उत्तरवाहिनी परिक्रमेतही आला. 

             सीताराम बाबांच्या आश्रमातून थोड्या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर मार्ग परत अगदी नर्मदा किनाऱ्याने जातो. हा साधारण तीन किमी.चा मार्ग मात्र पूर्ण दगडगोट्यातून आहे. परिक्रमा करणाऱ्यांना चालणं सुकर व्हावं म्हणून थोडे दगडगोटे बाजूला केले आहेत. मा मार्गावरुन चालत आम्ही परत जिथे नावा थांबलेल्या असतात तिथे पोहोचलो. 

             इथून नावेने आम्ही तिलकवाड्याला म्हणजेच उत्तर तटावर परत आलो आणि आमची उत्तरवाहिनी परिक्रमा पूर्ण झाली. नावेतून जिथे उतरलो तिथे स्नानासाठी सुरक्षित किनारा नव्हता. तिथे असलेल्या पोलिसांनी आम्हाला उजव्या हाताला थोडं पूढे जाऊन स्नान करायला सांगितलं तिथे काही भाविक आधीच स्नान करत होते. मग आम्हीही तिथे गेलो. तिथेही किनारा दगडगोट्यांनीच व्यापला होता.

              माझ्या पुढे आमच्या ग्रुप मधले काही जणं चालत होते. मी थोडी मागून नर्मदेश्वर आणि नर्मद्या गणेशाच्या शोधात सावकाश चालत होते. काही मिळाले ते वेचत असतानांच मला ग्रुपमधल्या एकांनी हाक मारली आणि एक रेखीव नर्मदेश्वर माझ्या हातात दिला. मी तो पाहून त्यांना परत देत असता त्यांनी तो मलाच दिल्याचं सांगितलं आणि मला काय बोलावं तेच कळेना. कारण अतिशय अचानकपणे परिक्रमा पूर्ण झाल्यावर मैयाने माझी ही इच्छाही पूर्ण केली होती. आमचा ग्रुप मोठा असूनही आम्ही एकमेकाशी अगदी गरजेपुरतंच बोलत होतो. बराचसा वेळ नामस्मरण सुरु होतं. ही सेवा मैयाचरणी रुजू झाल्याचा संकेत म्हणजेच मला प्राप्त झालेला नर्मदेश्वर ही माझी धारणा आहे.

              स्नान करण्यासाठी मैयाजळात उतरलो आणि सारा थकवा, उन्हाची काहिली नाहीशी झाली. किमान तासभर तरी आम्ही पाण्यातच होतो. पण मग मात्र आणखी उशिर होऊ नये म्हणून पाण्याबाहेर आलो. स्नान करुन आम्ही परत वासुदेव कुटीर येथे निघालो. हा मार्ग मात्र जरा दमवणारा होता. कोरड्या पात्रातून दगडगोट्यातून बरंच चालल्यावर वर  बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर आम्ही कुटिरात पोहोचलो. तिथे परत एकदा श्री मारुतीरायाचं दर्शन घेतलं. वासुदेव कुटीरातच कन्यापूजन केलं. मार्गावरही मध्ये मध्ये कुमारिकांना यथाशक्ती काही अर्पण करत होतोच. परिक्रमा निर्विघ्नपणे पूर्ण झाली या आनंदात गाडीजवळ पोहोचलो. गाडीने परत मुक्कामी आलो. लगेचच पूजेची तयारी करुन संकल्पपूर्ती केली. नर्मदा तीरावर पूजेसाठी योग्य अशी सावलीची जागा ना न मिळाल्याने मुक्कामाच्या ठिकाणीच संकल्पपूर्ती करावी लागली.

              सारं आवरुन मुक्कामाचं ठिकाण सोडून पोयचा येथील निळकंठधाम मंदिर पहायला गेलो. विस्तीर्ण आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. मुख्य मंदिर आणि आजूबाजूला अनेक मंदिरं असं याचं स्वरुप आहे. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा दुपारचं अतिशय कडक उन होतं. गरम झळा येत होत्या. त्यामुळे भराभर थोडं फिरुन पुढे निघालो.

              नंतरचं आमचं ठिकाण होतं ते म्हणजे पावागड. चंपानेर मधलं हे महाकाली मातेचं सुंदर शक्तीपीठ. मात्र इथे पोहोचल्यावर कळलं की वाईट हवामानामुळे रोपवे बंद आहे. आम्हाला इथे जायला सायंकाळ झाली होती. त्यामुळे रोपवे बंद असल्याने तीन हजार पायऱ्या चढून उतरणं वेळेअभावी शक्य नव्हतं. रात्री उशिरा अहमदाबादहून आमची परतीची रेल्वेची तिकिटं होती. त्यामुळे नाईलाजास्तव तिथूनच परत फिरलो. तिथून अहमदाबादला पोहोचलो आणि रात्रीच्या रेल्वेने परतीच्या प्रवासाला लागलो.

              श्री दत्तात्रेयांच्या कृपेने पौर्णिमेचं गिरनार दर्शन आणि लगेचच नर्मदा मैयाच्या कृपेने घडलेली उत्तर वाहिनी परिक्रमा या आम्हा सर्वांसाठी अतिशय भाग्याच्या घटना आहेत.


| जय गिरनारी |          | नर्मदे हर |


- स्नेहल मोडक






Tuesday, March 21, 2023

जागतिक कविता दिन

        आपल्या प्रत्येकाचं मन असंख्य आणि अतर्क्य अशा भावभावनांनी सदैव ओसंडून वाहत असतं. आणि प्रत्येकाचा 'व्यक्त' होण्याचा मार्गही वेगवेगळा असतो. कुणी हलकंसं स्मित करुन, कुणी बोलून, कुणी अबोल होऊन, कुणी लेखणीतून, कुणी संगीतातून तर कुणी कवितेतून व्यक्त होत असतं. कुठल्याही मार्गानं व्यक्त होऊन मनमुक्त होणं हे प्रत्येकासाठी फार महत्त्वाचं असतं एवढं मात्र नक्की. कधी मनभावना शब्दफुलांत गुंफल्या जातात आणि सुंदरशी कविता जन्माला येते.

        आज जागतिक कविता दिन. यानिमित्तानं माझ्या भावनांना दिलेलं हे काव्यरुप...


मुक्त ती अन स्वचछंद ती

निर्झरासम धुंद अवखळ ती

नाजूक फुलांसम बहरणारी ती

फुलपाखरांमागे पळणारी ती

सागरलहरींशी खेळणारी ती

हळूच शंखशिंपले वेचणारी ती

नभीची लुकलुकती चांदणी ती

अवकाशीचं सप्तरंगी इंद्रधनु ती

मृगधारेत चिंब भिजणारी ती

मृदगंधाने धुंद मोहरणारी ती

कुंचला होऊन चित्र रेखणारी ती

रंगावलीत सुरेख रंग भरणारी ती

बंध नात्यांचे अखंड जपणारी ती

व्यक्त होऊनी मनमुक्त होणारी ती

राग रुसवा अन दुखावणारी ती

मायेच्या शब्दांनी सुखावणारी ती

अश्रू पापणीआड लपवणारी ती

अन अधरावरलं स्मितहास्य ती

माझ्या मनातली स्वप्नातली ती

माझिया हृदयीची कविताच ती

माझिया हृदयीची कविताच ती

- स्नेहल मोडक

Wednesday, February 8, 2023

गिरनार आणि पावागड

               माघ पौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं पण रेल्वे आरक्षण मिळालं नव्हतं. त्यामुळे घरच्या गाडीनेच जायचं नक्की केलं आणि निवांत झालो. 

               पौर्णिमेला दोनच दिवस असताना अचानक उडन खटोलाच्या कार्यालयातून फोन आला , तुमचं पौर्णिमेचं उडन खटोलाचं तिकीट आहे पण त्यादिवशी दुपारी बारा वाजल्यानंतरच तुम्हाला जाता येईल. कारण त्यादिवशी अंबामातेच्या मंदिरापर्यंत कसल्याशा स्पर्धा आहेत. आम्हाला नीट काही कळलं नाही म्हणून आम्ही त्यांना, आम्हाला पुढे जायचंय असं सांगितलं. मग मात्र, तुम्हाला गुरुदत्तात्रेयांच्या दर्शनाला जायचंय तर तुम्ही सकाळी जाऊ शकता असं सांगितलं. पण काहीतरी गडबड आहे एवढंच आम्हाला कळलं.

               पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. पोहोचायच्या आधी आम्ही जिथे रहाणार होतो तिथल्या कार्यालयात फोन केला. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे  गोंधळात अजूनच भर पडली. त्यांच्या म्हणण्यानुसार रात्री बारा ते  दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत पायी चढून किंवा रोपवे ने जाणं सारंच बंद रहाणार आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला रात्री बारा वाजण्यापुर्वी चढायला सुरुवात करावी लागेल किंवा दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजल्यानंतर जाता येईल.

               वाटेत ३-४ ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे खूपच वाहनकोंडी झाली होती.  त्यामुळे तलेटीला पोचायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे रात्री चढायला सुरुवात करणं शक्य नव्हतं. पण तिथे गेल्यावर रोपवे सकाळी बहुतेक सुरु असेल असं कळलं. आम्ही पहाटे लवकर आवरुन निघायचं ठरवलं कारण रोपवे सुरु नसेल तर चढून जावं लागणार होतं.

                आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी येत असतानाच स्पर्धेची जोरदार तयारी सुरु असलेली दिसली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली सगळी टपरीवजा दुकानं हटवली होती. रस्त्याच्या दुतर्फा बांबूचं कुंपण करुन स्पर्धकांसाठी रस्ता पूर्ण मोकळा ठेवला होता. स्पर्धेकरता  खूप मोठी तयारी केलेली दिसत होती. चौकशीअंती कळलं तिथं राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धा होणार होती. गिरनारच्या पायथ्यापासून अंबामातेच्या मंदिरापर्यंतच्या पाच हजार पायऱ्या कमीत कमी वेळात धावत चढून उतरायच्या असं त्या स्पर्धेच स्वरूप होतं. विजयी स्पर्धकांना मोठ्या रकमेची बक्षिसं मिळणार होती. वेगवेगळ्या ठिकाणांहून एक हजार स्पर्धक यात सहभागी झाले होते.

                आम्ही ठरवल्याप्रमाणे पहाटे लवकर आवरुन दर्शनाला निघालो. पहिल्या पायरीचं दर्शन घ्यायला गेल्यावर पोलिसांनी अडवलं पण आम्ही रोपवे जाणार हे कळल्यावर पहिल्या पायरीचं दर्शन घेऊ दिलं. पायरीचं दर्शन घेऊन रोपवे साठी गेलो आणि लगेच आम्हाला रोपवेने वर जायला मिळालं. अंबमाता, गोरक्षनाथ यांचं दर्शन घेऊन गुरुशिखरी पोहोचलो. गुरुचरणी नतमस्तक झाले आणि अतिशय सुंदर असं दर्शन घडलं. दर्शन घेऊन खाली उतरुन अखंड धुनीचंही दर्शन प्रसाद घेतला. 

                माघ पौर्णिमा ही गंगास्नानासाठी अतिशय पवित्र मानली जाते. प्रयागराजला या दिवशी गंगास्नान आणि आरतीचा मोठा सोहळा असतो. यादिवशी सर्व देवता गंगास्नान, दान करण्यासाठी पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे. म्हणूनच यादिवशी गंगास्नानाला महत्त्व आहे. गिरनार पर्वतावरही गंगा अवतीर्ण झालेली आहे. श्री दत्तात्रेयांचं कमंडलू पडलं आणि त्याचे दोन भाग झाले. ते भाग जिथे पडले त्या एका ठिकाणी अग्नी उत्पन्न झाला आणि दुसऱ्या ठिकाणी गंगा अवतीर्ण झाली. या गंगेच्या तीर्थजल प्राशनाचा योग माघ पौर्णिमेलाच गिरनार दर्शनाच्या निमित्ताने आम्हाला आला ही भाग्याचीच गोष्ट. 

                खरंतर पौर्णिमा आणि गिरनार हा एक अध्यात्मिक असा अतूट बंध आहे. चंद्र हा मानवी मनाचा कारक आहे. पौर्णिमेला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे जसं सागराला उधाण येतं तसंच त्याचा आपल्या तनमनावरही दृश्य परिणाम होतो. पौर्णिमेच्या दिवशी वातावरण अतिशय सकारात्मक उर्जेनं भारलेलं असतं. म्हणूनच पौर्णिमेला पूजापाठ, होमहवन, ध्यानधारणा, सामुहिक साधना करण्याची प्रथा आहे. या सर्वांचा खूप चांगला परिणाम या दिवशी होतोच आणि आपलं मनही शांत आणि खंबीर होतं. आयुष्यातले चढ उतार स्वीकारणं सोपं होतं. अखेर आपलं मनच आपल्या जीवनरथाचा सारथी असतं. आणि म्हणूनच प्रत्येक पौर्णिमेला गिरनार दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जात असतात.

                गिरनार दर्शन करुन आम्ही रोपवेने परत यायला निघालो. मात्र रोपवेचा वेग थोडा कमी होता त्याचं कारण म्हणजे वाढलेला वारा. सकाळपेक्षा वाऱ्याचा वेग वाढलेला सहज कळत होता. गिरनार पर्वतावरचं वातावरण हे सततच बदलत असतं. वारा वाढलेला बघूनच मनात विचार आला होता की रोपवे बंद होणार नाही ना. पण त्यादिवशी रोपवे कमी वेगाने का होईना सुरु होता. मात्र दुसऱ्या दिवशी वाढलेल्या वाऱ्यामुळे रोपवे बंद ठेवावा लागला होता. आम्ही गेलो तेव्हा मॅरेथॉन स्पर्धा असूनही कुठलीही अडचण न येता, कुठेही थांबावं न लागता आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं ही दत्तगुरुंचीच कृपा.

                मुक्कामाच्या ठिकाणी परत येऊन आम्ही लगेच परतीच्या प्रवासाला लागलो. खोली पहाटे दर्शनाला जातानाच रिकामी करुन सामान गाडीत ठेवलं होतं. कारण त्यादिवशी सकाळनंतर खोली उपलब्ध होणार नव्हती. तसंच आम्हालाही दुसऱ्या दिवशी पावागडला महाकालीमातेच्या दर्शनाला जायचं होतं. जुनागढ पासून  पावागड ४०० किलोमीटर पेक्षा थोड्या जास्त अंतरावर आहे. आणि वडोदरा पासून ५० किमी. अंतरावर आहे. त्यामुळे वेळेनुसार वडोदरा किंवा पावागडच्या पायथ्याशी कुठेतरी मुक्काम करायचा असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे पावागडच्या थोडं जवळच आम्हाला रहाण्यासाठी खोल्या मिळाल्या.

                गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील हलोल तालुक्यातील हा पावागड म्हणजे एक शक्तीपीठ. याच्या पायथ्याशी चंपानेर हे ऐतिहासिक ठिकाण आहे. पावागडचा उल्लेख जुन्या शिलालेखात पावकगड असा आढळतो. याचा पहिला उल्लेख बाराव्या शतकात आढळतो. हनुमंत द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्याचा एक भाग इथे पडला तो हा गड अशी स्थानिक संकल्पना आहे. पावागडची अजून एक आख्यायिका सांगितली जाते. अतिशय दुर्गम असा हा गड चढणे अशक्य कोटीतील गोष्ट होती. चारही बाजूंनी खोल दऱ्या असलेल्या या गडावर अतिवेगवान वारे वहात असल्याने याला पावागड असं नांव पडलं. 

                प्रजापती दक्षाच्या यज्ञप्रसंगी झालेला भगवान शिवांचा अपमान शिवपत्नी सतीदेवी ला सहन झाला नाही. त्या अपमानाने योगबलाने सतीने प्राणत्याग केला. भगवान शिव सतीच्या आत्मसमर्पणाने क्रोधित होऊन तिचं कलेवर घेऊन ब्रम्हांडात सैरावैरा पळू लागले. त्यावेळी सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या कलेवराचे तुकडे केले. तेव्हा तिचे अवयव , आभुषणं जिथं जिथं पडली तिथं तिथं शक्तीपीठं निर्माण झाली. पावागडावर सतीचं वक्षस्थल पडलं आणि तिथे शक्तीपीठ निर्माण झालं. मातेचं वक्षस्थल पडलं असल्याने हे शक्तीपीठ अतिशय पवित्र आणि पुजनीय आहे.  पावागडावर वैशिष्ट्यपूर्ण अशी दक्षिणमुखी कालीमातेची मूर्ती आहे. त्यामुळे या देवीची तांत्रिक पूजा केली जाते. हे मंदिर दहाव्या आणि अकराव्या शतकाच्या मध्यात बांधण्यात आलं आहे. इथं महर्षी विश्वामित्र यांनी कालीमातेची घोर तपश्चर्या केली होती. या मंदिरातील कालीमातेची स्थापना ही विश्वामित्र ऋषींनीच केली असल्याचं मानतात. 

                या मंदिरात दर्शनासाठी पायथ्यापासून १८०० पायऱ्या चढून जावं लागत असे. खूपच अवघड असा हा मार्ग होता. पायऱ्याही काही ठिकाणी खड्या, अरुंद, उंच असल्यामुळे वयोवृद्ध भाविकांना दर्शनासाठी जणं अशक्य होतं. मात्र सर्वांना गडावर जाऊन मातेचं दर्शन घेता यावं म्हणून १९८६ सालापासून इथे रोपवेची व्यवस्था करण्यात आली आहे. माछी गावातून हा रोपवे सुरु होतो. रोपवेने गडावर गेल्यावर २५० पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येतं. तसंच आता पूर्वीच्या पायऱ्यांऐवजी नवीन पायऱ्या बांधल्या आहेत. त्या अगदी कमी उंचीच्या आणि चढायला सोपं जाईल अशा बांधल्या आहेत. पण त्यामुळे १८०० ऐवजी ३०००पायऱ्या चढाव्या लागतात. 

                आम्ही पहाटेच दर्शनासाठी निघालो. या रोपवेचंही तिकीट आधीचं काढलं होतं. परंतु भाविकांची संख्या थोडी वाढेपर्यंत रोपवेसाठी थांबावं लागलं. मात्र रोपवे सुरु झाल्यावर पहिल्याच ट्राॅलीने आम्ही गडावर पोहोचलो. पुढे २५० पायऱ्या चढून मुख्य मंदिरात पोहोचलो. महाकाली मातेचं सुंदर दर्शन घडलं आणि मन तृप्त झालं. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाने नटलेलं हे मंदिर प्रशस्त आहे. आजूबाजूचा परिसरही मोठा आहे. या भागातील हे अतिशय जागृत देवस्थान मानलं जातं. दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला इथे मोठी यात्रा भरते. गडावर तीन मोठे तलाव आहेत. तसंच विश्वामित्री नदीचा उगमही या डोंगरातूनच होतो. हे सारं पाहून, मातेची मूर्ती डोळ्यात साठवून आम्ही परत निघालो.

                चंपानेर हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. इथल्या काही वास्तूंना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानं म्हणून घोषित केलंय. मंदिरातून परत आल्यावर आम्ही हे सारं पहायचं ठरवलं होतं. आम्ही जिथे मुक्काम केला होता ते ठिकाणही किल्ल्याच्या अंतर्भागातच होतं. किल्लयात आता फक्त दोन‌ ऐतिहासिक मशीदी आणि इतर लोकवस्ती आहे.  किल्ल्यात बाकी पहाण्यासारखं काही नाही. किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि तटबंदी मात्र अजूनही सुस्थितीत आहे. हे सगळं बघून आम्ही परत निघालो.

                आमचा प्रवास सुरु असताना सायंकाळ झाली. केशररंगाची उधळण करत रवीराज अस्ताचलास निघाले. आणि चालत्या गाडीतूनच मी त्या मावळत्या दिनकराची छायाचित्रं घेण्यात दंग झाले. एका क्षणी तो केशरगोल डोंगराआड गेला आणि दूरवर दिसणारी ती सावळी पर्वतरांग केशरकडेनी चमकू लागली. पुढच्या काही मिनिटांतच रवी पूर्ण अस्ताला गेला आणि सावळी पर्वतरांग गडद झाली. अचानक मनात विचार आला माझे दत्तगुरु गिरनारीच राहिले. त्याच क्षणी दुसरा विचार आला सारं चराचर व्यापून दशांगुळे उरलेत ते माझे दत्तगुरु. हे मात्र योग्यच. कारण क्षणोक्षणी ते आपल्या बरोबरच असतात. आपण साद घालायचा अवकाश, क्षणात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. गाडीत त्यावेळी दोघांची चर्चा सुरु होती, आज श्रीगुरुप्रतिपदा. या तिथीला श्री नृसिंह सरस्वती निजानंदास गेले. गाणगापूरला यादिवशी मोठा सोहळा असतो. पण माझ्या मनात विचार आला की त्यादिवशी ते गुप्त झाले तरी अजूनही आपल्या बरोबरच आहेत. आणि म्हणूनच श्री दत्तात्रेयांना स्मर्तृगामी म्हटलं जातं. बहुधा हिच जाणीव त्यांनी मला करुन देऊन आश्वस्त केलं.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त  ||

- स्नेहल मोडक








Wednesday, January 18, 2023

सागरतीरी

                   दुपारचं उन सरतं आणि सायंकाळ अवतरते. सारी पश्चिमा नीलरंगातून सोनकेशर रंगात रंगते. अस्ताचलास जाणारा कनकगोल‌ सागरावरही सोनकेशराची उधळण करतो. आणि त्या चमकत्या सोनेरी जळावरलं रवीराजाचं प्रतिबिंब लाटांवर स्वार होतं. काही वेळातच हा रंगखेळ संपून गडद सांज होते. मग मात्र सगळ्या प्राणिमात्रांची लगबग उडते ती आपापल्या घरट्याकडे परतण्याची. त्याचवेळी आपलं मनही किंचित हळवं कातर होतं. असंख्य विचारांची वावटळ उठते. पण काही वेळातच अवनीवर चांदणसडा पसरतो आणि आपलं मनही शांत होतं, सुखावतं. अशा शांत नीरव रात्री कधीतरी सागरकिनारी बसावं आणि मनातली वादळं शमवत त्या नीरव शांततेत हरवून जावं. अतिशय वेगळ्या पण हवाहव्याशा वाटणाऱ्या अशा या अनुभवाने तनमन सुखावतंच.


उसळती शुभ्र फेसाळ निळ्या सागरलाटा

अवतरते सांज सुरेख गोजीरी सागरतटा

होतसे अधीर कनकगोल हा सागरभेटीस

रंगविभोर होई पश्चिमा रवी येता दिठीस

झेपावती विहग घरट्याकडे आपल्या

सांजरंगात साऱ्या सावल्या दाटल्या

सळसळते बन ते माडांचे होतसे शांत

गजबजला सागरकिनारा होई निवांत

अंधारल्या सागरतीरी मग एकले बसावे

अन गाजेसंगे भावलहरीत तल्लीन व्हावे

विध्द जाहल्या मनास हलकेच सावरावे

होऊनी कुंचला भावचित्र सुरेख रंगवावे

पुनवेच्या चांदव्याने मग नभी अवतरावे

अन अवकाशीचे ते चांदणे मनी उतरावे

- स्नेहल मोडक

Thursday, January 12, 2023

एक अनुभव असाही

                        नुकतंच घरी एक शुभ कार्य संपन्न झालं होतं. खरंतर तयारीला खूप कमी वेळ मिळाला होता. त्यामुळे खूपच धावपळ सुरु होती. त्यातच आमच्या आधीच ठरलेल्या कार्यक्रमांमध्येही वेळ जात होता. अशातच तब्येतीच्या आणि इतर काही अडचणी उद्भवल्या. आणि कार्यक्रम पार पडेपर्यंत मनात एक चिंतेचं सावट दाटून राहिलं. मात्र केवळ श्री दत्तात्रेयांच्या आशीर्वादानेच त्या साऱ्या अडचणींतून आम्ही सुखरुप बाहेर पडलो आणि कार्य अतिशय उत्तम रितीनं संपन्न झालं. 

                        कार्यक्रमानंतर २-३ दिवसातच दैनंदिन व्यवहार सुरु झाले. याचं ऑफिसला जाणं सुरु झालं. पण आधी बिघडलेल्या तब्येतीमुळे अशक्तपणा खूपच होता. पण हळूहळू बरं वाटेल याच विचाराने रुटिन सुरु केलं होतं. घरच्या सगळ्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने खूपच दगदग झालीय आता पूर्ण विश्रांती घ्या. कुठेही प्रवासाला जाऊ नका अशी प्रेमळ दटावणीही केली होती. त्याप्रमाणे काही दिवस सुरळीत सुरु होतं. 

                        पौष पौर्णिमा चार दिवसांवर आली आणि मला गिरनारचे वेध लागले. एवढं मोठं कार्य संपन्न झालं, साऱ्या अडचणीतून बाहेर काढत आम्हाला आश्वस्त केलं ते श्री दत्तगुरुंनीच. त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी माझं मन आसुसलं होतं. पण याची तब्येत अजून तितकी ठिक नसल्याने तो नंतर जाऊया असं म्हणत होता. पण मला लगेच आलेल्या पौष पौर्णिमेलाच दर्शनाला जायचं होतं. गिरनारला निघायच्या आदल्या दिवसापर्यंत याचा नकार होता. माझं मन मात्र दर्शनासाठी कासावीस झालं होतं. 

                        अखेर मी दत्तगुरुंनाच प्रार्थना केली काहीही करा पण मला गिरनार दर्शन घडवा. माझी गिरनारला कशीही यायची तयारी आहे. मी एकटीने, कुठल्याही गाडीने, कसाही प्रवास करुन यायला तयार आहे. पण मला दर्शन घडवाच. दत्तगरुंना माझी तळमळ कळली आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ण करायचं ठरवलं असावं. मी याला सांगितलं माझं एकटीचं रेल्वेचं तिकीट काढं. ऐनवेळी एकही तिकीट उपलब्ध नव्हतं हे कळल्यावर मी जनरल डब्यातून प्रवास करेन पण गिरनारला जाईन असंही सांगितलं. पण मला एकटीला पाठवणं त्याला अशक्य होतं अखेर रात्री इथून अहमदाबाद पर्यंतची दोन तिकिटं मिळाली. तिथून पुढे दुसऱ्या गाडीने जुनागढची तिकीटं मिळाली. आणि गिरनारला जायचं नक्की झालं. मात्र परतीचं फक्त अहमदाबाद पर्यंत तिकिट मिळालं. पुढचं दुसऱ्या गाडीचं तात्काळ मध्ये तिकीट काढायचं ठरवलं. 

                        रेल्वेची तिकीटं मिळाल्यावर उडन खटोलाची तिकीटं काढली. पण उडन खटोलाच्या च्या साईटची काहीतरी गडबड झाली होती. आम्ही तिकीटं‌ काढली आमचे पैसे तिथे जमा झाले पण आम्हाला तिकीट मिळालच नाही. बराच प्रयत्न करुनही काही होईना म्हणून ते पैसे वाया गेले असं समजून पुन्हा तिकीट काढायचा प्रयत्न केला तर तेही येईना. मग मात्र सकाळी बघू असा विचार करुन तो नाद सोडून दिला. 

                        सकाळी अचानक उडन खटोलाच्या सईटवरुन आमची तिकीटं आली असल्याचा मेसेज आला. आदल्या दिवशीची काळजी मिटली होती. आधी भरलेले पैसे वाया न जाता तिकीटं मिळाली होती. मग सारं आवरुन प्रवासाला निघालो. अहमदाबाद पर्यंत सारा प्रवास सुरळीत झाला. अहमदाबादला वेळेत पोहोचलो. पुढे जुनागढला जाणाऱ्या गाडीला दिड तासाचा अवधी होता. म्हणून आम्ही ज्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर उतरलो होतो तिथेच बसलो. तिथून मुख्य इंडिकेटर सहज दिसत असल्याने आम्हाला आमची गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार ते कळणार होतं. त्यानुसार थोड्या वेळाने आमची गाडी दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणार हे कळलं आणि आम्ही तिकडे गेलो. मात्र तिथे , प्लॅटफॉर्म नंबर 2A असा बोर्ड होता. हा 2A आहे म्हणजे बाजूचा दोन नंबर आहे असं साधा समज करुन घेत आम्ही तिथेच थांबलो. गाडीची वेळ जवळ आली आणि माझ्या मनाची चलबिचल सुरु झाली. का कुणास ठाऊक पण काही तरी चुकतंय असं मला वाटू लागलं. आणि मी इथे बाजूलाच असलेल्या स्टाॅलवरच्या माणसाला विचारुन हाच दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे ना याची खात्री करुया असं याला सारखं म्हणू लागले. पण त्याचं एकच उत्तर साधं सरळ आहे, इथेच गाडी येणार विचारायची काही गरज नाही. आणि मग मीही गप्प बसले. पण त्याचवेळी मीच विचारुन घेतलं असतं तर पुढचा सगळा गोंधळ टळला असता अर्थात ही पश्चातबुध्दी होती. 

                        गाडीची वेळ होत आली आणि आम्ही जिथे थांबलो होतो तिथे दुसरीच गाडी आली, जी आमच्या गाडीच्या नंतर सुटणारी होती. आणि त्याच गाडीचं तिकीट आम्हाला मिळालं नव्हतं. असं कसं झालं असा आम्ही विचार करत असतानाच प्लॅटफॉर्म क्रमांक 2A वर आमची गाडी येताना दिसली. आणि आम्ही आमच्या डब्याकडे जाण्यासाठी चटकन पुढे गेलो पण त्या गाडीचा इंडिकेटरच लागला नसल्याने डबा नक्की कुठे येईल हे आम्हाला कळलं नव्हतं. त्यामुळे आम्ही डबा बघत असतानाच गाडी मात्र आमच्या नजरेसमोरुन न थांबता जणूकाही आम्हाला वाकुल्या दाखवत पुढे निघून गेली. आणि काही क्षण आम्ही थिजूनच गेलो. मग भानावर येत स्टॉलवरच्या माणसाला गाडी बद्दल विचारलं तर तो सहजपणे आताच तर गेली गाडी असं म्हणाला. पण गाडी थांबलीच नाही असं सांगितल्यावर म्हणाला गाडी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरच थांबली होती. तेव्हा कळलं तो प्लॅटफॉर्म आम्ही जो समजत होतो तो नव्हताच. तर 2A आणि 2 नंबर असा एकच लांबलचक प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे गाडी खूप मागे येऊन थांबलेली आम्हाला कळलीच नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गाडीची सुचनाही दिली गेली नव्हती. 

                        गाडी नजरेसमोरुन निघून गेली आणि मग आमच्या समोर एकच पर्याय उरला होता तो म्हणजे बाजूचा उभ्या असलेल्या गाडीत विनातिकीट चढणे. ती गाडी सुटायची वेळ झाल्याने आम्ही लगेच त्या गाडीत चढून दारातच तिकिट तपासनीसाची वाट बघत उभं राहिलो. गाडी सुटली आणि काही वेळातच तिकीट तपासनीस आला. आम्ही त्याला सारं सांगितलं आमचं त्या गाडीचं तिकीट दाखवलं अर्थात त्या तिकीटाचा इथे काहीच उपयोग नव्हता. पुन्हा दंडासहित तिकिट घेणं भाग होतं त्याला आम्ही तयार होतोच. कुठल्याही परिस्थितीत जुनागढला पोचायचं होतं आम्हाला.  तपासनीसानी आम्हाला पुढच्या स्थानकावर  बसायला मिळेल अशी व्यवस्था केली. तोपर्यंत आम्ही दोघंही दारातच उभं राहीलो होतो. साधारण तासाभरानंतर आलेल्या स्थानकावर २-३ जणं उतरली आणि आम्हाला बसायला जागा मिळाली. आणि श्री दत्तगुरुंना मनोमन नमस्कार केला. 

                        पहाटे वेळेत जुनागढला उतरलो. आधी ठरवलेल्या संस्थेत रहाण्यासाठी गेलो. पण आम्हाला हवी ती खोली उपलब्ध नव्हती. मग जी साधी खोली मिळाली ती घेऊन खोलीच्या बाहेर असलेल्या स्नानगृहात सारं आवरुन दर्शनाला निघालो. मला इथेही चांगलीच तडजोड करावी लागली होती. पण कुठल्याही परिस्थितीत दर्शन तर हवंच होतं. म्हणूनच ते स्विकारणं भाग होतं. दर्शनासाठी बाहेर पडलो आणि नेहमीप्रमाणे पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे साठी तिथे पोहोचलो. खरंतर खूपच मोठी रांग होती. पण आमचं तिकीट आधीच काढलेलं असल्याने आम्हाला अगदी लगेच जायला मिळालं. 

                        रोप वे ने उतरुन पायऱ्या चढायला सुरुवात केली. तब्येत ठीक नसल्याने सावकाश जायचं असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे नामस्मरण करत चढत होतो. पण अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे तब्येत साथ देत नसूनही सर्वात कमी वेळेत आम्ही गुरुशिखरावर पोहोचलो. मंदिरात प्रवेश करुन दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन क्षणात शांत झालं. याचसाठी केला होता अट्टाहास याची जाणीव झाली अन मन तृप्त झालं. कसंही न्या पण मला दर्शन घडवाच ही माझी इच्छा दत्तगरुंनी पुर्ण केली होती. घरात निर्विघ्नपणे शुभ कार्य श्री दत्तात्रेयांच्या कृपेने पार पडलं होतं त्यामुळे त्यांचं दर्शन माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. 

                        दर्शन घेऊन गुरुशिखरावरुन खाली येऊन अखंड धुनीचं दर्शन प्रसाद घेऊन परत खाली निघालो. रोपवेने पायथ्याशी परत आलो. रहाण्याच्या ठिकाणी जाऊन परत एकदा खोलीची चौकशी केली असता आम्हाला हवी असलेली खोली रिकामी झाली होती. त्यामुळे आम्ही लगेच त्या खोलीत आमचं सामान घेऊन गेलो. 

                        दुसऱ्या दिवशी परतीचं अहमदाबाद पर्यंतचं तिकीट होतं. पुढचं तिकीट काढायचा प्रयत्न केला तर एकाही गाडीचं तिकीट उपलब्ध नव्हतं. पुन्हा मनात काळजी निर्माण झाली. जुनगढहुन सुटणाऱ्या रेल्वेचं तिकीट मिळतंय का पहात असताना  २-३ अशी वेटिंग लिस्ट दिसत होती.  एक प्रयत्न म्हणून त्या गाडीची तिकीटं काढली. सायंकाळी थोडं फिरुन भवनाथ महादेवाचं दर्शन घेऊन रुमवर परत आलो. रात्री आमची तिकीटं रद्द झाल्याचा मेसेज आला आणि आमची काळजी वाढली. मधल्या वेळेत अहमदाबाद पर्यंतचंं तिकीटही आम्ही रद्द केलं होतं. आता परतीसाठी रेल्वेचा पर्याय उरला नव्हता. मग तिथूनच सुटणाऱ्या दुसऱ्या दिवशीच्या बसची चौकशी केली असता तिथे मात्र चटकन तिकीट मिळालं आणि आम्ही निवांत झालो. 

                       मी श्री दत्तगुरुंना कसंही करुन दर्शन घडवा अशीच प्रार्थना केली होती. एका क्षणी तर माझ्या मनात साशंकता निर्माण झाली होती की माझ्या एखाद्या प्रमादाची शिक्षा म्हणून मला गुरुदर्शन घडणार नाहीय. मात्र त्याचवेळी मी दत्तगुरुंना मनोमन प्रार्थना केली होती की दुसरी कुठलीही शिक्षा द्या पण गिरनार दर्शन घडवा आणि वस्तूरुप प्रचिती द्या. श्री दत्तात्रेयांनी माझी ही इच्छाही पुर्ण केली ती म्हणजे अखंड धुनीजवळ मिळालेल्या प्रसाराबरोबर पहिल्यांदाच मिळालेलं गिरनारस्थित गुरुमुर्तीचं अप्रतिम छायाचित्र. खरंच माझ्यासाठी ही खूपच भाग्याची गोष्ट आहे. 

                       खरंतर रेल्वे किंवा बसचा प्रवास करायला मी मनापासून कधीच तयार नसते. पण दोघांसाठीच घरच्या गाडीने एवढा लांबचा प्रवास कंटाळवाणा होईल म्हणून रेल्वेने जायचं ठरवलं होतं. त्यामुळे मी कसाही प्रवास करुन यायला तयार आहे पण मला गिरनार दर्शन हवंच आहे, असा माझा अट्टाहास होता. म्हणूनच बहुधा श्री दत्तात्रेयांनी थोडीशी परिक्षा घेतली असावी. पण परिक्षा घेणारे आणि त्यात यश देणारे स्वयं दत्तगुरुच यावर पुर्ण विश्वास असल्याने याही परिस्थितीत त्यांनी आम्हाला दर्शन घडवून माझी आत्यंतिक इच्छा पूर्ण केली. 

                       आपण आत्यंतिक तळमळीने केलेली प्रत्येक प्रार्थना श्री दत्तात्रेय ऐकतातच आणि आपली इच्छाही पुर्ण करतातच.

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक

Wednesday, January 4, 2023

मनकुपी

                   मनकुपी - अतिशय वेगळा अपरिचित पण सुंदर असा हा शब्द. आणि या सुंदर शब्दाइतकाच सुंदर असा हा प्रकल्प म्हणजेच मनकुपी कॅम्पींग.

                  अपार सृष्टी सौंदर्याने नटलेल्या कोकणभूमीतील दापोली हे एक शहर. दाट हिरवीगार वनराई आणि स्वच्छ सुंदर सागरकिनारे अशी या दापोलीची ओळख. आता दापोली शहरात आणि आसपास मोठमोठी हाॅटेल्स, रिसाॅर्टस् सुरु झाली आहेत. त्यामुळे सगळ्या सुट्ट्यांच्या दिवशी इथे पर्यटकांची खूपच गर्दी असते. मात्र या गजबजाटापासून लांब शांत, रमणीय ठिकाण म्हणून मनकुपी हा उत्तम पर्याय आहे. 

                  दापोलीपासून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचनदी गावात मयुरेश मोडक या इंजिनिअर तरुणाने साकारलेला हा प्रकल्प, म्हणजेच मनकुपी कॅम्पींग. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग मनसोक्त अनुभवायचा असेल तर हा पर्याय नक्कीच सुंदर. 

                  पंचनदी हे अगदी छोटंसं, जेमतेम दिड दोन हजार लोकवस्ती असलेलं, अतिशय शांत आणि रमणीय असं गांव. गावातून वहाणारी लहानशी नदी आणि तिच्यावर बांधलेलं धरण, बाजूला असलेला कोळथरे गावचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, आणि सुपारीच्या घनदाट बागा हे या गावाचं वैशिष्ट्य.

                 याच गावातल्या एका निसर्गरम्य ठिकाणी साकारलेलं मनकुपी कॅम्पींग.  लाल मातीतून नागमोडी वळणं घेत जाणारी वाट, दोन्ही बाजूंनी असणारी गर्द वनराई यातून थोडंसं अंतर चालत गेल्यावर आपल्या दृष्टीस पडतो अप्रतिम नजारा. लाल मातीत छान वाढणारी सुपारी आणि केळीची बाग, आणि त्यापुढे असलेला धरणाचा विस्तीर्ण जलाशय. इतकं सुंदर दृश्य पाहून काही क्षण का होईना आपली पावलं खिळून रहातातच. 

                 निसर्गाला जपतच मुळच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न इथे केलाय. अतिशय शांत अशा या ठिकाणी सुंदर जलाशय, त्यावर आणि आजूबाजूच्या वनराईत येणारे विविध पक्षी, त्यांचं मधुर कुजन, सायंकाळी दिसणारा सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा अनुभवण्यामधलं सुख काही वेगळंच.

                 अस्सल कोकणी पद्धतीचं शाकाहारी आणि मांसाहारी सुग्रास भोजन, डोगरांमधून जंगलवाटानी फिरणं, पक्षी निरीक्षण, कानी येणारा त्यांचा मधुर किलबिलाट, निसर्ग सौंदर्य टिपत करता येणारं सुरेख छायाचित्रण ही या कॅम्पींगची खासियत. 

                 इधल्या शांत चांदणरात्रीचा अनुभव अतिशय वेगळाच. शुभ्र चांदणं, कलेकलेनं वाढता चंद्रमा, चोहीकडे नीरव शांतता अधूनमधून ऐकू येणारी रातकिड्यांची किरकिर, मधेच दूरवरुन ऐकू येणारा टिटवीचा आवाज सारंच अप्रतिम. 

                 रोजच्या धावपळीतून आणि गजबजलेल्या वातावरणातून शांत निवांत क्षण अनुभवायला या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.


सरली सांज रात आली

अन टिपूरचांदणं ल्याली

जलदर्पणी चांदवा खुले

अन तरुपर्ण मोहक डुले

नाजूक रातराणी उमले

अन गर्द रात ही गंधाळे

तरुवरी काजवे चमचमती

अन भूवरी आरास मांडती

चांदण्यात नदीतीर नाहती

अन जळावरी तरंग उठती

नीरव रातही अलवार खुले

अन मनी चांदणझुला झुले

सरली सांज रात आली

अन टिपूरचांदणं ल्याली

- स्नेहल मोडक


मनकुपी कॅम्पींग - संपर्क : +91 7499510681









कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...