Pages

Wednesday, October 5, 2022

माॅं का बुलावा

         वैष्णोदेवी हे पूर्व भारतातील सर्वात मोठं श्रध्दास्थान. वैष्णोदेवीचं नुसतं स्मरण जरी झालं तरी 'चलो बुलावा आया है माताने बुलाया है' या गीताच्या ओळी आठवल्या शिवाय रहात नाहीत. अशी श्रद्धा आहे कि स्वयं वैष्णोदेवी मातेने दर्शनाला बोलावल्याशिवाय आपण कितीही ठरवलं तरी तिच्या दर्शनाचा योग येत नाही.

         वैष्णोदेवी मंदिर दर्शनासाठी कायम सुरु असतं. पण इतर वेळेपेक्षा नवरात्रात देवीचं दर्शन घेणं विशेष मानलं जातं. आणि त्यामुळेच इतर वेळेपेक्षा नवरात्रात करोडो लोकं दर्शनासाठी येतात. 

         आम्हीही यावर्षी नवरात्रात वैष्णोदेवी दर्शनाला जायचं ठरवून चार महिने आधीच विमानाची तिकिटं काढली. याआधी पायी जाणं झालं असल्याने यावेळी एक महिना आधी हेलिकॉप्टरचीही तिकिटं काढली. नवरात्रात दर्शन घडणार म्हणून सगळेच आनंदात होतो. 

          प्रवासाची फार काही तयारीही करायची नव्हती त्यामुळे निवांत होतो. अनंत चतुर्दशी संपून पूढचे ५-६ दिवस नेहमीसारखे गेले. हळूहळू जायचा दिवस जवळ येत होता. आणि अचानक माझ्या सहचराची तब्येत थोडी बिघडली. औषधं घेऊन आणि ३-४ दिवस ऑफिस मध्ये न जाता घरीच आराम करुन थोडं बरं वाटलं. मग नेहमीच्या सवयीप्रमाणे थोड्या अट्टाहासानेच ऑफिसला गेला. आणि जेमतेम ऑफिस पर्यंत पोहोचला आणि जोरदार चक्कर येऊन खाली बसला. सहकारी मित्रांनी तातडीने रुग्णालयामध्ये नेलं. साऱ्या तपासण्या झाल्या. फार चिंता करण्यासारखं काही नाही हे कळलं आणि सारेच थोडे शांत झालो. आम्ही मधल्या वेळात त्याच्याजवळ पोहोचलोच होतो. मग सगळे घरी परत आलो. घरातच औषधोपचार सुरु केले. अतिशय थकवा, अशक्तपणा आला होता. हे सगळं वैष्णोदेवीला जायला जेमतेम ३-४ दिवस असताना घडलं होतं. त्यामुळे मनात थोडी काळजी दाटली होती.

         जम्मूला विमानाने जायचं होतं आणि पुढे वैष्णोदेवीच्या दर्शनालाही हेलिकॉप्टरने जायचं यायचं होतं म्हणूनच केवळ जायचं ठरवलं. आणि आम्ही एकूण सात जणं जाणार होतो. आम्ही जाणं रहित केलं असतं तर सगळ्यांचाच हिरमोड झाला असता. म्हणून वैष्णोदेवीलाच प्रार्थना करुन जायचं ठरवलं.

         ठरल्याप्रमाणे घटस्थापनेदिवशी पहाटे सारं आवरुन कुलस्वामिनी समोर अखंड नंदादीप आणि माळ लावून आम्ही निघालो. विमानतळावर जाण्यासाठी गाडीने निघालो. सकाळी लवकर निघूनही वाहतूक कोंडीत अडकलो. वेळेत पोहोचणार की नाही याची चिंता वाटत असतानाच अखेर वेळेत पोहोचलो. ठरल्या वेळेत निघालो आणि वेळेत जम्मूला पोहोचलो. आधी ठरवल्यानुसार विमानतळावरुन गाडीने पुढे निघालो. 

         सुरुवातीला आम्ही थोडं स्थलदर्शन करायचं ठरवलं होतं. त्यानुसार गाडीने डलहौसी ला पोहोचलो. तिथे पोहोचायला थोडा उशीर झाला होता. मार्गात थांबत थांबत प्रवास करत होतो. आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत, छायाचित्रं काढत डलहौसी ला पोहोचलो. रात्री गरमागरम चविष्ट दालखिचडीचा आस्वाद घेऊन मुक्काम केला. 

         डलहौसी हे भारताच्या हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील अतिशय सुंदर असं थंड हवेचं ठिकाण. पाच टेकड्यांवर वसलेलं हे शहर समुद्र सपाटी पासून ६००० फूट उंचावर आहे. धौलाधर पर्वत रांगेत असलेलं हे सुंदर पर्यटन स्थळ चंबा जिल्ह्यातील काथलाॅंग, पोट्रेन, तेहरा, बाक्रोटा आणि बाळु या पाच टेकड्यांवर वसलेलं आहे. १८५४ मध्ये ब्रिटिशांनी हे बांधून विकसित केलं आणि तत्कालीन व्हाॅईसराॅय लाॅर्ड डलहौसी यांचं नांव या जागेला देण्यात आलं. 

         मनमोहक अशा सृष्टी सौंदर्याबरोबरच सुंदर मैदानं, पर्वत, प्राचीन मंदिरं, चंबा आणि पंगी खोरं याचा समावेश डलहौसी मध्ये आहे. 

        आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्थलदर्शनासाठी निघालो. सारा रस्ता घाटमार्गाने जाणारा होता. सारे रस्ते खूप छान आहेतच पण सगळीकडे स्वच्छताही आहे. अतिशय सुंदर असं सृष्टी सौंदर्य पहात वळणदार रस्त्याने आम्ही चाललो होतो. बरोबरीने अर्थातच छायाचित्रं आणि चित्रण करणं सुरुच होतं. सारं डलहौसी आणि आजूबाजूची गावं अतिशय दाट हिरवाईने बहरलेली आहेत. तिथली सारी बांधकामं ती हिरवाई जपून केलेली आहेत. साधारण डिसेंबर महिन्यात तिथे बर्फ पडायला सुरुवात होते. त्यामुळे तिथे देवदार वृक्षांची दाटी आहे. 

       तासाभराने आम्ही डलहौसी पासून २४ किलोमीटरवर असलेल्या  खज्जियार ला पोहोचलो. मखमालीचा गर्द हिरवा शालू ल्यायलेलं हे खज्जियार मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं. पोपटी हिरव्या रंगाची लांबवर पसरलेली दाट हिरवळ आणि तिला देवदार वृक्षांची गर्द किनार अप्रतिम असं दृश्य. कितीही पाहिलं, छायाचित्रात, चित्रणात बद्ध केलं तरीही समाधानच होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सुंदर हिरवळीवर आपण मनमुराद फिरुन‌ आनंद घेऊ शकतो. आणि आपल्या फिरण्यात, आनंदात अडथळा होईल असे कुठलेही खेळ किंवा इतर काहीही इथे नाही. 

         अगदी ३-४ च छोटी उपहारगृहं आहेत पण ती पूर्णपणे बाजूला आहेत. प्रवेशद्वाराच्या समोर रस्त्यापलिकडे  खाऊच्या छोट्या हातगाड्या आहेत. सगळीकडे साधारणपणे आलू पराठा, पनीर पराठा, मूली पराठा, छोले भटुरे, मॅगी, चहा, काॅफी हे सहज उपलब्ध असतं. 

         हे सारं सृष्टी सौंदर्य पाहून आम्ही परत निघालो. मग पोहोचलो दै कुंड टेकडीवर. इथे थोडं वर चढून गेल्यावर देवीचं मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जास्त फिरता येत नाही. इथे वायु सेनेचा तळ आहे. हे पाहून आम्ही परत निघालो.

         आमचं पुढचं ठिकाण होतं पंचपुला. या ठिकाणी एक सुंदर नैसर्गिक तलाव आणि जवळपास असलेले पाच पुल यामुळे हे ठिकाण पंचपुला या नावाने ओळखलं जातं. तलावातून पुढे जाणारं पाणी अगदी छोट्या धबधब्याच्या स्वरुपात खळखळत वहातं. आता आजूबाजूला इथे काही दुकानं सुरु झाली आहेत. इथे जाताना वाटेत अजून एक स्थान आहे ते म्हणजे सतधारा. सात स्वतंत्र जलधारा इथे एकाच ठिकाणी पहायला मिळतात. हे पाणी औषधी आहे. या पाण्याने स्नान केल्याने काही रोग बरे होतात अशी मान्यता आहे. मात्र आता इथे पर्यटकांना जायला बंदी घातली आहे. 

         हे सारं स्थलदर्शन करुन आम्ही कटरा ला निघालो. वाटेत थांबत थांबत निसर्ग सौंदर्य पहात छायाचित्रं काढत रात्री कटरा मुक्कामी पोहोचलो. सारं कटरा शहर नवरात्रात २४ तास गजबजलेलं असतं. सारं वातावरण वैष्णोदेवीच्या भक्तीने भारलेलं असतं. त्या वातावरणात येताच सारं स्थलदर्शन बाजूला पडलं आणि आम्हालाही वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाची आस लागली. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी जायचं होतं.

        भारतातील हिमालय पर्वतरांगेतील वैष्णोदेवी हे अतिशय पवित्र आणि लोकप्रिय असं श्रध्दास्थान. जम्मूमधल्या कटरा शहरातील त्रिकुट पर्वतावर हे वैष्णोदेवीचं स्थान आहे. दुर्गादेवीचा एक अवतार म्हणजे वैष्णोदेवी. जम्मू पासून ४५ किलोमीटरवर असलेल्या कटरा शहरापासून १४ किलोमीटरची चढाई करुन वैष्णोदेवीच्या दर्शनाला जावं लागतं. ज्यांना हे संपूर्ण अंतर पायी चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी घोडा, पालखी, पिठ्ठू असे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कटरा ते सांजीछत अशी हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे. जाता - येता दोन्ही वेळा किंवा एकच वेळ अशी हेलिकॉप्टरची सेवा आहे. 

         त्रिकुट पर्वतावर असलेलं हे वैष्णोदेवी मंदिर एका गुहेमध्ये स्थित आहे. भैरवनाथाने वैष्णोदेवीचा आदिशक्तीला वश करण्यासाठी पाठलाग केला. माता वैष्णोदेवी या त्रिकुट पर्वतावर आली आणि एका ठिकाणी थांबून तिने भैरवनाथ मागोमाग येत असल्याची खात्री करुन घेतली. त्या स्थानाला चरणपादुका दर्शन असं नांव आहे.  

         माता ज्या गुहेत जवळपास ९ महिने राहिली त्या गुहेला 'गर्भजून' किंवा अर्धकुमारी गुंफा म्हणून ओळखतात. वैष्णोदेवी मातेबरोबरच हनुमानजी तिच्या रक्षणासाठी उपस्थित होते अशी मान्यता आहे. हनुमानजीना तहान लागली म्हणून वैष्णोदेवीने बाण मारुन पर्वतामध्ये जलधारा उत्पन्न केली आणि या धारेत मातेनं आपले केस धुतले. आता ही जलधारा बाणगंगा या नावाने ओळखली जाते. या जळात स्नान केल्याने किंवा हे जल प्राशन केल्याने श्रध्दावानांचा सारा  थकवा आणि अडचणी दुर होतात असं म्हणतात.

         ज्याठिकाणी वैष्णोदेवी मातेने भैरवनाथांचा वध केला होता त्या ठिकाणाला भवन म्हणून ओळखलं जातं. भैरवनाथांचा वध केल्यावर त्याचं शिर दूरवर जाऊन पडलं. तिथं भैरवनाथ मंदिर बांधण्यात आलं आहे. त्यालाच भैरोघाटी असंही म्हणतात.

          भैरवनाथांचा वध केल्यानंतर त्याना आपली चूक कळली आणि त्यांनी वैष्णोदेवी मातेची क्षमायाचना केली. तेव्हा मातेने त्यांना क्षमा करुन सांगितलं की माझं दर्शन घेतल्यानंतर तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन पूर्ण होणार नाही. भैरवनाथ मंदिर दर्शनासाठी ३ किलोमीटर अंतर चढून जावं लागतं. त्यासाठी पायऱ्या, आणि साधा रस्ता अशी दोन्ही प्रकारची व्यवस्था आहे. त्याशिवाय घोडा, पालखीचीही सोय आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून भवन ते भैरवनाथ अशी रोपवे ची ही व्यवस्था करण्यात आली आहे.

         सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर्षीपासून वैष्णोदेवी यात्रेसाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. यात्रा पर्ची असली तरी ओळखपत्र अनिवार्य आहे. 

         त्यामुळे ते घेण्यासाठी आम्ही सकाळी ६.३० वाजताच श्राईन बोर्डाच्या कार्यालयात पोहोचलो. ओळखपत्र घेऊन तिकीट तपासणी, स्वतः चं वजन करुन बोर्डिंग पास घेण्यासाठी गेलो. या मधल्या वेळात पावसाचे टपोरे थेंब अधुनमधून शिंपडायला सुरुवात झाली होती. आमच्या मनात किंचित आशंका निर्माण होऊ लागली आणि तेवढ्यातच तिथल्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे असं सांगितलं. आमच्यासह तिथे असलेल्या इतर लोकांनाही थोडी काळजी वाटू लागली. पण अगदी १५-२० मिनीटातच सेवा सुरु होतेय असं सांगून आम्हाला बोर्डिंग पास दिला. आणि आम्ही तिथल्या गाडीने हेलिपॅड कडे रवाना झालो. परिस्थिती अनुकूल नव्हतीच. ढगाळ हवामानामुळे काय होणार ही काळजी मनात होतीच. 

         श्राईन बोर्डाच्या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आम्हा सात जणांपैकी दोघांचं तिकिट दुसऱ्या कंपनीचं होतं. ते दोघं त्या कंपनीच्या तिसऱ्या हेलिकॉप्टरने पुढे गेले. त्यानंतर त्या कंपनीचं अजून एक हेलिकॉप्टर सांजीछतला गेलं आणि त्या कंपनीने त्यांची सेवा खराब हवामानामुळे बंद केली. आम्हा चौघांचा पास सहा नंबरच्या हेलिकॉप्टर साठी होता. आणि एकाचा सात नंबरच्या हेलिकॉप्टरसाठी. आम्हाला हेलिपॅड वर जाऊन थांबवलं. सांजीछतहून आलेल्या हेलिकॉप्टर मध्ये फक्त आम्ही चौघं बसलो. आणि दोन पायलटसह आमचं हेलिकॉप्टर निघालं. उड्डाण झालं खरं पण मी नेमकी पायलटच्या मागेच बसल्याने मला त्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेच सावट स्पष्ट कळत होतं. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती.

             आकाश काळ्यापांढऱ्या ढगांनी व्यापलं होतं. त्यातून मार्ग काढत हेलिकॉप्टर योग्य दिशेने नेणं कठिण होतं. दाट ढगांमधून पलिकडचं काहीच दिसत नव्हतं. जेमतेम ८ मिनीटांचं हे अंतर पार करुन सांजीछतला पोहोचेपर्यंत खरोखरच सगळ्यांनाच काळजी वाटत होती. पण मनात वैष्णोदेवीचं अखंड नामस्मरण सुरु होतं. तिच्या कृपेनेच आमचं हेलिकॉप्टर सुखरुप सांजीछतला उतरवण्यात पायलटला यश आलं. आम्ही हेलिकॉप्टरमधून उतरुन कार्यालयात जाऊन पोहोचलो. मात्र ते हेलिकॉप्टर तिथेच थांबवलं होतं. अतिशय वाईट हवामानामुळे त्यांना कटराला परत जाणं अशक्य होतं.

            आम्ही चौघांनी लगेच वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी चालायला सुरुवात केली. सांजीछत पासून साधारण २.५० किलोमीटर चालत जावं लागतं. तेव्हा आपण भवनच्या दर्शन मार्गावर पोहोचतो. हेलिकॉप्टर ने ये-जा करणाऱ्या भाविकांची दर्शन रांग वेगळी असते. साहजिकच ती रांग बरीच कमी असते. मात्र नंतर साधी रांग आणि विशेष रांग दोन्ही एकत्रच होते. 

            आम्ही सावकाश चालत होतो. कारण माझ्या सहचराची तब्येत अजूनही तितकीशी ठिक नव्हती. खूप अशक्तपणा होता. 

            सुरुवातीचं ३-४ किलोमीटर अंतर संपलं आणि आमच्या समोर आला अप्रतिम नजारा. इतर वेळी घेतलेल्या दर्शनापेक्षा नवरात्रातील दर्शन हे खरोखरच अवर्णनीय असतं. नवरात्रात संपूर्ण भवनच्या मार्गावर ताज्या फुलांची अतिशय अप्रतिम अशी सजावट केलेली असते. इतकी प्रचंड सजावट असते की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. जेव्हा आमच्यासमोर हे दृश्य आलं तेव्हा मी काही क्षण जागीच खिळून उभी राहिले. आजूबाजूच्या गर्दीचंही भान राहिलं नाही. काय आणि किती नजरेत आणि छायाचित्रात साठवू हेच कळेनासं झालं. माझा सहचर आधीपासूनच  नवरात्रात दर्शनाला येत असल्याने त्याला हे काही नवीन नव्हतं. पण बाकी आम्ही तिघंही अक्षरशः अचंबित झालो होतो. मनात एकच विचार येत होता .या ताज्या फुलांची सजावट करण्यासाठी किती कलाकार एकत्र आले असतील, ऐनवेळी ही सजावट करताना किती कष्ट त्यांनी घेतले असतील. दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी हा पुष्पसजावटीचा खजिनाच जणू या कलाकारांनी उघडा केला होता.

            या साऱ्या सजावटीचा आनंद घेत छायाचित्रं काढत आम्ही  दर्शनासाठी रांगेतून पुढे सरकत होतो. आम्हाला काही वेळातच दर्शन घडणार होतं. पण कान मात्र हेलिकॉप्टर च्या आवाजाकडे लागले होते. आम्ही सांजीछतला उतरल्यापासून हेलिकॉप्टरची ये-जा पूर्णपणे बंद झाली होती. आम्हाला दर्शन मार्गावरुन पर्वतावर पसरलेलं दाट धुकं सतत दिसत होतं. जोपर्यंत धुकं जाऊन हवामान स्वच्छ होतं नाही तोपर्यंत हेलिकॉप्टर सेवा पूर्ववत सुरु होणं अशक्य होतं. 

            साधारण तासाभरातच मातेच्या दर्शनासाठी आम्ही मुख्य गुहेत पोहोचलो. आणि पुढच्या काही मिनीटातच प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेसमोर मी नतमस्तक झाले. मातेचं सुंदर, लोभस रुप नजरेत साठवत शांत तृप्त मनाने बाहेर पडले. 'याचसाठी केला होता अट्टाहास' या जाणिवेने डोळ्यात पाणी आलंच. मनही क्षणात हळवं कातर झालं. 

            दर्शन आणि प्रसाद घेऊन अतिशय तृप्त मनाने परत निघालो. भवनच्या बाहेर आल्यावर सकाळपासून असलेलं धुक्याचं वातावरण अजूनच गडद झाल्याचं दिसलं. आणि परत मनात काळजी दाटली. हेलिकॉप्टर सेवा अजूनही सुरु झाली नाही हे कळलंच. त्यामुळे आता कटरा ला परत कसं जायचं हा प्रश्न होताच. पण त्याला निदान इतर पर्याय उपलब्ध होते. मात्र आमची चिंता वेगळीच होती. 

            आम्हा सात जणांपैकी दोघं आधीच दर्शनासाठी हेलिकॉप्टरने पोहोचले होते. आम्ही चौघंही हेलिकॉप्टरने पोहोचलो होतो. पण एक सहकारी मित्र एकटेच आमच्या नंतरच्या हेलिकॉप्टरने येणार होते. हेलिकॉप्टरमधून प्रत्येकाच्या वजनानुसार नेलं जातं. त्यामुळे एकाच कुटुंबातील किंवा ग्रुपमधील सगळे एकत्र जाऊ शकतातच असं नाही. त्यामुळे आम्ही फक्त चौघंच एकत्र जाऊ शकलो. आणि त्यांना पुढच्या हेलिकॉप्टर साठी थांबवलं होतं. पण अतिशय खराब हवामानामुळे ही सेवा बंद करावी लागली होती. त्यामुळे आता त्यांना दर्शन कधी कसं होणार ही काळजी आमच्या मनात होती. मात्र २-३ तास वाट पाहून सेवा सुरु होऊ शकणार नाही याची खात्री झाल्याने ते घोड्यावरुन दर्शनाला निघाले आणि आमची ती काळजी मिटली.

            आम्ही दर्शन घेऊन परत सांजीछतला पोहोचलो. तिथे तिकिटं रद्द करुन कटराला जाण्यासाठी चालत निघालो. खरंतर चालत जाण्याएवढी तब्येत ठिक नव्हती. पण तरीही अतिशय सावकाशपणे थांबत थांबत अर्धकुमारी गुंफेपर्यत आलो. मात्र तोपर्यंत त्याची खूपच दमछाक झाली होती. अर्धकुमारी पासून कटरा सहा किलोमीटर अंतरावर आहे. एवढं चालणं त्याला फारच कठीण होतं. मग मात्र चौघंही घोड्यावरुन कटराला जायला निघालो. पुढच्या एका तासातच आम्ही कटराला सुखरुपपणे पोहोचलो. तिथून रिक्षाने मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. 

            थोडा आराम करुन कटराच्या बाजारपेठेत फिरुन पोटपूजा करुन परत मुक्कामी आलो.

            चौथ्या दिवशी सकाळी लवकर निघून आणि जम्मूला गेलो. तिथल्या रघुनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. बाजारपेठेत थोडीफार सुकामेव्याची खरेदी केली. आणि परत जम्मूच्या विमानतळवर पोहोचलो. परतीचा प्रवास करुन घरी आलो.

        वैष्णोदेवीला जायचं चार महिने आधीच ठरवलं होतं. पण माझ्या सहचराची ऐनवेळी बिघडलेली तब्येत, त्यातून त्याला आलेला खूपच अशक्तपणा यामुळे दर्शन होणार की नाही याची चिंता वाटत असतानाच मातेने बोलंवलंय तेव्हा आपण जायचंच या श्रध्देने गेलो. त्यातही तिथल्या वाईट हवामानामुळे हेलिकॉप्टर सेवा बंद झाली, ती आदल्या दिवशीही पूर्णपणे बंद होती. पण असं असूनही केवळ आमच्यासाठीच जणू ती हेलिकॉप्टरची त्यादिवशीची अखेरची फेरी झाली आणि आम्ही त्या वाईट परिस्थितीतही मातेच्या कृपेने सांजीछतला सुखरुप पोहोचलो. मातेचं अतिशय उत्तम असं दर्शन घडलं. परतीचा प्रवासही नीट झाला. हे सारं घडलं ही आमच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे. वैष्णोदेवी मातेने बोलावल्याशिवाय आपण कितीही ठरवलं तरी दर्शन घडत नाही हे जितकं खरं आहे तितकंच तिने दर्शन द्यायचं ठरवलं असेल तर अनंत अडचणीतूनही आपल्याला तिच्या दर्शनाचं भाग्य लाभतं हेही खरंच आहे.

                 || जय माता वैष्णोदेवी ||


- स्नेहल मोडक












Friday, September 9, 2022

पाऊस सरताना...

                वैशाखाच्या काहिलीने सारी धरती तप्त झालेली असते. आपलं तनमनही त्रस्त झालेलं असतं. सारी धरणी मृगधारांची आसुसून वाट पहात असते. अखेर मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच वाजत गाजत रेशीमधारा बरसतात. बिजलीचा नृत्याविष्कार आणि त्याला मेघमृदुंगाची साथ आणि बरोबरीने बरसणाऱ्या जलधारा यामुळे तृषार्त अवनी तृप्त होते. मृदगंधाने दरवळते. मग या वर्षाऋतूच्या आगमनाने सारी वसुंधरा हिरवा शालू लपेटते. सुजलाम सुफलाम होते. आणि मग वेळ येते ती ऋतु बदलाची. चार महिने छान संगत करणाऱ्या पावसाची निरोपाची वेळ जवळ येते. आणि इतके दिवस शांतपणे रिमझिणारा बरसणारा पाऊस सरताना मात्र आपलं थोडंसं का होईना रौद्र रुप दाखवतो.

                अगदी अचानक आभाळ भरुन येतं आणि पाऊस कोसळायला सुरुवात होते. पावसाबरोबरच जोरदार वाजंत्री वाजू लागते. सुरुवातीला हवाहवासा वाटणारा वीजांचा लखलखाट आणि पाठोपाठ होणारा गडगडाट काळीज कातरणारा वाटू लागतो. सरता पाऊस चार सहा दिवस साधारण ठराविक वेळी सुरु होतो. मग रोज ती वेळ जवळ आली की मन आधीच हळवं कातर होतं. इतके दिवस हवासा असलेला पाऊस आता मात्र थांबावा असं वाटायला लागतं. मनात काळजी दाटत असली तरीही सरता पाऊस नकळत एक हुरहूर मात्र लावून जातो.


माध्यान्ह जराशी कलते

अन आकाश काजळते

सौदामिनी ती लखलखते

मेघमृदुंगही ते कडकडते

बरसता जलधारा क्षणात

भिजते अवनी त्या जळात

अंधारसावल्या दाट होतात

मेघसरी धुवांधार बरसतात

चहुकडे पाणीचपाणी होते

वाट घराची तयात हरवते

रात्रही ती वादळीच असते

मन मनाचा आधार शोधते

मग अशा सरत्या पावसात

दाटते किंचित भय मनात

दाटते किंचित भय मनात 

- स्नेहल मोडक

Saturday, August 6, 2022

मनभावन श्रावण

        श्रावणाच्या नुसत्या उल्लेखानेही आपलं मन मोहोरतं, हो ना? आता तर श्रावण सुरु होऊन आठवडा झालाय. पण या आठ दिवसांतच साऱ्या सृष्टीचं रुप बघा किती खुललंय. वसुंधरेवर मस्त हिरवी मखमल पसरलीय. त्या एका हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध. कुठे पाचूसारखा गर्द हिरवा तर कुठे राव्यासारखा उत्फुल्ल पोपटी. आणि त्यावर रंगफुलांची नक्षी. किती सुंदर दिसतोय हा सारा साज. साऱ्या तरुवेलीही पर्णसंभारानी बहरल्यात. या हिरव्या मखमलीतून जाणाऱ्या लाल मातीच्या रानवाटाही श्रावणधारांनी सजल्यात. साथीला आहे पक्ष्यांचं मधुर‌ कुजन.  खरंच किती नितांत सुंदर मनमोहक दिसतेय सारी अवनी. तिच्या या सौंदर्याने आपलं मनही असंच उत्साहानं फुललंय.

श्रावण मासी चाले उनपावसाचा खेळ

उमटे अवकाशी इंद्रधनुचा सुरेख मेळ

   अवनीच्या हिरव्या शालूवर थेंबांची नक्षी

   सजते सुंदर रंगगंधी पुष्पांना घेऊन कुक्षी

पाचूच्या वनी खळाळती निर्झर ते शुभ्र

दिसे कनकगोल सुरेख सरताच ते अभ्र

   सुरेल मधुरव विहगांचा ऐकू येई कानी

   अन उलगडे अवचित मोरपिसारा रानी

अनाहत नाद अवखळ झऱ्यातून नादतो

कधी सहज साथ त्यास मेघमृदुंगही देतो

   मधुगंधी, फुलपंखी श्रावण हा मनभावन

   पसरे हिरवी मखमल अन वाहे गंधित पवन

                             स्नेहल मोडक

Saturday, July 30, 2022

वृक्षतरु

                 प्राण्यांप्रमाणेच सजीवत्वाची सारी लक्षणं झाडातही असतात. म्हणूनच झाडही सजीवच  मानलं गेलंय. 

                 जमिनीखाली स्वताभोवतीचं कठीण असं कवच भेदून बीज अंकुरतं. आणि भूवरी अवतरतात ती पोपटी हिरव्या रंगाची नाजूक इवलीशी दोन पर्णं. आणि मग आकाराला येत ते छोटंसं रोपटं. माती आणि हवेतून पाणी आणि अन्नद्रव्यं मिळवत यथावकाश त्याचं रुपांतर मोठ्या वृक्षवेलीत होतं. कालानुरूप फुलाफळांनी ही झाडं वेली बहरतात. कालंतराने सृष्टि नियमानुसार नैसर्गिक किंवा अनैसर्गिकपणे (वृक्षतोड, वादळं) नाशही पावतात. तसंच त्यांच्या बीजापासून नवीन रोपही अकुंरतात. खरंच सजीवत्वाची सारी लक्षणं जनन, पोषण, निर्मिती, अंत ही सारी वृक्षवेलीत आढळतात. 

                 पण सजीवत्वाच्या एका मुख्य लक्षणापासून मात्र या वृक्षवल्ली वंचित आहेत. ते म्हणजे स्थलांतरण. सारे सजीवमात्र स्थलांतर करु शकतात पण झाड मात्र अचल उभं असतं. बीज अंकुरल्यापासून नाश होईपर्यंतचा सारा काळ ते स्थिर उभं असतं. उन,वारा, पाऊस वादळं सारं काही झेलत कणखरपणे वर्षानुवर्ष उभं असतं. आणि अगदी एका जागी उभं राहूनही सदैव फळाफुलांनी बहरत असतं. पक्ष्यांचं आश्रयस्थान आणि  वाटसरुंची सावलीही असतं.

                 तरुवेलींनाही भावना असतात हे सिद्ध झालंय. आपलं अस्तित्व, आपला स्पर्श, आपलं बोलणं त्यांना सहज कळतं हा माझाही अनुभव आहे. मीही घरातल्या कुंड्यांमधल्या झाडांशी रोज नित्यनेमाने बोलते, त्यांना अलवार स्पर्श करते. मग झाडंही छान तरारुन येतात.आपण गावाहून परत आल्यावर पुरेशा पाण्याअभावी झाडं मलूल होतात. पण फक्त अपुरं पाणी एवढंच कारण नसतं तर आपली अनुपस्थितीही झाडांना जाणवते. पाण्याबरोबरच पुन्हा त्यांच्याशी बोलणं, गोंजारणं सुरु केलं की मलुल झालेली झाडं पुन्हा छान टवटवीत होतात. या माझ्या त्यांच्याशी बोलण्यातूनच असेल कदाचित पण झाडांचं अचलत्व मला फार जाणवतं, विचार येतो मनात आपल्याला कधी असं अचल रहाणं जमेल का? वर्षानुवर्ष स्थिर उभं राहूनही आनंदात जगायला ?



एकदा मला वृक्षतरु व्हायचंय

अचल उभं राहून बघायचंय

      इवल्या बीजातून छान अंकुराचंय

      पाचूसम रेखीव पर्णांनी खुलायचंय

उन वारा पाऊस मला झेलायचंय

वादळातही भक्कम उभं रहायचंय

       मृदेच्या आधारे मुळांना घट्ट रुजवायचंय

       आत्मविश्वासाने पुन्हा पुन्हा बहरायचंय

पाखरांना पर्णफांद्यांवर खेळवायचंय

मधुर किलबिलाटात त्या दंग व्हायचंय

        जर मी प्राजक्ताचं झाड असेन

        नाजुक फुलांनी मी सदा बहरेन

        पखरण रंगगंधी फुलांची करेन

        रिते होण्यातले मर्म मी जाणेन

जर मी बकुळीचं झाड असेन

ईवल्या फुलांनी सुरेख मोहरेन

सडा मी चांदणफुलांचा घालेन

वाळल्या फुलांनाही गंध देईन

        जर मी एखादा वटवृक्ष असेन

        घनदाट फांद्या मग मी पसरेन

        येतील कुणी सुरपारंब्या खेळाया

        थकल्या पांथस्था देईन मी छाया

जर मी सुरेख आम्रतरु असेन

ऐन वसंतात मी मुक्त मोहरेन

कोकिळेच्या कुजनाने बहरेन

आम्रफलांनी रसना तृप्त करेन

         जमेल का मला स्थिर रहायला

         अचल राहून आनंदात जगायला 

         एकदा मला वृक्षतरु व्हायचंय

         अचल उभं राहून बघायचंय....

         

- स्नेहल मोडक

Friday, July 15, 2022

कसोटी

               यावर्षी गुरुपौर्णिमेला गिरनारला दत्तगुरुंच्या दर्शनाला काही कारणाने जायला जमणार नव्हतं. दर्शनाला तर जायचंच होतं पण गुरुपौर्णिमेच्या आधी की नंतर ते ठरत नव्हतं. अखेर अखंड धुनीच्या दर्शनाचा योग साधून दोन दिवस आधीच जायचं ठरवलं.

               आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून फराळाचे पदार्थ तयार करुन घेऊन सकाळी लवकर आम्ही पाचजणं गाडीने निघालो. सुरुवातीलापासूनच रिमझिम पाऊस आम्हाला साथ देत होता. वातावरण अगदी मस्त होतं. प्रवास छान सुरु होता. महाराष्ट्राची सीमा पार करेपर्यंत पाऊस कमी जास्त होता. गुजरातच्या हद्दीत प्रवेश केला आणि मग मात्र पावसाचा जोर वाढत चालला. रस्त्यावर पाणी साचू लागलं. त्यातच वाहतूकही  मोठ्या प्रमाणात सुरु होती. यातूनच आमचा प्रवास सुरु होता. मात्र पाऊस आणि वाऱ्याचा जोर मधेमधे खूपच वाढत होता. जिकडे तिकडे पाणी साठलं होतं. रस्त्यावरील पाण्याचा, खड्ड्यांचा अंदाज घेत थांबत थांबत प्रवास सुरु ठेवला. राजकोटच्या पुढे मात्र पाऊस कमी झाला होता. अखेर साधारण साडेअकरा वाजता आम्ही तलेटी मुक्कामी पोहोचलो.

               दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून नित्याप्रमाणे लंबे हनुमानजींचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं. आणि उडन खटोलाजवळ पोहोचलो. खरंतर आदल्या दिवशी प्रवासात असतानाच उडन खटोलाच्या कार्यालयातून आम्हाला संपर्क करुन एकादशी दिवशी उडन खटोल वाईट हवामानामुळे बंद असल्याचं सांगण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी हवामान ठिक असेल तर उडन खटोला सुरु होईल असंही सांगितलं होतं. सकाळी आम्ही निघालो तेव्हा पायथ्याशी वारा पाऊस जवळजवळ नव्हता.  म्हणून आम्ही उडन खटोला सुरु होईल या अपेक्षेने गेलो परंतु तो सुरु होणारच नव्हता. प्रत्यक्ष गिरनारवर खूप वाईट हवामान आहे.  चढून जाणार असल्यास अतिशय सांभाळून जा असा इशाराही तिथले स्थानिक लोकं सगळ्यांनाच देत होते. उडन खटोला बंद असल्याने दहा हजार पायऱ्या चढणे शक्य नाही म्हणून काही भाविक परत फिरत होते. आम्ही चढून जायचं आणि दर्शन घ्यायचंच असं ठरवलं आणि परत पहिल्या पायरीशी येऊन चढायला सुरुवात केली.

               पहिल्या दिडदोनशे पायऱ्या चढेपर्यंत वातावरण खूपच सुंदर होतं. अगदी रिमझिम पाऊस, सुखावणारा गार वारा, पुढे धुक्याचा विरळ पडदा आणि जोडीला केकारव... खूप प्रसन्न वातावरणात उत्सहाने आम्ही पायऱ्या चढत होतो. आमच्या मागे पुढे मात्र खूपच कमी भाविक होते. आदल्या रात्री चढायला सुरुवात करुन दर्शन घेऊन परत येणारे लोक भेटत होते. त्यांना पाहून, त्यांच्याशी बोलून वरच्या वाईट हवामानाचा अंदाज आम्हाला येत होताच. अंदाजे तिनशे पायऱ्या चढून गेल्यावर त्याची प्रचिती यायला सुरुवात झाली. आम्ही जवळपास हजारएक पायऱ्यांवर पोहोचेपर्यंत वाऱ्यापावसाचा जोर फारच वाढला. पायऱ्या चढण्याचा आमचा वेग कमी होऊ लागला. 

               साधारण पंधराशे पायऱ्या चढलो आणि निसर्गाने आपलं रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली. इतका वेळ सुसह्य असणारा जोरदार वारा पाऊस वाढला. जोरदार घोंघावणारा वादळी वारा, सन्नाट कोसळणारा पाऊस यामुळे तोल सावरत पायऱ्या चढणं कठिण होऊ लागलं. 

               जेमतेम दोन तीन फुटांपर्यंतच समोरचं दिसेल एवढा सन्नाट पावसाचा दाट पडदा, पायऱ्यांवरुन खळखळ करत वाहणारं फेसाळतं पाणी आणि काळजात धडकी भरवणाऱ्या आवाजात वाहणारा वादळी वारा, भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातूनच थांबत थांबत आमच्यासह सारेजण पायऱ्या चढतच होते. सुरुवातीपासूनच घातलेल्या रेनकोटमधूनही सगळेजणं नखशिखांत भिजले होते. अतिशय वाईट परिस्थिती होती पण मार्गक्रमण सुरुच होतं. 

               जैन मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत निसर्गाचा रौद्रावतार वाढतच चालला होता. त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत पोहोचायलाही वेळ लगला होता. हळूहळू मनात साशंकता निर्माण होऊ लागली होती. दर्शन होणार की नाही याची चिंता वाटू लागली. अंबाजी टुकवर पोहोचेपर्यंत परिस्थिती बिकट झाली होती. तिथपर्यंत पोहोचायला वाईट हवामानामुळे आम्हाला नेहमीच्या दिडपट वेळ लागला होता. अंबाजी टुकवर पोहोचत असतानाच  इथूनच परत फिरावं असा विचार माझ्या मनात येऊ लागला. कारण मला कळत होतं की या परिस्थितीत दर्शन घेऊन परत पायथ्याशी पोहोचायला आम्हाला खूप रात्र होणार होती. आमच्याबरोबर परतीच्या पायऱ्या उतरताना कुणी सोबत असण्याची शक्यता फारच कमी होती.

                तिथल्या दुकानदारांकडून माहिती मिळाली होती की आदल्या दिवशी याहून फारच वाईट परिस्थिती होती. साधारण दोनहजार पायऱ्यांच्या वर पुढे कंबरभर पाणी साठलं होतं. आणि त्या पाण्याला खूप ओढ होती. त्यामुळे सारे लोक, अगदी डोलीवालेही परत फिरले होते. शिखर दर्शन अगदीच कमी लोकांना जे त्यावेळेआधी किंवा नंतर गेले त्यांनाच घडलं होतं. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो ही मोठीच गोष्ट होती. म्हणून तुम्ही शिखरापर्यंत जाणारच असाल तर खूपच काळजी घ्या असं प्रत्येक दुकानदार आवर्जून सांगत होता.

              हे सारं ऐकून आणि वाढत्या रौद्ररूपाचा अंदाज घेऊन आमच्या पुढेमागे असणाऱ्या भाविकांपैकी काही भाविक अंबाजी टुकपासून परत फिरले. त्यामुळे दर्शनाला पुढे जाणारे लोक फारसे  नव्हते. काही अगदी तरुण लोकंच पुढे जाताना दिसत होते. मीही अंबाजी टुकपासूनच 'परत फिरुया म्हणजे पूर्ण अंधार पडायच्या आधी तरी आपण पायथ्याशी पोहोचू' असंच म्हणत होते. आमच्या बरोबरच्या एका मित्रांची तब्येत अंबाजी टुकच्या आधीच थोडी बिघडली होती. त्यामुळे डोली मिळाली तर दर्शन घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यादिवशीही डोलीवाले अगदीच कमी होते. अंबाजी टुकवर डोलीची व्यवस्था झाली आणि ते दर्शनाला गेले. आता आम्ही चौघंच उरलो होतो. पण सगळ्यांच मत होतं दर्शनाला जायचंच. कदाचित पुढे वारा पाऊस थोडा सुसह्य असेल त्यामुळे आपल्याला कमी त्रास होईल, असं मी सोडून सर्वांना वाटत होतं. अखेर सगळ्यांची इच्छा आणि दत्तगुरुंवरील श्रध्दा यामुळे पुढे जायचं ठरवलं. कळत होतं श्री दत्तगुरुच सगळ्यांची परिक्षा घेतायत. त्यामुळे आपण प्रयत्न करायचा, दर्शन देणं न देणं त्यांची इच्छा असा विचार करुन पुढे निघालो. अर्थातच फारच कसोटीची वेळ होती. पण गोरक्षनाथ टुकवर पोहोचेपर्यंत खरोखरच वारा पाऊस थोडा कमी झाला. 

               गोरक्षनाथ टुकवर पोहोचलो. गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन त्यांना 'आम्हाला श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडवा' अशी प्रार्थना केली आणि थोडा वेळ तिथे थांबलो. त्या मंदिरासमोरच्या एका छोट्याशा मठीत एक साधक रहातात. त्यांच्याशी थोडं बोलायची संधी मिळाली. त्यांनी आम्हाला थोडं थांबून चहा पिऊन जायचा आग्रह केला. अर्थातच आमच्यासाठी तो प्रसाद होता. चहा तयार होईपर्यंत गिरनारबद्दल काही अनुभूती त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या. स्वयं श्री दत्तगुरु आणि गोरक्षनाथ यांचं अजूनही सातत्यानं गिरनारवर येणंजाणं आहे, याची प्रचितीही त्यांना आली आहे. त्यांचं म्हणणं होतं की स्वयं श्री दत्तात्रेय ज्या मार्गाने ये-जा करतात त्या मार्गावर आपल्याला चालायला मिळतंय हि किती भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही या भयप्रद परिस्थितीतही इथवर आलात हेही श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच. हे सारे अनुभव ऐकून तिथे थांबलेले त्यांचे परिचित आणि आम्ही खरंच भारावलो होतो. माझ्या मनाला आपण दर्शनाला जायचं ठरवलं ते किती योग्य केलं याची जाणीव झाली. खरंच एवढी मोठी कसोटी बघणारे श्री दत्तात्रेयच आणि त्यात यश (दर्शन) देणारेही तेच. त्या साधकांनी खास आमच्यासाठी केलेला वाफाळता चहा पिऊन आम्ही पुढच्या पायऱ्या चढायला (उतरायला) सुरुवात केली.

               थोड्या पायऱ्या उतरेपर्यंत जरा कमी असलेला वारा पाऊस आणि धुकं परत वाढलं. पुन्हा सन्नाट पाऊस आणि भणाणता वारा सुरु झाला. पुन्हा एकदा तोल सावरत पुढे जाणं सुरु ठेवलं. कमंडलू कुंडाची कमान ओलांडली आणि परत पावसाचा जोर कमी झाला. आमच्या मागेपुढे इतर कुणीच नव्हतं. पुढच्या पायऱ्या चढताना हळूहळू पाऊस अगदी कमी होत शिखरावर पोहोचेपर्यंत पाऊस जवळजवळ थांबला. आणि आम्ही उरलेल्या पायऱ्या जरा भरभर चढून गेलो आणि मंदिरात पोहोचलो.

                मंदिरात प्रवेश केला आणि सर्वात आधी तिथेच कठड्यावर बसलेल्या शुभ्र कबूतराने आमचं स्वागत केलं. गेल्या कित्येक दिवसांपासून ते तिथंच बसल्याचं तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं. मी त्या कबूतराला हळूच स्पर्श केला आणि त्यानेही माझ्या स्पर्शातली माया ओळखून माझं बोट हलकेच चोचीत  पकडलं. त्याला धान्याचे दिलेले दाणेही त्याने माझ्या हाताच्या तळव्यावरुन अलगद टिपले. परत एकवार स्पर्श करुन मी पुढे झाले. श्री दत्तगुरुंचे दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केला. त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि नेहमीसारखेच डोळ्यात अश्रू तरळले. एवढी कठीण परिक्षा त्यांनी घेतली होती आणि त्यात यशही त्यांनीच दिलं होतं. पण ही एकच भाग्याची गोष्ट नव्हती तर अजून एक मोठं भाग्य त्याक्षणी आम्हाला लाभलं होतं. मंदिरात आम्ही आणि दोन पूजारी यांच्याव्यतिरिक्त कुणीच माणसं नव्हती त्यामुळे आम्हाला पहिल्यांदाच श्री दत्तगुरुंच्या चरणपादुकांसमोर सात-आठ मिनिटं बसायला मिळालं. खरोखरच आजवरची माझी इच्छा त्याक्षणी स्वयं दत्तात्रेयांनी पूर्ण केली होती. जेवढा वेळ तिथे बसायला मिळालं तेवढा वेळ मला अश्रू अनावर झाले होते. इतक्या भयप्रद परिस्थितीतून पायऱ्या चढताना झालेला त्रास, मनात दाटलेली काळजी सारं एका क्षणात नाहीसं झालं आणि जाणवलं 'याचसाठी केला होता अट्टाहास'... अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं दत्तगुरुंनी. नंतर भाविक दर्शनासाठी येऊ लागले आणि आम्ही प्रसाद घेऊन तिथून निघालो.

                थोडं खाली उतरुन अखंड धुनीचं दर्शन घ्यायला गेलो. उडन खटोला बंद असल्याने आम्ही पायऱ्या चढून वर पोहोचेपर्यंत अखंड धुनी प्रज्वलित होऊन गेली होती. त्यामुळे प्रज्वलित धुनीचं दर्शन आम्हाला मिळालच नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे धुनीचं दर्शन घेतलं आणि शिधा, देणगी अर्पण केली. तिथेही इतर कुणी लोकं नसल्याने गुरुचरित्राचं वाचन धुनीसमोरच बसून करायला मिळालं. वाचन करुन भोजनप्रसाद घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

                 पायऱ्या उतरायला (चढायला) सुरुवात केली आणि पुन्हा वाऱ्यापावसाचा जोर वाढला. कमंडलू कुंडापासून गोरक्षनाथ टुकपर्यंत परत थांबत थांबत आलो. पुन्हा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन त्या साधकांशी थोडं बोलून पुढे निघालो. आता पायऱ्या फक्त उतरायच्या होत्या. पण पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाल्याने आम्हाला सावकाश उतरावं लागत होतं. पण हळूहळू पावसाचा जोर कमी झाला आणि आम्हाला पायऱ्या उतरणं थोडं सोपं झालं. पूर्ण अंधार पडण्यापूर्वी शक्य तितक्या पायऱ्या उतरायचा आमचा प्रयत्न सुरु होता. कारण या वादळी पावसामुळे मार्गावरील  विद्युतदिवे सुरु असण्याची शक्यता फारच कमी होती.  जैन मंदिरापर्यंत बऱ्यापैकी दिसत होत. मग मात्र अंधार पडला आणि आमच्या अंदाजानुसार दिवेही अगदी खूप अंतरावर अधुनमधून सुरु होते. मग भ्रमणध्वनीच्या उजेडात आमचं चालणं सुरु झालं. आम्ही फक्त चौघंच होतो मागेपुढे कुणीच नव्हतं. 

                 अंदाजे हजारएक पायऱ्या उतरायच्या बाकी असताना आम्हाला दोघंजणं भेटले. साधारण सत्तरीच्या वयाचे वडिल आणि आमच्या वयाची त्यांची मुलगी असे ते दोघंच होते. आम्हाला बघून त्यांना हायसं वाटलं. मग तेही आमच्या बरोबर चालू लागले. मधेमधे थांबत पायऱ्या उतरणं सुरुच होतं. मध्येच आमच्या चौघांपैकी दोघंजणं बोलता बोलता थोडं पुढे गेले. आणि वाटेत भेटलेले दोघं सावकाश उतरत असत्याने जरा मागे राहिले. त्यांच्यासाठी आम्ही दोघं जरा एका ठिकाणी थांबलो. जेमतेम बसलो आणि अगदी समोरुन जोराची गुरगुर ऐकू आली. आम्ही दोघंही तटकन उठलो आणि शब्दही न बोलता चालायला लागलो. चार पायऱ्या उतरलो आणि मागून त्या मुलीचा आवाज आला 'ताई थांबा' म्हणून. आम्ही तिथेच थांबलो, ते दोघं आले आणि त्यांनी विचारलं तुम्ही आत्ता काही आवाज ऐकला का? आमच्या लक्षात आलं की तो आवाज त्यांनीही ऐकला होता. जंगलच्या राजाचं गुरगुरणं होतं ते. प्रत्यक्ष दिसला नसला तरी क्षणभर का होईना भीती वाटणं साहजिकच होतं. उरलेल्या पायऱ्या उतरुन अखेर आम्ही पायथ्याशी पोहोचलो. आमचं मुक्कामाचं ठिकाण जवळच असल्याने लगेच तिथे गेलो. 

                 खरंतर उडन खटोला ने जाऊन दर्शन घेऊन परत येऊन दुपारी लगेच परतीच्या प्रवासाला निघायचं ठरवलं होतं. पण दर्शन घेऊन येईपर्यंत रात्र झाली होती त्यामुळे नाईलाजास्तव त्या रात्री तलेटीलाच मुक्काम करुन तिसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघालो. निघतानाच भेटलेल्या काही परिचितांकडून आदल्या दिवसापासून गुजरातमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तुफान वारा पाऊस आहे अशी माहिती मिळाली होती. तरीही शक्यतो घरी पोहोचायचंच असं ठरवून निघालो. पण आमची परिक्षा अजून संपली नव्हती. धुवांधार पाऊस, वादळी वारा सुरुच होता. रस्त्यावर पाणी साचत होतं. त्यातूनच हळूहळू आम्ही पुढे जात होतो. पण नंतर वाहनकोंडीत अडकणं सुरु झालं. रस्त्यावर लहान गाड्यांपेक्षा अवजड वाहनंच खूप होती.

                 अशाच एका अवजड ट्रकच्या बाजूने आमची गाडी जात असताना त्या ट्रकमधून अचानक गाडीच्या टपावर खूपच जोरात काहीतरी आपटलं. एवढा मोठा आवाज ऐकून आम्ही सगळेच हादरलो. पण गडी थांबवून पहाणं अशक्य होतं. वाहनकोंडीतून गाडी थोडी बाहेर आल्यावर लगेच बाजूला थांबवली. टपावर नीट पाहिलं असता एखादी अणुकुचीदार वस्तू जोरात आपटल्यावर जसे खड्डे पडतील तसे दोन लहानशा खुणा टपावर पडलेल्या दिसल्या. गाडीला किंवा कुणालाच काही इजा झाली नाही ही गुरुकृपाच.

                  थोडा थोडा वेळ करत किमान चार तास तरी आमचे त्या वाहनकोंडीत वाया गेले आणि आमचा उशिरा का होईना घरी पोहोचण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. अखेर महामार्गावरच निवास व्यवस्था शोधून तिथेच मुक्काम केला.

                 चौथ्या दिवशी पहाटेच पुढचा प्रवास सुरु केला. सुरुवातीपासूनच पाऊस होता. रस्त्यावरील पाण्याचा, खड्ड्यांचा अंदाज घेत पुढे जात होतो. महाराष्ट्राच्या हद्दीत पोहोचलो तरीही पाऊस सुरुच होता. साधारण साडेतीन तासांच्या प्रवासानंतर सांभाळून गाडी चालवत असतानाच एका खड्ड्याने प्रसाद दिलाच. गाडीचं मागचं चाक पूर्ण फाटलं. सुदैवाने जवळच  वाहनदुरुस्तीच दुकान होतं. तिथल्या माणसाने लगेच चाक बदलून दिलं. अर्ध्या तासात गाडीचं चाक बदलून आम्ही पुढे निघालो. पुढच्या दिडदोन तासात घरी पोहोचणार असतानाच पुन्हा एकदा खड्ड्याचा प्रसाद मिळाला.

              पुढच्या अर्ध्या तासात  गाडीचं पुढचं चाक खराब झालं. आणि तेही अशा ठिकाणी की जवळपास दुरुस्तीची सोयच नव्हती. पाऊस थांबायचं चिन्ह दिसत नव्हतं. सुदैवाने जवळच एक घर होतं. तिथे जाऊन चौकशी केली असता कळलं की आठ दहा किलोमीटर अंतरावर दुरुस्तीचं काम होऊ शकतं. मग त्या घरातल्या माणसानेच एक रिक्षा बोलावली. आमच्या बरोबरचे रिक्षा घेऊन त्या कामासाठी गेले. आम्ही दोघं त्या घरात बसलो. या सगळ्यात तासाभरापेक्षा जास्त वेळ गेला. तेवढा वेळ आम्ही त्या घरात बसलो होतो. घर अगदी साधं चिव्याचं मातीनं लिंपलेल्या भिंती आणि वर पत्रे असंच होतं. आदली रात्र त्या घरातल्या लोकांनी जागून काढली होती. वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून गेले तर काय या चिंतेने ते झोपू शकले नव्हते. पण अशा घरात रहाणारी माणसं  मनाने मात्र श्रीमंत होती. कुठलीही ओळख नसताना अगदी सहज मदत केली होती त्यांनी आम्हाला. जोराच्या वाऱ्यापावसात बाहेर उभं राहू न देता आम्हाला घरात बसायला सांगितलं होतं. आपली कामं बाजूला ठेवून आमच्याशी छान गप्पाही मारल्या. चहा नाश्तयाचाही आग्रह केला पण आम्ही वाटेत नाश्ता करुन निघालो होतो.  आणि त्यांना आम्ही गेल्या गेल्याच थोडाफार खाऊ दिला होता.

                 गाडीचं चाक नवीनच लावलं, आणि त्या घरच्या लोकांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. पुढचा उरलेला प्रवास फारच सावधपणे आणि सावकाश करुन अखेर दुपारी उशीराने घरी पोहोचलो. 

                 यावेळची गिरनार यात्रा म्हणजे आमची खरंच कसोटी होती. अर्थातच श्री दत्तगुरुंनीच परिक्षा घेतली आणि त्यांनीच आम्हाला या मोठ्या परिक्षेत उत्तम यश दिलं आणि सुंदर दर्शन घडवलं. 

              || अवथुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||


गुरुपौर्णिमा अन गिरनार गणित जमेना

परि गुरुशिखर दर्शनाविण चैन पडेना

सुरु होती घालमेल मनाची चार दिवस 

गिरनार दर्शना गेलो आधी दोन दिवस

निघालो मिळून सगळे सकाळी गाडीने

संगतीला होतेच वारा पाऊस जोडीने

पावसाचे पाणी रस्त्यावर लागले साचू

पाण्यात खड्ड्यात गाडी लागली नाचू

कसेबसे हळूहळू पुढे जातच राहिलो

मध्यरात्री अखेर मुक्कामी पोहोचलो

पहाटे आवरुन निघालो गुरुदर्शनाला

वादळी वाऱ्याने बंद होता उडनखटोला

मग दशसहस्त्र पायरी जशी लागलो चढू

तसा वाऱ्यापावसाचा जोर लागला वाढू

सन्नाट पावसात समोरचं काही दिसेना

भन्नाट वाऱ्यात तोल सावरता येईना

विचार केला इथूनच माघारी फिरावं

पण मग गुरुशिखर दर्शन कसं घडावं

निसर्गाचं रौद्र रूप मात्र वाढतच होतं

संगतीलाही बरोबर फार कुणी नव्हतं 

गुरुश्रध्देने हळूहळू पुढे जात राहिलो

अखेर एकदाचे मंदिरात पोहोचलो

दत्तगुरंच्या चरणी नतमस्तक झालो

अन क्षणात भीती, थकवा विसरलो 

अवघड परिक्षा घेणारे स्वयं दत्तगुरुच

प्रयत्नांती यश देणारेही स्वयं दत्तगुरुच

- स्नेहल मोडक



 

Friday, July 8, 2022

विठ्ठल विठ्ठल

                   सावळे सुंदर रूप मनोहर

                   राहो निरंतर हृदयी माझे

                  पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांच्या बरोबरच भान हरपून विठुरायाच्या गजरात, भजनात तल्लीन व्हावं, श्वासागणिक विठुरायाचा नापजप करावा, आणि वारी प्रत्यक्ष अनुभवावी ही अनेकांप्रमाणेच माझीही इच्छा. अर्थात या वर्षीही ही इच्छा पूर्ण होता होता राहिली. पण माऊलींच्या कृपेने हा योग नक्की कधीतरी येईल हा विश्वास आहे. मात्र या निमित्ताने एक अनुभव शब्दबद्ध करावा असं वाटलं आणि मी व्यक्त झाले.

                  खूप वर्षांपूर्वींची गोष्ट आहे ही. इथल्याच एका आयोजकांनी आयोजित केलेल्या यात्रेला आम्ही दोन कुटुंबं गेलो होतो. बरोबर इतर यात्रेकरुही होतेच. दोन सतरा आसनी गाड्यांमधून आम्ही सारे यात्रेकरु गेलो होतो. गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, सोलापूर, गोंदवले इ. स्थानदर्शन अशी ती यात्रा होती. 

                  पंढरपूरला पहाटे पोहोचलो. सगळं आवरुन विठुरायाच्या दर्शनाला निघालो. कार्तिकी एकादशीचा तिसराच (तृतीया) दिवस होता. चंद्रभागेचा तीर भाविकांच्या गर्दीने, उत्साहाने आणि विठ्ठलाच्या जयघोषने फुलून गेला होता. आम्ही सगळेही त्याचाच एक भाग होऊन दर्शन रांगेत सहभागी झालो. सकाळी आठ वाजता आम्ही रांगेत उभे होतो. पण एकूण गर्दी बघता दर्शनाला साधारण किती वेळ लागेल याची चौकशी केली असता 'काळजी करु नका दोन तीन तासात दर्शन होईल' अशीच उत्तरं मिळाली. आणि आम्ही रांगेत थांबायचं ठरवलं. निर्णय घेतला खरा पण आजूबाजूची परिस्थिती अतिशय किळसवाणी होती. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. अगदी खरं सांगायचं तर नाक मुठीत धरुन आणि डोळ्यांना झापडं लावूनच आम्ही उभे होतो. साधारण तासाभरात आम्ही रांगेतून एका इमारतीत प्रवेश केला. सुरुवातीला वाटलं आता थोड्याच वेळात आपल्याला विठुरायाचं  दर्शन घडेलं. पण मग लक्षात आलं ही रांग प्रचंड मोठी आहे. त्या इमारतीचे काही मजले रांगेतून गेल्यावर मग मुख्य मंदिरातल्या रांगेत आम्ही पोहोचणार होतो. आणि प्रत्येक मजल्यावर ती रांग फिरवत फिरवत खाली आणलेली होती. ही परिस्थिती लक्षात आल्यावर मग मात्र आम्हाला खूपच काळजी वाटायला लागली.  त्या इमारतीतही बिलकुल स्वच्छता नव्हती. जिकडे तिकडे कचरा, पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या अशी गलिच्छ अवस्था होती. केवळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही हे सारं सहन करायचा प्रयत्न करत होतो. साधारण दोन मजले रांगेतून फिरत फिरत गेल्यावर मात्र माझा आणि माझ्या मैत्रिणीचा संयम संपला. दर्शन राहुदे आपण परत जाऊया असं वाटायला लागलं. कारण आमच्या बरोबर आमची मुलंही होती. आणि तीही इतकी लहान की अगदी कडेवर, हाताशी अशी परिस्थिती होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दर्शनाला एवढा वेळ लागेल याची पूर्वकल्पना नसल्याने मुलांसाठी खाऊ पाणी हेही फारसं बरोबर घेतलेलं नव्हतं. अखेर मैत्रिणीच्या कुटुंबाने परत फिरायचा निर्णय घेतला पण आम्ही मात्र कसे कोण जाणे पण दर्शनासाठी थांबलो.

                    रांग पुढे सरकत होती वेळ जात होता तसतसं मुलींना सांभाळणंही कठीण होऊ लागलं होतं. मुलींना कडेवर घेऊन हात आणि सतत उभं राहून पायही बोलायला लागले. मुलींची तहानभूक पुरवायलाही काही नव्हतं. बरोबरचा खाऊही संपला. तिथे काही खाऊ मिळणंही शक्य नव्हतं. मग मात्र माझा संयम पूर्णच संपला. मनोमनी मी त्या विठुरायाला बोल लावू लागले, तुझं दर्शन घेण्यासाठी तू आम्हाला थांबवलंयस पण त्याचा नको इतका त्रास माझ्या अगदी लहान मुलींनी का सोसायचा? आम्ही तुझ्या दर्शनासाठी कितीही त्रास सहन करु शकतो पण मुलींना आज जो त्रास होतोय तो माझ्या सहनशक्ती पलिकडचा आहे, आणि त्याला माऊली तुच जबाबदार आहेस. असे बोल लावतच मी मुलींना सांभाळत रांगेत उभी होते. कधी एकदा दर्शन घेऊन बाहेर पडतो असं झालं होतं.

                  अखेर  नऊ तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सायंकाळी पाच वाजता आम्हाला पंढरीरायानं दर्शन घडवलं. तिथे असलेले गुरुजी प्रत्येक भाविकाला दर्शन घेताच बकोटीला धरुनच बाजूला करत होते. क्षणभरही थांबू देत नव्हते. ते बघून माझा त्रागा अजूनच वाढला. पण बहुदा त्या लोभस सावळ्या रुपालाच आम्हाला सुंदर दर्शन घडवायचं होतं. त्यामुळे असेल कदाचित पण त्या गुरुजींनी बिलकुल घाई केली नाही, आणि शांतपणे दर्शन घेऊ दिलं. माऊलींच्या चरणी मी नतमस्तक झाले आणि नकळतच डोळे भरुन आले. बाजूला होऊन मनोमनी दर्शन घडल्याचा आनंद व्यक्त केला पण त्याचवेळी त्या माऊलींना व्यथित मनाने सांगितलं आज दर्शन घडवलंत पण मुलींना झालेला त्रास मी विसरु शकत नाही. मुलींना असा त्रास होणार असेल तर आम्हाला दर्शनाला यायची बिलकुल इच्छा नाही. दर्शन घेऊन आम्ही परत फिरलो. दिवसभर जवळजवळ उपवास घडला होता तो चार घास भोजन ग्रहण करुन सोडला, आणि एक नकोसा अनुभव घेऊन पुढील प्रवासाला निघालो.

                  आम्ही दरवर्षी दीपावली नंतर अंबाजोगाईला आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जातो. तिथून मग आजूबाजूला फिरुन परत येतो. त्याप्रमाणे तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट इ. ठिकाणी जाऊन दर्शन घेत होतो. पण पंढरपूरच्या पहिल्यावहिल्या दर्शनाच्या नकोशा अनुभवानंतर पंढरपूरला परत दर्शनाला जायचं नाही हे ठाम ठरवलं होतं.  त्यामुळे पंढरपूरला जात नव्हतो. 

                 काही वर्षांनी असंच अंबाजोगाईहून परत येताना आमच्याबरोबर असलेल्या सगळ्यांची इच्छा म्हणून परत एकदा पंढरपूरला गेलो. मंदिराजवळ पोहोचलो आणि आधी दर्शनाला किती वेळ लागेल याची पूर्वीप्रमाणेच चौकशी केली. तेव्हाही दोन तीन तासात दर्शन होईल असंच उत्तर मिळालं आणि मी लगेच दर्शन न घेता परत निघुया असं म्हटलं. तेव्हा तिथला एक फुलवाला म्हणाला आलाच आहात तर मुखदर्शन तरी घ्या. मग विचारलं तर म्हणाला ते दर्शन लगेच होईल. म्हणून मग मुखदर्शन घेण्यासाठी गेलो. अर्थात तिथेही रांग होतीच. पण पंधर वीस मिनिटांत मुखदर्शन घेता आलं. तेवढ्यावरच समाधान मानून सारे परत फिरलो. मुलींना तासनतास रांगेत उभं रहायला लावून, त्रास देऊन दर्शन घ्यायचं नाही या माझ्या निर्णयावर‌ मी ठाम होते. त्यामुळे चटकन मुखदर्शन करुन परत एकदा विठुरायाला माझा तो निर्णय परत एकदा सांगून मी मंदिराबाहेर आले. अर्थात समोरुन नाही तर एवढं तरी दर्शन घडल्याचा आनंद सगळ्यांना झाला होता.

                 त्यानंतर परत एक वर्षी अंबाजोगाईला आमच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांना पंढरपूरला जायचंच होतं. म्हणून परत एकदा नाईलाजाने आणि रांग असेल तर आम्ही थांबणार नाही या अटीवरच आम्ही पंढरपूरला गेलो. आधीप्रमाणेच दर्शनासाठी किती वेळ लागेल याची चौकशी केली. तेव्हा पहिल्यांदाच असं कळलं की दर्शनाला अजिबात गर्दी नाहीय. मग मात्र आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि मी जागीच स्तब्ध झाले. मंदिरात तो जगन्नियंता राजस विठुराया आणि आम्ही यांच्याव्यतिरिक्त फक्त गुरुजी होते. अक्षरशः भान हरपून मी फक्त त्या पांडुरंगाकडे पहात होते. काही क्षणांनी त्याच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन एकदम शांत झालं. अश्रुभरल्या डोळ्यात ते लोभस रुप साठवत बाजूला झाले. त्यादिवशी माऊलींनी माझी इच्छा पूर्ण केली होती. क्षणभरही वाट पहायला न लावता थेट दर्शन घडवलं होतं. पहिल्यांदा दर्शन घेताना माझी झालेली तडफड माऊलींनी जाणली होती. काही वर्षांनंतर का होईना आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं. मन तृप्त तृप्त झालं होतं.

                 दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला आणि अर्थातच एरवीही या अनभुवांची परत परत आठवण येते आणि जाणवतं किती जपतो आपल्या प्रत्येकाचं मन तो जगन्नियंता. त्याच्या कुठल्याही निर्गुण रुपासमोर आपण अनन्यभावाने शरण गेलो तर तो यथावकाश सारं काही मनासारखं घडवतो हे नक्की. 

              अखेर 'देव भावाच भुकेला' हेच खरंय.

- स्नेहल मोडक

Thursday, June 30, 2022

आषाढस्य प्रथम दिवसे

        वर्षाऋतुचा सांगावा घेऊन आलेला 'ज्येष्ठ' संपलाय. आजपासून आषाढ महिना सुरु झालाय. व्रतवैकल्यांची सुरुवात म्हणून जरी आषाढ महिना ओळखला जात असला तरी आषाढातील पहिला दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. कालिदासांनी आपल्या मेघदूत या महाकाव्याची सुरुवात 'आषाढस्य प्रथम दिवसे' अशी केलीय. त्यामुळेच आषाढातील पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात आला आहे. प्रेमीजनांची विरहव्याकुळता व्यक्त करणारं मेघदूत हे काव्य आणि त्याचे रचयिते महाकवी कालिदास यांच्या आठवणीचा आषाढ महिना आज सुरु झालाय. आजच्या या दिनी त्यांना मनोमन आदरांजली अर्पण करुया.



दिवस प्रथम असे आषाढाचा आज

सजे आकाशी मेघमल्हाराचा साज

   नीलवर्ण गगनीचा लुप्त तो जाहला

   अन साऱ्या नभी कृष्णमेघ दाटला

विरही यक्षाला मेघांत मार्ग दिसला

सावळ्या मेघाला दूत तयाने केला

   धाडीला निरोप प्रियेला त्या मेघासंगे

   तुजविण मम आयुष्याचे चित्र ना रंगे

विरहास यक्षाच्या काव्यातच गुंफले

अन कालिदासांसी मेघदूत ते स्फुरले

   महाकाव्य ते मेघदूत खास प्रेमीजनांसी

   मम आदरांजली ही कवी कालिदासांसी

- स्नेहल मोडक

Thursday, June 23, 2022

अजूनही रुसून आहे....

             मे महिना सरता सरता विविध माध्यमांतून हवामान खात्याने वर्तविलेले वर्षाऋतूचे अंदाज झळकायला लागतात. अमुक तारखेला पाऊस अंदमानमध्ये येणार. अमुक तारखेला केरळमध्ये येणार आणि पुढच्या चार दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र पर्जन्यराजा व्यापणार. बातम्या ऐकून उन्हाच्या काहिलीने अतिशय त्रस्त झालेलं आपलं तनमन त्या रेशीमधारांची चातकासारखी वाट पहायला लागतं. वैशाख वणव्याने तप्त अवनीही पर्जन्यराजाची आसुसून वाट पहात असते.

             अमलताश, गुलमोहोर, सोनमोहोर, पांढरा चाफा हे सारे गर्द फुलांची पखरण घालून रिक्त होऊ लागतात. पक्ष्यांची घरटी बांधायची लगबग सुरु होते. आंबा,फणस, करवंद, जांभळं यांचा हंगाम संपत येतो. सारी आगोठची कामं आवरती घेतली जातात. 

             वर्षाऋतूच्या आगमनाची चाहूल लागते. आकाशात अधूनमधून कृष्णमेघ दिसू लागतात. सहस्ररश्मी कृष्णमेघांबरोबर लपंडाव खेळू लागतो. शेतकरी वर्ग उल्हसित मनाने शेतीच्या कामांची जुळवाजुळव सुरु करतो. पर्जन्यराजाच्या स्वागताची सारी तयारी होते. आणि सुरु होतं त्याच्या प्रत्यक्ष येण्याची वाट पहाणं. 

             पण... हो हा पण यावेळी फारच लांबलाय, हो ना? 

             सध्या वातावरणात सातत्याने विचित्र बदल घडतायत. पावसाचं आगमन काही ना काही कारणाने लांबतंय. उन्हाची काहिली शांत होण्याची शक्यता दुरावतेय. भास्कराचा मृगनक्षत्री प्रवेश होऊनही दिवस सरलेत. पण अजूनही जलधारा हव्या तशा बरसत नाहीयेत. शेतकरी वर्गाला हळूहळू चिंता ग्रासतेय. अजूनही गावोगावी पाण्यासाठी वणवण सुरु आहे. भेगाळली भुई पावसाच्या सरींसाठी आसावलीय. पाऊस लगेचच सुरु नाही झाला तर हळूहळू माध्यमांद्वारे धरणांमधला पाणीसाठा जेमतेम इतकेच दिवस पुरेल अशा आशयाच्या बातम्या देण्यास सुरुवात होईल.

             सध्या पृथ्वीवरील तापमानात अतिवाढ होतेय. अतिरेकी प्रदुषणामुळे ही तापमानवाढ होते असं म्हटलं जातंय. पण याचाच परिणाम म्हणून काही ठिकाणी दुष्काळ पडतोय तर काही ठिकाणी पूर येतायत. हिमनग वितळू लागल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतेय. ऋतुचक्रही बदलत चाललंय. परिणामी वर्षाऋतही बदलतोय. जून महिना सरत आला तरीही पाऊस अजूनही नीट सुरु झाला नाहीय. आपल्याकडूनच होत असलेल्या वाढत्या प्रदूषणामुळं आपल्यालाच त्याचे भयंकर दुष्परिणाम सोसावे लागतायत. 

            म्हणूनच खिन्नपणे म्हणावं लागतयं - पाऊस अजूनही रुसून आहे. बघा नं वाढतं औद्योगिकीकरण, जंगलतोड, जीवाश्म इंधनाचा अति वापर, रासायनिक खतांचा वापर या साऱ्या गोष्टींचा किती वाईट परिणाम होतोय. त्या पर्जन्यराजालासुध्दा तप्त वसुंधरेला तृप्त करावसं वाटत नाहीय. 

            हल्ली विविध माध्यमांतून या तापमानवाढीवर बोललं जातंय. ही तापमानवाढ रोखण्यासाठी प्रयत्न केले जातायत. प्रदूषण कमी करण्याचे, वृक्षारोपणाचे पर्याय राबविले जातायत. पण तरीही बहुधा हे खूपच कमी प्रमाणात होतंय. कारण अजूनतरी या प्रयत्नांमुळे तापमानवाढ कमी होत नाहीय. आणि अजूनही पूर्वी सारखा पाऊस पडत नाहीय. पृथ्वीवरील जलसंपदा सातत्याने कमी होतेय. भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण होण्याची चिंता सतावतेय. अर्थातच तापमानवाढ, प्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने सार्वत्रिक स्तरावर प्रयत्न केले तरच यश येईल. पण तोपर्यंत तरी पाऊस अजूनही रुसून आहे....

- स्नेहल मोडक

Friday, June 17, 2022

वटपौर्णिमा - गिरनार

                 वटपौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं आणि रेल्वेचं आरक्षणही केलं. पण प्रत्यक्षात जायला मिळणार की नाही हे मात्र पावसावर अवलंबून होतं. 

                परंतु पाऊस सुरु झाला नसल्याने आम्ही जायचं नक्की केलं. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी निघायचं होतं. निघताना नेहमीप्रमाणे श्री दत्तगुरुंना  गिरनार दर्शन घडवून आणा अशी प्रार्थना केली आणि अचानक माझ्या मनात शब्द उमटले "दत्तगुरु तुम्ही आम्हाला बारावं गिरनार दर्शन घडवणार आहात. प्रत्येक वेळी मला तुम्ही खूपच सुंदर अनुभूती दिली आहे. यावेळी मला दृष्य स्वरुपात काही अनुभूती द्याल का" मनात ही प्रार्थना उमटली आणि पुढच्या क्षणी भानावर आले मी. मलाच कळेना मी हे काय मागतेय दत्तगुरुंजवळ... दृश्य अनुभूती? कसं शक्य आहे हे? पण विचार करायला वेळ नव्हता. निघायची वेळ झाली होती.

                पौर्णिमेच्या दिवशी पहाटे जूनागढला पोहोचलो. तिथून तलेटीला गेलो. मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन भराभर सारं आवरुन दर्शनाला निघालो. नित्याप्रमाणे लंबे हनुमानजींचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन प्रार्थना केली आणि उडन खटोलाजवळ पोहोचलो. गर्दी कमी असल्याने फार वेळ थांबावं लागलं नाही. उडन खटोलाने निघालो साधारण अर्धं अंतर गेलो आणि उडन खटोलाची गती कमी झाली. भन्नाट वारा आणि दाट धुक्यामुळे गती कमी झाली होती. वरती पोहोचलो तेव्हा गिरनार धुक्याने पूर्ण वेढलेला होता. अतिशय अप्रतिम दृश्य होतं. गार वारा सुटला होता. त्या वातावरणात आम्ही शिखरावर पोहोचलो. गर्दी कमी असल्याने अतिशय सुंदर दर्शन झालं. दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक झाले अन मन एकदम शांत झालं. 

                अखंड धूनीजवळ येऊन नित्याप्रमाणे आधी  गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं. मग दर्शन घेऊन शिधा आणि देणगी अर्पण केली. आणि भोजनप्रसाद घेण्यासाठी निघालो. तेवढ्यात आमच्या मित्रानी थांबवून प्रसाद मिळाला का विचारलं. आम्हाला नेहमीचा प्रसाद तर मिळाला होता. पण त्यांनी जेव्हा देणगी तेव्हा त्यांना एका भक्ताकडून वेगळ्याच प्रसादाबद्दल माहिती त्यांना मिळाली. आणि त्या माहितीनुसार तो प्रसाद त्यांनाही मिळाला. आम्हाला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. मित्रांच्या सांगण्यावरुन आम्ही पुन्हा गुरुजींशी बोललो. त्यांनी जरा गर्दी कमी होईपर्यंत थांबायला सांगितलं. तोपर्यंत आम्ही भोजनप्रसाद घेतला. गुरुजींनी आमचा प्रसाद मित्राच्या हाती दिला.

                बारा पौर्णिमा गिरनार दर्शन घडल्यावर तिथे विशेष प्रसाद दिला जातो. आणि हा प्रसाद म्हणून रुद्राक्ष माला आम्हाला किंचितही पूर्वकल्पना नसताना अचानकपणे मिळाली. प्रसाद मिळाला आणि मला घरुन प्रार्थना करुन निघताना मनात उमटलेले शब्द आठवले. त्याक्षणी मात्र मला डोळ्यातलं पाणी थांबवणं अशक्य झालं. दृश्य अनुभूती? होय श्री दत्तगुरुंनी ही दृश्य अनुभूती देऊन अगदी सहजपणे माझी इच्छा पूर्ण केली होती.

                 खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे ही आमच्यासाठी. कारण मुळात गिरनार दर्शनाची ओढ पूर्वीपासून होती. पण अनेक लोकांप्रमाणे आपणही गिरनारला दहा हजार पायऱ्या चढून जाऊ शकतो का अशी साशंकता मनात होती. अखेर श्री दत्तात्रेयांच्या कृपेने गिरनार दर्शनाचा पहिला योग आला आणि आम्ही दहा हजार पायऱ्या चढून दर्शन घेऊन परत दहा हजार पायऱ्या उतरुन आलो. आणि 'एकदातरी' असं म्हणता म्हणता या वटपौर्णिमेला बाराव्या वेळी दर्शन घडलं. अर्थातच ही सारी श्री दत्तात्रेयांचीच कृपा.

                प्रत्येक गिरनार दर्शनाच्या वेळी मला जशी श्री दत्तात्रेयांच्या अस्तित्वाची, त्यांच्या आशीर्वादाची प्रचिती ते देतात तशी ती खरंतर प्रत्येक भक्ताला देत असतात. आपल्या श्रध्देची, भक्तीची कवाडं उघडी असली की आपल्याला त्याची जाणीव होते असं मला वाटतं.

                खरंतर वटपौर्णिमा म्हणजे धुवांधार पाऊस. पण यावेळी मात्र गिरनारवर तसा पाऊस नव्हता. मात्र अतिशय आल्हाददायक आणि नयनरम्य असं वातावरण होतं गिरनारवर. आपण जितक्या वेळा गिरनारला जातो तितक्या वेळा आपल्याला त्याचं वेगळेपण जाणवतं. प्रत्येक वेळी तो वेगळ्याच सौंदर्याने नटलेला असतो. कितीही वेळा गिरनारवर गेलं, थांबलं तरी मनाचं समाधान होतच नाही.

| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त |

            

दुलई धुक्याची ल्यायला गिरिनारायण

शोभती काठावरी नक्षीदार सोनकिरण

रेशमी धुक्यात हलकेच उषा अवतरली

परि दशसहस्त्र पायरी धुक्यात हरवली

अवचित येता नभातूनी ते रवीकिरण

धुक्याची दुलई होते विरळ काही क्षण

हळूच गेला भास्कर पुन्हा कृष्णमेघात

हरवला गिरनार सारा मग दाट धुक्यात 

बरसल्या अवचित मृगाच्या रेशीमधारा

अन ओलावूनी सुखावला गिरनार सारा

धुक्यात चाले उनपावसाचा खेळ वेगळा

ध्यानस्थ गिरनार भासे अवखळ आगळा


- स्नेहल मोडक

           



Monday, May 23, 2022

श्रीक्षेत्र दत्तधाम

            नेहमी कोकणात जातायेताना एकदा तरी दत्तधामला जावं असं वाटायचं. पण प्रत्येक वेळी काही कारणामुळे जाणं अशक्य व्हायचं. पण यावेळी कोकणातून परत येताना नुकताच श्रीक्षेत्र दत्तधामला जायचा योग जुळून आला आणि खूप समाधान वाटलं.

            हे दत्तधाम पाटण तालुक्यातील हेळवाक या गावात असलं तरी इथे चिपळूणहून कुंभार्ली घाटातून जाता येतं. हा घाट पार केल्यावर लगेच साधारण ४-५ किमी अंतरावरच हे स्थान आहे.   

            आम्ही चिपळूणहून सकाळी लवकर निघालो. कुंभार्ली घाट सुरु झाला आणि वातावरण एकदम बदललं. घाटात मस्त पावसाळी वातावरण होतं. छान गार वारा सुटला होता. घाटातून दिसणारे लांबवरचे डोंगर मात्र खाली उतरलेल्या ढगांमध्ये जणू अदृश्य झाले होते. अप्रतिम दृश्य होतं घाटातलं. अर्थातच त्या वातावरणात गाडी थांबवून खाली उतरण्याचा मोह आवरणं अशक्यच. साहजिकच गाडी थांबवून खाली उतरलो. थोडा वेळ थांबून घाटातला गार वाऱा अनुभवून तिथलं सुंदर दृश्य डोळ्यात आणि छायाचित्रात साठवून पुढे दत्तधामला निघालो. 

            कुंभार्ली घाट पार केल्यावर मात्र उजव्या बाजूला लक्ष ठेवत पुढे जावं लागतं. साधारण ४-५ किमी वर दत्तधामची एक लहानशी पाटी दिसते. या व्यतिरिक्त दत्तधामची कुठलीही खूण रस्त्यावरुन दिसत नाही. त्या पाटीजवळच रस्त्यावरुन बाजूला गाडी उभी करायला मोकळी जागा आहे. तिथे उतरुन पाटीजवळ आलं की आत जाणारी वाट दिसते. पण तिथूनही आतमध्ये नक्की काय आहे याची कल्पना येत नाही. 

            दत्तधामच्या पाटीजवळून आपल्याला दिसतं ते फक्त दाट जंगल आणि त्यातून जाणारी पायवाट. या पायवाटेने जरासं पुढं गेल्यावर एक छोटासा पक्का बांधलेला पूल लागतो. ही कोयनेची एक उपनदी कापणी. हा पूल पार करुन पुढं गेल्यावर आपल्याला दत्तधामचं प्रवेशद्वार दिसतं. इथे पोचल्यावर आपली उत्कंठा अजूनच वाढते. 

            प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पायऱ्या सुरु होतात. वळदार रस्त्याने सुबक अगदी कमी उंचीच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. दोन्ही बाजूला गर्द जंगल आहे. दाट सावली, सुखावणारा गंधित वारा, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट यामुळे या तीनशे पायऱ्या चढताना बिलकूल त्रास होत नाही. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला आधार आणि सुरक्षेसाठी लोखंडी कठडा आहे. आणि त्या दाट जंगलातही कठड्याजवळ बऱ्याच ठिकाणी लाल जास्वंदीची झाडं आहेत. अतिशय मनमोहक अशी ही जास्वंद सगळीकडे भरभरुन फुलली होती. आम्ही सकाळी लवकर पोहोचल्यामुळे वातावरण खूप शांत प्रसन्न होतं. 

            थोड्याशा पायऱ्या चढून वर गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटसं रामदूत हनुमान मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. तिथल्या सुंदर वातावरणात पायऱ्या चढून केव्हा मंदिराजवळ पोहोचलो कळलंही नाही. 

            मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार ओलांडून आत गेल्यावर समोर येतं ते दक्षिणेकडील गिरनार म्हणजेच हे श्रीक्षेत्र दत्तधाम. 

             श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी आपल्या वास्तव्यासाठी एक अतिशय शांत असं स्थान निर्माण करावं असं परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे यांना सांगितलं होतं. त्यानूसार मामासाहेब जागेच्या शोधात होते. त्याचवेळी त्यांचे उत्तराधिकारी  श्री.शिरिषदादा कवडे हे कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होते. ते कोयना धरणावर अभ्यास दौऱ्यावर आले असताना तिथला रम्य, शांत परिसर पाहून तिथली थोडी जागा मामासाहेबांना अर्पण करावी असं त्यांना वाटलं, पण तो विषय तेवढ्यावरच राहिला. कालांतराने त्यांचे मित्र त्याच ठिकाणी आले असता त्यांना कानात कुणीतरी हिच ती जागा असं बोलल्याचं जाणवलं. त्यांनी तात्काळ शिरिषदादांना संपर्क केला. मग मामासाहेबांना हे सारं सांगून ही जागा विकत घेण्यात आली. हे स्थान म्हणजेच आजचं दत्तधाम. 

            सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं हे अतिशय निसर्गरम्य स्थान अजूनही फारसं प्रसिद्ध नाहीय. चिपळूण मधून कुंभार्ली घाटातून साधारण बत्तीस किमी. वरचं हे स्थान म्हणजे दत्त आणि नाथ संप्रदायाची प्राचीन तपोभूमीच. इथं गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केलं होतं. त्यांना याठिकाणीच भगवान श्री परशुरामांकडून श्री विद्या प्राप्त झाली. त्यामुळे या स्थानाचं महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे. 

           गुरु गोरक्षनाथांना ज्याठिकाणी अनुग्रह प्राप्त झाला त्याठिकाणीच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पंचधातूची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित आहे. ही मूर्ती सांगलीतील एका कारखानदाराने स्वतासाठी बनवून घेतली होती परंतु त्यांना ती मूर्ती मामासाहेब यांना देण्याचा दृष्टांत झाला आणि ती मूर्ती मामासाहेबांकडे आली . तीच मूर्ती या दत्तधाममध्ये प्रतिष्ठापित करण्यात आलीय. तसंच श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांचीही पंचधातूची मूर्ती इथं आहे. इथं असलेल्या शिवलिंगाबद्दलही एक अद्भुत कथा ऐकायला मिळते. हिमालयात एका साधूला स्वयं भगवान शंकरांनी हे शिवलिंग देऊन ते मामासाहेबांना देण्याची आज्ञा केली. त्यानूसार साईरामबाबांनी हे शिवलिंग मामासाहेबांना दिले. 

           आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा तिथल्या गुरुजींची पूजा पूर्ण होतच आली होती. त्यांनी आम्हाला तिथेच बसायला सांगितलं. आम्ही तिथे असलेल्या चटईवर बसून त्यांची पूजा पहात मनोमनी नामस्मरण सुरु केलं. अतिशय शांत आणि पवित्र वातावरण होतं. अतिशय पवित्र अशा स्थानाचं दर्शन आणि तिथेच बसून नामस्मरण हा खूपच मोठा योग आला होता. डोळ्यात येणारं पाणी निग्रहानं परतवत मी नामस्मरण सुरु ठेवलं होतं. पूजा झाली आणि आम्ही दर्शन घेतलं. बरोबर नेलेला नैवेद्य अर्पण करुन तीर्थ प्रसाद घेतला. खूप दिवसांपासून लागलेली दर्शनाची आस पूर्ण झाली आणि अतीव समाधान लाभलं. 

           मुख्य मंदिराव्यतिरिक्त अजून सहा दर्शन स्थानं इथं आहेत.   मुख्य मंदिराच्या समोरच श्री वरदविनायकाचं मंदिर आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला दत्त आश्रम आहे. तिथेच मामासाहेबाचं नामसमाधी मंदिर आहे. तसंच कमंडलू तीर्थ आणि विश्रांती शिलास्थान जवळच आहे. मात्र याठिकाणी दत्तजयंती दिवशीच भाविकांना दर्शन घेता येतं. मुख्य मंदिराच्या थोडं पुढे छोटंसं गुरुपादूका मंदिर आहे. इथे मात्र रोज दर्शन घेता येतं. मंदिर दर्शनासाठी रोज ठरलेल्या वेळेतच उघडं असतं. सकाळी ८.३० ते १२.३० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंतच दर्शन घेता येतं. तसंच दर सोमवारी मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद असतं. 

           मंदिराचा संपूर्ण परिसर अतिशय शांत, पवित्र पण रमणीय आहे.  मंदिरात तीनशे पायऱ्या चढून जावं लागतं. पण किंचितही त्रास होणार नाही असा सुंदर गर्द जंगलातून जाणारा हा मार्ग आहे. एकदा तरी आवर्जून दर्शनाला जावं इतकं अप्रतिम असं हे दत्तधाम. 

           अतिशय अप्रतिम असं हे श्रीक्षेत्र दत्तधाम प्रसिद्धी पासून मात्र थोडं दूरच आहे. कदाचित स्वयं श्री नृसिंह सरस्वती स्वामींची शांत परिसरात वास्तव्य करण्याची इच्छा होती म्हणूनच इथे फारशी वर्दळ दिसून येत नाही आणि याची फारशी प्रसिद्धीही श्रीपाद सेवा मंडळाकडून केली जात नाही.

           इतकं शांत पवित्र असं हे स्थान शब्दांकित करण्याचा मी प्रयत्न करण्याचं कारणही जरा विलक्षणच. दत्तधामला जाऊन दर्शन घेऊन अतिशय समाधानाने आम्ही घरी परत आलो. दुसऱ्या दिवसापासून आमचं कामाचं रोजचं वेळापत्रक सुरु झालं. तीन चार दिवसांत जास्तीची कामं उरकली आणि आज दुपारी घरातच जरा निवांत फेऱ्या मारत होते आणि अचानक कानाशी शब्द ऐकू आले दत्तधाम विसरलीस का तू? क्षणभराने जाणवलं हा अनुभव आपण अजून शब्दबद्ध केला नाहीय. तरीही मी दुर्लक्ष करुन फेऱ्या मारुन झाल्यावर निवांत बसून डोळे मिटले आणि परत दत्तधाम एवढाच शब्द जोरात ऐकू आला. खाडकन डोळे उघडले आणि मग मात्र हे सारं शब्दांत मांडायचा प्रयत्न केलाय. 

          || अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

    

    




- स्नेहल मोडक

Wednesday, April 27, 2022

कपाट

               शब्द नुसता वाचूनच डोळ्यासमोर आलं ना आपल्या घरातलं कपाट. प्रत्येक घरात एक तरी मजबूत लोखंडी कपाट ‌असतंच, हो ना? अर्थात त्याबरोबरच लाकडी कपाटंही असतातच घरात. आपल्या साऱ्या चीजवस्तू , कागदपत्रं नीट ठेवण्यासाठी गरजच असते कपाटाची. गरजेनुसार अनेक लहानमोठे कप्पे असलेली कपाटं असतात आपल्याकडे. पण आज मला एका वेगळ्याच कपाटाबद्दल बोलायचंय.

               मनाचं कपाट. हो अगदी बरोबर मनाचं कपाट. आपल्या मनातही भावभावनांचे असंख्य कप्पे असतात. कुटुंब, आप्तेष्ट, मित्रपरिवार या सगळ्यांसाठीही वेगवेगळे कप्पे असतात आपल्या मनात. सुखद, हळव्या, हव्याहव्याशा आठवणी एका कप्प्यात तर दु:खद, नकोशा आठवणी एका कप्प्यात ठेवतो आपण. पण घरातली कपाटं जशी आपण वेळोवेळी आवरुन नीट ठेवत असतो, निरुपयोगी वस्तू काढून टाकतो अगदी तसंच मनाचं कपाटही वेळोवेळी आवरावं लागतं. त्रासदायक भावना विसराव्या लागतात. त्यासाठी आपल्या माणसांजवळ हक्कानं व्यक्त व्हावं लागतं. मनमोकळ बोलूनच आपण तणावमुक्त होत असतो.


आपल्या मनातले

अदृश्य जगातले

असंख्य कप्पे असलेले

भावभावनांनी भरलेले

एक कप्पा कुटुंबाचा

प्रेम अन काळजीचा

एक कप्पा नात्याचा

प्रेम अन आधाराचा

एक कप्पा परिचितांचा

साथ अन मदतीचा

एक कप्पा मैत्रीचा

निखळ आनंदाचा

एक कप्पा स्वतः चा

आवड अन छंदाचा

मनाचे कपाट कधी भरुन वाहते

सावरणारे कुणीतरी समोर लागते

कधी भरलेले कपाट बंद होते

आतल्याआत तडफडत राहते

होता भावनांचा असह्य भार

उद्वेगाने होतो मग देहावर वार

एका क्षणात एखादं आयुष्य संपतं

आठवणीत जगणं एवढं बाकी उरतं

असंख्य भावबंध असलेले

निरंतर मनातच जपलेले

हे कपाट नित्यनेमाने उघडायचे

व्यक्त होऊनी सहजमुक्त जगायचे

- स्नेहल मोडक

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...