Pages

Tuesday, October 15, 2024

जय माता दी

                   नवरात्र सुरु झालं अन पहिले तीन दिवस छान पार पडले. नवरात्राच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी मात्र माझ्या सहचराच्या मनाची चलबिचल सुरु झाली. कारण काय तर चौथ्या दिवशी म्हणजे ६ तारखेला सकाळीच त्याच्या ऑफिसमधल्या सहकारी मित्रांनी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं होतं. आणि आम्ही मात्र यावर्षी घरीच होतो. खरंतर खूप आधी वैष्णोदेवीच्या दर्शनला जाण्याबद्दल आमची चर्चा झाली होती. पण सारखं सारखं काय जायचं असं म्हणत लेकींनी आमचा बेत उधळून लावला होता. आम्हा दोघांनाही दर्शनाला जायची तीव्र इच्छा होती पण मुलींचं म्हणणंही पटत होतं त्यामुळं मी शांत होते. पण जसं त्याच्या सहकाऱ्यांनी दर्शन घेतल्याचं कळलं तसं याला चैन पडेना. 'आपल्याला माता दर्शनाला बोलवतेय तर तूच ठरव काय करायचं ते' असं मला म्हणाला. मग माझंही मन दर्शनासाठी आसुसलं. अखेर ६ तारखेला रात्री तिघांचीही विमानाची तिकिटं काढलीच. 

            ‌ ‌       ८ तारखेला भल्या पहाटेचं विमान होतं. ७ तारखेला पूर्वनियोजित असलेलं एक काम करुन आम्ही रात्री प्रवासाला सुरुवात केली. आम्ही अक्षरशः ऐनवेळी वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाला जायचं ठरवलं होतं. त्यामुळं प्रवासाची तयारी आणि पुढली सगळी व्यवस्था खूप गडबडीत करावी लागली. अर्थात हे सगळं आमच्यासाठी सवयीचं असल्यानं कसलीही अडचण आली नाही. 

                      ८ तारखेला सकाळीच जम्मू विमानतळावर उतरलो. आमची गाडी तिथे आधीच येऊन थांबली होती. आम्ही त्या गाडीने लगेच पुढील प्रवासाला निघालो. त्यादिवशी आम्ही 'पहलगाम' ला जाणार होतो. ४-५ तासांचा प्रवास होता. आधी वाटेत वैष्णो ढाब्यावर नाश्ता केला आणि पुढे निघालो. सारा प्रवासमार्ग अतिशय रमणीय आहे. एका बाजूला उंच पर्वतराजी आणि त्यांच्या पायथ्याशी डौलदार वळणं घेत वाहणारी कधी चिनाब नदी, कधी झेलम नदी तर कधी लिद्दर नदी आणि यातूनच जाणारा रस्ता. ७,२०० फूट उंचीवर असलेलं 'अनंतनाग' जिल्ह्यातील 'पहलगाम' हे अगदी नितांतसुंदर असं शहर. लिद्दर नदी पहलगाम मधली प्रमुख नदी. ७३ किमी. लांबीची ही नदी ४,६५३ मीटर उंचीवरच्या कोलाहोई ग्लेशियर मधून उगम पावते. 'पुहेअल' या शब्दाचा काश्मीरी भाषेत ला अर्थ 'चरवाहा' असा आहे . 'चरवाहोंका गाम' म्हणून पहलगाम हे नाव पडलं. ग्रीष्म ऋतूत पशूंना चरण्यासाठी हे उत्तम स्थान आहे. 

                    आमचा बनिहाल पर्यंतचा प्रवास वेळेत आणि छान झाला. बनिहाल सोडलं आणि पुढे सगळी गडबड झाली. जम्मू कश्मीर च्या निवडणुकीचा निकाल ८ तारखेलाच होता. आणि आम्ही अगदी ऐनवेळी आमचा बेत ठरवल्यानं आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही बनिहाल ला पोहोचेपर्यंत निकाल यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे जिंकलेल्या उमेदवारांच्या मिरवणुका ठिकठिकाणी सुरु झाल्या. आणि प्रचंड वाहनकोंडी सुरु झाली. शांतपणेच त्यातून मार्ग काढत पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. कसबसं अखेर अपेक्षित वेळेपेक्षा खूप उशीरा आम्ही पहलगाम ला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. 

                         पहलगामला रुमवर पोहोचून थोडं ताजंतवानं होऊन फिरायला निघालो. सायंकाळ झाल्यानं फार फिरणं शक्य नव्हतं. म्हणून सर्वात तिथल्या मंदिरात आणि मग मार्केटमध्ये फिरायचं ठरवलं. 

                         ममलेश्वर मंदिर - पहलगाम मधलं हे अतिशय पुरातन मंदिर. 'पार्वती मातेनं' इथं स्नान करण्यापूर्वी आपला पुत्र 'गणेश' याला द्वारपाल म्हणून उभं केलं आणि आपल्या अनुमतीविना कुणासही प्रवेश न देण्यास सांगितलं. मात्र 'भगवान शिवांनाही' पुत्र गणेशाने अडवलं तेव्हा त्यांनी संतप्त होऊन गणेशाचा शिरच्छेद केला. आणि नंतर पार्वतीमातेनं पुत्रास जिवंत करण्यास सांगितलं असता गजराजाचं शिर गणेशाच्या देहास लावून पुत्र जिवीत केला. ही घटना जिथे घडली तेच हे स्थान. 'मम माल' याचा अर्थ 'जाऊ नको' यावरुनच या स्थानाला ममलेश्वर हे नाव प्राप्त झालं. इथं भगवान शिवाचं मंदिर आहे. मंदिरात शिव पिंडी आणि द्विमुखी नंदी विराजित आहेत. ४ थ्या शतकात बांधलेल्या या मंदिराची १२ व्या शतकात राजा जयसिंह यांनी पुनर्निर्मिती केली आणि भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं. अतिशय प्राचीन आणि सुंदर असं हे छोटंसं मंदिर त्यासमोर असलेली पुष्करणी आणि आजूबाजूला केलेला बगीचा सारंच नयनरम्य. भाविकांची बिलकुल गर्दी नसल्यानं अतिशय शांत प्रसन्न वातावरण. आम्ही या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. थोडावेळ थांबून पुढं निघालो.

                  मंदिरातून बाहेर येऊन जवळच असलेल्या मार्केट मध्ये गेलो. इथं काही दुकानं फिरलो पण फारशी खरेदी केली नाही थोडीशी लहानसहान खरेदी करुन तिथल्याच वैष्णो हाॅटेलमध्ये जेवून परत रुमवर आलो. तिथल्या व्यवस्थापकाशी दुसऱ्या दिवशी आम्हाला करायच्या स्थलदर्शनाबद्दल‌ माहिती घेतली आणि रुममध्ये येऊन निद्राधीन झालो. 

                    ९ तारखेला सकाळी लवकरच आम्ही पहलगाम मधलं स्थलदर्शन करायला निघालो. पहलगामला स्थलदर्शनासाठी आपल्या वाहनानं फिरायला परवानगी नाही. तिथल्या स्थानिक लोकांच्या वाहनांनीच फिरावं लागतं. त्यानुसार आम्ही गाडी ठरवली आणि स्थलदर्शन करायला निघालो. सर्वात आधी आम्ही पहलगाम पासून १६ किमी अंतरावर असलेलं एक ठिकाण बघायला गेलो. एका बाजूला घनदाट देवदार वृक्ष आणि दुसऱ्या बाजूला लिद्दर नदी असा हा सुंदर घाटरस्ता जुन्या पहलगाम शहरातून या ठिकाणी जातो. 'चंदनवारी' - पहलगाम मधलं हे अतिशय शांत, पवित्र आणि महत्त्वाचं स्थान. इथून अमरनाथ यात्रा सुरु होते. त्यामुळे इथं जुलै ऑगस्ट महिन्यात भाविकांची सतत प्रचंड गर्दी असते. इथूनच अमरनाथ यात्रेच्या पायऱ्या सुरु होतात. पायऱ्यांच्या बाजूने लिद्दर नदी यात्रेकरुंना साथ देते. या यात्रेव्यतिरिक्तच्या काळात हे अतिशय शांत स्थान. पहलगामला आधीच खूप थंडी होती. त्यात आम्ही इथं आल्यावर थंडीचा कडाका वाढला. गाडीतून उतरल्यावर लगेच त्याचं कारणही कळलं. चंदनवारीला आदल्या रात्रीच बर्फवृष्टी झाली होती. समोर डोंगरावर ताजं शुभ्र बर्फ दिसत होतं. अतिशय सुंदर दृश्य होतं. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा आमच्या व्यतिरिक्त इथं कुणीच नव्हतं. इथली दुकानही उघडली नव्हती . त्या शांत वातावरणात नदीच्या संथ जळाचा अनाहत नाद स्पष्ट ऐकू येत होता. शुभ्र जल छान चमकत होतं. माझं मन त्या शांततेशी एकरुप झालं आणि एक वेगळीच अनुभूती आली. तिथल्या पहिल्या पायरीला स्पर्श करुन 'श्री बाबा अमरनाथ' ना नमस्कार केला, काही पायऱ्या चढून गेलो. आणि मग तिथली शांतता अनुभवून परत निघालो.

                    चंदनवारी बघून आम्ही पोहोचलो एका अप्रतिम, नयनरम्य अशा खोऱ्यात. 'बेताब व्हॅली' - लिद्दर नदीपासून जवळपास ८,००० फूट उंचावरलं हे खोरं पहाणं म्हणजे एक अप्रतिम अनुभव. आम्ही इथं पोहोचलो आणि तिथं असलेल्या ढाब्यावर नाश्ता करण्यासाठी थांबलो. नाश्ता करुन फिरायला गेलो. घनदाट अशी जर्दाळू आणि देवदारची वृक्षराजी, मखमली हिरवळ आणि त्यातून जाणाऱ्या वळणवाटा अगदी नेत्रसुखद असं दृश्य. व्हॅलीमधून वाहणारी नदी दोन प्रवाहात विभागते आणि परत एकत्र होते. त्या मधलं बेट अतिशय नितळ आहे. इथं सर्वत्र घोड्यावरुन फिरता येतं. बेटातल्या पाण्यातूनही  घोडे आपल्याला फिरवतात. खूप मोठी अशी ही व्हॅली पहाण्याचा हा अनुभव छानच. थंडीच्या दिवसांत इथं भरपूर बर्फ पडतं. त्यावेळी या खोऱ्याचं सौंदर्य अजूनच वाढतं. इथला बर्फ अनुभवण्यासाठी, त्यात खेळण्यासाठी डिसेंबर जानेवारी हे महिने उत्तम आहेत. या व्हॉलीचं मूळ नांव 'हजन/ हगन व्हॅली' असं होतं. 'सनी देओल' आणि 'अमृता सिंग' यांच्या प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट 'बेताब' याचं चित्रिकरण इथं झालं आणि तो चित्रपट खूप गाजला म्हणून या व्हॅलीचं नाव ' बेताब व्हॅली ' करण्यात आलं. 

                      बेताब व्हॅली बघून आम्ही तिथून १८ किमी.वर असलेलं दुसरं एक प्रसिद्ध खोरं बघायला गेलो. 'अरु व्हॅली' - पहलगाम मधलं पर्यटकांना आकर्षित करणारं एक प्रसिद्ध खोरं. 'कोलाहोई ग्लेशियर' आणि 'तारसर तलाव' इथं चढाई करण्यासाठीचा अरु व्हॅली हा प्रारंभबिंदू आहे. हे संपूर्ण खोरं दाट हिरवळ, तलाव आणि पर्वतानी नटलंय. अतिशय सुंदर, शांत अशी ही व्हॅली वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्र आहे. इथं तपकिरी रंगाचे कोल्हे, काळ्या रंगाचे कोल्हे, हरणं, बिबट्या अशा प्राण्यांचं वास्तव्य आहे. इथंही खूप बर्फ पडतो आणि त्यानंतर इथं बर्फातले खेळ खेळण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. या व्हॅलीतून वाहणारी छोटी अरु नदी लिडर नदीला मिळते. या नदीचं नितळ निळं जल पहातच रहावं असं. अतिशय मंत्रमुग्ध करणारी ही व्हॅली, इथं कितीही वेळ थांबलं तरी समाधान होणं अशक्यच. पण आम्हाला वेळेचं बंधन असल्यानं अखेर तिथून निघावच लागलं. तिथून परत आम्ही आमच्या हाॅटेलजवळ आलो.  स्थलदर्शनासाठी ज्या गाडीने फिरलो ती गाडी सोडून परत आमच्या गाडीने परत प्रवास सुरु केला. आता आम्हाला 'कटरा' ला पोहोचायचं होतं. 

                          आमचा प्रवास परत एकदा घाटरस्त्याने, नदीकाठाने सारं निसर्ग सौंदर्य बघत सुरु झाला.  प्रवास सुरु केला आणि साधारण तासाभरात आम्ही एक apple valley नावाची बाग बघायला गेलो. सफरचंदाची खूप मोठी बाग होती इथं. सध्या सफरचंदांचा मोसम सुरु असल्यानं सगळी झाडं सफरचंदानी जणू ओथंबली होती. खूप सारी  रसरशीत मोठमोठी सफरचंद लगडलेली पाहून आपल्याकडच्या हापूस आंब्यानी लगडलेल्या झाडांची आठवण आली. इथं बागेत फिरुन, सफरचंदाचा रस पिऊन, सफरचंद खरेदी करुन निघालो. 

पहलगाम ते कटरा हा प्रवासही खरंतर अवघ्या ४-५ तासांचा होता. पण प्रत्यक्षात मात्र पोहोचायला दुप्पट वेळ लागला. यावेळीही प्रचंड वाहनकोंडीमध्ये आम्ही अडकलो होतो. पण या वाहनकोंडीचं कारण मात्र वेगळंच होतं. शेळ्या मेंढ्यांमुळे ठिकठिकाणी ही वाहनकोंडी होत होती. उन्हाळ्यात जम्मूच्या आसपासच्या गावातून या शेळ्या मेंढ्यांना घेऊन राखणदार काश्मीर मध्ये जातात. काश्मीर मध्ये तेव्हा त्यांना चरण्यासाठी हिरवा चारा विपुल प्रमाणात उपलब्ध होतो. जेव्हा काश्मीर मध्ये बर्फ पडायला सुरुवात होते तेव्हा ते राखणदार आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन परत आपापल्या गावी जातात. असे हे कळपच्या कळप परत निघाले होते आणि साहजिकच त्यामुळे वाहनकोंडी होत होती. एकेका कळपात ४००-५०० ते अगदी २-३ हजार इतक्या शेळ्या मेंढ्या होत्या. याचमुळे आम्हाला 'कटरा' ला पोहोचायला रात्रीचे १० वाजून गेले. उशीर झाल्यानं RFID CARD मिळणारे काऊंटर बंद झाले होते. त्यामुळे आम्हाला हाॅटेलच्या रुमवरच जावं लागलं. रुममध्ये पोहोचून जेवून आम्ही निद्राधीन झालो. 

                      १० तारखेला पहाटे सारी आन्हिकं आवरुन आम्ही RFID CARD घ्यायला गेलो. १०-१५ मीनीटांतच कार्ड मिळालं आणि आम्ही वैष्णोदेवीच्या पायथ्याशी जिथून चढाईला सुरुवात होते तिथे गेलो. खरंतर दर्शनासाठी रात्री चालत जाऊन चालत यायचं अशी आमची इच्छा होती. पण आदल्या दिवशी 'कटरा' ला पोहोचायला खूप उशीर झाला होता. त्यामुळं चालत जाऊन येणं शक्य नव्हतं. मग दर्शनाला जाताना कटरा ते भवन पर्यंत घोड्यावरुन जायचं आणि परत येताना पूर्ण चालत यायचं असं ठरवलं. त्यानुसार आम्ही तिघंही घोड्यावरुन निघालो. 'अर्धकुमारी माता' मंदिराच्या थोडं पुढे घोड्यांना विश्रांती आणि खायला देऊन पुढे निघालो. साधारण पावणेदोन तासातच आम्ही भवनच्या जवळ पोहोचलो. तिथून घोड्यावरुन उतरुन चालायला सुरुवात केली. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अतिशय नयनरम्य अशी खऱ्या फुलांची सजावट केली होती. आम्ही इथं पोहोचलो आणि डोळे भरुन अप्रतिम पुष्प सजावट पहात, कलेला आणि कलाकारांना मनोमन दाद देत पुढे निघालो. तिथल्या लाॅकरमध्ये सामान, शूज, मोबाईल सारं ठेवून दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो. दिड तासातच आम्ही प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेच्या समोर पोहोचलो. डोळे भरुन दर्शन घेत नतमस्तक झालो आणि मन शांत तृप्त झालं. अलोट गर्दीमुळं तिथं प्रत्येकाला क्षणभरातच बाजूला करतात. पण तो एक क्षणही प्रत्येक भक्तासाठी अतिशय भाग्याचा असतो. किती दुरुन, कष्ट सोसून भाविक दर्शनासाठी येतात पण मातेसमोर काही क्षणही उभं राहू देत नाहीत. पण तरीही असंख्य भाविक दर्शनासाठी येतातच. आणि मातेच्या त्या क्षणभराच्या  दर्शनानं सारे कष्ट विसरुन तृप्त होतात. अगदी तसंच आम्हीही प्रसन्न मनानं बाहेर आलो. 

                   वैष्णोदेवी मातेच्या दर्शनानंतर 'भैरोबाबाचं' दर्शन घेण्यासाठी निघालो. इथं घोड्यावरुन,चालत किंवा रोपवेनं जाता येतं. आम्ही रोपवेचं तिकीट आधीच काढलं असल्यानं लगेच तिथं रांगेत उभं राहिलो. तासाभरानं आम्हाला रोपवेनं जायला मिळालं. मंदिरात पोहोचून रांगेतून 'भैरवनाथाचं' दर्शन घेतलं आणि रोपवेनंच परत आलो. वैष्णोदेवी देवीच्या दर्शनमार्गावर ठिकठिकाणी खानपान व्यवस्था आहे. तिथल्याच एका Nescafe च्या स्टाॅलवर पोटपूजा केली. आणि मग परतीच्या मार्गाला लागलो. आरामात चालत, मधेमधे क्षणभर विश्रांती घेत आम्ही पायथ्याशी पोहोचलो. आणि तिथून लगेच हाॅटेलच्या रुमवर गेलो. दमलो होतो पण अगदी ऐनवेळी ठरवूनही केवळ मातेच्या कृपेनं अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं त्यामुळं खूप समाधान वाटलं. 

                        ११ तारखेला सकाळीच आम्ही हाॅटेल सोडून निघालो. सर्वात आधी आम्ही देवीच्या शक्तीपीठाचं दर्शन घ्यायला गेलो. जम्मू पासून साधारण ५० किमी. अंतरावर हे शक्तीपीठ आहे. आर्मीच्या अखत्यारीत असलेलं हे 'नाभा माता मंदिर'. अतिशय रमणीय शांत असं हे मंदिर. इथं सतीदेवीच्या कलेवराचा नाभीचा भाग पडला होता. त्यामुळं हे 'नाभा माता मंदिर' म्हणून ओळखलं जातं. छोट्या गुंफेत हे स्थान आहे. इथं मंदिरात बाराही महिने नैसर्गिक जलधारा पडत असतात. हे जल अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. त्यामुळे भाविक हे जल आवर्जून घरी नेतात. याचं गुंफेत भगवान शिवही विराजमान आहेत. गतवर्षीही आम्ही इथं दर्शनाला गेलो होतो. यावेळीही अतिशय सुंदर असं मातेचं दर्शन घडलं. दर्शन घेऊन बाहेर आलो तीर्थ प्रसाद घेतला आणि तिथल्या पंडितजीनी मला परत बोलवलं. कुणा भाविकानं मातेला अर्पण केलेला शृंगार मला आणि लेकीला प्रसाद म्हणून दिला. बांगड्या, कुंकू, काजळ, मेहंदी असा सारा शृंगार मला प्रसाद रुपात मिळाला आणि डोळ्यात पाणी आलंच. आमची सेवा मातेच्या चरणी रुजू झाल्याची जाणीव झाली आणि मन असीम तृप्त झालं. 

                यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात पोहोचलो. जम्मू पासून १४ किमी. अंतरावर असलेलं हे 'कौल कंडोली' माता मंदिर. भगवान श्री रामरायांच्या आज्ञेनुसार माता वैष्णोदेवी ५ वर्षीय कन्येचं रुप धारण करुन त्रिकुटा पर्वतावर निघाली. बराच प्रवास केल्यावर 'नगरोटा' या गावात या स्थानी माता विश्रांतीसाठी थांबली. तिला हे स्थान आवडलं आणि तिनं तिथंच १२ वर्षं तपस्या केली.  त्यानंतर ती त्रिकुटा पर्वतावर गेली. तेव्हापासून या मंदिरात मातेचं पहिलं दर्शन घेऊन मग त्रिकुट पर्वतावर जाऊन तिथलं दर्शन घेण्याची प्रथा आहे. इथे मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.

         ‌         इथून पुढे आम्ही नवीनच बांधलेल्या एका बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मंदिर प्रशस्त आणि सुंदर आहे. इथं व्यंकटेशाची भव्य मूर्ती स्थापित केली आहे. आजुबाजुला इतरही मंदिर आहेत. 

                   जम्मू मधलं एक प्रमुख मंदिर रघुनाथ मंदिर. इथं श्री रामरायाचं मुख्य मंदिर असून सभोवती अनेक मंदिरं असलेलं हे मंदिर संकुल आहे. इथं श्री रामरायाचं दर्शन घेतलं. तिथून निघून जम्मूचं मार्केट फिरुन खरेदी केली. आणि जम्मू विमानतळावर निघालो. सायंकाळच्या विमानानं परतीचा प्रवास केला. 

                 दर्शनाची तीव्र इच्छा असतानाही दर्शन होणार नाही अशी आपण आपल्या मनाची तयारी केली असेल तरीही जर आपली पूर्ण श्रद्धा असेल तर देवी माताही आपल्या भक्तांना दर्शन घडवतेच. आणि अशा अनपेक्षितपणे घडलेल्या दर्शनाचा आनंद काही वेगळाच असतो. आम्हाला आलेला हा दुसरा अनुभव. सारं काही श्री दत्तात्रेयांच्या इच्छेनं आणि कृपेनंच घडतं हेच खरं. अचानकच आपल्याला त्या स्थानी जायची बुध्दी होते आणि आपल्या दैवताचं सुंदर दर्शन घडतंच.

||  जय माता दी  ||

- स्नेहल मोडक

  


  

  

  

Tuesday, October 1, 2024

भटकंती

               २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. या दिवसाचं औचित्य साधून ऐनवेळी एक दिवसीय भ्रमंती करायचं ठरवलं. पण त्यादिवशी सुट्टी नसल्यानं दुसऱ्या दिवशी जायचं ठरवलं. 

            जवळच आहे कधीही जाता येईल या एकाच कारणामुळं जायचं राहिलेल्या ' जव्हार' ला सकाळी लवकरच निघालो. 

              प्रवासाला सुरुवात केल्यावर काही वेळ प्रवास व्यवस्थित झाला. आणि मग मात्र रस्त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. रस्त्याची इतकी दुर्दशा झाली होती की मोठमोठ्या खड्ड्यातून रस्ता अक्षरशः शोधावा लागत होता. साहजिकच त्यामुळे पुढं प्रचंड वाहनकोंडी झाली होती. या साऱ्यातून मार्ग काढत आमचा प्रवास सुरु होता. आम्ही केवळ फिरण्यासाठीच निघालो होतो आणि दोन्ही लेकीही एकत्र बरोबर होत्या त्यामुळं हे सगळं आम्ही सहजतेनं घेत होतो. 

                खराब रस्ते आणि वाहनकोंडीमुळं आम्हाला वाटेत कुठंच नाश्ता करायला मिळाला नाही. बरोबर नेलेल्या कोरड्या खाऊवरच समाधान मानावं लागलं. अखेर नेहमीच्या वेळेपेक्षा दुप्पट वेळाने आम्ही जव्हार ला पोहोचलो. आमच्या ओळखीच्या एका घरीच आधी आम्ही पोहोचलो. तिथंच आम्ही जेवणाची व्यवस्था केली होती. बरीच वर्षं त्यांचं तिथं मोठं पण घरगुती भोजनालयच होतं. आता नुकतंच त्यांनी हे प्रमाण कमी करुन अगदी थोड्या प्रमाणात सुरु ठेवलंय. आम्ही प्रवासात असताना त्यांच्या संपर्कात होतोच. त्यामुळं त्या काकू आमची वाटच पहात होत्या. 

              आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो, ताजतवानं झालो आणि  फार वेळ न दवडता त्यांनी आम्हाला जेवायलाच वाढलं. आम्हाला वाटेत नाश्ता मिळाला नसल्याचं त्याना कळलंच होतं. अतिशय सुग्रास आणि वाफाळतं भोजन समोर आलं आणि सकाळपासून धगधगत असलेल्या यज्ञकुंडात सुग्रास भोजनाची आहुती दिली आणि जठराग्नी तृप्त झाला. आम्हीच आधी सांगितल्याप्रमाणं त्यांनी साधाच पण अत्यंत चवदार आणि वाफाळता स्वयंपाक केला होता. आमचं जेवण झाल्यावर मग गप्पा सुरु झाल्या. घरगुती असलं तरीही त्यांचं भोजनालय अतिशय प्रसिद्ध आहे. बऱ्याच मोठमोठ्या व्यक्ती त्यांच्याकडे आवर्जून जेवायला येत असतात. थोडावेळ गप्पा मारुन कुठे कसं फिरावं याची माहिती घेऊन फिरायला निघालो.

                 सर्वात आधी आम्ही निघालो जव्हारचा अतिशय प्रसिद्ध असा धबधबा बघायला. इथे जाताना जव्हारचा खरा निसर्ग अनुभवायला मिळतो. रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत सुंदर अशी हिरवाई पसरलीय. ही हिरवाई पहातच आम्ही धबधब्याच्या जवळ पोहोचलो. दुरुनही धबधब्याचा आवाज ऐकू येत होता. आम्ही तिथं पोहोचलो आणि भान हरपून पहातच राहिलो. 

                  ' दाभोसा धबधबा ' जव्हारचं एक प्रमुख आकर्षण.  उंच उंच हिरव्यागार डोगरांमधून खळाळत वाहणारा लेंढी नदीचा जलप्रपात रोरावत दरीत कोसळतो आणि एक अनाहत ध्वनी निर्माण होतो. ३०० फुट उंचावरुन कोसळणारा हा शुभ्र फेसाळ प्रपात आणि त्याचे ५०-६० फुटांपर्यंत उंच उडणारे शुभ्र तुषार म्हणजे जणू नजरबंदीच. अप्रतिम असं हे दृश्य नजरेत आणि छायाचित्रात साठवत आम्ही थांबलो होतो. सगळ्या बाजूंनी दाट हिरवंगार जंगल आणि मध्ये कोसळणारा जलप्रपात, निसर्गाचा एक अप्रतिम आविष्कार कितीही पाहिलं तरी समाधान होत नव्हतं. पण पुढंही फिरायचं असल्यानं आम्ही तिथून निघालो.

                      धबधबा पहायला जाताना मार्गातलं एक स्थान पाहून ठेवलं होतं. धबधबा बघून परतताना तिथं थांबलो. अगदी ' मिनी स्वित्झर्लंड ' म्हणावं इतका नितांतसुंदर असा तो भाग होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर पोहोचेल तिथपर्यंत मखमली हिरवळ आणि त्यापुढे दाट हिरवीगार वृक्षसंपदा. आम्हाला त्या मऊ लुसलुशीत हिरवळीवर खरंतरं बसावंसं वाटत होतं पण पावसाची भुरभुर सुरु असल्यानं माती खूप ओली होती. आम्ही जिथं उभे होतो तिथून दूरवर त्या हिरव्या रानात चरणारी काही गायीगुरं आणि त्यांच्या बरोबर असलेले दोन गुराखी दिसत होते. फिक्या आणि गडद रंगछटा ल्यायलेलं हिरवं रान, दूरवर असलेली वृक्षराजी, त्या रानात चरणारी गुरं, गुराखी, आकाशात दाटलेले कृष्णमेघ, पावसाची हलकी भुरभूर आणि तरीही साऱ्या आसमंतात भरुन राहिलेली असीम शांतता. निसर्गाचं एक शांत पण तितकंच प्रसन्न रुप. अतिशय रमणीय असं निसर्गानंच रेखलेलं एक सुंदर चित्र. अगदी निसर्गाच्या कुशीत शिरण्याची तृप्त अनुभूती. तिथून परत निघायला पाऊलच उचलवत नव्हतं. 

                       तिथून पुढे निघून आम्ही एका धरणावर पोहोचलो. ' जय सागर ' धरण हे १९६१ साली बांधून पूर्ण झालं. जव्हार संस्थानचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे यांनी जव्हार मधील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण बांधायचं स्वप्न पाहिलं होतं. १९४८ साली जेव्हा हे संस्थान भारतीय संघराज्यात विलिन झालं त्यानंतर महाराष्ट्र शासनानं हे धरण बांधलं आणि १९६१ साली श्रीमंत राजे यशवंतराव मुकणे यांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन झालं. जव्हार ला लागूनच असलेल्या ' झरिपा ' नावाच्या अनेक जिवंत झरे असलेल्या जलाशयावर हे धरण बांधलंय. या धरणावर जायला व्यवस्थित पायऱ्या आहेत. खाली उतरुन पुढे धरणाच्या भिंतीवरुन पलिकडेही जाता येतं. धरणाची भिंत रुंद आणि कठडा असलेली आहे. भिंतीच्या एका बाजूला विस्तिर्ण जलाशय आणि दुसऱ्या बाजूला पायऱ्या आहेत. पाणी कमी असतांना त्या पायऱ्यांवर जाऊन धरणाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेता येतो. इथलं दृश्यही अप्रतिम आहे. विस्तिर्ण जलाशय, किनारी असलेली दाट हिरवी झाडी, नितळ जळात दिसणारं नभमेघांचं आणि वृक्षांचं प्रतिबिंब आणि जोडीला असणारी नीरव शांतता. हे ठिकाणही सुंदरच होतं. 

                   इथून पुढे आम्ही ' शिरपामाळ ' बघायला गेलो. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करण्यास गेले होते तेव्हा १६६४ साली त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन महाराज तेव्हाचे जव्हार संस्थानचे राजे विक्रमशहा यांना भेटावयास आले होते. तेव्हा या माळरानावर मोठा शामियाना उभारण्यात आला होता. तेव्हा राजे पहिले विक्रमादित्य यांनी शिवरायांना मानाचा शिरपेच देऊन यथोचित सन्मान केला होता. या घटनेची आठवण म्हणून इथं एक चौथरा बांधलाय. त्यावर एका उंच स्तंभावर भगवा झेंडा फडकतोय. आम्ही इथं गेलो तेव्हा एक मोठा ग्रुप तिथं आधीच आलेला होता. तिथल्या शांत पवित्र वातावरणात त्यांचा दंगा सुरु होता. काहीजणं तर तिथं खो-खो खेळत होते. मग आम्ही फारवेळ तिथं न थांबता पुढे निघालो. 

                   इथूनच पुढे आम्ही किल्ला बघायला गेलो. पण इथं मात्र निराशाच झाली. किल्ल्याच्या तटबंदी व्यतिरिक्त इथं बघण्यासारखं काहीच शिल्लक नाही. 

                    यानंतर खरंतर ' जय विलास राजवाडा ' बघायला जायचं होतं. पण आम्ही ज्यांच्या घरी जेवायला गेलो होतो त्यांनीच राजवाडा आज बघायला मिळणार नाही असं सांगितलं होतं. जेव्हा संस्थानच्या राजांचे सध्याचे वंशज राजवाड्यात येतात तेव्हा पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. ही खाजगी मालमत्ता असल्यानं ते तिथे असताना राजवाडा पहाता येत नाही. त्या राजवाड्यात काकूंच्या घरुनच जेवणाचा डबा जात असल्यानं त्यांनी आधीच आम्हाला कल्पना दिली होती. माझी थोडी निराशा झाली होती पण नाईलाज होता. 

                    एव्हाना सायंकाळ होत आल्यानं आम्ही इतरत्र कुठं न जाता परत फिरायचं ठरवलं. सकाळी येतानाच्या अनुभवावरुन परतीचा प्रवास दुसऱ्या मार्गानं करायचं ठरवलं. पण तिथंही अक्षरशः तशीच परिस्थिती होती. अत्यंत खराब रस्ता आणि वाहनकोंडीमुळं पून्हा घरी पोहोचायलाही दुप्पट वेळच लागला. 

                    जव्हार संस्थान इसवी सन १३१६ पासून १९४८ पर्यंत अस्तित्वात होतं. त्यानंतर ते मुंबई इलाख्यात विलिन झालं. आताच्या पालघर जिल्ह्यातला हा जव्हार तालुका. इथल्या बहुतांश भागात आदिवासी वस्ती आहे. तसंच या तालुक्याचा बराचसा भूभाग डोंगर आणि दऱ्याखोऱ्यांनी व्यापलाय. ठाणे शहरापासून १०० किमी. वर असलेलं जव्हार ठाणे जिल्ह्याचं  ' महाबळेश्वर ' म्हणूनही ओळखलं जातं. इथं प्रामुख्यानं नागली, भात आणि वरई ही पिकं घेतली जातात. पूरक म्हणून इतरही पिकं आणि फुलं, भाज्या पिकवतात. इथला मोगरा दररोज मुंबईच्या मंडईत पाठवला जातो.  इथल्या आदिवासींची वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे. जय विलास राजवाडा, दाभोसा धबधबा, हनुमान पाॅईंट, जय सागर धरण, शिरपामाळ, भूपतगड किल्ला, बाणगंगा महादेव मंदिर इत्यादी अनेक प्रेक्षणीय स्थळांनी नटलेला  नितातसुंदर जव्हार पहाण्यासारखाच आहे. इथला निसर्ग एकदा तरी अनुभवावा असाच आहे.

                       गणेश चतुर्थीला कोकणातल्या घरी जाणं आणि त्यानंतर लगेचच वर्षासहलीच्या निमित्तानं कणकवलीला सावडावच्या धबधब्यावर मनसोक्त भिजणं झालं होतं तरीही पुन्हा निसर्गात रममाण व्हायला आमची पावलं जव्हारकडे वळली होती. आणि पुन्हा एकदा निसर्गाकडून खूप सारी उर्जा आम्ही घेऊन आलो.

- स्नेहल मोडक




 




Monday, September 30, 2024

गुज

 होताच सांज उमटे पश्चिमेस केशरनक्षी

अन कोंदणी पाचूच्या उमले गुलबक्षी

पश्चिमरंग जणू सुमनांवरी ओघळतो

निकट तयांच्या मंद सुगंध दरवळतो

कलिकांसह गर्द गुलाबी पुष्प उमलले

मुग्ध कलिकेस तयाचे नवल भासले

      अलवार उमलणे फुलाचे कळी पाहते

      जणू आपुलेच प्रतिबिंब कळीस भासते

ओथंबून कलिका पुसते मग सुमनास

दिसेन ना मीही इतकीच सुंदर खास

      कुसुम कलिकेचे गुज काव्यात गुंफते

      अन क्षणातच मुग्ध कळी उमलू लागते

- स्नेहल मोडक

 

Monday, September 23, 2024

पाऊलवाट

 पसरली चोहीकडे गर्द मखमल हिरवीगार 

तयात लाल मातीची पाऊलवाट वळणदार 

       शांत नितळ सरितेशी ही वळणवाट थांबते

       अन पावलांस माझ्या अलवार जळ स्पर्शते

रानफुलांच्या नक्षीने हिरवी मखमल सजते

अन फिकट गडद रंगांनी पाचूसम चमचमते 

       गंधभरला आसमंतही नीरव शांत भासतो

       अनाहत नाद जळाचा हलकेच कानी येतो

अवचित पाखरू एक लडिवाळ किलबिलते

मोहक चित्र हे सृष्टीचे अचानक सजीव होते 

       ऋतू पावसाळी अन सुरेख मोहोरलेली सृष्टी 

       तांबडमाती अन हिरव्या तृणावर खिळते दृष्टी

कुंचला निसर्गाचा रेखतो चित्र सफाईदार 

तयात लाल मातीची पाऊलवाट वळणदार

- स्नेहल मोडक



Wednesday, August 28, 2024

सांज

उसळती शुभ्र फेसाळ निळ्या सागरलाटा

अवतरते सांज सुरेख गोजीरी सागरतटा

होतसे अधीर कनकगोल हा सागरभेटीस

रंगविभोर होई पश्चिमा रवी येता दिठीस

झेपावती विहग घरट्याकडे आपल्या

सांजरंगात साऱ्या सावल्या दाटल्या

सळसळते बन ते माडांचे होतसे शांत

गजबजला सागरकिनारा होई निवांत

अंधारल्या सागरतीरी मग एकले बसावे

अन गाजेसंगे भावलहरीत तल्लीन व्हावे

विध्द जाहल्या मनास हलकेच सावरावे

होऊनी कुंचला भावचित्र सुरेख रंगवावे

पुनवेच्या चांदव्याने मग नभी अवतरावे

अन अवकाशीचे ते चांदणे मनी उतरावे

- स्नेहल मोडक

Thursday, August 8, 2024

थेंब . . .

आताच बरसात आहे थांबली

पर्णे थेंबांच्या नक्षीने सजली

थेंब दोन टपोरे असती पारदर्शी

जणू आरसे बिलोरी भावस्पर्शी 

रुप सृष्टीचे साजीरे त्यात दिसते

पाहता प्रतिमा सुंदर मन मोहते

दोन पाचूच जणू सुरेख लगडती

गुंफताच शब्दात काव्यच होती

गुंफताच शब्दात काव्यच होती 

- स्नेहल मोडक


  


Monday, August 5, 2024

श्रावण

आला श्रावण श्रावण 

ऋतू हा मनभावन 

कधी रिमझिम बरसे

कधी उन्हाचे कवडसे

भूवरी पाचूचे शिंपण

नभी इंद्रधनुचे तोरण

पर्णात मौक्तिकमाला

गंध मातीचा ओला

व्रतवैकल्ये ही खास

झुले बांधती झाडास

कान्हा वाजवी पावा

राधेस धाडी सांगावा

ओलेत्या सांजवेळी 

भेट ती यमुनाजळी

ऋतू हा मनभावन 

आला श्रावण श्रावण 

- स्नेहल मोडक

Sunday, August 4, 2024

मैत्री ???

व्याख्या मैत्रीची पुस्तकातच वाचायची

अन स्वप्नातल्या दुनियेत अनुभवायची

     असतेच का मैत्री जिवापाड जपणारी

     आली वेळ तर जीवाला जीव देणारी

वापरा अन फेका चा जमाना आलाय 

अगदी मैत्रीतही हाच नियम झालाय

     नवं मैत्र जुळलंच कि जुनं विसरायचं

     अन नकोसं झालेलं मैत्र दूर सारायचं

बेत ठरवतानाही एखादं कुणी नसतं

त्याचं असणं नसणंही निरर्थक ठरतं

     मजा मस्ती सदा सारे मिळून करतात

     आपल्याच कुणाला सहज विसरतात

त्यानंच समजून घ्यावं नेहमी म्हणतात

आपली चूक मात्र सगळेच लपवतात 

     होते जाणीव मैत्रीतल्या परकेपणाची

     नसे किंमत कुणास मन दुखावल्याची

सवय होते मग हळूहळू एकटेपणाची

अन लागते आवड एकांती जगण्याची 

     व्याख्या मैत्रीची पुस्तकातच वाचायची

     अन स्वप्नातल्या दुनियेत अनुभवायची

- स्नेहल मोडक

Wednesday, July 24, 2024

गुरुपौर्णिमा

              आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा. महाभारत, पुराणं लिहिणाऱ्या महर्षी व्यासांनां नमन करण्याचा, पूजन करण्याचा हा मंगलदिन. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. हा ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या गुरुंचे पूजन करायचा, कृतज्ञता व्यक्त करायचा हा शुभ दिवस. दत्तभक्तांसाठी तर ही मोठी पर्वणीच. अनेकविध मार्गानं प्रत्येक भक्त ही गुरुपौर्णिमा साजरी करतात.  तसंच आम्हीही नेहमीप्रमाणं गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं होतं.

              नेमकं निघायच्या २-३ दिवस आधीपासूनच सर्वत्र अतोनात पाऊस बरसत होता. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी निघायचं होतं. पण निघायच्या दिवशी लोकल ट्रेन तरी सुरु असतील का अशी शंका होती. पण उशीराने का होईना ट्रेन सुरु होत्या. त्यामुळे सारे सायास करत, पावसात भिजतच आम्ही गंतव्य स्थानकावर पोहोचलो. जुनागढला जाणारी ट्रेन वेळेत सुटली आणि पहाटे नेहमीच्या वेळेत पोहोचली. रात्रभर सुरु असलेल्या पावसानं थोडी विश्रांती घेतली होती त्यामुळे आम्हाला तलेटीला रिक्षाने पोहोचायला काही अडचण आली नाही. 

              रुमवर पोहोचून सारी आन्हिकं आवरुन लगेच दर्शनासाठी निघालो. लंबे हनुमानजी आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे कडे निघालो. गुरुशिखर दाट धुक्यात हरवलं होतं. तरीही आम्ही जिथं राहिलो होतो तिथून रोपवे सुरु असलेला दिसत होता. पण तिथं पोहोचलो आणि प्रचंड गर्दी पाहिल्यावरच काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. चौकशी केल्यावर कळलं की ट्रायल सुरु होती पण गुरुशिखरावर प्रचंड वारा आणि विजा चमकत असल्यानं रोपवे बंद आहे. सकाळचे पावणेसात वाजले होते आणि १० वाजल्यानंतर जर वातावरण शांत झालं तर रोपवेची ट्रायल घेऊन मग सुरु करायचा की नाही ते ठरवू अशी माहिती मिळाली. मला रोपवे ने च दर्शनासाठी जायचं होतं आणि रोपवे सुरु होण्याचा संकेत माझं मन मला देत होतं. त्यामुळे मी पायऱ्या चढून जायला तयार नव्हते. आम्ही तिथून परत फिरलो. मी रुमवर थांबते तुम्ही तिघं चढून जा असं मी सांगितलं पण मी चालत जायला अजिबात तयार नाही म्हणून माझ्या सहचरानं पण चालत जायचं रद्द केलं आणि आम्ही दोघंही रुमवर परत आलो. आमचे दोन्ही सहमित्र चालत निघाले. आम्ही रुममध्ये आराम करत असतानाच पाऊण तासातच रोपवे सुरु झाल्याचा फोन मित्रांनी केला. आम्ही लगेच निघून रोपवे जवळ आलो तर परत प्रचंड गर्दी होती. अखेर ९ वाजता आम्ही रोपवे ने वरती अंबाजी मंदिराजवळ पोहोचलो.

              रोपवे थोडा हळूहळूच सुरु होता. थोडं वर गेल्यावर आमची ट्राॅलीही गुरुशिखरावरच्या धुक्यात शिरली. आजूबाजूला फक्त शुभ्र दाट धुकं आणि ट्राॅलीत आम्हा दोघांसह अजून एकजण असे तिघंच होतो. त्या धुक्यातूनच ट्रॉली हळूहळू वर पोहोचली. उतरुन आम्ही वर अंबामाता मंदिराजवळ आलो. धुक्यामुळं १०-१२ फुटांपलिकडं काही दिसत नव्हतं. अप्रतिम नजारा होता. साऱ्या गिरनारनं  धुक्याची दाट दुलई लपेटली होती. जोराचा वारा सुटला होता. सारं दृश्य नयनात साठवतच जरासं पुढं गेलो आणि लक्षात आलं की दर्शनासाठी इथूनच रांग सुरु झालीय. सुरुवातीला रांग नीट पुढं सरकत होती. रांगेतूनच गोरक्षनाथ मंदिराच्या जरासं पुढे आलो आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. मग बाजूला थांबून रेनकोट घालून परत रांगेत उभं राहिलो. थोडं पुढे गेलो आणि रांग तिथेच थांबली. किमान पाऊण तास एकाच जागी सगळे उभे होतो. अखेर हळूहळू रांगेतून पुढं सरकत साधारण अकरा वाजता आम्ही मुख्य मंदिरापर्यंत पोहोचलो.  पुढल्या काही क्षणातच डोळ्यातलं पाणी पापणीआड थांबवत मंदिरात प्रवेश केला. श्री दत्तात्रेयांचं दर्शन झालं आणि नतमस्तक होताना आसू ओघळलेच. बरोबर नेलेलं वस्त्र आणि रुद्राक्ष माला अर्पण केली आणि अत्यंत समाधानानं, आनंदानं मन भरुन आलं. श्री दत्तगुरुंना हवी असलेली वस्तू प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. याच कारणामुळं माझं मन तृप्त झालं होतं.

              गेल्या महिन्यात वटपौर्णिमेला जेव्हा आम्ही दोघंच गिरनारला गेलो होतो तेव्हाच मला श्री दत्तात्रेयांनी  एका गोष्टीची जाणीव करुन दिली होती. आम्ही वटपौर्णिमेला दर्शनासाठी गेलो तेव्हा आमची ट्रेन कधी नव्हे ती अडिच तास उशिरा जुनागढला पोहोचली होती. त्यामुळे रुमवर पोहोचून सारं आवरुन दर्शनासाठी निघायला साहजिकच उशिर झाला होता. आणि नेमकं तेव्हाही वाईट हवामानामुळे रोपवे बंद होता. दर्शनासाठी चालत  जाऊन येणं वेळेअभावी शक्य नव्हतं. कारण आमचं  त्याचदिवशीचं रात्रीचं राजकोटहून ट्रेनचं परतीचं तिकीट होतं. आणि त्यासाठी जुनागढहून सायंकाळी ५ वाजता सुटणाऱ्या बसचं राजकोटपर्यंतचं तिकीट होतं. 

               त्यामुळे मग आम्ही पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन ५०-६० पायऱ्या चढून गेलो. तिथूनच परत उतरुन खाली येत असताना एका भगव्या वस्त्रधारी वृध्द साधू बाबांनी आम्हाला थांबवलं. ते तिथंच असलेल्या एका दुकानासमोर तिथं विक्रीसाठी ठेवलेल्या रुद्राक्ष माळांमधली एक माळ हातात धरुन उभे होते. मी त्यांना काय झालं असं विचारताच ते मला ' ताईजी मुझे ये माला चाहिए ' एवढंच म्हणाले. कसं कुणास ठाऊक पण क्षणातच मला काही जाणवलं आणि मी त्यांना म्हटलं 'ठिक है, आपको जो माला चाहिए वो लिजिये' आणि त्या दुकानात असलेल्या आजीबाईना त्या माळेचे किती पैसे द्यायचे ते विचारलं. एवढ्या वेळात माझा सहचर मात्र जरा पुढे जाऊन बसला होता. त्याला ते बाबाजी काय म्हणतायत ते काही कळलंच नव्हतं. मी त्याच्याकडून पैसे घेऊन आजीबाईंना दिले. अगदी क्षणभरासाठी का होईना पण मनात विचार आलाच ही माळ घेऊन ते बाबाजी स्वतः घालणार की काय करणार पण  तत्क्षणीच दुसऱ्या मनानं फटकारलं 'आपलं काम माळ देणं एवढंच आहे '.तोपर्यंत त्या आजीनी ती माळ काढून त्या साधू बाबांना दिली. माळ हातात मिळताच बाबाजी अतिशय खुष झाले आणि अगदी लहान मुलासारखं निरागस हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमललं. मी त्यांना नमस्कार करताच क्षणातच ते तिथून निघून गेले. मीही आजींना नमस्कार करुन परत याच्याजवळ आले. त्यानं मला माळ कुठंय असं विचारलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की याला यातलं काहीच नीट कळलं नव्हतं. मग त्याला हे सगळं सांगतच आम्ही पायऱ्या उतरत खाली आलो. तिथून लगेचच नाश्ता करायला गेलो. पण नाश्ता करताना मला घडलेली घटनाच दिसत होती आणि डोळ्यातलं पाणी थांबवणं अशक्य झालं होतं. कारण  स्वयं श्री दत्तात्रेयच त्या रुपात येऊन दर्शन देऊन आणि त्यांना हवं ते घेऊन गेल्याच्या जाणिवेनं सारं तनमन सुक्ष्मपणे थरथरत होतं. हे असं का घडलं याचा विचार करत असताना अचानक लक्षात आलं आम्ही नेपाळ यात्रेहून येताना खूप रुद्राक्ष माळा आणल्या होत्या. पण त्यातली माळ श्री दत्तगुरु ना अर्पण करायचं सुचलं नव्हतं. अखेर या मार्गानं स्वयं दत्तगुरुंनीच ही आठवण करुन दिली होती. रोपवे बंद असल्यानं प्रत्यक्ष गुरुशिखरावर जाता येणार नाही म्हणून आम्हाला वाईट वाटत होतं पण या विशेष अशा दर्शनाने आमचं मन सुखावलं होतं.

                नाश्ता करुन रुमवर परत निघताना एका दुकानात थांबलो आणि अचानक तिथे एकजण आला आणि रोपवे ११ वाजल्यानंतर सुरु होणार असं कळल्याचं सांगून गेला. आम्ही लगेच रोपवे जवळ गेलो. तेव्हा ट्रायल सुरु आहे, थोड्याच वेळानं लोकांना सोडणार असं कळलं. मग तिथंच थांबलो. अखेर १२ वाजता रोपवेने वर जायला मिळालं. वारा खूप होता पण पाऊस नव्हता आणि त्यामुळे भराभर वर जाता आलं अर्थात गर्दीमुळे थोडा वेळ लागलाच. मंदिरात जाऊन नतमस्तक झाले आणि आधीच्या घटनेच्या आठवणीनं मन भरुन आलंच. अतिशय सुंदर दर्शन घडलं आणि आम्ही परत निघालो. वेळेअभावी अखंड धुनीचं दर्शन न घेता अंबाजी  मंदिराजवळ आलो. आणि अचानक मला सकाळचे साधूबाबा मंदिराजवळ अगदी क्षणभरच दिसले आणि त्यांनी ती रुद्राक्ष माला धारण केलेली दिसली. त्या क्षणीच सकाळी माझ्या मनात आलेल्या विचारांनी मलाच अपराधी वाटलं आणि मी मनोमन श्री दत्तगुरुंची क्षमा मागितली. तिथून आम्ही रोपवे जवळ आलो. गर्दीमुळे परत खाली पोहोचायला वेळ लागलाच. ४ वाजता रुमवर पोहोचलो लगेच आवरुन निघालो. जुनागढ हून राजकोटला जायला ज्या बसचं तिकीट काढलं होतं ती बस ही एक तास उशिरा आली. पुढच्या ट्रेनच्या वेळेआधी जेमतेम राजकोट स्टेशन वर पोहोचलो.

                 या गेल्या महिन्यातील खूपच वेगळ्या अनुभवामुळे या गुरुपौर्णिमेला गुरु शिखरावर जाऊन रुद्राक्ष माला श्री दत्तगुरुंना अर्पण करणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे रोपवे सुरु झाला आणि आम्हाला दर्शनाला जायला मिळून माळ अर्पण करता आली याचा आनंद खूपच मोठा होता. माझ्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट होती ती. दर्शन घेऊन आम्ही परत निघालो तेही रांगेतूनच. जशी रांग दर्शनासाठी होती तशीच परत जाण्यासाठीही होती. रांगेतूनच  पायऱ्या उतरुन नेहमीच्या जागी थांबून थोडं वाचन केलं आणि परत रांगेतून अखंड धुनीच्या दर्शनाला गेलो. तिथं दर्शन, प्रसाद घेऊन परतीच्या मार्गाला लागलो. कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुच होता. गोरक्षनाथ मंदिराजवळ पोहोचायच्या आधीच सन्नाटा वारा आणि तुफान पाऊस सुरु झाला. आता रोपवे सुरु होणं कठिण असल्याचं लक्षात आलं. त्या सन्नाटा वाऱ्यात कसाबसा तोल सावरत रोपवे जवळ गेलो. सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं. खूप लोकं रोपवे साठी थांबले होते. पण प्रत्यक्षात रोपवे कधी सुरु होईल काहीच सांगता येत नव्हतं. मला मनोमन रोपवे सुरु होईल असं वाटत होतं. पण दुपारचा दिड वाजला होता. रोपवे सुरु होण्याची वाट पाहून जर सुरु झालाच नाही तर उशिरा पायऱ्या उतरायला लागल्या असत्या. या कारणांमुळं अखेर मला थांबायचं असूनही नाईलाजानं चालायला सुरुवात करायचं ठरवलं. मग मात्र तिथली काठी आधारासाठी घेतली कारण एवढ्या तुफान वाऱ्या पावसात तोल सावरत उतरणं अवघड होतं. काठीच्या आधारानं भराभर जाता येणार होतं. काठी घेऊन निघालो पण वारा पाऊस उरात धडकी भरवणाराच होता. मी परत इथंच थांबूया म्हणत होते. पण 'पावसामुळं पायऱ्यांवरुन वाहणारं पाणी वाढेल आणि पूर्वीसारखी परिस्थिती होईल' असं सांगत यानं मला निघायलाच लावलं. 

                २०२२ सालच्या गुरुपौर्णिमेलाही रोपवे बंदच होता आणि सकाळी ७ वाजल्यापासूनच तुफान वारा पाऊस होता. पायऱ्यांवरुन खूप पाणी वाहत होतं आणि त्या परिस्थितीत आम्ही ४-५ जणंच गुरु शिखरावर दर्शन घेऊन आलो होतो. आमच्या व्यतिरिक्त कुणी दर्शनाला तर गेलं नव्हतंच पण सारी दुकानं बंद होती. एकही डोलीवाला नव्हता. या साऱ्या आठवणीने आम्ही अखेर चालायला सुरुवात केली. बघता बघता पायऱ्यांवरुन शुभ्र पाणी खळाळत व्हायला लागलं. मग त्या पाण्यातून, वाऱ्या पावसातून आमची अक्षरशः कसरत सुरु झाली. गर्दीही खूपच होती. यावर्षी गुरुपौर्णिमेला भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. रोपवे सुरु नसल्यानं बहुतेक सर्वजणं चालतच परत निघाले होते. पायऱ्यांवरुन धो धो वाहणारं पाणी वाढतच होतं. दर्शनाला जाण्यापूर्वीच रेनकोट असूनही चिंब भिजलोच होतो. आणि अजूनही पाऊसवारा कमी होण्याचं चिन्ह नव्हतं. काही क्षणांपेक्षा जास्त वेळ कुठंही न थांबता आम्ही पायऱ्या उतरत होतो. आमच्या बरोबरच शुभ्र पाणीही पायऱ्यांवरुन खळाळत वाहत होतं. मध्येच कुठेतरी पाण्यात माती मिसळून गढुळ पाणीही वाहत होतं. बाजूच्या उंच कडे कपारीतून फेसाळ चमचमते शुभ्र धबधबेही भाविकांची मनं उल्हसित करत कोसळत होते. खरंतर अप्रतिम असं वातावरण होतं. पण अंधार पडण्यापूर्वी पायथ्याशी पोहोचायचं असल्यानं आम्ही कुठंही थांबलो नाही. अखेर जेमतेम तीन तासांच्या आतच आम्ही पायथ्याशी पोहोचलो आणि निःश्वास सोडला.

                श्री दत्तात्रेयांनी माझ्या त्यांच्यावरील श्रध्देला किंचितही धक्का लागू न देता परत एकदा अवघड परिक्षा घेतली आणि यशही दिलं. वेळोवेळी ते आपल्याला वेगवेगळ्या मार्गानं संकेत देत असतात. मात्र आपल्याला ते ओळखता येणंही महत्वाचं असतं. ते नेहमीच आपल्या प्रत्येक भक्तांची इच्छा अतिशय सुंदर रितीने पूर्ण करतात. मनापासून साद घालताच कुठल्या ना कुठल्या रुपात अवतरतात. अर्थात म्हणूनच त्यांना 'स्मर्तृगामी' म्हणूनच ओळखतात.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

- स्नेहल मोडक

Saturday, July 6, 2024

आषाढघन

दिस आषाढाचा पहिला 

दाह वैशाखाचा सरला

     जलद घन नभी दाटती

     केकारव ते वनी घुमती

नभी खेळ विद्युल्लतेचा

साज जणू मेघमल्हाराचा

     आषाढघन चिंब बरसती

     अन तृषार्त सारे तृप्त होती

भूवरी इवली तळी साचती

कागदी नावा त्यात डोलती

     सुंदर पाचूची शेते बहरती

     सृष्टीवरी मखमल पांघरती

दिन विशेष हा आषाढाचा

कालिदासांच्या मेघदूताचा

     आषाढमेघ ते दूत बनती

     विरहवेदनेचा निरोप देती

आषाढात धुंद आसमंत 

मनोमनी प्रीतीचा वसंत 

     पाऊसओल्या मातीवरती

     प्रीतीसंगे हिरवे अंकुर येती

दिस आषाढाचा पहिला 

दाह वैशाखाचा सरला

- स्नेहल मोडक

Tuesday, July 2, 2024

ओटा

ओटा म्हणजे ओटा म्हणजे ओटा असतो

स्वयंपाकघराचा जणू तो श्वास असतो

     रात्रंदिन ओट्यावरती अन्नपूर्णा नांदते

     माझिया हातूनी जणू तीच सारे रांधते

कधी ओटा होतो माझा कागदी फलक

जलबिंदूंच्याच नक्षीची उमटते झलक

     कधी ओटा माझे चिमुकले अंगण होतो

     रेखल्या रंगावलीच्या रंगांनी सुरेख रंगतो

कधी ओटा माझा जणू छान तबक होतो

फळाफुलांच्या कोरीव रचनांनी सजतो

     कधी ओटा होतो सागरतीरीची पुळण

     शंखशिंपल्यांची त्यावर करते मी शिंपण

ओटा जणू माझी अमूर्त सखीच असते

गुज मम मनीचे त्यास सहजच कळते

     ओटा म्हणजे ओटा म्हणजे ओटा असतो

     स्वयंपाकघराचा जणू तो श्वास असतो

- स्नेहल मोडक

Thursday, June 20, 2024

फुलपाखरु

        ' फुलपाखरु ' असा शब्द जरी कधी ऐकू आला तरी तत्क्षणीच नाजूक, देखणी फुलपाखरं आपल्या मन:चक्षुंसमोर‌ भिरभिरायला लागतात. खरंच अतिशय नाजूक, रंगबिरंगी, अप्रतिम देखणं असं अनेकविध फुलांवर भिरभिरणारं फुलपाखरु म्हणजे निसर्गाचा एक सुंदर आविष्कारच. 

         खूप वर्षांपूर्वी मी फुलपाखरांवरचा एक लेख वाचून लगेच प्रयोग करायला सुरुवात केली. घरातल्या वापरलेल्या लिंबांच्या बिया मातीभरल्या कुंडीत रुजत घातल्या. त्याच दरम्यान प्रवासात एका धाब्यावर चहा नाश्ता करायला थांबलो असताना तिथं पानफुटीची मोठी रोपं दिसली. त्यातली दोन पानं त्यांच्याकडून आणली आणि तीही कुंडीत रुजत घातली. यथावकाश लिंबू आणि पानफुटीची रोपं छान तरारुन आली. रोपं थोडीशी मोठी झाली आणि मग आम्ही आतुरतेनं फुलपाखरांची वाट बघू लागलो. सोसायटीमध्ये भरपूर फुलझाडं आणि इतर हिरवाई असल्यानं खूप फुलपाखरं भिरभिरत असायचीच. ही फुलपाखरं लिंबू आणि पानफुटीच्या झाडांकडे कशी आणि कधी आकर्षित होतात हे पहाणं सुरु झालं. एरवी आमच्या बाल्कनीतल्या अधुनमधून फुलणाऱ्या फुलांवर फुलपाखरं यायचीच. त्यामुळे या झाडांवरही ती नक्की येतील याची खात्री होती. 

               बाल्कनीच्या ग्रीलला लावलेल्या जाळीतून लिंबांच्या झाडांच्या काही फांद्या बाहेर गेल्या होत्या. त्या फांद्यांवर एक दिवस अचानक लेकीला काही छोट्या अळ्या दिसल्या. आधी आम्हाला लिंबाला किड लागली असंच वाटलं. एका अर्थी खरंही होतं ते. पण मग नीट पाहिलं आणि आंतरजालावर थोडं शोधल्यावर आम्ही ज्याची आतुरतेनं वाट पहात होतो त्याच या फुलपाखरांच्या अळ्या असल्याचं कळलं आणि आम्हाला खूपच आनंद झाला. त्या दिवसापासून आमचं काळजीपूर्वक निरीक्षण करणं सुरु झालं. 

                 त्या अगदी इवल्याशा अळ्या हळूहळू मोठ्या झाल्या. लिंबाची पानं हेच त्यांचं अन्न होतं. ८-१० दिवसांत त्या मोठ्या झालेल्या अळ्यांचं अचानक हिरव्या रंगात रुपांतर झालं. या अळ्या अन्नासाठी लिंबाच्या झाडावर सगळीकडे फिरत होत्या. पण नंतर त्यातल्या काही अळ्या दिसेनाश्याच झाल्या. मात्र २-३ अळ्यांनी साधारण १०-१२ दिवसांनी स्वतः भोवती कोष विणायला सुरुवात केली. दिवसभरातच त्या अळ्यांचं रुपांतर फांदीला लटकलेल्या कोषात झालं. पुढच्या ८-१० दिवसांनी त्या कोषांचा रंग बदलला. आणि त्यातून अत्यंत नाजूक सुंदर अशी फुलपाखरं कोषातून बाहेर आली. मात्र ती कधी आणि कशी बाहेर आली हे आम्हाला कळलंच नाही. फक्त ती फुलपाखरंच पहायला मिळाली. तसंच बाकीच्या अळ्या कुठे गेल्या तेही कळलं नाही.

               लिंबाच्या झाडांवर जेव्हा आम्हाला फुलपाखरांच्या अळ्या दिसल्या तेव्हाच  पानफुटीच्या झाडांवरही असाच काहीसा वेगळा प्रकार दिसला. पानफुटीच्या पानांचा काही भाग पारदर्शी झाला होता. आणि त्यात अळीसदृश्य काही तरी काळं दिसत होतं. 

काही दिवसांनी त्यातून अगदी गव्हाच्या दाण्याएवढ्या पांढऱ्या अळ्या बाहेर आल्या. त्यांनी झाडावर फांद्यांवर, पानांवर कोष केले जे सहजासहजी दिसत नव्हते. पण आम्ही त्या कोषांचं निरिक्षण करत होतो. याही कोषांचे रंग आठवडाभरात बदलले. पांढरे कोष पूर्ण काळे झाले आणि त्यातूनही इवलीशी फुलपाखरं बाहेर आली. अर्थातच ती फुलपाखरं कोषातून बाहेर येताना आम्हाला बघायला मिळालीच नाहीत. पण ती तिथे आजूबाजूला बराचवेळ उडत असल्यानं कोषातून नुकतीच बाहेर आल्याचं कळलं. मग मात्र आम्ही फुलपाखरांची अधिक सविस्तर माहिती मिळवली. आणि पुन्हा नव्याने निरिक्षण सुरु केलं. 

           काही दिवसांनी पुन्हा जेव्हा लिंबाच्या आणि पानफुटीच्या झाडांवर फुलपाखरं भिरभिरताना दिसली तेव्हा मी थोड्या वेळानं लगेच त्याठिकाणी पाहिलं आणि मला अतिशय आनंद झाला. कारण मला ती फुलपाखरं जिथं जिथं बसून गेली होती तिथं तिथं अगदी इवलीशी मोहरीच्या दाण्याएवढी पांढरी अंडी पानांवर‌ चिकटलेली दिसली. यावेळी मात्र मी फारच बारकाईने बघत होते. त्यामुळे त्या अंड्यांमधून इवल्या अळ्या बाहेर पडल्यापासून त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते. जशा त्या अळ्या मोठ्या होऊन हिरव्या रंगाच्या झाल्या तशा त्यांना प्लास्टिकच्या पारदर्शक डब्यात ठेवल्या. कारण आधी ज्या हिरव्या अळ्या गायब झाल्या होत्या त्यांचं कारण कळलं होतं. बाल्कनीतल्या झाडांवर नित्यनेमाने येणारे माझे सखे सोबती चिमण्या, शिंपी,बुलबुल यांच्या भक्ष्यस्थानी त्या अळ्या पडल्या होत्या. हे सगळे पक्षी मी रोज घालत असलेले दाणे खायला आणि तुळशीच्या मंजिऱ्यामंधल्या बिया खायला नेहमीच येतात. याचवेळी त्यांच्या दृष्टीस फुलपाखरांच्या अळ्या पडतात आणि ते लगेच गट्टम् करतात. म्हणून यावेळी त्या अळ्यांना वाचवण्यासाठी डब्यात ठेवणं आवश्यक होतं. त्यामुळे त्या अळ्यांना डब्यात ठेवलं आणि मग सुरु झालं त्यांची काळजी घेणं. सतत त्यांना त्यांचं अन्न असलेली लिंबाची पानं घालणं. जसं त्या अळ्या कोषात गेल्या तसं पानं घालणं बंद केलं. आणि कोषांवर लक्ष ठेवलं. साधारण १०-१२ दिवसांनी कोषांचा रंग बदलला आणि आता त्यातून फुलपाखरु बाहेर येणार हे आमच्या लक्षात आलं. झालं, मी आणि लेक त्या डब्यासमोर ठाण मांडून बसलो. काही तासांची आमची प्रतिक्षा फळाला आली आणि आम्हाला फुलपाखरु कोषातून बाहेर येताना प्रत्यक्ष पहायला आणि त्याचं चित्रण करायला मिळालं. ते इवलंसं रंगबिरंगी फुलपाखरु बघून आम्हाला अत्यानंद झाला होता, जणू आपल्या घरी बाळाचा जन्म झाला असंच वाटत होतं. कारण फुलपाखराचा तो जन्मसोहळा आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला होता. फुलपाखरु बाहेर आलं आणि हळूहळू इकडे तिकडे फिरु लागलं. काही क्षणांनी मी माझं बोट अलगद त्याच्यासमोर नेलं आणि तत्क्षणीच ते अलवारपणे माझ्या बोटावर आलं. त्याला बोटावर घेतलं आणि मन सुखावलं, याचसाठी केला होता अट्टाहास हे जाणवलं. आपल्याला फुलपाखरं पहायला आवडतात पण मला ते हातावर घेण्याची खूप इच्छा होती. यावेळी ती पहिल्यांदा पूर्ण झाली होती. फुलपाखरु कोषातून बाहेर आल्यावर लगेच उडू शकत नाही. त्याचे इवले पंख पूर्ण वाळेपर्यंत ते कोषाच्या आजुबाजूलाच बसून रहातं. त्यामुळे आपण त्यावेळी त्याला सहज बोटावर घेऊ शकतो. असंच पानफुटीवरचे कोषही डब्यात ठेवून त्याचंही निरिक्षण करुन ते फुलपाखरुही कोषातून बाहेर येताना पाहिलं आणि चित्रणही केलं. यानंतर अशी अनेक फुलपाखरं कोषातून बाहेर येताना पहायचं आणि त्यांना अलगद बोटावर घ्यायचं भाग्य आम्हाला मिळतय. 

        आपल्या सर्वांनाच माहितेय फुलपाखरांचं आयुष्य जेमतेम १४ दिवसांचं असतं. त्या १४ दिवसांत त्याची पूर्ण वाढ होऊन मादी फुलपाखरं अंडी घालतात. २-३ दिवस ही अंडी घालण्याची प्रक्रिया सुरु असते. आणि त्यांनतर बहुधा लगेचच त्यांचं आयुष्य संपतं. पण अंडी, अळी, कोष आणि त्यातून येणारं फुलपाखरु हा सारा प्रवासही खूप कठीण असतो. दिडदोन इंच लांबीची अळी जेव्हा कोषात जाते तेव्हा तो कोष लहानच असतो आणि प्रत्यक्ष जेव्हा त्यातून फुलपाखरु बाहेर येतं ते कोषापेक्षा मोठं असतं. म्हणजे कोषात त्या अळीचं रुपांतर फुलपाखरात होणं किती कष्टमय असेल याची कल्पना येते. 

             फुलपाखरं परागीकरणात अतिशय महत्त्वाची भुमिका बजावतात. फुलांमधला मधुरस ग्रहण करताना परागकण त्यांच्या पायांना चिकटतात आणि ते दुसऱ्या वनस्पतींवर बसल्यावर होणारं क्राॅस परागीकरण वनस्पतींना पुनरुत्पादन करण्यासं मदत करतं. तसंच ही फुलपाखरं पक्षी, वटवाघूळ, कोळी आणि इतर किटकांचा अन्नस्त्रोत आहेत. फुलपाखरांच्या अळ्या  पक्षी, वटवाघळं खातात. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  फुलपाखरांचा सुचक प्रजाती म्हणून वापर केला जातो. म्हणजे शास्त्रज्ञ फुलपाखरांच्या संख्येचा अभ्यास करुन परिसंस्थेचं आरोग्य मोजतात. फुलपाखरं पर्यावरण बदलांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या संख्येत होणारी घट प्रदूषण, हवामान बदल किंवा जैवविविधता नष्ट होण्याचे संकेत असतात. याचमुळे फुलपाखरांचं संवर्धन करणं हे गरजेचंच आहे. 

             वेगवेगळ्या जातींची फुलपाखरं वेगवेगळ्या झाडांवर अंडी घालतात. लिंबाच्या झाडावर Papilio Polytes जातीची फुलपाखरं अंडी घालतात. तर पानफुटीच्या झाडांवर Red Pariot या जातीची फुलपाखरं अंडी घालतात. अंड्यांमधून बाहेर पडलेल्या अळ्या याच झाडांची पानं खाऊन जगतात. अर्थातच त्यामुळे त्या झाडांची वाढही खूप जोमानं होत नाही. पण आम्ही केवळ फुलपाखरांसाठीच ही झाडं लावली आहेत. त्यामुळे आजपर्यंत Red Pariot जातीची असंख्य फुलपाखरं आमच्या पानफुटीच्या झाडांवर जन्माला आलीत. आणि Papilio Polytes या जातीतलीच पण विविध प्रकारची, रंगाची अनेक फुलपाखरं जन्माला आली आहेत. जेव्हा जेव्हा फुलपाखरं अंडी घालतात तेव्हा तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेतो. चिमण्या पाखरापासून त्यांना वाचवतो जर नेमकं त्या काळात आम्ही बाहेरगावी जाणार असू तर झाडांवर बारीक प्लास्टिकची जाळी घालतो जेणेकरुन अळ्या सुरक्षित रहातात. 

        आसमंतात, बागेत भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरं आपल्या बाल्कनीतल्या झाडांवर यावीत, त्यांना अतिशय जवळून पहायला मिळावं, त्यांचा अंडी, अळी, कोष, फुलपाखरु हा सारा जीवनप्रवास जवळून पहाता यावा ही माझी इच्छा कुंडीत लावलेल्या लिंबू आणि पानफुटीच्या झाडांमुळे सहज पूर्ण होतेय ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. निसर्ग जपत, फुलपाखरु संवर्धनाची (खारीचा वाटा) महत्वाची गोष्ट आमच्या हातून घडतेय आणि त्याबरोबरच त्यांचा जीवनप्रवास बघत, नुकत्याच जन्मलेल्या फुलपाखरांना अलवार हातावर घेण्याचही सुख मिळतय. 

          मात्र गेली दोन वर्षं का कुणास ठाऊक पण आम्ही या आनंदाला पारखे झालो होतो. पण आता पुन्हा हा आनंद आम्हाला मिळायला लागलाय. नुकत्याच एका सुंदर नाजूक Papilio Polyte जातीच्या फुलपाखराचा जन्म झालाय. आता पुन्हा हे सोहळे आम्हाला पहाता येतील याची खात्री पटलीय आणि त्यानिमित्तानंच मला व्यक्त व्हावसं वाटलंय. खरंतर फुलपाखरांचा हा प्रवास शब्दबद्ध करण्यापेक्षा प्रत्यक्ष पहाण्याचा अनुभव फारच वेगळा आणि सुंदर आहे हे नक्की.

           या फुलपाखरांबरोबरच दुर्मिळ असं Oak Leaf Butterfly  ही आम्हाला काही वर्षांपूर्वी आमच्या सोसायटीत आणि आता अगदी नुकतंच आमच्या घराच्या बाहेरच्या भिंतीवर पहायला आणि चित्रणही करायला मिळालं. त्यावेळचा आनंदही वेगळाच होता. ऋतू बदलण्याच्या काळात अनेक जातींची फुलपाखरं हजारो मैलांचं स्थलांतर करतात. इवलंसं फुलपाखरु एवढ्या मोठ्या अंतरापर्यंत उडत स्थलांतर करतं हे विशेष.

             इवलंसं अंडं ते फुलपाखरु हा अतिशय कष्टदायी प्रवास आणि त्यानंतर मिळाणारं अवघ्या १४ दिवसांचं आयुष्य पण या काळातही आपल्या अप्रतिम सौंदर्यानं सगळ्यांना मोहविणारं, आनंद देणारं फुलपाखरु म्हणजे निसर्गाच्या खजिन्यातला एक अलंकारच. 

- स्नेहल मोडक

















Friday, June 14, 2024

मृगधारा

बरसल्या मृगधारा 

चिंब भिजली धरा

    तरुवेलही तरारले

    विहग तृप्त झाले

परी वाटेना भिजावे

मृदगंधाने मोहरावे

    मन जाहले कोरडे

    मृग पापणीत दडे

अंगणात जलधारा 

मनात आठव सारा

    भूवरी साचते तळे

    मनी उठती वादळे

मृगवर्षाव जरी झाला

मनात शिशीर दाटला

मनात शिशीर दाटला

- स्नेहल मोडक

कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...