Pages

Tuesday, March 29, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग ५

                   दहाव्या दिवशी सायंकाळी आम्ही जबलपूरला पोहोचलो. नर्मदा तटावर वसलेल्या जबलपूरला संस्कारधानी असंही म्हणतात. जबलपूरचं पूर्वीचं नांव जाबालीपुरम होत. महर्षी जाबाली यांच्यावरुन हे नांव मिळालं होतं. इथला नर्मदातटावरचा गौरीघाट ( ग्वारीघाट) खूप सुंदर आणि प्रसिद्ध आहे. याच घाटावर मैयाची नित्यनेमाने सायंआरती केली जाते. आम्हीही खास त्या आरतीसाठी थांबलो होतो. 

                 सायंकाळी ६ वाजताच आम्ही घाटावर गेलो होतो. घाटावर अतिशय उत्साहाचं , पावित्र्याचं वातावरण होतं. जसजशी सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती तसतसा घाट अजूनच सुंदर दिसत होता. सूर्यास्त झाला तरी जरावेळ मंद उजेड असतो पण ते काही क्षण आपल्या मनाची अवस्था फारच तरल असते. इथे तर आमच्या नजरेसमोर मैया होती पण अंधारल्यावर मात्र ती वेगळीच भासू लागली. नेहमीचं तिचं दर्शन मन प्रसन्न करणारं पण आता मात्र ती मला थोडी गूढ गंभीर आणि जरा भीतीदायक वाटू लागली होती. 

                 मनात विचारांची आवर्तनं सुरु असतानाच पूजा आरतीची वेळ झाली. या घाटावर अतिशय सुंदर अशी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा आरती केली जाते. मंत्रोच्चारात पूजा सुरु झाली आणि माझं मन त्यात गुंतलं. पूजा संपून छान तालासुरात आरती सुरु झाली. मी थोडंसं छायाचित्रण करत होते खरी पण आरती सुरु झाल्यावर मात्र माझी नजर फक्त मैयाकडेच होती. 

                 आणि अचानक आरतीच्या घंटानादात शुभ्रवसनधारी मैया जळातून सगुण साकार झालीय असं मला दिसलं. ते काही क्षण मी अक्षरशः भान हरपून तिच्याकडे पहात होते. अचानक आरतीचा आवाज वाढला आणि मी भानावर आले. माझं मलाच कळत नव्हतं जे दिसलं तो निव्वळ भास होता की खरचं मैयानं दर्शन दिलं होतं. कदाचित पूजेआधी माझ्या मनात आलेली भीती किती अवास्तव आहे हे सांगून मला आश्वस्त करण्यासाठीही मला हा भास किंवा दर्शन घडलं असू शकतं. काहीही असलं तर आता हे लिहितानाही माझ्या नजरेसमोर ते सारं जसच्या तसं तरळतय.

                आरती संपल्यावर आम्ही तिथे पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या नर्मदा मैयाच्या रेखीव मूर्ती स्वरुपाचंही दर्शन घेतलं. प्रसाद घेतला आणि पूजा आरतीचं सारं दृश्य डोळ्यात आणि मनात साठवून मुक्कामाच्या ठिकाणी परत गेलो.

                अकराव्या दिवशी आम्ही दिंडोरी गांवात पोहोचलो. दिडोरी हे मध्य प्रदेशच्या पूर्वभागातील आणि छत्तीसगडच्या सीमेवरचं गांव. मैकल पर्वतश्रेणीतील नर्मदा किनारी वसलेलं हे ऐतिहासिक गांव.

                इथे नित्याप्रमाणे नर्मदा स्नान करुन मैयासमोर असलेल्या आश्रमात मैयाची पूजा आरती करायची होती. आम्ही घाटाच्या पायऱ्या चढून वर गेलो तर तिथे एकजण ४-५ मोठ्या पपया विकायला घेऊन बसला होता. मला एकदम पपई  खायची तीव्र इच्छा झाली. पण पूजेची वेळ झाली होती म्हणून तशीच पुढे गेले. आम्ही ३-४ जणींनी आश्रमात आधी प्रवेश केला. तर तिथे एक वयोवृद्ध बाबाजी आराम करत होते. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला बाबाजी आणि स्त्रीला माताजी या नावांनं पुकारलं जातं. बाबाजींना बघून आम्ही थबकलो पण ते लगेच म्हणाले 'आइये माताजी आप बैठिये' असं म्हणून ते उठून बाहेर गेले. तोपर्यंत सगळेच आश्रमात आले. आम्ही पूजेसाठी आसन लावलं. कुणीतरी त्या बाबाजींना आत बोलावलं. पूजेची तयारी बघून ते आणि त्यांच्याबरोबर असलेले एकजण असे दोघंही आत येऊन बसले.

                आमची पूजा झाली, आरती सुरु झाल्यावर ते स्वताचं आरतीचं साहित्य घेऊन आमच्यात सामिल झाले. माझ्यापुढे जरी काहीजणं असली तरी मला ते बाबाजी समोर स्पष्ट दिसत होते. निरांजनाच्या उजेडात त्यांचा शांत गंभीर चेहरा वेगळाच भासत होता मला. काही कारण नसताना नकळत डोळ्यात पाणी तरळलं माझ्या. आरती संपली , आणि आम्ही तिथेच भोजनासाठी थांबलो.

                  आमचं भोजन तयार होत होतं तोपर्यंत त्या दोन्ही बाबाजींबरोबर थोडं बोललो तेव्हा कळलं की ते पाचव्यांदा चालत परिक्रमा करतायत. आणि दुसरे बाबाजी दुसऱ्यांदा. क्षणात मनापासून हात जोडले गेले आमचे. आणि त्या बाबाजींबद्दल काही माहिती नसताना आरतीच्या वेळी माझ्या डोळ्यात पाणी का तरळलं ते चटकन लक्षात आलं. किती शांत तृप्त होते ते, माहिती सुद्धा दुसऱ्या बाबाजींनी दिली होती.

                   भोजन करुन निघालो, बसमधे बसलो आणि १० मिनिटांतच माझ्यासमोर मस्त केशरी रंगाची, नीट फोडी केलेली पपई आली. मी काही क्षण नुसती बघतच राहिले. आमच्यापैकीच एकानी ती विकत घेतली होती पण मला ते माहितही नव्हतं.  माझी पपई खायची इच्छा मात्र मी काहीही बोलले नसतानांही मैयाने सहज पूर्ण केली होती.

                    दिंडोरीहून भोजन करुन निघालो आणि अमरकंटक ला पोहोचलो. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील एक पवित्र स्थान अमरकंटक. हे विंध्य आणि सातपुडा यांना जोडणाऱ्या मैकल पर्वतराजीच्या पूर्वभागात आहे.अमरकंटक या तीर्थस्थानी नर्मदा आणि शोण या नद्यांचा उगम झाला आहे. नर्मदा ही भारतातील सर्वात प्राचीन नदी आहे. तिचा उगम पाच लाख वर्षांपूर्वी झाला असं संशोधकांचं मत आहे. नर्मदा नदी मैकल पर्वतात उगम पावते आणि पूढे काही कि.मी.वर असलेल्या उंच कड्यावरुन खाली येते.  इथे कपिलमुनींनी तपश्चर्या केली, आणि इथेच संख्याशास्त्राची रचना केली. म्हणूनच या धारेला कपिलधारा हे नांव मिळालं. इथे कपिलमुनींचा आश्रम आहे.

                कपिलधारा आणि त्यापुढे असलेल्या दुग्धधारा पाहण्यासाठी जंगलातून चालत जावं लागतं. आम्ही लहान वाहनाने थोडं अंतर आत जाऊन पुढे ४ किमी जंगलातील पायवेटेने चालत जाऊन कपिलधारा, दुग्धधारा बघितलं. अतिशय सुंदर धारा आहेत. 

              उंचावरुन शुभ्र फेसाळ पाण्याच्या मोठ्या धारा पडतात. त्यांनाच दुग्धधारा म्हणतात. आम्ही त्या पाण्यात उतरलो आणि त्या शीतल जलस्पर्शाने मस्त सुखावलो. पाण्यातून बाहेर यावसंच वाटत नव्हतं.

                पौराणिक कथेनूसार दुर्वास ऋषींनी या स्थानी तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन नर्मदेने त्यांना साक्षात दर्शन दिलं होतं. यावरुन नर्मदेच्या या जलधारांना दुर्वासधारा असं नावं मिळालं होतं. त्याचा अपभ्रंश होऊन पुढे ते नाऔव दुग्धधारा असं झालं. दुर्वास ऋषी दुधासारख्या शुभ्रधवल अशा नर्मदा जलाने शिवशंकराला अभिषेक करत असत. या दुग्धधारेजवळच दुर्वास ऋषींची गुंफा आहे, जिथे त्यांनी तपस्या केली होती. तसंच तिथं शिवलिंग आहे. आणि त्या शिवलिंगावर सातत्याने नैसर्गिकरित्या जलधारा पडत असते. पूर्ण वाकूनच या गुहेत जावं लागतं. अतिशय थंड पण थोडी अंधारी अशी ही गुहा आहे.

                त्या नंतर एक मोठं सुंदर जैन मंदिर पाहीलं. भगवान महावीरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ निर्माणाधीन असलेलं हे जैन मंदिर. भारतातील अष्टधातू मंदिरांपैकी एक मोठं मंदिर. भगवान आदिनाथांची  अष्टधातूंची २४ फूट उंचीची पद्मासनतील मूर्ती आहे. अजूनही या मंदिराचं काम सुरु आहे.

              यानंतर आम्ही गेलो नर्मदा मंदिरात. नर्मदेचा जिथे उगम झाला तिथे एक सुंदर दगडी मंदिर बांधलंय आणि भोवती दगडी तटबंदी आहे. आत गेल्यावर आजूबाजूला इतर बरीच मंदिरं आहेत. मधोमध दोन मंदिरं असून पुढे मोठं सरोवर आहे. एक मंदिर श्रीरामसीतेचं आणि दुसरं पार्वतीमातेचं आहे. समोर काळ्या पाषाणातील नर्मदेची अडिच तीन फूट उंचीची मूर्ती आहे. नर्मदादेवी हे देवीचं ३९ वं शक्तीपीठ आहे. त्याला चंद्रिकापीठ म्हणतात. 

               इथं नर्मदेचा प्रवाह भूमीगत आहे तो परिक्रमा करताना ओलांडून जायचं नसतं म्हणून या मंदिरात केवळ अर्ध्या भागातील मंदिरात जाऊन दर्शन घेता येत. हे सारं पाहून, दर्शन घेऊन आम्ही अमरकंटकलाच मुक्काम केला.




    

    



- स्नेहल मोडक

Monday, March 28, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग ४

                 आठव्या दिवशी दुपारी आम्ही उज्जैन ला पोहोचलो. मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचं शहर उज्जैन (उज्जयिनी). क्षिप्रा नदीतीरावर वसलेलं हे ऐतिहासिक शहर पूर्वी विक्रमादित्य राजाची राजधानी म्हणून ओळखलं जात होतं. तसंच महाकवी कालिदासांची ही नगरी. सम्राट विक्रमादित्य राजाच्या नवरत्नांपैक एक कालिदास. त्यांना उज्जयिनी नगरी अतिशय प्रिय होती. मेघदूतामध्ये कालिदासांनी उज्जैनचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. 

                 मंदिरांचं शहर म्हणूनही उज्जैन ओळखलं जातं. कारण इथे अनेक प्राचीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर मंदिरं आहेत. दर १२ वर्षांनी इथं सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यासाठी जगभरातून लोक येतात. इथलं सर्वात महत्त्वाचं मंदिर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वराचं मंदिर. हे मंदिर रुद्रसागर सरोवराच्या किनारी आहे. असं म्हटलं जातं की अधिष्ठ देवता भगवान शिव स्वत: या लिंगात स्वयंभू रुपात स्थापित आहेत.म्हणून या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवपुराणानुसार एकदा ब्रम्हा, विष्णू आणि महेश याच्याच चर्चा सुरु होती. तेव्हा भगवान शंकरांच्या मनात ब्रम्हा आणि विष्णूची परिक्षा घ्यावी असा विचार आला. त्यांनी दोघांना प्रकाशाचा अंत कुठे ते शोधण्यास सांगितलं. त्यासाठी शंकरानी एक स्तंभ उभा केला व त्याचं टोक शोधण्यास सांगितलं. दोघांनी खूप प्रयत्न केला. अखेर विष्णूंनी हार मान्य केली. पण ब्रम्हा खोटं बोलले. शंकरानी त्यांना तुझी कुणीही पूजा करणार नाही असा शाप दिला. ब्रम्हानी क्षमायाचना केल्यावर शिव स्वत: त्या स्तंभात विराजमान झाले. हा स्तंभ म्हणजेच ज्योतिर्लिंग.या स्तंभाचं शिवलिंगात रुपांतर झालं आणि त्यास विशेष महत्व प्राप्त झाल.

                याशिवाय इथे असलेलं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे मंगळ ग्रहाचं मंगळनाथ मंदिर. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले सारे दोष नाहीसे होतात अशी श्रद्धा आहे. अजून एक महत्त्वाचं स्थान म्हणजे सांदिपनी आश्रम. कृष्ण आणि बलराम मथुरेहून सांदिपनी ऋषींच्या या आश्रमात अध्ययनासाठी आले होते. ६४ कला आणि १६ विद्या यांचं ज्ञान कृष्णाने ६४ दिवसांत घेतलं असं मानतात. गुरु सांदिपनी स्नानासाठी रोज त्यावेळच्या लखनौ येथे गोमती नदीवर जात असत. म्हणून कृष्णाने बाण मारुन कुंड निर्माण केलं आणि मग त्यात गोमती नदी अवतीर्ण झाली. हे पवित्र कुंड आजही आश्रमात आहे.  

              याशिवाय इथलं अजून एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे कालभैरव मंदिर. पौराणिक कथेनूसार ब्रम्हदेवाने शिवशंकरांचा अपमान केला. त्यामुळं क्रोधित झालेल्या शिवाच्या क्रोधातून काळ्या रंगाच्या भैरवाची उत्पत्ती झाली. भैरवानं शिवनिंदा करणारं ब्रम्हाचं पाचवं मस्तक छाटलं. त्यामुळे ब्रम्हहत्येचं पातक घडलं. त्यातून मुक्ती मिळण्यासाठी भैरव ते शीर तळहातावर घेऊन सर्व तीर्थक्षेत्र फिरले. अखेर काशीला गेल्यावर त्यांच्या हातून ते शीर गळून पडलं आणि त्यांना ब्रम्हहत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. जिथं ते शीर गळून पडलं ते स्थान कपालमोचनतीर्थ म्हणून ओळखलं जातं. काशीला गेल्यावर आधी कालभैरवाचं दर्शन घेऊन मग महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि परत कालभैरवाचं दर्शन घ्यायचं अशी प्रथा आहे. त्याच कालभैरवाचं मंदिर उज्जैनला आहे. तसचं बऱ्याच ठिकाणी कालभैरव मंदिर आहे. 

               याचबरोबर क्षिप्रा नदीघाट, सिध्दवट मंदिर, गढ कालिकामाता मंदिर, हरसिध्दी मंदिर अशी बरीच मंदिरं उज्जैन मध्ये आहेत त्या सर्वांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.

               परिक्रमा सुरु होऊन आठ दिवस झाले. खरंच कधी संपले हे आठ दिवस कळलंही नाही. रोज नवं स्थलदर्शन, तिथलं स्थानमहात्म्य, प्रत्येक ठिकाणी मैयाचं बदलतं तरीही हवंहवंसं वाटणारं रुप, सगळेजणं परिक्रमेत इतके दंग झालो होतो की वाढत्या उन्हातही सगळीकडे उत्साहाने फिरत होतो. सुरुवातीचे ५-६ दिवस उन सुसह्य होतं. आता मात्र उन्हाचा तडाखा फारच वाढायला लागला होता. गाडीतून उतरलं की सगळ्यांच्या नजरा जणू अगदी काकदृष्टीने दुकानं शोधत असत. फळं, ताक, लस्सी, सरबत, उसाचा रस जे मिळेल ते घेऊन उन्हाची तलखी कमी करण्याचा सतत प्रयत्न करत होतो. अजून जवळपास अर्धी परिक्रमा बाकी असल्याने कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकजण घेत होतो. वाढत्या उन्हाचा आम्हाला जरी त्रास होत असला तरी सृष्टीला मात्र वसंताची चाहूल लागली होती. रखरखत्या उन्हात आजूबाजूला खूप सारे पलाशवृक्ष बहरलेले दिसत होते. पेटत्या ज्वालेसारखी केशररंगी फुलं उन्हातही अतिशय सुंदर दिसत होती.  बोगनवेलीही रंगिबेरंगी फुलांनी बहरल्या होत्या. आम्रमोहोराचा मंद गंध दरवळत होता. पहाटसमयी कोकळकुजनही ऐकू येत होतं.रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेली गव्हाची कापणीला आलेली सोनेरी शेती होती. वाऱ्यावर डोवणारं ते सोनसळी पिक नजरेलाही सुखावत होतं. अर्थातच आमचा उत्साहही त्यामुळे वाढत होता.

               नवव्या दिवशी सकाळी आम्ही पोहोचलो नेमावरला. पुराणकाळात नेमावर नाभीपूर या नावानं ओळखलं जात होतं. नर्मदेचं हे नाभिस्थान मानलं जातं. इथे अतिशय प्राचीन असं सिध्दनाथ मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना सत्ययुगात  ऋषी सनक, सनन्दन, सनातन आणि सनतकुमार या ऋषींनी केली होती, त्यावरुनच सिध्दनाथ हे नांव मिळालं. पापनाशन करणारं सिध्दनाथ तीर्थस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या वरच्या बाजूला ओंकारेश्वर आणि खालच्या बाजूला महाकालेश्वर हि मंदिरं येतात. आजुबाजुच्या पर्वतातील गुहा, कपारी मध्ये साधना करणारे साधक इथे नर्मदा स्नानासाठी येतात. इथे नर्मदेचं अतिशय विशाल, शांत सुंदर पात्र आहे. इथून पुढे सलकनपूरला देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. रोपवेने किंवा जीपने किंवा पायऱ्या चढून इथं जाता येतं. माॅं विजयासन देवीचं हे सुंदर मंदिर आहे. आम्ही रोपवेने जाऊन या देवीचं दर्शन घेऊन परत आलो.

  

  

  

  

- स्नेहल मोडक

Sunday, March 27, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग ३

                 पाचव्या दिवशी मिठीतलाईला पोहचून सारं आवरुन मैयाची रोजची पूजा आरती केली. आणि भोजन करुन पुढे नारेश्वरला गेलो. हा श्रीरंग अवधुत महाराजांचा आश्रम. दत्तबावन्नीचे रचयिते. हे दर्शन घेऊन करणाली येथे मुक्कामास पोहोचलो.

                 कुबेर भंडारी हे करणाली मधील प्रमुख मंदिर. कुबेर हा देवांचा खजिनदार. ब्रम्हदेवांनी देवतांचा धनरक्षक म्हणून कुबेराची नियुक्ती केली होती. कुबेर हा विश्रवस ऋषींचा पुत्र आणि लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊ. एकदा माता पार्वतीचा देवी लक्षमी कडून अपमान होतो. तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांकडून सुखसंपन्न सोन्याची नगरी मागते. भगवान शिव सोन्याच्या नगरीची निर्मिती करुन धार्मिक विधींसाठी विश्रवस ऋषींना पाचारण करतात. पूजा संपन्न झाल्यावर विश्रवस ऋषींना दक्षिणा मागण्यास शिव सांगतात. ते दक्षिणेत आपल्या मुलांसाठी ती सोन्याची नगरी म्हणजेच सोन्याची लंका मागतात. शिव ती नगरी दान करतात. पार्वती माता चिडून 'तुझ्या मुलांच्या अहंकारात लंकेची राख होईल' असा शाप देते. पुढे विश्रवस ऋषी त्यातली अर्धी नगरी रावणाने कुबेराला द्यावी असं सांगतात. रावण अहंकाराने ते मान्य करत नाही. तेव्हा नारदमुनी कुबेराला नर्मदा तीरी शिव शंकराची घोर तपश्चर्या करायला सांगतात. त्यानुसार कुबेराने जिथे तपश्चर्या केली तेच हे कुबेर भंडारी मंदिर. याच बरोबर गायत्री मंदिर, गीतामाता मंदिर, सोमेश्वर मंदिर यांचं दर्शन घेतलं.

                 सहाव्या दिवशी सकाळी गरुडेश्वरला पोहोचलो. या स्थानी पूर्वी अति बलशाली असा गजासूर नांवाचा राक्षस रहात होता. त्याने गजाचे रुप घेऊन गरुडाशी युद्ध केलं. त्यात गरुडांनी त्याला मारलं. त्याची हाडं पर्वतावरच पडून राहिली. कालांतराने ती नर्मदेत वाहून आली. गजासुराने नर्मदेत राहून १०० वर्षं तप केलं. भगवान शिव प्रसन्न झाले. हवा तो वर माग म्हणाले. तेव्हा गजासूराने हे स्थान कुरुक्षेत्राप्रमाणे प्रसिद्ध व्हावं, इथं स्नान, पूजा करणाऱ्यांना पुण्य लाभावं असा वर मागितला. तसंच आपलं कातडं शिवाने धारण करावं आणि गरुडाच्या हातून मृत्यू झाला म्हणून आपलं नांव गरुडाबरोबर जोडून इथे वास करावा असं मागणं मागितलं. भगवान शंकरानी गजासूराला तसा आशीर्वाद देऊन लिंग स्थापन करण्यास सांगितलं. तेच हे गरुडेश्वर.

                 श्री दत्तात्रेयांचे उपासक प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे गरुडेश्वरी उतरले होते. ते इथं असल्याचं कळताच त्यांचे भक्तगण इथं येऊ लागले. नंतर इथं दत्तमंदिर स्थापन करण्यात आलं. या मंदिरात मध्यभागी श्री दत्तप्रभु त्यांच्या उजवीकडे प.पू. आद्य शंकराचार्य आणि डावीकडे विद्यादायिनी सरस्वती देवी आहे. या तीनही मुर्तींची प्रतिष्ठापना पू. ब्रम्हानंद स्वामींनी केली आहे. १९१४ मध्ये प.पू. स्वामीजींनी गरुडेश्वर मुक्कामी नर्मदा मैयाच्या कुशीत समाधी घेतली. त्यांनी समाधी घेतली तिथे समाधी मंदिर बांधण्यात आलं आहे. आणि त्यासमोरच त्यांच्या निर्गुण पादुकांचं मंदिर आहे. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत अशी श्रद्धा आहे त्यामुळे गरुडेश्वर हे दत्तभक्तांचं श्रध्दास्थान आहे.

                 सातव्या दिवशी सकाळी रात्रभराचा प्रवास करुन महेश्वर येथे पोहोचलो. महेश्वर हे पुराणकाळापासून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पुराणातील कार्तवीर्य अर्जुन या सोमवंशीय क्षत्रिय राजाची राजधानी म्हणून महेश्वरचे उल्लेख आढळतात. कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन या नावानेही रामायण आणि महाभारतात ओळखला जातो. एका पुराणकथेनुसार राजा आपल्या ५०० राण्यांसह नदीतीरी फिरायला गेला. राण्यांना क्रीडा करायची लहर आली. क्रिडेसाठी मोठी जागा हवी म्हणून सहस्रार्जुनाने आपल्या हजार बाहूंनी नर्मदेचा प्रवाह रोखला. त्याचवेळी आकाशमार्गे जाणाऱ्या रावणाने नदीचे कोरडे पात्र पाहिलं आणि शिवभक्त रावणाने तिथे शिवलिंग स्थापून पूजा सुरु केली. तेवढ्यात राण्यांची क्रिडा संपली आणि राजाने नर्मदेचा प्रवाह सोडून दिला. प्रवाहात शिवलिंग वाहून गेलं. संतापलेल्या रावणाने सहस्रार्जुनाशी युध्द आरंभलं. राजाने रावणाचा सहज पराभव केला. रावणाला जमिनीवर लोळवून त्याच्या प्रत्येक डोक्यावर एकेक दिवा ठेवला. त्याची आठवण म्हणून अजूनही महेश्वरच्या सहस्रार्जुन मंदिरात ११ दिवे लावण्याची प्रथा आहे. महेश्वरचं पुरातन नांव माहिष्मती असं होतं.

                अठराव्या शतकाच्या अखेरीस महेश्वर अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी म्हणून नावारूपाला आलं. मल्हारराव होळकर यांच्या स्नुषा अहिल्यादेवी कुशल शासक म्हणून ओळखल्या जात असत. अगदी लहान वयात वैधव्य आल्यावर सासरे मल्हारराव यांच्या मार्गदर्शनाखाली महेश्वरच्या राज्यकारभाराची धुरा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी सांभाळली. त्यांच निवासस्थान असलेला वाडा साधाच पण मोठा होता. त्या वाड्यातलं त्याचं खाजगी देवघर ही वाड्याची खासियत. या देवघरात अनेक देवदेवतांच्या सोन्याच्या मूर्ती होत्या. आजही त्यातली झुल्यावर बसलेली बाळकृष्णाची सोन्याची मोठी मूर्ती आपल्याला पहायला मिळते. राजवाडा आणि राजगादीवरील अहिल्यादेवींची मूर्ती पहाताना तो सगळा काळ अक्षरशः डोळ्यासमोर उभा रहातो. आणि क्षणभर तरी प्रत्येक जण नतमस्तक होतोच. अहिल्यादेवी यांनी महेश्वरमध्ये अनेक मंदिरं आणि धर्मशाळा बांधल्या. श्री काशी विश्वेश्वर मंदिर बांधलं. महेश्वरसहित अनेक ठिकाणी अतिशय सुंदर नदीघाट बांधले. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट महेश्वरला आहेत. महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा मैया इथून जाते. अहिल्यादेवींनी सुरु केलेली एक धार्मिक परंपरा म्हणजे कोटी लिंगार्चन. त्यांचा असा विश्वास होता की स्ताला जे मिळालंय ते उदंड आहे. त्याहून अधिक मिळवण्याचा आपल्याला अधिकार नाही. 

                 त्यामुळे प्रजेच्या सौख्याला त्यांनी जास्त महत्व दिलं. त्याचा एक भाग म्हणजे कोटी लिंगार्चन ही प्रथा. रोज १०८ ब्राह्मणांनी नर्मदेतील माती आणून १०८ पाटांवर प्रत्येकी १३२५ छोटी शिवलिंग शिवमहिम्न पाठ म्हणून स्थापन करायची. त्यांची विधीवत पूजा करायची. नंतर अहिल्यादेवी स्वतः त्या शिवलिंगाची पूजा करुन प्रजेच्या सौख्याची, रक्षणाची प्रार्थना करत. सायंकाळी ती सारी शिवलिंग नर्मदेतच विसर्जित करत असत. अजूनही ही परंपरा सुरु असून ११ पाटांवर ही शिवलिंग स्थापून पूजा, अभिषेक केला जातो. आणि प्रथेप्रमाणे सायंकाळी त्यांचं नर्मदेत विसर्जन केलं जातं.

                 महेश्वरची खासियत म्हणजे महेश्वरी साडी. अहिल्यादेवींनी महाराष्ट्रातून कारागिर बोलावून मराठी स्त्रिया परिधान करत असलेल्या साड्या विणण्यासाठी हातमाग उपलब्ध करुन दिले. कालांतराने या महेश्वरी साड्यांची ख्याती सर्वदूर पसरली. महेश्वर मधली मंदिरंही प्रसिद्ध आहेत. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर आणि अहिल्येश्वर ही मंदिरं आवर्जून पाहण्यासारखी आहेत.

  

    

    




- स्नेहल मोडक

Saturday, March 26, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग २

                तिसऱ्या दिवशी आम्ही प्रकाशा ला पोहोचलो. श्री क्षेत्र प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. इथे पुष्पदंतेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन मैयाची पूजा आरती केली. हे मंदिर तापी नदीच्या काठावर पूर्वाभिमुख असून यात महादेवाची स्वयंभू पिंड आहे. एक राजा या मंदिरात रोज पूजा करायचा. एकदा पूजा करताना त्याच्याकडे पूजेसाठी फुलं नव्हती मात्र पूजेत खंड पडू नये म्हणून त्याने आपला दंत काढून महादेवाला अर्पण केला. तर त्या दंताचं पुष्प झालं. तेव्हापासून या मंदिराला पुष्पदंतेश्वर हे नांव पडलं अशी एक आख्यायिका आहे. इथे तापी, गोमती, पुलिंदा या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. हा संगम, केदारश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर यांच दर्शन घेतलं. तसचं इथं ऋणमुक्तेश्वराचंही मंदिर आहे. आपलं कर्ज फिटावं म्हणून लोक या मंदिरात नवस बोलतात आणि ५,७,११ वेळा अमावस्येला दर्शन घेतल्यानंतर कर्जमुक्ती होते अशी श्रद्धा आहे.

                 त्यानंतर आम्ही पोहोचलो शुलपाणेश्वर मंदिरात. परिक्रमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा. इथं पूर्वी खूप मोठं घनदाट जंगल होतं. त्यात भिल्ल लोकांचं वास्तव्य होतं. पायी परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी हे जंगल पार करणं कष्टदायक आणि जोखमीचं होतं. इथले भिल्ल प्रत्येक भाविकाला लुटत. अगदी अंगावरल्या वस्त्रासहित सारं काही काढून घेत असत. त्याचं कारण इतकं अपरिमीत दारिद्रय तिथं नांदत होतं. नंतर सरदार सरोवर प्रकल्पात हे जंगल बरंचसं धरणाखाली गेलं. भिल्लांचा त्रास बंद झाला तरी त्या मार्गाने चालणं अधिक कष्टदायी झालं. तिथलं मूळ मंदिर आता वरच्या बाजूला बांधण्यात आलं आहे.अतिशय रमणीय असा हा परिसर आहे. आम्ही इथं पोहोचलो तेच सूर्यास्तसमयी. त्यामुळे सूर्यास्ताचं अप्रतिम दृश्य आम्हाला अनुभवायला मिळालं. इथे दर्शन घेऊन राजपिपला इथं आम्ही मुक्कामासाठी पोहोचलो. 

                 खरंतर याच दिवशी कठपोर ते मीठीतलाई या समुद्र तरणासाठी रात्री २ वाजताची वेळ आम्हाला मिळाली होती. पण त्यामुळे शूलपाणेश्वर आणि भालोद ही परिक्रमेतील २ महत्वाची स्थानं करणं आम्हाला अवघड होतं. जसं  हे आम्हाला कळलं तसं आम्ही सारेच नाराज झालो. पण दुसऱ्या क्षणीच मैयाला मनोमन प्रार्थना केली की कसंही करुन तू आम्हाला या दोन्ही स्थानांचं दर्शन घडव. मनापासून प्रार्थना केली तर मैया इच्छा पूर्ण करते असा अनुभव ऐकत आलो होतो. त्यामुळे मैया आपली इच्छा नक्की पूर्ण करणार असा विश्वास होता. अखेर कठपोरला संपर्क साधून बोलणं करुन दुसऱ्या दिवशीच्या रात्री २ वाजताची वेळ ठरवण्यात आली आणि आमची इच्छा पूर्ण झाली. मैयाने खूप छान अनुभूती दिली होती. मन समाधानानं भरुन पावलं होतं.

                चौथ्या दिवशी सकाळी लवकर निघून मार्गातील मंदिरांचं दर्शन घेऊन पोइचा ला पोहोचलो. नर्मदा नदीच्या काठावर १०५ एकरात उभारलेलं निळकंठधाम स्वामी मंदिर. अतिशय देखणं विशाल असं हे मंदिर. या मंदिरात महादेवाची नटराज स्वरुपातील भव्य मूर्ती आहे. मंदिर इमारतीच्या भोवती जलाशय असून अनेक देवदेवतांची लहान मोठी मंदिरे आहेत. हे सारं पाहून दर्शन घेऊन पुढे निघालो. 

                 मनाला ज्याची ओढ लागली होती त्या भालोद या स्थानी पोहोचलो. नर्मदा परिक्रमेत श्री दत्तप्रभुंची मोजकीच मंदिरं आहेत. जबलपूर, नर्मदापुरम (होशंगाबाद), गरुडेश्वर, राजघाट आणि भालोद. त्यातील भालोदच्या दत्तमंदिरात आम्ही पोहोचलो होतो. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी १४००व्या शतकातील एकमुखी दत्तात्रेयांची मूर्ती जी अंधारात किंवा उजेडात कशीही पाहीली तरी पोटावर गोमुख दिसतं. प.पू.वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या कृपेने प.पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन परिक्रमा पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोदला वास्तव्य करण्याचा आदेश मिळाला. याचदरम्यान बडोदा येथे काशीताई निरखे यांच्याकडे असलेली पुरातन दत्तमूर्ती प.पू.प्रतापे महारांजाकडे आली आणि भालोदला दत्तमंदिर स्थापन झालं. मुळात काशीताईंच्या आजोबांना श्री दत्तगुरुंनी स्वप्नदृष्टांत दिला आणि 'मी नर्मदेच्या जळात आहे, मला तू घेऊन जा' असं सांगितलं. त्याप्रमाणे ही दत्तमूर्ती बडोद्याला आणून तिथे मंदिर स्थापन केलं. नंतर मुलाने आणि त्यानंतर काशीबाईंनी वयाच्या ८५ वर्षांपर्यंत सेवा केली. पण मग  या दत्तमूर्तीचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळीही श्री दत्तगुरुंनी स्वप्नदृष्टांत देऊन 'उद्या सकाळी मंदिरात येणाऱ्या पहिल्या व्यक्तीला मला दे' असं सांगितलं. सकाळी प्रतापे महाराज त्या मंदिरात गेले आणि ती दत्तमूर्ती त्याच्याकडे आली. ही मूर्ती एकमुखी आणि शाळिग्रामाची आहे. अतिशय रेखीव अशी ही मूर्ती आहे.

                 श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन प्रतापे महाराजांना भेटलो. खरंतर नर्मदा परिक्रमेविषयी त्यांच्याकडून काही ऐकायची खूप इच्छा होती. पण वेळेअभावी ते शक्य झालं नाही. पण माझं त्यांच्याशी अगदी थोडंसं का होईना गुरुचरित्राबद्दल बोलणं झालं आणि मनाला समाधान लाभलं. आश्रमाचा सारा परिसर सुंदर आहे. समोरच मैयाचं विशाल पात्र आहे. परिक्रमावासींची इथं उत्तम व्यवस्था केली जाते. खरंतर तिथून निघावसंच वाटत नव्हतं. अखेर तिथून निघालो आणि कठपोरला पोहोचलो.

                 कठपोरला पोहोचायला रात्रच झाली होती. तिथल्या विमलेश्वर मंदिराजवळच आमची व्यवस्था केली होती. रात्री २.३० वाजल्यानंतर समुद्र तरणासाठी निघायचं होतं. तोपर्यंत आम्ही त्याठिकाणी थांबलो होतो. सारं आवरुन साधारण  सव्वा तीन वाजता आम्ही तिथून निघालो. विमलेश्वर मंदिराच्या बाजूनेच नावेपर्यंत जायचा लहानसा रस्ता आहे. जवळपास ३ किमी इतकं अंतर चालून जावं लागतं. किंवा छोट्या वाहनानेही जाता येतं. आमच्यापैकी काही जणं वाहनाने तर आमच्यासह काही जण चालत निघालो. 

                 आम्ही सगळ्यांबरोबर चालायला सुरुवात केली. मिट्ट काळोख होता. रस्त्यावर एकही दिवा नव्हता.सारं अंतर अंधारातच चालायचं होतं.  एवढंच काय जिथं नावा थांबल्या होत्या तिथही अंधारच होता. भ्रमणध्वनीच्या आणि छोट्या वाहनांच्या दिव्यांच्या उजेडातच सारी लगबग सुरु होती. 

                 आम्ही चालायला सुरुवात केली आणि पुढच्या पाच मिनिटांतच माझ्या लक्षात आलं की बाजूने कुणीतरी चालतंय कारण अंधारात फक्त डोळे चमकत होते. अर्थात अंदाज आला होताच पण भ्रमणध्वनीच्या उजेडात बघितलं आणि दिसला एक छान काळ्या रंगाचाच एक श्वान. आमच्या बाजूनेच जणू काही आमची काळजी घेतच चालत होता तो. मधेच ७-८ पावलं पुढे जाई आणि थांबे, मधेच मागे पुढे असलेल्या सगळ्या लोकांच्या बाजूने चाले आणि परत आमच्याजवळ येई. जणू त्या मिट्ट काळोखात आमची काळजी घेण्यासाठी स्वयं श्री दत्तगुरुंनीच पाठवलं होतं त्याला. कारण आम्ही अगदी नावेत चढेपर्यत तो आमच्या जवळच उभा होता. आम्हाला नावे पर्यंत पोहोचल्यावर तास दिड तास रस्त्यावरच अंधारात थांबावं लागलं होतं. समुद्राच्या भरतीचं पाणी तिथं येईपर्यंत नावा निघू शकत नाहीत. पण तेवढावेळ आमचं रक्षण तो श्वान करत होता असंच म्हणायला हवं. वाटेत चालताना त्याने माझ्याकडून छान गोंजारुनही घेतलं होतं. आणि छायाचित्रही काढू दिलं होतं. 

                 समुद्र तरण दिवसा होणार कि रात्री ते पौर्णिमा अमावास्या यावर ठरतं. १५ दिवस दिवसा आणि १५ दिवस रात्री समुद्र तरण होतं. आदल्या दिवशी किती लोकं समुद्र तरणासाठी आली आहेत ते नोंद करुन त्याप्रमाणे नावा सोडतात. आधी दलदलीसारख्या जागेतच नावा लागलेल्या असतात. भरतीचं पाणी हळूहळू चढायला सुरुवात झाल्यावर आमच्या नावाड्यांनी हाकारा केला आणि आम्ही नावेजवळ गेलो. जमिनीपासून नावेत जाण्यासाठी आधी थोडी तीव्र उताराची जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एवढीच वाट आणि पुढे थोडा बांबूच्या पट्ट्यांचा अरुंद साकव अशी स्थिती होती. त्यावरुन तोल सावरत भीतभीतच नावेत जाऊन बसलो. नांवेत अनवाणी पायाने चढावं लागतं. एकतर आपल्या जवळ पिशवीत चपला घ्यायच्या किंवा किनाऱ्यावरच सोडायच्या. आम्ही अर्थातच आधीच पिशवीत चपला काढून ठेवल्या होत्या. सारे नावेत बसल्यावर थोड्याच वेळात नाव निघाली. आणि सुरु झाला आमचा समुद्र प्रवास. अजूनही उजाडलं नव्हतं. त्यामुळे अंधारात समुद्र दिसत नसला तरीही आता आपल्या आजूबाजूला फक्त पाणी आणि अंधार आहे या विचारानेच मन थोडं अस्वस्थ होतं. पण थोड्याच वेळात पूर्वदिशेला सोनकेशर रंगाची पखरण होऊ लागली. आणि सहस्त्ररश्मीची स्वारी दिमाखात आकाशी अवतरु लागली.

                   अतिशय अप्रतिम दृश्य होतं ते. इतकं सुंदर दृश्य छायाचित्रात बध्द करण्यासाठी माझ्यासहित सगळ्यांचीच गडबड उडाली. रवीराजाचं प्रतिबिंब सागरात दिसू लागलं आणि सागराचं पाणीही चमचम करु लागलं. साऱ्या सृष्टीला जाग आली. आमच्या नावेवरुन खूप सारे समुद्रपक्षी उडू लागले. आणि मग सुरु झाला एक छान खेळ.आम्ही त्यांना खाऊ घालत होतो आणि आम्ही हवेत उंच फेकलेला खाऊ ते समुद्र पक्षी वरच्यावर चोचीत पकडत होते. खूपच छान वातावरण होतं. रात्रीचं अंधारातलं चालणं, कसरत करत नावेतलं चढणं, आजूबाजूला पसरलेला अथांग सागर सारं विसरुन सगळे नौकानयनचा छान आनंद घेऊ लागले.

                    मैया जिथे सागराला मिळते तो संगम आला आणि आम्ही आमच्या जवळच्या नर्मदा जलाच्या कुपीतलं थोडं जल संगमात ओतून तिथलं थोडं जल कुपीत घेऊन तीर्थमिलन केलं. संपूर्ण परिक्रमेत हे प्रत्येक ठिकाणी करायचं असतंच.  जवळजवळ ४ तासांचा हा रत्नासागरातला प्रवास कधी संपला ते कळलंही नाही. आम्ही मिठी तलाईला पोहोचलो तिथं मात्र उतरायला व्यस्थित धक्का बांधलेला आहे. नावेतून उतरुन पायऱ्या चढून वर जाता येतं.

  



  

स्नेहल मोडक

Friday, March 25, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग १

! त्वदीय पादपंङ्कजं नमामि देवी नर्मदे !

             नर्मदा मैया ही मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यातून वाहणारी प्रमुख नदी. शिवकन्या नर्मदा ही रेवा, अमरजा, मैकलकन्या नावांनेही ओळखली जाते. मध्य प्रदेशातील मैकल पर्वतश्रेणीतील अमरकंटक हे नर्मदा नदीचं उगमस्थान. म्हणूनच नर्मदेला मैकलकन्या या नावानंही ओळखतात. नर्मदेच्या मार्गात अनेक धबधबे, दृतवाह आहेत त्यामुळे 'उड्या मारत, खळखळ करत'  जाणारी या अर्थाने रेवा हे सार्थ नांव. नर्मदेला हे नांव श्री रामांनी दिलं असं मानतात. भारतातील सगळ्या नद्या दक्षिणेकडे वाहतात. नर्मदा ही एकच अशी नदी आहे की जी पश्चिम दिशेकडे जाऊन पुढे सागराला मिळते. आपल्याकडे अठरा पुराणं आहेत. आणि नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे. महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असं तिला वरदान आहे.

            नर्मदेच्या पात्रात मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात. तसंच तिच्या पात्रातील काळ्या पाषाणांपासून शिवलिंग बनवतात. याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात भगवान शिव विद्यमान असतात असा पुराणात उल्लेख आहे. भरतखण्डात नर्मदेपेक्षा आकाराने मोठ्या नद्या असल्या तरीही नर्मदेचं प्राचीनत्व आणि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व या वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा फक्त नर्मदा नदीचीच केली जाते.

              या परिक्रमेचे आद्य प्रवर्तक श्रीमार्कंडेय ऋषी. सुमारे सात हजार वर्षांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त नर्मदा नदीच नाही तर तिला मिळणाऱ्या ९९९ नद्यांचा धारा- प्रवाह न ओलांडता त्यांच्या उगमाला वळसा घालून शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी परिक्रमा केली. २७ वर्षं लागली त्यांना या परिक्रमेला. अनेक ऋषी मुनींनी नर्मदा तीरी साधना करुन देह ठेवला आहे.

              ही परिक्रमा पायी चालत किंवा वाहनानेही करतात. साधारण ३००० किमी अंतराच्या या परिक्रमेत असंख्य प्राचीन मंदिरं, ऋषीमुनींचे आश्रम यांचं दर्शन घेता येतं. पायी चालत परिक्रमा करताना अवघड वाटेवरुन, जंगलातूनही जावं लागतं. पण श्रध्देने चालणाऱ्या प्रत्येकाची काळजी स्वतः मैया घेते. अतिशय सुंदर अनुभूती या परिक्रमेत मैया आपल्याला देते. 

               त्यामुळे नर्मदा परिक्रमा असा नुसता शब्द जरी ऐकू आला तरी आमचे कान टवकारले जायचे. कारण नर्मदा परिक्रमा करायची, अर्थातच आधी वाहनाने अशी खूप तीव्र इच्छा होती. त्यामुळे याविषयी कुठे काही ऐकलं तरी लगेच त्याबद्दल माहिती घेत होतो. 

              खूप वेगवेगळ्या यात्राकंपन्या नर्मदा परिक्रमा आयोजित करतात. अशाच एका आम्हाला हव्या तशा अध्यात्मिक यात्रेची आम्हाला माहिती मिळाली. पण माझी मात्र द्विधा मनस्थिती झाली होती. २०-२२ दिवस मुलींना सोडून कसं जायचं हा विचार मनात येत होता. पण मुलींनी आलेली संधी सोडू नका, नर्मदा मैय्या बोलवतेय, तुम्ही कुठलीही काळजी न करता जाऊन या अशा दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे आश्वस्त होऊन आम्ही परिक्रमेला जायचं नक्की केलं.

              आमची परिक्रमा ओंकारेश्वरपासून सुरु होणार होती. ओंकारेश्वरला महाशिवरात्रीच्या सायंकाळी सर्वांनी एकत्र जमायचं होतं. त्याआधी एक दिवस आम्ही इंदोरला पोहोचलो. तिथल्या अतिथी निवासात रहाण्याची व्यवस्था आम्ही आधीच केली होती. त्याप्रमाणे इंदोरला पोहोचल्यावर तिथे जाऊन सारं आवरुन आधीच ठरवलेल्या गाडीने उज्जैनला गेलो. तिथे श्री महाकालेश्वरचं दर्शन घेऊन जवळच्या हरसिध्दी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर कालभैरव, बडा गणपती, सांदिपनी आश्रम हे सारं करुन इंदोरला ५६ दुकान येथे जाऊन इंदोरच्या खास खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. रात्री इंदोरला राहून दुसऱ्या दिवशी परत थोडं इंदोर फिरुन, भेटीगाठी घेऊन ओंकारेश्वरला पोहोचलो. 

                ओंकारेश्वरला ठरल्यानुसार सर्वजणं सायंकाळी एकत्र जमलो. चहापान झालं, परिक्रमेसाठीच्या इतर महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता केली. नंतर फराळ करुन उशिरा श्री ओंकारेश्वरच्या दर्शनाला गेलो. रात्री ११.१५ वाजता अतिशय सुंदर दर्शन झालं. तिथून परत येऊन निद्राधीन झालो ते दुसऱ्या दिवशीच्या मांधाता परिक्रमेच्या विचारातच.

               मांधाता परिक्रमा म्हणजे नर्मदा आणि कावेरी संगमस्थित मांधाता पर्वतावर असलेल्या ओंकारेश्वर मंदिराला केली जाणारी परिक्रमा. ही परिक्रमा साधारण ७ किमी अंतराची आहे. ओंकारेश्वरच्या कोटी तीर्थ या स्थानापासून परिक्रमेची सुरुवात होते. ही पायी चालत किंवा नावेतूनही करता येते. या मार्गात नर्मदा आणि कावेरी यांचा संगम होतो. अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे. ही परिक्रमा अतिशय रमणीय आनंददायी आहे. या परिक्रमेतच ऋणमुक्तेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरात चणा डाळ अर्पण केली असता सर्व पापातून, ऋणातून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. 

                अशी ही सुंदर मांधाता परिक्रमा नावेतून करुन, ऋणमुक्तेश्वराचं दर्शन करुन आणि एक सुंदर अनुभव घेऊन आम्ही दुपारी परत आलो.

                सायंकाळी ओंकारेश्वरच्या ब्रम्हपुरी घाटावर परिक्रमेच्या संकल्प पूजेसाठी गेलो. 

                मांधाता पर्वतावरील ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचं शहर आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. मांधाता पर्वताचा आकार ओम चिन्हासारखा आहे. इथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर अनेक मंदिरं आहेत. परिक्रमेच्या दृष्टीने ओंकारेश्वरचं महत्व अनन्यसाधारण आहे. परिक्रमा आरंभ ओंकारेश्वर, नेमावर किंवा अमरकंटक यापैकी कुठूनही केला तरीही नर्मदा जल ओंकारेश्वरला चढवल्यावरच परिक्रमेची सांगता होते अशी मान्यता आहे.

                संकल्प पूजेपूर्वी नर्मदा स्नान करायचं असतं. स्नानासाठी घाटाच्या पायऱ्या उतरुन खाली गेलो खरं पण मनात गोंधळ होता. पाण्याची भिती, थोडी उत्सुकता, थोडी लज्जा अशा संमिश्र भावना मनात दाटल्या होत्या. अनेक स्त्रिया तिथे मुक्तपणे स्नान करत होत्या. मग मीही नकळत पाण्यात उतरले. पावलांना जलस्पर्श झाला आणि तनामनावर शिरशिरी उमटली. साऱ्या संमिश्र भावना क्षणात नाहीशा झाल्या आणि उरली ती फक्त मैयाच्या उबदार स्पर्शाची जाणीव. लहान बाळ जसं आईच्या कुशीत शिरल्यावर सुखावतं तशी सुखावले मी. छान स्नान करुन प्रसन्न मनाने संकल्प पूजा केली. 

                संकल्प पूजेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रावेरखेडी येथे पोहोचून मैयाची यथासांग पूजा आरती केली. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रावेरखेडी हे थोरल्या बाजीराव पेशव्यांचं समाधीस्थान. इ.स. १७४० मध्ये उत्तरेच्या मोहिमेवर असतांना वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी थोरल्या बाजीराव पेशव्यांचा रावेरखेडी येथे मृत्यू झाला. नर्मदा तीरीच त्यांचं समाधी स्थान आहे. 

                 तिथूनच पुढे सियाराम बाबांच्या आश्रमात जाऊन दर्शन घेतलं आणि मुक्कामाला निघालो.

    

 

  


- स्नेहल मोडक

Tuesday, February 8, 2022

निमित्त माघी जयंतीचे ...

                यावेळी माघी गणेश जयंतीच्या उत्सवाला गावाला जायचं ठरवलं आणि तयारी केली. उत्सवाच्या आदल्या दिवशी सकाळी लवकर निघालो.

    

              प्रवासाला सुरुवात केली खरी पण सारा रस्ता धुक्यात हरवला होता जणू. सध्या रोजच आमच्या परिसरात धुकं दाटलेलं असतंच. सारी सृष्टी शुभ्र धुक्याची दाट दुलई ल्यायली होती. अप्रतिम दृश्य होतं. दाट धुक्यातून आमचा प्रवास सुरु झाला आणि त्याबरोबरच छायाचित्र आणि चित्रण करणं ही सुरु झालं. अतिशय सुंदर वातावरण आणि साथीला गाडीत सुरु असलेली जूनी सुंदर गाणी. प्रवास संपूच नये असं वाटत होतं. सहस्त्ररश्मीचं आगमन होऊन बराच वेळ झाला तरी सारी सृष्टी धुक्याची दाट दुलई लपेटूनच बसली होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत असंच वातावरण होतं. नंतर मात्र हळूहळू धुकं विरळ होत गेलं आणि सृष्टीवर लख्ख उन पसरलं. 
               उन्हात आजूबाजूच्या परिसराचं सौंदर्य उजळून निघालं. आणि आमच्या नजरा नेहमीप्रमाणे बहरलेल्या झाडांचा शोध घेऊ लागल्या. कुठलाही ऋतू असला तरी  कोकण सदैव सृष्टीसौंदर्यानं नटलेलच असतं. गुलमोहोर, सोनमोहोर, पांढरा चाफा यांना बहर यायला वेळ असला तरी एव्हाना पांगारा, पळस , गिरीपुष्प ( ग्लिरिसिडीया ) बहरायला सुरुवात झालेली असते. आणि आम्ही तेच पहात होतो. खूप ठिकाणी ही झाडं बहरलेली दिसत होती. पण रस्त्यापासून थोडी दूर असल्याने छायाचित्रं काढणं शक्य होत नव्हतं. 
               हे सारं पहात जात असताना अचानक एका ठिकाणी अगदी रस्त्याच्या जवळच पळसाचं बहरलेलं झाड दिसलं. लगेच गाडी थांबवून उतरुन झाडाजवळ गेले. फुलांची छायाचित्रं काढली पण उन्हामुळे मनासाखी छायाचित्रं मिळत नव्हती मग अलगद फुलांचा एक तुरा खुडून घेतला जवळून छायाचित्र घेता येण्यासाठी. 


             

               पळस - पलाश, किंशुक, याज्ञिक, त्रिपत्रक इत्यादी नावांनी ओळखला जातो. इंग्लिश मध्ये पळस पॅरट ट्री किंवा फ्लेम ऑफ फाॅरेस्ट या नावानी ओळखला जातो. अतिशय औषधी उपयुक्त असा हा वृक्ष आहे. याची पानं, फुलं, साल हे सारं औषधी आहे. पळसाच्या सालीला पडलेल्या किंवा पाडलेल्या खांचामधून लाल रंगाचा रस पाझरतो. तो वाळल्यावर त्याचा विशिष्ट प्रकारचा डिंक तयार होतो. तोही आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी उपयुक्त असतो. या वृक्षात अग्नितत्व असल्याने याच्या लहान फांद्या वाळल्यावर यांचा समिधा म्हणून यज्ञात उपयोग केला जातो. म्हणूनही याला याज्ञिक हे नांव मिळालं असावं. याची वाळलेली फांदी (दंड) मुंज मुलास सोडमुंजीच्यावेळी हाती देतात. याची पानं त्रिदल स्वरुपात असतात म्हणून याला त्रिपत्री हे नांव आणि 'पळसाला पानं तीनच' ही म्हण रुढ झाली असावी. या पानांपासून पत्रावळी तयार केल्या जाता. या वृक्षाची फुलं गर्द केशरी लाल रंगाची ज्वालेसारखी भासणारी असतात. पानगळ होऊन गेल्यावर हा वृक्ष या केशरी रंगाच्या फुलांनी बहरतो. जणू अग्निज्वाला पेटल्यासारखा दिसतो. ही फुलंही अतिशय औषधी आहेत. ही फुलं पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान केल्यानं त्वचारोग बरे होतात. या फुलांपासून नैसर्गिक रंगही तयार करता येतो. या पलाशपुष्पाची रचना ईश्वरासमोर, निसर्गासमोर नतमस्तक असल्यासारखी असते. या फुलांमधे मोठ्या प्रमाणात असलेला मध खाण्यासाठी पक्षी आणि मधमाशा येतात.
               सध्या सर्वत्र हा वृक्ष बहरलेला दिसतोय. त्याची छायाचित्रं काढून आणि फुलं काढून घेऊन आम्ही पुढे निघालो.

         
.
               थोडं पुढे गेलो आणि इतका वेळ दूर दिसणारं बहरलेलं गिरीपुष्पचं एक झाड रस्त्याच्या अगदी जवळ दिसलं आणि आम्ही पुन्हा एकदा थांबलो. 
               गिरीपुष्प - याला इंग्लिश मध्ये ग्लिरिसिडीया असं नांव आहे. हे उंच वाढणारं पण फारशा फांद्या नसलेलं झाड आहे. सध्या हे झाड शेताच्या बांधावर, कुंपणावर लावलं जातंय. अतिशय उपयुक्त असं हे झाड आहे. याची पानं गळून पडल्यावर याचं उत्तम असं कंपोस्ट खत तयार होतं. यामुळे जमिनीचा कस वाढतो. याच्या बिया उंदरांनी खाल्यास त्यांचा नाश होतो. याची पानं गायीगुरं खात नाहीत म्हणून बांधाच्या कडेने याची लागवड करतात. या झाडाची जानेवारी महिन्यात पानगळ होते आणि मग फांद्यांच्या टोकांवर नाजूक गुलाबी जांभळ्या रंगाची फुलं उमलतात. या फुलांनी बहरलेलं झाडं सुंदर दिसतं. या फुलांतूनही मधमाशांना भरपूर मध मिळतो.
               या फुलांचीही छायाचित्रं काढून आणि थोडी फुलं काढून घेऊन आम्ही पुढे निघालो.
               सरळ घरी न जाता थोडं फिरुन जायचं असं ठरवल्यामुळे थोडं वेगळ्या रस्त्याने जाऊन आम्ही आंजर्ल्याला पोहोचलो. 
               आंजर्ला - कड्यावरचा गणपती. याच्या निर्मितीबद्दलची कागदपत्रं उपलब्ध नसली तरी आख्यायिकेनुसार हे मंदिर बाराव्या शतकातील असावं. मंदिरात काळ्या पाषाणातील पाच फूट उंचीची उजव्या सोंडेची सिंहासनाधिष्ठित मूर्ती आहे. जीर्णोद्धार करताना काळ्या पाषाणातील भिंतीना गिलावा देऊन संगमरवरासारखं मंदिर केलं आहे. एकूण सोळा कळस असणाऱ्या मंदिरांचे सोळा उपकळस मंदिराच्या गर्भगृहात आहेत. सभागृह, अंतराळ, गर्भगृह अशी रचना असणाऱ्या या मंदिराच्या कळसावर अष्टविनायकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दापोली पासून वीस किमीवर असलेल्या या मंदिरापर्यंत आता गाडीने जाता येतं. पूर्वी पूल नव्हता तेव्हा नावेतून पलिकडे कड्याच्या पायथ्याशी जाऊन साधारण दोनशे पायऱ्या चढून मंदिरात जावं लागायचं. या पायथ्याशी पायऱ्यांच्या सुरुवातीला रॅंग्लर परांजपे याचं निवासस्थान होतं.
               आम्ही या मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी गेलो. आम्हाला अतिशय छान दर्शन झालं. माघी जयंतीचा या मंदिरात मोठा उत्सव असतो. त्यामुळे आम्ही गेलो तेव्हा तिथे कार्यक्रम सुरुच होते. साऱ्या मंदिरात फुलांची सजावट केली होती. मंदिराभोवती मंडप घातले होते. अतिशय उत्साहानं, मांगल्यानं सारा परिसर भारला होता. आम्ही गेलो तेव्हा अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीसंदर्भात कार्यक्रम सुरु होता. आम्ही दर्शन घेऊन थोडा वेळ तिथे थांबून निघालो. 
               मंदिराजवळच असलेल्या एका उपाहारगृहात भोजनासाठी गेलो. घरगुती गरमागरम साधंच पण चविष्ट जेवण आम्हाला मिळालं. आम्ही जेवत असतानाच अचानक तिथल्या ताईनी पुरणपोळी पानात वाढली आणि आम्हाला आश्चर्यच वाटलं. भाजी, पिठलं, भाकरी अशा जेवणात अचानक पुरणपोळी पानात आली. विचारलं तर त्या म्हणाल्या आत्ताच मंदिरातून हा प्रसाद आलाय. ऐकलं आणि आम्ही चमकलोच. नुकतंच मंदिरात झालेलं गणरायाचं सुंदर दर्शन आणि ध्यानीमनी नसताना मिळालेला हा प्रसाद गणाधिशाच्या अस्तित्वाची आणि त्याचं सदैव आमच्याबरोबर असण्याची जाणीव क्षणातच झाली. आणि पुन्हा एकदा मनोमनी नतमस्तक झाले. 
               भोजन करुन आम्ही निघालो ते पोहोचलो थेट मुरुडच्या समुद्र किनारी. अतिशय सुंदर , स्वच्छ आणि विस्तिर्ण असा हा समुद्र किनारा. गेल्या काही वर्षांपासून घोडागाडीची रपेट आणि विविध खेळ इथे सुरु झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी होते. पण आम्ही थोडं लवकर गेलो असल्याने किनाऱ्यावर जास्त वर्दळ नव्हती. 
                मुरुड हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं गांव. त्यांचं नांव त्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या शाळेला दिलं आहे. हिरव्या वनराईनं नटलेलं मुरुड छोटं टुमदार गाव.
                समुद्राला ओहोटी असल्याने लाटांशी खेळायला मिळालं नाही मग समुद्र किनारी फिरुन, छायाचित्रं काढून, शंखशिंपले वेचून आम्ही घरी जाण्यासाठी मार्गस्थ झालो.
                दुसरा दिवस गणेश जयंतीचा. अतिशय आनंदात, गडबडीत, तयारीत दिवस गेला. सायंकाळी मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी गेलो. आमचं हे मंदिर रस्त्यापासून थोडं आत आहे. रानातल्या पायवाटेने थोडं चालत जावं लागतं. मंदिराच्या एका बाजूला रान अन दुसऱ्या बाजूला सुपारीच्या सुरेख बागा आहेत. आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा तिथले कार्यक्रम,  सहस्त्रावर्तनं संपतच आली होती. नंतर पूजा, आरती यथासांग पूर्ण झाली. सगळे तिथून दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघाले, आम्ही तिथेच थांबलो. जवळच्या सुपारीच्या बागेत पाटाचं पाणी झुळझुळ वहात होतं. साऱ्या बागेत पाटाचं पाणी फिरवलं होतं. अशा स्वच्छ नितळ पाण्यात जायचा मोह आवरणं अशक्यच. त्यामुळे लगेचच खाली बागेत उतरुन पाण्याजवळ गेले. पावलांना पाण्याचा थंडगार स्पर्श झाला आणि तनामनावर शिरशिरी उमटली. किती वेळ झाला तरी त्या पाटाच्या पाण्यातून बाहेर यावसंच वाटत नव्हतं. नंतर तिथून निघालो ते कोळेश्वराच्या दर्शनाच्या ओढीनेच. 
                कोळथरे येथील हे कोळेश्वराचं पुरातन मंदिर. महादेवाचं मुख्य मंदिर आणि आजूबाजूला इतर छोटी मंदिरं असं याचं स्वरुप आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. कोळेश्वराचं दर्शन घेऊन निघालो ते थेट पोहोचलो तिथल्या समुद्र किनारी. कोळथरचा समुद्र किनाराही अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. इथे पर्यटक फक्त समुद्र अनुभवायला येतात. आम्ही खरंतर सुर्यास्ताच्या वेळेलाच समुद्रावर पोहोचलो होतो. पण ढगाळ वातावरणामुळे सूर्यास्त पहाता आला नाही. मात्र आकाशात हलका केशररंग पसरला होता. त्यामुळे छान छायाचित्रं काढता आली. तिथून घरी परत आलो. रात्री नैवेद्य भोजनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला.
                उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून थोडं दूर असलेल्या आमच्या बागेत फिरुन आलो. मग सारं आवरुन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

                कोकणात गावाला घरी नेहमीच जाणं होत असतं. आजुबाजुच्या गावात फिरणंही नेहमी होत असतं. पण प्रत्येक वेळी वेगळं सृष्टी सौंदर्य पहयला, अनुभवायला मिळतं. आणि एक वेगळीच उर्जा घेऊन घरी परत येणं होतं. 

- स्नेहल मोडक

Thursday, January 20, 2022

पौष पौर्णिमा - गिरनारी

             पौष पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. अष्टमीपासून सुरु होणारं शाकंभरी देवीचं नवरात्र पौर्णिमाला समाप्त होतं. 
             पृथ्वी वर पडलेल्या प्रचंड दुष्काळापासून जनतेला वाचविण्यासाठी माता पार्वतीने अवतार धारण केला आणि आपल्या तनुवरल्या फळं,भाज्या वनौषधींचा उपयोग करुन जीवसृष्टी वाचवली आणि त्यामुळे तिला शाकंभरी देवी हे नांव मिळालं. 
             अशा वैशिष्ट्यपूर्ण पौष पौर्णिमेला आम्हाला पुन्हा एकदा गिरनार शिखर दर्शन आणि अखंड धुनी दर्शनाचा योग आला हे खूप भाग्याचंच.
             पौष पौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं खरं पण नेमकं त्याचदरम्यान काही घरगुती कार्यक्रम आधीच ठरलेले होते. मग कार्यक्रमाला फक्त उपस्थिती लावून गिरनारला जायचं ठरवलं. जायच्या आधी दोन दिवस पित्तामुळे माझी तब्येत बिघडली. पण  शक्य तेवढा आराम करुन आणि औषध घेऊन गिरनारला जायचं नक्की केलं. 
             पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी लवकर निघून रात्री वेळेत भवनाथ तलेटीला आमच्या रहाण्याच्या ठिकाणी पोहोचलो. खोलीवर जाऊन ताजंतवानं होऊन जेवण्यासाठीसाठी पुन्हा बाहेर पडलो. परंतु वाढत्या निर्बंधांमुळे सारी दुकानं आणि उपहारगृहही दहा वाजत आल्याने बंद होण्याच्या तयारीत होती. फारशी भूक नसल्याने गरमागरम ठेपले आणि त्याबरोबर झणझणीत मिरची लोणचं बांधून घेतलं आणि आमच्या रहाण्याच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या पहिल्या पायरीचं आणि मारुतीरायाच दर्शन घेऊन परत आलो. जेवण करुन गिरनार दर्शनाचं सुखस्वप्न पहातच निद्राधीन झालो.
             दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर आवरुन पुन्हा पहिल्या पायरीचं आणि मारुतीरायाच दर्शन घेतलं, प्रार्थना केली आणि उडन खटोलाजवळ जाऊन रांगेत उभं राहिलो. भल्या पहाटेपासून उडन खटोलासाठी भाविक रांगेत उभे होते. ठरलेल्या वेळी उडन खटोलाच्या फेऱ्या सुरु झाल्या आणि थोड्या वेळातच आम्ही अंबाजी टुकवर पोहोचलो. नुकताच सूर्योदय झाला होता. एका बाजूला सोनकेशरी रंग पसरला होता तर दुसऱी बाजू अजून धुक्याची दुलई लपेटून बसली होती. अतिशय सुंदर नजारा होता. आकाश सोनकेशरी रंगात रंगलेलं, खाली धुक्याची दुलई आणि अंबाजी टुकवर जमलेले, भक्तीरसाने  रसरसलेले सारे भाविक, सारंच अप्रतिम. गिरनारचं वैशिष्ट्यच असं आहे की प्रत्येक वेळी तो वेगळ्याच सौंदर्यानं नटलेला आणि भक्तीरसात चिंब भिजलेलाच असतो.  गिरनारहून परत यावसंच वाटत नाही इतका तिथला परिसर भारलेला आहे. साक्षात श्री दत्तात्रेयांच्या तपोबलाने पावन झालेल्या त्या भूमीवरुन दर्शन घेऊन परत फिरावसंच वाटत नाही.
             अंबामातेच दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गोरक्षनाथ टुकवर पोहोचून दर्शन घेतलं आणि मंदिरासमोरील पापपुण्याच्या छोट्याशा बोगद्यातून (खिडकी) रांगत बाहेर येऊन पुन्हा पुढे गुरुशिखराकडे निघालो. काही वेळातच गुरुशिखरावर पोहोचलो. पुढच्या काही क्षणातच मी श्री दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि जाणवली ती अपार तृप्ती. स्वयं श्री दत्तात्रेय सतत आपल्याबरोबर आहेत ही जाणीवच फार विलक्षण आहे. मी घरुन करुन नेलेला नैवेद्य दत्तगुरुंना अर्पण करुन, तीर्थ आणि अष्टगंध लेऊन अखंड धूनीच्या दर्शनाला गेलो.
             अखंड धुनी ही दर सोमवारी सकाळी दोन तासांसाठी प्रज्वलित होते. दर सोमवारी तिथले साधूसंत पिंपळवृक्षाची काष्ठं धूनीच्या स्थानी रचतात आणि काही क्षणातच धुनी प्रज्वलित होते. पुढचे साधारण दोन तास धुनी तशीच प्रज्वलित असते.  यावेळी पौर्णिमा आणि सोमवार असा विशेष योग आल्यामुळे धुनीच्या दर्शनाला खूपच गर्दी होती. त्यामुळे थोड्या पाय-या उतरुन रांगेत उभं राहिलो. साधारण तासाभरात आम्ही धुनीजवळ पोहोचलो. मला धुनींचं दर्शन झालं आणि मी तिथेच अक्षरशः खिळून उभी राहिले. माझ्या दृष्टीसमोर होत्या धुनीतल्या केशरपिवळ्या ज्वाला आणि दत्तगुरुंची प्रसन्न मूर्ती. काही क्षणांनी भानावर आले आणि अन्नछत्रासाठी नेलेला शिधा, रक्कम गुरुजींच्या हाती अर्पण करुन नतमस्तक झाले. धूनीचं भस्म लेऊन प्रसाद ग्रहण करण्यासाठी बाजूच्या सभागृहात गेलो. नंतर तिथे लागूनच असलेल्या एका छोट्या समाधीस्थळी जाऊन बसलो. पून्हा एकदा शांतपणे गुरुशिखर आणि अखंड धुनीचं मानसदर्शन केलं.  गुरुचरित्राचं थोडं वाचन करुन मार्गस्थ झालो. गोरक्षनाथ टुकवर पोहोचून पून्हा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन अंबाजीटुक येथे आलो. अंबामातेचही परत एकदा दर्शन घेऊन उडन खटोलाजवळ आलो. काही वेळातच उडन खटोलाने तलेटीला परत आलो. रहाण्याच्या ठिकाणी परत येऊन थोडा आराम करुन परतीच्या प्रवासाला लागलो.
             कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष सलग तीन पौर्णिमा गिरनार दर्शन श्री दत्तगुरुंनी आम्हाला घडवलं हे आमचं फारच मोठं भाग्य.
             कार्तिकी पौर्णिमेला दर्शन आणि परिक्रमा दोन्हीचा योग आला. निर्बंधांमुळे सुरुवातीला परिक्रमेला परवानगी नव्हती. पण श्री दत्तगुरुंनी भक्तांची प्रार्थना ऐकली आणि ऐनवेळी परवानगी मिळाली. आमच्यासारख्या साऱ्या भाविकांना परिक्रमा करता आली म्हणून वेगळंच समाधान लाभलं होतं. 
             दत्तजयंतीला गिरनारला जायचा आनंद तर विशेषच होता. नेहमी आम्ही दोघं आणि स्नेही असंच दर्शनाला जातो. यावेळी मात्र मुलीही बरोबर होत्या. त्यांना तर दर्शनाला येण्याआधीच श्री दत्तात्रेयाच्या अस्तित्वाची, आमच्या जवळ असण्याची प्रचिती आली होती. त्यामुळे दत्तजयंतीलाही उत्तम रितीने गिरनार दर्शन झालं होतं. त्यादिवशीही संपूर्ण गिरनार धुक्यात हरवला होता. चैतन्याने भारलेलं अतिशय सुंदर वातावरण होत. सूर्योदय होऊनही बराच वेळ सारा परिसर धुक्याची दुलई पांघरूनच बसला होता. 
             भवनाथ तलेटीचा सारा परिसर मला खूप आवडतो. सतत उत्सहाने भरलेल्या आणि भाविकांनी फुललेल्या या ठिकाणी  पोहोचलं की आपणही त्या उत्साहाचा भाग होतो, एका वेगळ्याच विश्वात रमतो. गिरनार पर्वताच्या नुसत्या दर्शनानेही लीनता येते. आणि प्रत्यक्ष दर्शनाचं समाधान तर अवर्णनीयच.
             खरंतर नोव्हेंबर २०१९ आधी कुणी ज्योतिषांनी जरी मला भविष्य सांगितलं असतं तरी माझा विश्वास बसणंच कठिण होतं की इतका मोठा गिरनार वारीचा विशेष योग आमच्या आयुष्यात येईल. खरंच स्वयं श्री दत्तात्रेयच आम्हाला प्रत्येकवेळी गिरनार वारी घडवत आले आहेत. आम्ही फक्त प्रार्थना करतो आणि पूर्तता श्री दत्तगुरु करतात. 
           || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त  ||


मनी एकच ध्यास एकच आस
लाभो निरंतन तव सहवास
     मिटल्या नेत्रीही तू नित्य दिसावे
     पापणीत डोळीयांच्या तू असावे
हृदयमंदिरी तू सदा वसावे
अधरावरती तू  नित्य रहावे
     श्वासागणिक तुजला मी स्मरावे
     नामातच तुझिया सदा रमावे
कातर हळव्या क्षणी तू असावे
झुल्यावर सुखाच्या तुज स्मरावे
            सगुण निर्गुण भेदच नुरावे
            दत्तचरणी 'मी' पण हे सरावे
मनी एकच ध्यास एकच आस
लाभो निरंतन तव सहवास

- स्नेहल मोडक

Wednesday, January 12, 2022

बंध मैत्रीचे

                    कोरोना आणि काही इतर कारणांमुळे गेली दोन वर्षं पुढे पुढे जात राहिलेल्या आम्हा मित्रमैत्रिणींच्या स्नेहसंमेलनाला अखेर मुहूर्त मिळाला. तारिख आणि ठिकाण ठरवून रेल्वेचं आरक्षण केलं आणि सगळ्यांमधे उत्साहाची लहर पसरली.
                     मळवली - लोणावळ्यापासून अगदी जवळ म्हणजे नऊ किमी अंतरवार असलेलं एक छोटंसं शांत पण निसर्गरम्य गांव. आमच्या स्नेहसंमेलनासाठी या मळवलीमधलाच एक सुंदर बंगला आरक्षित केला होता. 
                    खरंतर काही कारणास्तव मी या संमेलनाला न जाण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यामुळे माझे सारे मित्रमैत्रिणी खूपच नाराज झाले होते. त्यांची नाराजी मला सतत जाणवत होती. अखेर संमेलनाच्या आदल्या दिवशी कारणं बाजूला ठेवून मी जीवलगांबरोबर संमेलनाला जायचं ठरवलं. रात्री उशिरा जायची तयारी केली आणि सगळेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भेटीचं स्वप्न पाहातच निद्राधीन झालो.
                   दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने सारे निघालो. एका मैत्रिणीने भल्या पहाटे उठून उत्साहाने तयार केलेल्या चविष्ट नाश्त्याने प्रवासाची छान सुरुवात झाली. नाश्त्याबरोबर गप्पाही रंगल्या. आणि त्यात वेळ कसा गेला कळलही नाही. आम्ही लोणावळा स्थानकावर उतरलो. तिथून थोडं दूर असलेल्या पण संमेलन स्थळ म्हणून ठरवलेल्या मळवली गावातील बंगल्यापर्यंत जाण्यासाठी एका मित्राने गाडीची व्यवस्था आधीच केली होती. त्या गाडीने आम्ही संमेलन स्थळी पोहोचलो. काही मित्र मैत्रिणीं दूसरीकडून येणार होते. त्यांना आमच्याबरोबर रेल्वेनं येणं शक्य नसल्यानं एका मित्राच्या गाडीने तेही एकाच वेळी संमेलन स्थळी पोहोचले. बंगला गावापासून थोडा आत होता. पण आवारात सुंदर बाग फुलवलीय. आणि जवळुन एक लहानशी नदी वाहते. एखाद्या छानशा चित्रासारखंच हे ठिकाण आहे.
                    सारे एकत्र जमलो आणि मग सुरु झाली धमाल मजामस्ती. बंगल्यात पोहोचलो, ताजेतवाने झालो आणि मग सुरु झाला यज्ञ - गप्पांचा अखंड यज्ञ. त्यात वाफाळत्या चहाची पहिली आहुती पडली आणि यज्ञ तेजाळला. नंतर भोजन आहुती अर्पण करेपर्यंत त्यात गप्पा आणि छायाचित्रणाच्या समीधा वाहणं अखंड सुरु होतं. झणझणीत भरली वांगी आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरी अशा गावरान जेवणाचा आस्वाद घेत गप्पा अधिकच रंगल्या होत्या.
                    भोजनाच्या आहुतीनंतरही गप्पांच्या समीधा यज्ञात पडतच होत्या. नंतर यज्ञ थोडा बाजूला ठेवून जवळच्या तरणतवावात मनसोक्त खेळून यज्ञाची धग थोडी कमी केली. मग परत आवरुन अंगणातच बसून वाफाळत्या चहाची आहुती यज्ञार्पण केली. मधल्या काळात सकाळपासूनचं स्वच्छ आकाश भरुन यायला लागलं होतं. चहा होईपर्यंत आकाशात मेघ दाटून आले. चहापानानंतर आम्ही जवळच थोडं फिरुन आलो. थोड्याच वेळात वरुणराजाने आमच्यावर गुलाबपाणी शिंपडायला सुरुवात केली. गार वारा आणि पावसाचा हलका शिडकावा वातावरण अतिशय सुंदर झालं होतं. गप्पा गोष्टी आणि छायाचित्रांचा यज्ञ सुरुच होता.
                     दोन मित्रांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ऐनवेळी ते संमेलनाला येऊ शकले नाहीत तर एक मित्र कामाच्या व्यस्ततेमुळे रात्री येणार होता त्याची वाट पहाणं सुरु होते. न आलेल्या मित्रांची उणीव सतत जाणवत होती. 
                    अशातच सांजसावल्या गडद झाल्या आणि पावसाचा शिडकावाही वाढला. मग घरात बसून खेळायचं ठरवलं. एका मित्राने घेतलेल्या या खेळाचा मुख्य उद्देश व्यक्त होणं हाच होता. 
                    खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या असतात. पण त्यासाठी योग्य वेळ आणि आपल्याला समजून घेणारी योग्य व्यक्ती हे दोन्ही असावं लागतं. बहुतेक वेळा आपल्याला कुणी समजून घेणार नाही या भावनेतून आपण अव्यक्त रहातो. आणि मनाच्या तळाशी या मनभावना दडपून टाकायचा प्रयत्न करत असतो. पण त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि पर्यायाने तब्येतीवर होतच असतो. मित्रमैत्रिणींचं स्नेहसंमेलन हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. इथं आपल्याला समजून घेणारे मित्रमैत्रिणी आहेत याची जाणीव होते आणि मग गप्पांच्या, खेळांच्या माध्यमातून इथं प्रत्येकाला मनापासून व्यक्त होता येतं. आणि मग मनमुक्त झाल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं.
                    आम्ही असंच मनमुक्त बोलत असतानाच काम संपवून येणाऱ्या मित्राचं आगमन झालं आणि आमच्या खेळाची रंगत अजूनच वाढली. अखेर खूप उशीराने गप्पांच्या यज्ञात भोजनाची आहुती दिली. आणि पुन्हा नवीन खेळाला सुरुवात केली. उशीरापर्यंत जागरण करुन अखेर थोडीशी विश्रांती घेतली. 
                   लगेच पहाटे ऊठून फिरायला गेलो. साऱा परिसर धुक्याची दुलई पांघरून बसला होता. पूर्वदिशेला पसरत असलेला सोनकेशरी रंग पाहात, छायाचित्र काढत, गार वारा अनुभवत आम्ही फिरत होतो. काही वेळातच सूर्योदयाचं सुंदर दृश्य डोळ्यात आणि छायाचित्रात साठवत परत आलो. 
                 आदल्या दिवसापासून सुरु असलेल्या यज्ञात पून्हा वाफाळत्या चहा आणि चमचमीत मिसळीची आहुती दिली. सारं आवरुन परत गप्पा, गाणी, खेळ, छायाचित्रं यात दंग झालो. अखेर काही वेळातच यज्ञात भोजनाची पूर्णाहुती दिली. आम्हाला दोन दिवस उत्तम चवीचं, आमच्या पसंतीचं, चहा, नाश्ता, भोजन करुन खाऊ घालणाऱ्या पती-पत्नी चा निरोप घेऊन तृप्त मनाने आम्ही निघालो. 
                 मळवलीपासून जवळच भाजे आणि कार्ल्याची प्राचीन लेणी आहेत. ही लेणी आणि कार्ल्याच्या एकवीरा देवीचं मंदीर पाहण्यासारखे आहेत. तसंच इथं मराठा साम्राज्याचा इतिहास सांगणारे लोहगड आणि विसापूर हे किल्लेही पहाण्यासारखे आहेत.
                आम्ही जवळच असलेला लोहगड किल्ला बघायला जायचं आधीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे किल्ल्याजवळ पोहचलो. हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला गेलाय. अतिशय मजबूत आणि बुलंद असा हा किल्ला आहे. अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा किल्ला पहाण्यासाठी खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागतं. पण गप्पा आणि छायाचित्रणाच्या नादात दमल्याची जाणीव न होता आम्ही वरपर्यंत चढून गेलो. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा हे पहात महादरवाजातून पुढे गेल्यावर एक ध्वजस्तंभ, लक्ष्मी कोठी, शिवमंदिर, एक छोटंसं अष्टकोनी तळं हे सारं पहाता येतं. वर पोहोचलो आणि एका वेगळ्याच आनंदानं मन भरुन आलं. नुसतं किल्ला चढतानाही आपल्याला दमायला होतं आणि जाणवतं त्याकाळी कुठलीही सुविधा नसताना बांधलेल्या अशा साऱ्या अभेद्य किल्ल्याचं महत्व. किती विपरीत परिस्थितीत बांधलेत हे सारे गडकिल्ले. कुठून आली असेल एवढी शक्ती त्या लोकांमध्ये. जिद्द, निष्ठा, जीवाची बाजी लावणं या साऱ्या शब्दांचा खरा अर्थ या इतिहासातूनच कळतो. किल्ल्यावर पोहोचून मनोमनी नतमस्तक होऊन, फिरुन, छायाचित्र काढून परत खाली उतरलो.
                 दोन दिवस सुरु असलेला हा संमलनाचा यज्ञ पुनरागमनायच म्हणून तात्पुरता शांत केला आणि गोड आठवणींची शिदोरी बरोबर घेऊन उत्फुल्ल मनाने परतीच्या प्रवासाला लागलो. 

      
जरतारी वस्त्र खास मैत्रीचे
स्नेहाच्या धाग्याने विणायचे
   गीत सुमधुर हे आयुष्याचे
   द्यायचे स्वरसंगीत मैत्रीचे
स्वप्नचित्र मनी रेखायचे
रंग मैत्रीचे त्यात भरायचे
   शांत अव्यक्त मन जपायचे
   अन मैत्रीत मनमुक्त व्हायचे
जीवन सारे जरी सुखदुःखाचे
मैत्रीचे इंद्रधनु त्यात फुलवायचे
   मैत्रीचे इंद्रधनु त्यात फुलवायचे

- स्नेहल मोडक

Monday, January 3, 2022

प्रारंभ नववर्षाचा

     पुन्हा एक नवं वर्ष सुरु झालंय. गतवर्षीच्या साऱ्या आठवणी आणि आपल्या माणसांसह या नवीन वर्षाचं स्वागत करुया. कटू आठवणी विसरुन, दु:खद आठवणींना काळाचं औषध लावून, आपल्याला आणि आपल्या साऱ्या सुहृदांना जपूया. नवीन वर्ष सौख्य समृध्दी आणि उत्तम आरोग्याचं असावं यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया. म्हणजे आपल्या आयुष्याचं गीत सुमधुर नक्कीच होईल, हो ना?


   

सूर संगीताचे मनी उमलावे

नीत नवे तराणे हृदयी छेडावे 

     श्वासातूनी आपल्या गीत फुलावे

     अधरातल्या तानेवर मन झुलावे

सुरावटीवरी जणू स्वैर विहरावे

नादावरी अलवार पाऊल थिरकावे

      भलेबुरे ते सारे विसरावे

      गीतामधूनी मनमुक्त व्हावे

क्षणी सुखाच्या संगीत ऐकावे

विरहात कुणाच्या गीत ते गावे

       विसरुन सारे स्वच्छंद जगावे

       गीत जीवनाचे गातच रहावे


- स्नेहल मोडक

Saturday, December 25, 2021

वर्ष सरताना...

              आपल्या आयुष्यातलं हे वर्ष सरत आलय. एक जानेवारीला सध्याच्या दिनदर्शिकेच्या जागी एक नवीन दिनदर्शिका येईल. आणि पुन्हा दर महिन्याला त्या दिनदर्शिकेचं एक-एक पान उलटलं जाईल. आपलं आयुष्य ही इतकं सहजसोपं असतं का हो?

              सरत्या वर्षाबरोबरच आपलं अनुभवांचं, सुखदु:खाचं गाठोडंही मोठं होत असतं. त्यातूनच आपण नवीन वर्षाचे काही संकल्प करतो. अर्थात काही पूर्ण होतात तर काही अपूर्ण...


अजून एक वर्ष सरत आलय

आठवणी साऱ्या ठेवून जातय

मोती खास मैत्रीचे काही विखुरले

नव मैत्रीचे बंध ते अलगद जुळले

सुटले काही दूरच्या नात्यांचे बंध

जुळले काही नवागतांशी संबंध

आले रागरुसवे झाले गैरसमज

जाणले कुणी भाव मनीचे सहज

घडल्या भेटी कुणी झाले मनमुक्त

टाळूनी भेट राहिले कुणी अव्यक्त

स्वप्नफुले काही सहजच उमलली

असूनी निगराणी काही कोमेजली

सरत्या वर्षाचा हा आलेखच असे

मनी नववर्षाचे कल्पनाचित्र वसे

चुका अन गैरसमज ते विसरुया

अन नात्यांचे भावबंध घट्ट विणूया

स्वप्नपंख लेऊनी नभी विहरुया

नववर्षाचा हाच संकल्प करुया

- स्नेहल मोडक


Monday, December 6, 2021

झिम्मा

              सहज बोलता बोलता अचानक लेक म्हणाली 'आई आपण झिम्मा बघुया'. क्षणभर ती काय म्हणतेय ते मला कळलंच नाही. मग तिने मला या चित्रपटाबद्दल सांगितलं. लगेच त्याची झलक असलेली चित्रफितही दाखवली आणि मलाही हा चित्रपट पहायची उत्सुकता निर्माण झाली. खरंतर चित्रपट आणि मालिका यांच्याशी माझं सख्य जरा कमीच. मात्र खास विषयांवर आधारित चित्रपट मी नक्की पाहते. ठरवल्यानुसार हा चित्रपट पाहिला आणि त्यावर व्यक्त व्हावं असं वाटलं.

              इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट 'झिम्मा'. यातील उत्तम कलाकार आणि त्यांचा अतिशय सहजसुंदर असा अभिनय आणि संपूर्ण चित्रपटात असलेली नयनरम्य अशी लंडनची पार्श्वभूमी यामुळे जणू आपणही या चित्रपटाबरोबर लंडनचा प्रवास करुन येतो.

             इरावती कर्णिक यांचं , 'प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो' हे एक वाक्यच संपूर्ण चित्रपटाचं सार सांगून जातंं. स्वतः ला किंवा इतरांना समजून घेण्यासाठी, नव्याने ओळखण्यासाठी पर्यटन हे अतिशय सुंदर माध्यम आहे. एकट्याने प्रवास करताना आपण स्वताच स्वताला नव्याने गवसतो. तर बरोबर कुणी असेल तर त्या व्यक्तीच्या सहवासाबरोबर त्या व्यक्तीला अतिशय जवळून ओळखताही येतं. कधी कधी आपणच आपल्यावर विनाकारण अनेक बंधनं घालून घेतलेली असतात. कधी काही घटनांचा खोलवर परिणाम झालेला असतो आणि त्यातून आपण आपलं अस्तित्वही विसरुन गेल्यासारखं जगत असतो. या साऱ्यातून बाहेर पडून आपलं आयुष्य पूर्ववत होण्यासाठी पर्यटन हा एक छान उपाय आहे.

               रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वताला थोडं बाहेर काढून सात स्त्रिया लंडन प्रवासाला निघतात. या साऱ्या स्त्रिया वेगवेगळ्या वयोगटातल्या , वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या अशा आहेत. इंग्लंड सहलीच्या निमित्ताने या सगळ्या जणी एकत्र येतात. संपूर्ण चित्रपट या सहलीदरम्यान घडणाऱ्या धमाल, मजामस्तीच्या चित्रांनी सजलाय अर्थात त्या सगळ्या चित्रांना प्रत्येकीच्या आयुष्यातील हळव्या घटनांची किनारही आहे.

              कुठल्याही स्त्रीला बाहेर पडताना खूप वेगवेगळ्या पातळ्या ओलांडाव्या लागतात. मुळात तिने स्वतावर जी बंधनं घालून घेतलेली असतात त्यातून मार्ग काढणं तिला जरा कठिणच होतं. पण कधीतरी तिलाच या बंधनातून मुक्त व्हावसं वाटतं आणि मग मात्र ती 'स्व' च्या शोधासाठी नक्की बाहेर पडते. आणि यासाठी पर्यटन हा एक सुंदर मार्ग आहे. अशा प्रवासातच तिला स्वतः ची नव्याने ओळख होते. सगळ्यांबरोबरच स्वताच्या मनाचाही विचार ती आवर्जून करु लागते. कधी एखाद्या घटनेचा आपण किती खोलवर विचार करत असतो, विनाकारण एखाद्या गोष्टीची अतिकाळजी करत असतो, कुटुंबिय, आप्तस्वकीय यांच्या जबाबदारीत नको इतके अडकलेले असतो या सगळ्या गोष्टींची जाणीव तिला होते. आणि त्यातून ती स्वतःच्या मनाला हळूहळू पण निश्चितपणे बाहेर काढते. अशा प्रवासात नव्या मैत्रीणी मिळवते. तर प्रवासात बरोबर एखादी मैत्रीण असेल तर त्यांच्यातल्या मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतात. अशा पर्यटनाला निघताना जरी तिची द्विधा मनस्थिती असली तरी नंतर मात्र ती प्रवासातल्या अनुभवातून अतिशय उत्साहात, आनंदात आपल्या रोजच्या कामात दंग होते. 

               माझ्यासाठीही पर्यटन हा नेहमीच एक आनंदानुभव असतो. अर्थात एकटीने प्रवास करायची वेळ सहसा माझ्यावर येत नाही. कुटुंबिय किंवा मित्रमैत्रिणी बरोबर असतातच. पण प्रत्येकवेळी मी माझी मलाच नव्याने उलगडत जाते. एखाद्या गोष्टीबद्दलचं अज्ञान, भिती, समज गैरसमज दूर होतात. स्वत: च्या क्षमतेची जाणीव होते.

               या प्रवासाचाच 'झिम्मा' या चित्रपटात अतिशय सहज सुंदर खेळलाय. मनमुक्त हसवणारा पण मध्येच हळवं करणारा, अगदी आवर्जून पहावा आणि आपल्यातल्या 'स्व' ला आपणही असंच जपावं याची सहज जाणीव करुन देणारा हा चित्रपट आहे.

- स्नेहल मोडक

Saturday, December 4, 2021

मनोमनी

              कधी कधी आपल्या आयुष्यात अशी काही एखादी घटना घडते किंवा कधी विचित्र परिस्थिती निर्माण होते आणि आपली मनस्थिती द्विधा होते. आजूबाजूला सारं काही नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु असतं, आपणही यांत्रिकपणे वावरत असतो पण आपलं मन मात्र थाऱ्यावर नसतं. या सगळ्यांपासून कुठतरी दूर जावं एकटं शांत बसावं असं काहीसं वाटत असतं. कुणाला त्रास होऊ नये, काही जाणवू नये म्हणून आपण सहज वावरायचा प्रयत्न करत असतो पण मन मात्र भावनांचा गोफ विणतच रहातं.


कधी वाटते एकलेच तळ्याकाठी बसावे

शांत जलाशयासम स्तब्ध नि:शब्द रहावे

        जसे पर्ण तरंगे संथ नितळ जळावरी

        उठती भावनांचे तरंग जणू मनावरी

कधी वाटते एकलेच फिरावे काजळ राती

होऊनी अंधारसावली विसरावी सारी भीती

        जावे विसरुन सारी जणू फसवी नातीगोती

        विणावा कोष हा निर्विकारतेचा मनाभोवती

कधी वाटते एकलेच पावसात भिजावे

कुणास नकळत आसवांचे पाट वहावे

        भिजूनी पाऊसधारात तनमन शांतवावे

        कल्लोळ भावनांचे हृदयातून संपवावे

कधी वाटते फिरावे घनदाट अरण्यात

हलके ओघळावे दु:ख दाटल्या पापण्यांत

        वाढली जरी किती ऊंची स्पर्श धरेचा असावा

        पानगळीसम निरपेक्ष निर्विकार भाव उरावा

             पानगळीसम निरपेक्ष निर्विकार भाव उरावा

- स्नेहल मोडक

कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...