Pages

Tuesday, April 27, 2021

कधी कधी वाटतं...

                आपलं मन कधी आशेच्या हिंदोळ्यावर झुलतं तर कधी निराशेच्या डोहात शिरतं. आपली तब्येत, आजूबाजूच्या घटना, इतर परिस्थिती यानुसार आपल्या मनात भावतरंग उमटत असतात. मनसोक्त भटकावं, निसर्गाच्या सान्निध्यात रममाण व्हावं आणि सदैव आपल्या माणसांचा सहवास लाभावा ही प्रत्येक मनातली इच्छा. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतच असतो.


कधी कधी वाटतं

  पहाटसमयी घनदाट जंगलात फिरावं

  पक्ष्यांचे मधुर कूजन ऐकून मन प्रसन्न व्हावं


कधी कधी वाटतं

   दिवसभर शुभ्र निर्झराजवळ बसावं

   स्पर्श होता शीतजळाचा मन तृप्त व्हावं


कधी कधी वाटतं

   वेगवेगळ्या छोट्यामोठ्या गिरीशिखरांवर चढावं

   आपल्या क्षमता अन जिद्दीला आपणच जाणावं


कधी कधी वाटतं

   साऱ्या गड किल्ल्यांवर इतिहास आठवत फिरावं

   शिवराय अन मावळ्यांसमोर नतमस्तक व्हावं


कधी कधी वाटतं

   फेसाळत्या लाटा पहात सागरतीरी बसावं

   मनभावनांचे चित्र अलगद वाळूवर रेखावं


कधी कधी वाटतं

   धुवांधार बरसणाऱ्या पावसात चिंब भिजावं

   ओघळणाऱ्या थेंबांनी मन शांत शुध्द व्हावं


कधी कधी वाटतं

   नात्यांच्या अन मैत्रीच्या साऱ्यांना सहज भेटावं

   अन घट्ट गळाभेटीने विरहाचं मळभ दूर व्हावं


कधी कधी वाटतं

   कधी कधी वाटणाऱ्या या भावनांना मूर्तरुप द्यावं

   अन वेगवेगळ्या अनुभवांनी आपण समृध्द व्हावं


- स्नेहल मोडक

Friday, April 16, 2021

श्रीमंत गल्ली


              श्रीमंत आणि तीही गल्ली? हो अगदी बरोबरच आहे. श्रीमंती जशी आर्थिक असते तशीच मनाची, बुध्दीची, विचारांची, नात्यांची अशा अनेक प्रकारांची असते. आणि अगदी तशीच निसर्गाचीही असते श्रीमंती. या वनसंपदेनंच श्रीमंत समृद्ध आहे आमच्या घराजवळची एक गल्ली.

                या एका गल्लीत एवढे विविध पुष्पवृक्ष आहेत की रोज त्या गल्लीतून गेल्याशिवाय मला राहवत नाही. घराबाहेर गेलं की माझी पावलं आपोआपच त्या गल्लीत वळतात.



                गल्लीत प्रवेश केला की सात - आठ पावलांवरच आपल्या स्वागताला दुतर्फा उभे असतात दोन - दोन बकुळ वृक्ष. सदाहरित असा हा बकुळ वृक्ष घुमटाकार वाढतो. या डेरेदार वृक्षाची फुलं आणि फळं मात्र नाजूक असतात. मार्च ते मे हा बकुळीच्या बहराचा काळ. तिन्हीसांज सरताना किंवा सकाळी लवकर या बकुळीच्या चांदणफुलांची मस्त पखरण झालेली असते. आणि सुगंध दरवळत असतो. या वृक्षाचा औषधांमधे उपयोग होतो. याची साल हिरड्या व दातांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. याच्या साल व फळांपासून दंतधावन बनवतात. तर सुंगधी फुलाचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी होतो.


          


                यातल्या एका बाजूच्या दोन बकुळ वृक्षांना लागूनच अजून एक सुंदर वृक्ष उभा असतो स्वागताला. खूपच कमी प्रमाणात आढळणारा असा हा वृक्ष कैलासपती किंवा नागचाफा या नावाने ओळखला जातो. हा ऊंच वाढणारा सदाहरित वृक्ष आहे. याच्या पानांचा आकारही भाल्याच्या टोकदार पात्यासारखा असतो. याच्या खोडालाच फळं फुलं येतात. १५-२० कळ्यांचे झुमके येतात. कैलासपतीची फुलं मात्र मोठी आणि चार पाकळ्यांची असतात. फुलाच्या आतला भाग म्हणजे शंकराची पिंड समजतात. आणि याचं रक्षण करण्यासाठी म्हणून बाजूला जो केसराचा भाग असतो ते म्हणजे या फुलातले श्रीकेसर. हे केसर म्हणजेच औषधांमध्ये मौल्यवान समजले गेलेले नागकेशर होय. या फुलांनाही खूप छान सुगंध असतो. ही फुलं श्री महादेवाला अतिशय प्रिय आहेत. याची फळंही आकाराने खूप मोठी असतात. यालाही मार्च ते जून या काळात बहर येतो.


                पुढे काही पावलांवरच आपल्याला सामोरे येतात दोन गुलमोहोर. गुलमोहोर साधारण एप्रिल पासून बहरायला सुरुवात होते. याच्या लालकेशरी फुलांचा बहर रणरणत्या उन्हातही डोळ्यांना सुखावतो. याच्या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर पाकळ्यांहून वेगळी असलेली एक पाकळी. ही पांढऱ्या रंगाची आणि त्यावर नाजूक लाल रेषा असलेली पाकळी असते. महाराष्ट्रातील सातारा इथे दरवर्षी एक मे रोजी गुलमोहोर दिन साजरा केला जातो. लोकांचा निसर्ग आणि पर्यावरण रक्षण, संवर्धन यातील सहभाग वाढावा म्हणून हा गुलमोहोर दिन साजरा केला जातो.


                 गुलमोहोरांच्या पुढे अगदी लगेच काही पावलांवर दिसायला लागतो बहावा. याचं त्याच्या बहराइतकंच सुंदर असं अजून एक नांव आहे अमलताश. बहाव्याचा बहर म्हणजे पिवळ्या पुष्पांची जणू लटकती झुंबरे. जितका सुंदर तितकाच औशधी असा हा वृक्ष. याच्या गराचा उपयोग काविळीवरील औषधात केला जातो. मार्च महिन्यात हा बहरायला सुरुवात होते.



                  या देखण्या बहाव्याच्या वृक्षाच्या बाजूलाच ऊभा आहे एक वेगळाच वृक्ष, पद्मक किंवा पद्मकाष्ठ ( Wild Himalayan Cherry ). याला फिकट गुलाबी रंगाची पाच पाकळ्यांची मोठ्या आकाराची फुलं येतात. खूप औषधी गुणधर्म असलेलं हे झाड. याचा उपयोग त्वचारोग, केसांच्या समस्या, पोटाच्या विकारांवर होतो. चूर्ण, तेल या स्वरुपात या वृक्षापासून आयुर्वेदिक औषधे बनविली जातात.  फिक्ट गुलाबी रंगांच्या फुलांनी बहरलेला हा वृक्षही खूप सुंदर दिसतो.


                   रस्त्याच्या एका बाजूला बहावा आणि पद्मकाचे झाड तर दुसऱ्या बाजूला आहे पांढरा चाफा. यालाच देवचाफा किंवा खुरचाफा या नावानेही ओळखतात. मार्च महिन्यातच याच्या बहराला सुरुवात होते. मात्र त्यावेळी या झाडाची संपूर्ण पानगळ झालेली असते. संपूर्ण झाड पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरलेले असते. याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांच्या मध्यभागी अगदी थोडासा पिवळा रंग असतो.


                   यानंतर लगेचच दिसतात ते सोनमोहोराचे वृक्ष. रस्त्याच्या दुतर्फा ओळीने उभे असलेले हे वृक्ष सदैव हिरवेगार असतात. आणि पिवळ्या पुष्पांनी बहरले की अधिकच सुंदर दिसतात. या झाडांच्या मध्येच आहेत अजून दोन गुलमोहोर. सोनमोहोराच्या पाच-सहा झाडांनंतर ही गल्ली मुख्य रस्त्याला मिळते.


                     इतके विविध औषधी पुष्पवृक्ष आणि या सगळ्यांच्या मधेमधे असलेली कडुनिंबाची झाडं यामुळे ही गल्ली निसर्ग समृद्ध म्हणेजच श्रीमंत आहे असंच म्हणायला हवं.

                                     - स्नेहल मोडक

Sunday, April 11, 2021

आरसा बिलोरी

              तसं पहायला गेलं तर आरसा एक साधी अचेतन निर्जीव वस्तू. पण त्याच आरशात कुणी डोकावून पाहिलं की मात्र तो आरसा अगदी सचेतनच होतो जणू.

              आपल्या सगळ्या भावभावनांचं प्रतिबिंब आपल्याला आरशात दिसतं.

               एखाद्या आनंदाच्या क्षणी जेव्हा आपण आरशात डोकावतो तेव्हा तो आरसाही आपल्या आनंदात सामील होतो. 

               कधी काही मनाविरुद्ध अकल्पित असं काही घडतं पण सर्वांसमोर आपल्या भावनांना बांध घालावा लागतो. अशातच अनावधानाने आपण आरशासमोर आलो की मात्र पापण्यांचा बांध झुगारून दोन आसू तरी नक्कीच ओघळतात. त्यावेळी आपलं मन शांत करायचं काम हाच आरसा करतो.

                सणासुदीला, शुभकार्याला आपल्याला सारा साजशृंगार करायला आरसा लागतोच. आणि मनाजोगतं नटल्यावर आपल्याबरोबर आरसाही खुलतो.


प्रियसख्यासम साथ देतो बिलोरी आरसा

अव्यक्त मन जाणण्याचा जणू घेतलाय वसा

         कधी होते मन उदास वाटते सारे व्यर्थ

         पाहताच आरशात कळतो त्यामागचा अर्थ

कधी आसू पापणीआड लपवता येतात

आरशासमोर मात्र दोन मोती ओघळतात

           कधी मन कुणाच्या आठवणीत रमते

           पाहता आरशात जणू तेच चित्र उमटते

कधी सजते मोहक वस्त्राभुषणे घालून

निरखिते आरशात स्वत:लाच भान हरपून

             प्रिय सख्यासम साथ देतो बिलोरी आरसा

             अव्यक्त मन जाणण्याचा जणू घेतलाय वसा

 

- स्नेहल मोडक

hgv

Monday, April 5, 2021

ऋतू वसंत

                    'ऋतूनां कुसुमाकर' असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत म्हटलंय. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे.

                     चैत्र-वैशाख हे दोन महिने उन्हाळा आणि वसंत ऋतू यांचे जणू समीकरणच.

                     सहस्ररश्मीच्या तेजाची दाहकता वाढत असतानाच  वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी मात्र विविध रंगांनी बहरते आणि आपल्या दृष्टीसमोर रंगमयी उधळण होते.

                     वसंत ऋतू म्हणजे जणू निसर्गाची मानवाला एक शिकवण. पर्णहिन झालेल्या तरुवेलींही काही काळानंतर पुन्हा पालवतात, रंगगंधी फुलांनी बहरतात. अगदी तसंच आपल्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी खंबीरपणे पाय घट्ट रोवून उभं राहिलं तर वादळं नक्की शमतील आणि आपल्या आयुष्यातही पुन्हा पुन्हा वसंत फुलेल.


येता कुसुमाकर होई अवनी रंगगंधी

येई सुरेख दरवळ आसमंती मधुगंधी

        वृक्ष बहाव्याचा जरी जाहला निष्पर्ण

        लटकती झुंबरे पुष्पांची जणू सुवर्ण

पर्णसंभार जरी तयाचा कमी जाहला

लालकेशरात हा गुलमोहोर बहरला

        वृक्ष ताम्हिणीचा इतकीच प्रतिमा उरे

        वसंतसमयी फुलती त्यावरी जांभळे तुरे

पानगळीतही ठाम उभा वृक्ष पलाशाचा

येई ज्वाळेसम त्यास बहर सोनकेशराचा

        शीतलछाया देत हा वृक्ष‌ असे उरला

        पिवळ्या पुष्पांनी सोनमोहोर फुलला

गाळूनी सारी पर्णे उभी काटेसावर

काटयातच येई लाल गुलाबी बहर

        शुभ्र मोगरा अन मादक सुरंगी पिवळी

        दरवळे जाईजुई अन नाजूक बकुळी

कूजिती कोकिळ मोहरल्या आम्रवनी

अन फुलतो अलवार वसंत मनोमनी

                                              - स्नेहल मोडक


      

                    


Saturday, March 27, 2021

रंगपंचमी

                   फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळी पौर्णिमेचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. आणि फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे रंगपंचमी.

                  बहुतेक ठिकाणी धुलीवंदनाच्या दिवशीच रंग खेळतात. मात्र कोकणाप्रमाणेच अजूनही काही ठिकाणी रंगपंचमीलाच रंग खेळतात. 

                   रंगपंचमी म्हणजेच रंगोत्सव. वृंदावनात श्रीकृष्ण गोपगोपिकांसमवेत रंग खेळत असे. पंचमीच्या दिवशी रंगांची उधळण आणि नृत्य यांनी राधा कृष्णाचा रास रंगत असे. त्याचीच आठवण म्हणूनही आपण रंगपंचमीला रंगाची मुक्त उधळण करतो. अशुभ, वाईट गोष्टींचा नाश होऊन आपलं आयुष्यही सप्तरंगी व्हावं अशी मनोमन प्रार्थना करतो.

                   

रंगला रास गोकुळी राधारमणाचा

संगे जमला मेळा गोपगोपिकांचा

       येताच समीप कान्हा राधा बावरली

       उधळिता रंग श्रीरंगाने ती मोहरली

छेडितो अडवूनी राधेस हरी सावळा

रंगात रंगली राधा अन कान्हा आगळा

        मधुगंधी श्वासात हरीच्या राधा फुलली

        हिंदोळ्यावर स्पर्शाच्या अलवार झुलली

निळ्या आभाळी जणू जाय उंच रासझुला 

सप्तरंगी रंगली राधामोहनाची रासलीला


                                                                                                                   - स्नेहल मोडक 


Saturday, March 20, 2021

शाळा

             आठवली ना प्रत्येकाला आपापली शाळा, अगदी मनचक्षुंसमोर आली ना?

            असंख्य आठवणींचा खजिना म्हणजे शाळा. आपल्या आयुष्याच्या जडण-घडणीमधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आपली शाळा. शिक्षण संपवून आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर  मात्र शाळेला भेट देणे क्वचितच घडते. पण शाळेच्या नुसत्या उल्लेखानेही खूप साऱ्या आठवणी, घटना नजरेसमोर तरळतात. आणि अर्थातच सगळ्या मित्रमैत्रिणीं आठवून मन हळवं होतं. अशा या शाळेत जाणं जरी क्वचितच जमलं तरी स्वप्नात मात्र अधूनमधून नक्कीच येते, हो ना?

            

स्वप्नात आली काल माझी प्रिय शाळा

दिसला शुभ्र खडू अन फळा काळा

      हळूच डोकावले खोलीत शिक्षकांच्या

      तपासत होते काही वह्या अभ्यासाच्या

मन धावलं मधल्या मैदानात मस्तीत

पण सुरु होती तिथे कवायत शिस्तीत

       मन फिरलं सगळ्या वर्गखोल्यांमधून

       सुरु होते पाठ विविध विषयांमधून

मन शिरलं मग प्रशस्त सभागृहात

सुरु होती कार्यक्रमाची तयारी जोरात

        लावला कान हळूच मग संगीतवर्गाला

        द्यावीशी वाटली दाद त्या सुरेल स्वराला

नंतर मन मोठ्या मैदानावर धावलं

खो-खो अन सोनसाखळीतच रमलं

        सारं फिरुन मन तिथल्या जुईशी थांबलं

        अलवार खुडून फुलांना गजऱ्यात गुंफलं

 गंधात त्या जुईच्या मन माझं मोहरलं

 स्वप्न होतं हे कळताच मात्र बावरलं

              - स्नेहल मोडक

Saturday, March 13, 2021

कुणकेश्वर

           महाशिवरात्र आणि कुणकेश्वर हे साऱ्या कोकणकरांसाठी एक सुंदर समीकरण.

           देवभुमी कोकणातल्या देवगड मधलं एक गांव कुणकेश्वर. इथे असलेलं हे शंभू महादेवाचं प्राचीन आणि भव्य देवालय. आणि या देवालयाच्या बाजूलाच असलेला विस्तिर्ण, स्वच्छ आणि नितांतसुंदर असा सागरकिनारा. महाशिवरात्रीला इथे खूप मोठी यात्रा भरते. ४-५ दिवस चालणारी ही यात्रा म्हणजे जणू पर्वणीच असते. या ४-५ दिवसांच्या यात्रेत व्यापाराची मोठी उलाढाल होतेच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीच्या निमित्ताने सगळे चाकरमानी शंभू महादेवाच्या दर्शनाच्या आणि यात्रेच्या ओढीने आपल्या घरी येतात. त्यामुळे साऱ्या कोकणात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं.

               खरंतर खूप वर्ष मनात येईल तितक्या असंख्य वेळा श्री कुणकेश्वराच्या दर्शनाचं भाग्य लाभलं पण अजूनही कुणकेश्वर असं नुसतं नांव जरी कानावर आलं तरी मन क्षणात महादेवांच्या चरणी पोहोचतं. नतमस्तक होऊन लगेच शुभ्र लाटांशी खेळायला समुद्र किनारी धावतं. 

            अकराव्या शतकात बांधलेलं, मूळ काळ्या पाषाणातलं, अप्रतिम शिल्पसौदर्याने नटलेलं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं हे शंभू महादेवाचं देवालय म्हणजे देवभूमी कोकणचा जणू मुकुटमणीच. हे मंदिर  दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय सध्या कोकण पर्यटन वाढल्यामुळे एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ही प्रसिद्ध झालंय.

               या मंदिराबद्दल पूर्वापार एक आख्यायिका सांगितली जाते. एक अरब व्यापारी जहाजातून प्रवास करत असताना या भागात त्याचं जहाज आलं आणि अचानक वादळ सुरु झालं. त्या व्यापाऱ्याला आपण आणि आपलं जहाज वाचणार नाही अशी भीती वाटू लागली. त्याचवेळी त्याचं लक्ष दूरवर भूभागावर लुकलुकणाऱ्या एका दिव्याकडे गेलं. तिथे काही देवस्थान असावं असा विचार करुन त्याने प्रार्थना केली की जर हे वादळ शमलं आणि मी त्यातून वाचलो तर तिथल्या देवाचं मोठं मंदिर बांधेन. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वादळं शमलं आणि तोही सुखरूप राहिला. किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्याने प्रार्थना केल्याप्रमाणे तिथे शोध घेतला असता शिवलिंग सापडलं. तिथेच मोठं मंदिर बांधून त्यात त्या शिवलिंगाची स्थापना केली. आणि नंतर त्याच मंदिराच्या कळसावरुन उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं. जिथे त्याची उडी पडली तिथे नंतर एक समाधी बांधली गेली.

                 नंतर या मंदिराची प्रसिध्दी वाढत गेली आणि इतिहास अभ्यासकांचं लक्ष या मंदिराकडे वळलं. मुसलमानी सत्ता हिंदू साम्राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना एका मुस्लिम व्यक्तीने हे मंदिर कसे बांधले असा प्रश्न अभ्यासकांना पडला आणि मंदिराचा ऐतिहासिक वारसा जाणून घेण्याचे प्रयत्न सुरु झाले. १९६० सालच्या सुमारास माननीय बाबासाहेब पुरंदरे यांनी या मंदिराला भेट दिली. आणि अभ्यासाअंती निष्कर्ष काढले आणि पुराव्यानीशी सिध्दही केले. त्यानुसार हे मंदिर कुठल्याही अरब माणसाने बांधलेलं नसून हिंदू साम्राज्य काळात हिंदूनीच बांधलेलं मंदिर असल्याचं स्पष्ट झालं. त्या अरबी व्यापाऱ्याची म्हणून जी समाधी सांगितली जात होती ती प्रत्यक्षात एक मंदिरच असल्याचं सिध्द झालं.

                  मुस्लिम साम्राज्यकाळात सर्वच हिंदू मंदिराचा कमी अधिक प्रमाणात विध्वंस केला गेला. जेव्हा मुसलमान कोकणात येऊन साम्राज्य विस्तार करु लागले तेव्हा हे शिवमंदिर प्रसिद्ध झालं होतं. या मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण करुन विध्वंस करु नये यासाठी प्रयत्न केले गेले.

                   छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा भाग होता. त्यांची श्री कुणकेश्वरावर अपार श्रध्दा होती. मुस्लिम जेव्हा आक्रमण करीत जवळ येऊ लागले तेव्हा त्यांना मंदिराच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली. आणि त्यातूनच वरिल आख्यायिका पसरवण्यात आली. सध्या समाधी म्हणून जी वास्तू सांगितली जाते ते तेव्हा मंदिरच होते. त्याच्या कळसावरील कोरीवकाम काढून त्याला चुमटाचा आकार दिला. बाहेरुन ती त्या व्यापाऱ्याची समाधी असल्याचं भासावं म्हणून हा प्रयत्न केला होता. जेणेकरून हे मंदिर आक्रमणापासून सुरक्षित राहील. तरीही ते स्वत: आपल्या तुटपुंज्या सैन्यासह मंदिरात रक्षणासाठी सिध्द राहिले. एवढे प्रयत्न करुनही मुस्लिमांनी मंदिरावर आक्रमण केलंच. तुटपुंज्या बळावर मराठ्यांनी जोरदार प्रतिकार केला.पण मुसलमानी सैन्य जास्त असल्याने मराठ्यांचा प्रतिकार कमी पडू लागला. मग स्वत: अमात्यानी मंदिराच्या कळसावरुन हल्ल्यात उडी घेतली. त्यांच्या येण्याने सैन्यात बळ संचारलं आणि त्यांनी अजून जोरदार प्रतिहल्ला केला. अखेर मुस्लिम सैन्याने माघार घेतली. पण या हल्ल्यात मंदिराचा थोडा विध्वंस झालाच. अमात्यांवर या घटनेचा मोठा मानसिक आघात झाला. त्यातून ते सावरलेच नाहीत आणि त्यातच कुणकेश्वर येथेच त्यानी अंतिम श्वास घेतला. त्यांनी युद्धासाठी जिथे उडी घेतली तिथे त्यांची समाधी म्हणून तुळशी वृंदावन बांधण्यात आलं आहे.

                   यानंतर जीर्णोद्धाराचं काम काही काळाने सुरु झालं मात्र प्रत्क्षात १७०० साली हा जीर्णोद्धार पूर्ण झाला. पण जीर्णोद्धार करताना काळ्या पाषाणाऐवजी तिथे सापडणाऱ्या चिऱ्याच्या दगडांचा उपयोग केला गेला. त्यामुळे मंदिराचे मुळ कोरीवकाम थोड्या प्रमाणातच शिल्लक राहिले आहे. यानतर परत काही काळानंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

                     या मंदिराचे हे सारे ऐतिहासिक संदर्भ आंतरजालाचा थोडा धांडोळा घेतल्यावरही सहज उपलब्ध होतात.

                     इथल्या समुद्रातल्या खडकांवर लाटांच्या विशिष्ट दिशेमुळे अनेक शिवलिंग नैसर्गिकरीत्या तयार झाली आहेत. हे कुणकेश्वरचं अजून एक खास वैशिष्ट्य आहे.

                    असं हे अगदी देखणं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं हे कुणकेश्वराचं देवालय आणि बाजूलाच असलेला नितांत सुंदर सागरकिनारा प्रत्यक्ष पहायलाच हवा.

                                             - स्नेहल मोडक

 

Thursday, March 11, 2021

उष:काल

        उष:काल हा शब्द जितका नादमधुर तितकीच ही वेळही रंगविभोर. रवीराजाच्या आगमनाच्या नुसत्या चाहुलीनेही उषा अगदी रंगबावरी होते जणू. आणि मग सोनकेशरी रंगाची उधळण करीत रवीराजाची स्वारी हलकेच अवतरते. त्याच्या आगमनाने संपूर्ण चराचरात चैतन्य उमलतं आणि नित्यक्रम सुरु होतो. 

        अतिशय विलोभनीय अशा उष:कालाचे हे काव्यरुप.

        

उष:काल झाला सखे उष:काल झाला

सोनकेशर उधळीत सहस्ररश्मी आला

       नभी मेघाचे कमंडलू हलकेच कलंडले

       अन मखमली हरीततृणांवर दवबिंदू सांडले

नितळ जलाशयी आभाळ केशरी न्याहाळते

वनराईतूनी किरण सोनेरी भूवरी झेपावते

         किलबिलाटाने पक्षी घालती सृष्टीस साद

         राऊळी होतसे देवतार्चन अन घंटानाद

पखरण प्राजक्ताची जणू मौक्तिक विखुरले

मधुगंधी मोगरा जाईजुईने आसमंत दरवळले

          खुडूनी ही विविध पुष्पे ईशचरणी अर्पिते

          लाभो सौख्य आरोग्य सर्वांना हेच मागते


                                               - स्नेहल मोडक

     


  


Saturday, March 6, 2021

लक्ष्मी विलास पॅलेस - वडोदरा

 

                 

                        वडोदरा - बडोदा संस्थानचा मानबिंदू आणि अतिशय देखणी वास्तू म्हणजे लक्ष्मी विलास महाल.

                    सयाजीराव गायकवाड महाराजांनी आपल्या वास्तव्यासाठी १८९० साली बांधलेला हा अप्रतिम महाल.

                    आमच्या माघी पौर्णिमेच्या गिरनार यात्रेनंतर लक्ष्मी विलास महालाला धावती भेट देण्याचा योग आला. वेळेअभावी फक्त मुख्य महालाच्याच वास्तुसौंदर्याचा आस्वाद घेता आला.

                    चार्ल्स माॅंट या ब्रिटिश वास्तुतज्ञाच्या आराखड्यानुसार या महालाची निर्मिती केली गेली. संपूर्ण महाल हा भारतीय, इस्लामिक आणि व्हिक्टोरियन वास्तुशैलीचा एक अनोखा मिलाफ आहे.

                    महालाच्या प्रवेशद्वारासमोरच अतिशय आकर्षक असं कारंज आहे. जे अजूनही व्यवस्थित सुरु आहे. मुख्य महालात प्रवेश केल्यावर  दोन्ही बाजूला सयाजीराव महाराजांच्या माता जमनाबाई गायकवाड आणि पिता खंडेराव गायकवाड महाराज यांची तैलचित्रे पहायला मिळतात. 

                    त्यानंतर आहे महालामधील मुख्य शाही दरबार (गादी हॉल). आत प्रवेश करताच रेखीव घडवंचीवरची शुभ्र धवल वस्त्राने आच्छादित प्रशस्त गादी आणि तक्के, धातूच्या मयुरावर तोललेली नक्षीदार छत्री आपलं लक्ष वेधून घेते. याबरोबरच इथे आहे आपल्या दृष्टीला मोहवणारी अजून एक खास गोष्ट म्हणजे राजा रविवर्मा यांची तैलचित्रं. ही चित्रं काढण्यासाठी राजा रविवर्मा यांनी संपूर्ण देशभ्रमण केलं होतं. अगदी नजर खिळवून ठेवणारी चित्रं आहेत ही.

                    यापुढे आहे राजदरबार. अतिशय प्रशस्त अशा या दरबारहॉलमधे खास व्हेनिसहून आणलेल्या फरशा बसवलेल्या आहेत. या दिवाणखान्याच्या कोपऱ्यात इटालियन शिल्पकार फेलिची यांनी बनवलेले संगमरवरी पुतळे आहेत. राजदरबारातील कारभार आणि इतर कार्यक्रम पहाण्यासाठी राजस्त्रियांना बसण्यासाठी पहिल्या मजल्यावरील दालनाबाहेर खुला कक्ष (गॅलरी) आहे. दालनाच्या समोरच्या बाजूला बेल्जियम काचेची अप्रतिम अशी रंगीत चित्रं आहेत. तर कक्षाच्या बाहेरच्या बाजूला वादन करणाऱ्या अप्सरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत.

                    राजदरबारानंतर आपल्यासमोर येतं ते शस्त्रागार. युद्धकाळात वापरलेल्या विविध तलवारी आणि इतर काही शस्त्रं इथं पहायला मिळतात. त्यात काही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण तलवारी आणि शस्त्रंही इथे आहेत.

                    ७०० एकर परिसरात मध्यभागी बांधलेल्या या राजवाड्यात बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचं निवासस्थान आणि राजदरबार होता. या संपूर्ण महालात १७० खोल्या आहेत. ५०० फूट लांब आणि २०० फूट रुंद अशा राजवाड्याच्या मनोऱ्याची ऊंची २०४ फूट आहे. बंकिगहॅम पॅलेसच्या चौपट मोठा हा राजवाडा आहे.

              

  

                    महालाच्या आजूबाजूला उद्याने, तरणतलाव, गोल्फचे मैदान आहे.हि सारी उद्याने, हिरवळ, कारंजी ब्रिटिश उद्यानतज्ञ विल्यम गोल्डरिग यांनी तयार केली आहेत. या महालात अजून मोतीबाग पॅलेस, माकरपुरा पॅलेस, प्रताप विलास पॅलेस आणि महाराजा फतेह सिंह संग्रहालय या काही ईमारती आहेत.

                    लक्ष्मी विलास पॅलेस पर्यटकांना सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पहाता येतो. २५० रुपये प्रवेश शुल्क आहे. संस्थानने या संपूर्ण महालाची माहिती देण्यासाठी एक उत्तम व्यवस्था केली आहे. कार्यालयातून माहिती ऐकण्यासाठी कानाला लावण्याचं एक छोटंसं यंत्र ( device) दिलं जातं.  याद्वारे आपल्याला हव्या असलेल्या भाषेतून ( मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती ) महालाबद्दलचं  निवेदन ऐकायला मिळतं. त्यामुळे आपल्याला संपूर्ण मुख्य महाल सविस्तर माहितीसह पहाता येतो. एकूण सव्वातासाचं हे निवेदन आहे. त्यानंतर किंवा आधी आपण इतर सर्व भाग पाहू शकतो. 

                    राजवाड्याच्या बाहेरील भागाची छायाचित्रं / चित्रण करता येतं. मात्र अंतर्भागात छायाचित्रं किंवा चित्रण करण्यास मनाई आहे. त्यामुळे बडोदा संस्थानची ही अतिशय देखणी ऐतिहासिक वारसा असलेली वास्तु एकदा तरी प्रत्यक्षच पहायला हवी.

                                                          - स्नेहल मोडक 

Wednesday, March 3, 2021

स्वप्न.? अंहं सत्य

              
                

                मार्गशीर्ष, पौष, माघ सलग तीन पौर्णिमा आणि त्या पौर्णिमांना आम्हाला घडलेलं गिरनार दर्शन. खरंच एवढा मोठा योग आमच्या आयुष्यात येईल असं आधी कुणी भविष्य सांगितलं असतं तरी त्यावर विश्वास ठेवावा का असाच प्रश्न मनात उमटला असता. 

               पौष पौर्णिमेला जेव्हा आम्ही गिरनारला मोठा ग्रुप बरोबर घेऊन गेलो होतो तेव्हा गिरनारला अतिशय थंडी आणि वारा होता. सर्वांनाच त्या थंडीचा थोडा त्रास झाला होता. पण मला थोडा जास्तच त्रास झाला. मला पूर्वीपासून असलेल्या त्रासात थंडीमुळे अजून भर पडली. अर्थात घरगुती उपचार आणि आराम हाच त्यावर उपाय होता. पण त्यामुळे पुन्हा लगेच माघी पौर्णिमेला गिरनारला जायचा विचारही मनात नव्हता.

                मात्र माघी पौर्णिमेच्या दोन - तिन दिवस आधी पुर्ण रात्रभर मनचक्षुंसमोर निद्रादेवी ऐवजी फक्त आणि फक्त गिरनार होता. मन केव्हाच गुरुशिखरी पोहोचलं होतं. तब्येतीमुळे मी मनाला आवरण्याचा प्रयत्न करत होते पण मन मात्र गुरुचरणीच तल्लिन झाले होते. अखेर तनमन एक झालं आणि गिरनारला जायचं नक्की केलं. त्याचवेळी गिरनार चढता उतरताना ऊडन खटोला ची (रोप वे) साथ घ्यायची हेही ठरवलं. दर्शनाला जायचंच होतं पण आधीप्रमाणे दहा हजार पायऱ्या चढून जाण्याची शक्ती नसल्यामुळे उडन खटोलाचा आधार घेणं आवश्यक होतं.

                पौर्णिमेच्या आदल्या रात्री तलेटीला पोहोचलो. सकाळी गिरनार दर्शनाला निघालो. जरी उडन खटोलाने जायचं ठरवलं असलं तरी नेहमीप्रमाणे लंबे हनुमानजींच आणि पहिल्या पायरीचं दर्शन आधी घ्यायला गेलो. दर्शन घेऊन प्रार्थना केली चार पायऱ्या चढलो आणि मनात द्वंद्व सुरु झालं, दहा हजार पायऱ्या कि रोप वे. अखेर द्विधा मनस्थितीतच नाईलाजाने रोप वे कडे वळलो. 

                रोप वे ने अंबाजी टुक ला पोहोचलो. अंबामातेचे दर्शन घेऊन पुढे निघालो. गोरक्षनाथ टुक ला गोरक्षनाथांचे दर्शन घेतले. अंबाजी टुक पासून एका तासात पाच हजार पायऱ्या पूर्ण करुन आम्ही दत्तगुरुंच्या चरणी लीन झालो होतो. मी दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि क्षणार्धात एका विलक्षण संवेदनेची जाणिव झाली.  स्वयं श्री दत्तात्रेयांनीच आम्हाला दर्शनाला बोलावलं आणि दर्शन घडवलं याची प्रचिती आली.

                शिखर दर्शन घेऊन परत खाली कमंडलू तीर्थाशी अखंड धुनीचं दर्शन घ्यायला गेलो. दत्तगुरुंच्या कृपेने अगदी धुनी समोर बसून गुरुचरित्राचं थोडं वाचन करायला मिळालं. धुनीचं दर्शन घेऊन प्रसाद घेण्यासाठी गेलो. भोजन प्रसादाची व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. भोजनासाठीचे पदार्थ बघून हा फक्त प्रसाद नसून दत्तगुरुंच्या कृपेने सर्वांनाच छोट्याशा मेजवानीचाच लाभ मिळालाय असंच वाटत होतं. प्रसाद ग्रहण करुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. अंबाजी टुक पर्यंत येऊन मग रोप वे ने खाली पोहोचलो.

                 सलग तीन पौर्णिमेला गिरनार शिखर दर्शन झाल्याने मन अगदी शांत तृप्त झालंय आणि अर्थातच श्री  दत्तात्रेय पुन्हा केव्हा दर्शनाला बोलावतात याचीही वाट पहातंय. 


                  जरी किती अवघड भासला गिरनार

              गुरुकृपेने दर्शन वारंवार घडणार

                  नित्य नामस्मरणात मन हे रमणार

                  ध्यासात गुरुसेवेच्या 'मी'पण सरणार

               यत्न सदा षडरिपुमुक्तीचा करणार

               जय गिरनार जय जय गिरनार

 

                                                     - स्नेहल मोडक


 


Monday, February 22, 2021

वादळ - विचारांचं


वादळ आणि तेही मनातल्या विचारांचं...

            सगळ्यांच्याच मनात ही विचारांची वादळं अगदी वारंवार येत असतात. आपण कितीही कामात गुंतलेले असलो तरी खूप वेळा मनात काही वेगळेच विचार सुरु असतात. कधी कधी विचारांचं हे वादळ एवढं जोरदार असतं कि हातातलं कामही बाजूला ठेवून आपल्याला त्या वादळाला संयमाने शांत करावं लागतं. अर्थात सारं काही छान मनासारखं घडेल या आशेवरच ते वादळ शमतं.

        

मनातल्या विचारांचं वादळ कधी शमेल का

सारं काही अगदी मनासारखं कधी घडेल का

      आयुष्याच्या पडद्यावर मनासारखं चित्र साकारेल का

      कल्पनेच्या कुंचल्यातून सप्तरंग तयात भरतील का

नातीगोती अन मैत्री निरंतर जपता येईल का

क्षणी सुखदुःखाच्या साथ सर्वाची लाभेल का

       चालताना तमातुनी संगतीस कुणी असेल का

       तिमीरातूनी तेजाचे त्या भाग्य कधी लाभेल का

 तप्त रणातूनी सदैव चालणे कधी संपेल का

 बरसूनी अमृतधारा तनमन तृप्त होईल का

        झोपेतल्या जगी सुखस्वप्ने कधी दिसतील का

        सत्यातल्या जगी स्वप्नपुर्ती सारी होईल का

 मनातल्या विचारांचं वादळ कधी शमेल का

 सारं काही अगदी मनासारखं कधी घडेल का


                   - स्नेहल मोडक

Thursday, February 18, 2021

खिद्रापूर

          कोल्हापूरपासून ६० किलोमीटरवर आणि नरसोबाच्या वाडी पासून अवघ्या २० किलोमीटरवर वसलेलं शिरोळ तालुक्यातील एक छोटसं गांव खिद्रापूर. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेलं हे गांव.

            या गावाला भेट द्यायची इच्छा आजवर काही ना काही कारणाने पुढे जात होती अखेर नुकताच तो योग आला आणि मनाला व दृष्टीला जणू शाही मेजवानीच मिळाली.

             भारतीय स्थापत्य कलेतलं एक सुवर्णपर्ण म्हणजे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. बाराव्या शतकात शिलाहार राजांच्या काळात बांधलेलं हे कोपेश्वराचं अप्रतिम, देखणं मंदिर. 

              मंदिराचा प्रवेशमार्ग अगदी साधाच. त्यामुळे सुरुवातीला आत काय पहायला मिळणार याची किंचितही कल्पना येत नाही. मात्र प्रवेशद्वारातुन शिरल्यावर आपल्या समोरच उभं असतं ते काळ्या पाषाणातलं अप्रतिम शिल्पमंदिर.

               खरंतर मंदिरात प्रवेश केल्यावर आपण सर्वप्रथम देवदर्शन करतो. मात्र इथे आल्यावर मी आधी मंदिराच्या बाह्यभागाच्या निरिक्षणातच दंग झाले. अर्थात नंतर काही क्षणातच आत जाऊन आधी देवदर्शन घेतलं.

                मंदिराची रचना ताऱ्याच्या आकाराची आहे. संपूर्ण मंदिर ९५ हत्तींच्या पाठीवर उभं आहे. प्रत्येक हत्तीच्या पाठीवर देवदेवता कोरलेल्या आहेत. पुर्ण मंदिरात अप्रतिम अशा कोरीवकामाने नटलेले १०८ खांब आहेत. आणि या सर्वावर कळस म्हणजे ४८ खांबांवर तोललेला १३ फुट व्यासाचा स्वर्गमंडप. आणि त्याखाली असलेली तेवढ्याच व्यासाची गुळगुळीत काळ्या पाषाणाचीच रंगशीळा. छतविरहित असा हा स्वर्गमंडप एकमेवाद्वितीय म्हणावा असाच आहे. त्या आकाशगवाक्षातून पहाताना अक्षरशः भान हरपून जातं. त्याच्या ४८ खांबांवरचं कोरीवकाम म्हणजे स्थापत्य कलेचा देखणा आविष्कारच. प्रत्येक खांब वेगळ्या पद्धतीने कोरलेला आहे. गोलाकार, चौकोन, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपल्याला प्रत्येक खांबात पहायला मिळतात.

                मुख्य मंदिरापासून काहीसा विलग असलेला हा स्वर्गमंडप, त्यानंतर आच्छादित सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.

                कोपेश्वर म्हणजेच शंभू महादेव. अर्धांगिनी दक्ष कन्या सतीच्या जाण्याने दक्ष राजावर कोपलेला तो कोपेश्वर. त्यांची समजूत काढण्यासाठी तिथे आले ते भगवान विष्णू. श्री विष्णूंचं नांव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर आणि त्यांच्या बाजूलाच थोडा उंच धोपेश्वर. 

                   गर्भगृहातील सर्व भिंती आणि खांबांवर अतिशय रेखीव अशा देवदेवता कोरलेल्या आहेत. गर्भगृहात प्रकाश थोडा कमी आहे. परंतु काही क्षणांनी आपल्याला मुर्तींचे व्यवस्थित अवलोकन करता येते. 

                   मंदिराचा अंतर्भागच नाही तर बाह्यभागही अप्रतिम अशा शिल्पसौदर्याने सजलेला आहे. बाह्य भागावर व्याल, किर्तीमुख, गणेश, विष्णूचे अवतार, दुर्गा, सुरसुंदरी हे सारे अत्यंत रेखीव असे कोरलेले आहेत.

                     याचबरोबर मंदिराच्या बाह्य भागावर रामायण महाभारतातील काही कथाही कोरलेल्या आहेत. संपूर्ण मंदिरच अशा विविध प्रकारच्या शिल्पकलेने नटलेले आहे.

                    भारतीय स्थापत्यकला, विज्ञान, गणित, संस्कृती यांचा सुरेख संगम म्हणजे हे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. ९०० वर्षांपूर्वीही हे सारं किती प्रगत होतं याचं हे एक उत्तम उदाहरण.

                    मोगलांच्या आक्रमण काळात बऱ्याच मुर्तींचे चेहरे उध्वस्त केले गेले आहेत. पण तरीही मंदिराचे सौंदर्य अबाधित आहे.

                    भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने हे मंदिर महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

                    अतिशय सुबक, सुंदर आणि रेखीव असं हे शिल्पमंदिर प्रत्येकाने आवर्जून पहावं असंच आहे.


                                                         - स्नेहल मोडक


           


            


                    






Saturday, February 6, 2021

समुद्रपक्षी ( Seagull )


        आमच्या गिरनार यात्रेत गिरनार दर्शनानंतर आणखी काही तीर्थस्थानी आम्ही नेहमीच जातो. त्यातलंच एक स्थान द्वारका.

         द्वारकाधिशांच्या द्वारकेचे गोमती द्वारका आणि बेट द्वारका असे दोन भाग आहेत. द्वारकाधिश गोमती द्वारका येथून राज्यकारभार चालवत होते. आणि बेट द्वारका येथे त्यांचे वास्तव्य होते. बेट द्वारका भर समुद्रात आहे. अर्थातच तिथे नावेतून जावे लागते. साधारण वीस मिनिटांचा नावेचा प्रवास आहे. 

          बेट द्वारकेला जाता येतानाच्या या छोट्या समुद्र सफरीचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यावाच. ही छोटी सफर नितांतसुंदर बनवण्यासाठी आपल्या संगतीला असतात सुंदर समुद्रपक्षी. खूप मोठ्या प्रमाणात हे समुद्रपक्षी या नावेच्या प्रवासात आपल्याला पहायला मिळतात. शुभ्र पांढरा रंग अन पंखाजवळ थोडा राखाडी काळा रंग  आणि कर्कश आवाज ही यांची ओळख.

मासे टिपण्यासाठी लांब अंतरापर्यंत उडत जाणे ही खासियत.

..

     

            बेट द्वारकेला जाताना नावेत चढण्याआधी तिथे विक्रीस असलेले समुद्रपक्ष्यांचे खाद्य बरोबर घेतात. नाव किनाऱ्यापासून आत समुद्रात जाऊ लागते आणि मग सुरु होतो एक रमणीय खेळ. आपण घालत असलेले खाद्य खाण्यासाठी समुद्रपक्ष्यांचे थवेच्या थवे आपल्या नावेच्या आजूबाजूला ऊडू लागतात.हवेतल्या हवेतच खाद्य पकडून खाणारे समुद्रपक्षी पहाणे अतिशय मनोरंजक असते. आपण घातलेले खाद्य खाण्यासाठी मासे येतात आणि खरंतर त्या माशांना खाण्यासाठी हे समुद्रपक्षी आपल्या नावेबरोबर येतात. एकूणच अतिशय विलोभनीय दृश्य असते. या रमणीय खेळात नावेचा प्रवास संपवून आपण बेट द्वारकेला कधी पोहोचतो ते कळतही नाही.

            समुद्रपक्षी सर्वत्र सहज आढळतात. मात्र इतक्या जवळून त्यांना पहाण्याची संधी बेट द्वारकेला जाता येताना नक्की मिळते. एकदा तरी हा अनुभव जरुर घ्यावा.


                               - स्नेहल मोडक


 

Thursday, February 4, 2021

गंध केशर अष्टगंधाचा - गिरनार

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

..


            नोव्हेंबर २०२० मध्ये कार्तिकी एकादशीच्या दरम्यान गिरनार परिक्रमा आणि गुरुशिखर दर्शन अशी यात्रा ठरवली होती. यावेळी मोठा ग्रुप बरोबर घेऊन जाणार होतो. परंतु आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध वाढल्यामुळे ऐनवेळी यात्रा स्थगित करावी लागली.

             नंतर आमचा दत्तजयंती निमित्त गिरनारला जायचा योग आला. उत्तम दर्शन झालं.

             मग सर्वांची विचारणा सुरु झाली आमचा गिरनार यात्रेचा योग कधी येणार. अखेर परिस्थिती थोडी सुधारल्यावर श्री दत्तगुरुंच्या कृपेने आताच्या पौष पौर्णिमेला गिरनार यात्रा संपन्न झाली.

            पहिल्यांदाच एवढा मोठा ग्रुप बरोबर घेऊन जाणार होतो म्हणून आम्हाला थोडी काळजी वाटत होती पण श्री दत्तगुरुंची कृपा आणि काही सहकारी मित्रांनी घेतलेली अथक मेहनत यामुळे एकूणच यात्रा ऊत्तम रितीने पूर्ण झाली.

            आम्हाला एकूण यात्रेबद्दल जी काळजी वाटत होती ती दूर करण्याचं काम मात्र श्री दत्तगुरुंनी अगदी सहज केलं होतं. प्रवासाला निघायच्या २-३ दिवस आधी माझ्या स्वप्नी गिरनार ची श्री दत्तात्रेयांची मोहक मुर्ती आली आणि पहाता पहाता विशाल होत गेली. क्षणात झोपेतून जाग आली आणि जाणवलं हो मी येतेय हे माझे शब्द आणि असीम तृप्तता.

            प्रथेप्रमाणे लंबे हनुमानजींच आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली. यावेळी पहिल्यांदाच गिरनार ला आलेल्या सर्वांना बरोबर घेऊन सावकाश पायऱ्या चढून जात होतो. सर्वांना दहा हजार पायऱ्या चढून जाऊन दर्शन होईल ना ही काळजी मनात होती. मनातल्या मनात नामस्मरण सुरुच होते. पण जेव्हा जेव्हा मी मनोमनी दत्तगुरुंना "दत्तगुरु आमच्या बरोबर आहात ना ?" अशी साद घालत होते त्याक्षणी केशर अष्टगंधाचा सुरेख परिमळ मला जाणवत होता. अर्थातच स्वयं श्री दत्तगुरु सतत आमच्याबरोबर असल्याची सुगंधी साक्षच होती ती.

               श्री दत्तगुरंच्या कृपाशीर्वादाने आम्हा सर्वांची यात्रा पूर्ण झाली. 

               हा गिरनार दर्शनाचा योग श्री दत्तात्रेयांच्या कृपेने वारंवार यावा आणि त्यातून असीम शांती लाभावी हिच दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना....

..

जय गिरनारी      जय गिरनारी      जय गिरनारी


                                                                  - स्नेहल मोडक

Saturday, January 16, 2021

व्यक्त - अव्यक्त


            अगदी प्रत्येकाच्या मनातली ही भावना. कित्येकवेळा प्रत्येकाला व्यक्त व्हावं कि अव्यक्तच रहावं या संभ्रमाला सामोरं जावंच लागतं. कधी अगदी छोटीशी गोष्ट असते किंवा गप्पांमधला एखादा विषय असतो पण त्यात एक क्षण असा येतो की त्यावेळी आपण व्यक्त व्हावं की नाही हा संभ्रम निर्माण होतो. आपल्या बोलण्यामुळे नात्यात अंतर तर येणार नाही ना अशी भिती अतिविचार, अतिकाळजी करणाऱ्या व्यक्तीच्या मनात नक्कीच येते. आणि मग अव्यक्त रहाणंच योग्य असं वाटायला लागतं.



            व्यक्त अव्यक्ताच्या हिंदोळ्यावर मन हे झुलते

            दुखावले मन माझे तरीही नाते मी जपते

                     कधी कधी वाटते अव्यक्तच रहावे

                     आपल्याच मनाच्या गाभाऱ्यात रमावे

            भावभावना किती आल्या जरी दाटूनी

            व्यक्त न व्हावे मनाचे कवाड उघडूनी

                      कधी वाटते मनास व्हावे व्यक्त

                      अव्यक्ताच्या बंधातूनी व्हावे मुक्त

             होता व्यक्त भाव मनाचे शब्दातूनी

             रुचतील ना ते साऱ्यांना मनातूनी

                      मन करावे मोकळे होऊनी सहज व्यक्त

                      कि घालूनी लगाम मनास रहावे अव्यक्त

             व्यक अव्यक्ताच्या हिंदोळ्यावर मन हे झुलते

             दुखावले मन माझे तरीही मी नाते जपते


                                                                           - स्नेहल मोडक

कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...