Pages

Sunday, October 24, 2021

सफर लेह लडाखची...

            लडाख हा ३१ ऑक्टोबर २०१९ पासून केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो. याआधी तो जम्मू काश्मीर चा एक भाग होता. लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे असून ते पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत.

           हिमालयातील चहूबाजूंनी दिसणारी उंचच उंच हिमाच्छादीत गिरीशिखरं, खोल दऱ्या, त्यातून नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या नितळ निळ्या पाण्याच्या नद्या, अवतीभवती असलेली हिरवाई, दुर्गम रस्ते, अनोखी भूरुपे अशा विलक्षण निसर्ग सौंदर्याने नटलेला हा लेह लडाख. याचमुळे लडाखला गेल्यावर एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा अनुभव येतो.

           सुर्योदयाचा अप्रतिम नजारा पहात आम्ही पहाटे लेह विमानतळावर उतरलो. कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकणारी बर्फाच्छादीत गिरीशिखरं पहाणं हा एक सुंदर अनुभव होता. विमानातून उतरण्याआधीच लेहचं तापमान ६ अंश असल्याचं सांगितलं होतं. अर्थात आम्ही थंडीपासून संरक्षण करण्याच्या पूर्ण तयारीनेच गेलो होतो. विमानतळावरुन आम्ही रहाण्याच्या ठिकाणी पोहोचलो. आणि तो संपूर्ण दिवस आराम केला. संध्याकाळी अर्धातास जवळच्या भागात थोडंसं फिरुन आलो. ११५०० फुट उंचीवर असलेल्या लेह मध्ये रहाण्यासाठी आपलं शरीर अनुकूल होणं ( high altitude acclimatization) गरजेचं असतं. एवढ्या उंचीवर ऑक्सिजनची पातळी थोडी कमीच असते. त्यामुळे लेहला पोचल्यावर एक दिवस संपूर्ण आरामाची गरजच असते.

           दुसऱ्या दिवसापासून आमचं स्थलदर्शन सुरु झालं. सर्वात आधी लेहमधल्या हेमिस येथील बौद्ध मठ पहायला आम्ही गेलो. हा मठ लेहपासून साधारण ४५ किमी अंतरावर आहे. अकराव्या शतकातील हा मठ लडाखमधील सर्वात श्रीमंत मठ समजला जातो. दरवर्षी इथे जूनमध्ये हेमिस फेस्टिव्हलचे आयोजन केलं जातं. त्यावेळी हजारो पर्यटक इथे हजेरी लावतात. हा मठ पहायला बऱ्याच पायऱ्या चढून जावं लागतं. लाकडी कोरीव काम केलेल्या इमारती, शांत पवित्र वातावरण अगदी अनुभवण्यासारखं.

 
           हेमिसचा मठ पाहून पुढे थिकसे येथील मठ पहायला गेलो. ११८०० फुट उंचीवर असलेल्या या मठातून आपल्याला इंडस खोरं पहायला मिळतं. या मठात जाण्यासाठीही खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागतं. इथे आपल्याला अप्रतिम असा ४९ फुट उंचीचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा पहायला मिळतो. १९७० मध्ये १४ व्या दलाई लामा यांनी या मठाला भेट दिली होती. सगळ्या मठांमध्ये आपल्याला बुध्दाच्या विविध मुर्ती, पुतळे, भित्तीचित्रं पुराणकालीन हस्तलिखितं, पोथ्या हे सारं पहायला मिळतं.

           यानंतर आम्ही पोहोचलो शे पॅलेस पहायला. इथेही खूप वरपर्यंत पायऱ्या चढून जावं लागतं. १६ व्या शतकातली मठ आणि बाजूलाच खास उन्हाळ्यात रहाण्यासाठी बांधलेला राजवाडा असं याचं स्वरुप आहे. इथे शाक्यमुनी बुध्दाची लडाखमधील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची रेखीव मूर्ती आहे. सोनं आणि तांबं या धातूंच्या मिश्रणातून ही मूर्ती घडवली आहे. या मठाच्या बाजूलाच असलेला पॅलेस राजा नामग्याल यांनी बांधलाय. मात्र आता तिथे खूप काही पहाण्यासारखं नाही.

           प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, आदराने मान झुकवावी अशी लेहमधील वास्तू म्हणजे हाॅल ऑफ फेम. भारतीय सैनिकांना दिलेली मानवंदना म्हणजे हाॅल ऑफ फेम. या दुमजली इमारतीमध्ये भारत पाकिस्तान युद्धाची माहिती, पाकिस्तानी सैनिकांनी युध्दात वापरलेली शस्त्रास्त्रं, युद्धकालीन कागदपत्रं, सैनिकांना मिळालेली सन्मान चिन्हं, लडाखचा इतिहास, लेहमधील जीवनशैली, सियाचीन मध्ये उणे तापमानात सैनिकांना वापरावे लागणारे पोशाख आणि इतर साहित्य हे सर्व पहाता येतं. त्याचबरोबर रोज सायंकाळी इथे कारगिल युध्दाची अर्ध्या तासाची चित्रफित आणि थोडं सादरीकरण दाखवण्यात येतं. 

            हे सारं पाहून त्यादिवशी लेहमध्येच मुक्काम केला.

            दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो नुब्रा खोऱ्याकडे. इथे जाण्यासाठी खारदुंग-ला ही सर्वात उंच खिंड पार करावी लागते. वाहनाने जाता येईल अशी ही सर्वात उंचावर असलेली, श्योक खोरं आणि नुब्रा खोरं यांना लेह शहराशी जोडणारी ही खारदुंग-ला खिंड वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. १८००० फूट ऊंचीवर असलेल्या या ठिकाणी ऑक्सिजनची पातळी खूपच कमी असल्यामुळे इथे १५-२० मिनीटांवर थांबणं अशक्य असतं.

             ही खिंड पाहून पुढे गेल्यावर येतो तो दिस्किट मठ. इथेही खूप साऱ्या पाय-या चढाव्या लागतात. १४ व्या शतकातील या मठातही अतिशय शांत पवित्र वातावरण आहे. या मठात बुध्दाचा ३२ मी. उंचीचा सुवर्ण पुतळा आहे. या मठाच्या जवळच मोकळ्या जागेवर मैत्रेय बुध्दाचा १०६ फुट उंचीचा सुंदर पुतळा आहे.

              यानंतर‌ आम्ही पोहोचलो ते नुब्रा खोऱ्यातील वाळवंटात. ज्याला हिमालयातील थंड वाळवंट म्हटलं जातं ते सॅन ड्यून किंवा कोल्ड डेझर्ट. अतिशय अप्रतिम आणि विस्तिर्ण असं हे वाळवंट. फक्त इथेच आपल्याला भारतातील एक आश्चर्य पहायला मिळतं ते म्हणजे मंगोलियन जातीचे दोन कुबड असलेले उंट. हे उंट पहायला आणि त्यावर बसून फिरायला पर्यटक इथं नेहमीच गर्दी करतात. हे सारं पाहून आम्ही जवळच असलेल्या हुंदेर या छोट्या गावातील रिसॉर्टमध्ये मुक्कामाला गेलो.

              सकाळी लवकर निघालो भारत पाकिस्तान सीमारेषेवरचं शेवटचं थांग हे गाव पहायला. या छोट्या गावातून पायवाटेने चालत या गावतील घरं, लोकं, त्यांचं रहाणीमान हे सारं पहात आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो. तिथून दुर्बिणीच्या सहाय्याने आपल्याला भारत-पाक सीमारेषा पहाता येते.

                ते पाहून आम्ही थांग जवळच्या तुरतुक या भारत पाक सीमारेषेवरच्या दुसऱ्या गावात पोहोचलो. हे भारतातील शेवटची चौकी असलेलं ठिकाण आहे. यापुढे पाकिस्तान मधील गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग सुरु होतो. १९४७ च्या युध्दात तुरतूक गावावर पाकिस्तानने कब्जा केला होता. नंतर १९७१ साली झालेल्या युध्दात भारताने हे गाव आपल्या ताब्यात घेतलं. श्योक नदीवरील पूल पार करुन गावातून पायवाटेने चालत इथल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाता येतं. इथंही दुर्बिणीच्या सहाय्याने भारत पाक सीमारेषेवरच्या दोन्ही देशांच्या चौक्या पहाता येतात. हे एकच ठिकाण असं आहे की जिथे पाकिस्तानची चौकी आपल्या चौकीपेक्षा थोडीशी उंचावर आहे. ते पाहून परत फिरताना वाटेत एक छोटं संग्रहालय आहे. त्यातून बाल्टि लोकांच्या संस्कृतीचा परिचय होतो. पुलाच्या दुसऱ्या बाजूला अजून एक लहानसं संग्रहालय आहे. मुळात तो एक लहानसा राजवाडा होता. तोच आता संग्रहालय म्हणून ओळखला जातो. बाल्टिस्तानच्या राजाने खास उन्हाळ्यात फक्त ३ महिने रहाण्यासाठी बांधलेला राजवाडा. आता तिथे त्या काळात वापरलेल्या वस्तू, शस्त्र, राजगादी हे पहायला मिळतं. हे पाहून आम्ही परत हुंदेरमधल्या रिसॉर्टमध्ये मुक्कामाला गेलो.   

                  दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच पॅनगाॅंग लेक च्या दिशेने निघालो. याआधीच्या साऱ्या प्रवासातले रस्ते अतिशय वळणाचे, चढ उताराचे, एका बाजूला उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या असे असले तरी ठिक होते पण पॅनगाॅंग सरोवराकडे जाणारा रस्ता मात्र फारच खराब होता. म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्ता नाही तर नुसत्या दगडातूनच जावं लागतं. अर्थात याला तिथली परिस्थिती कारणीभूत आहे. वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे रस्ता नीट राहणं अशक्यच. तसंच रस्त्याचा काही भाग प्रत्क्ष नदीपात्रातून जात असल्यामुळेही नुसता दगडाळ आहे. पण तरीही विलक्षण अशा निसर्ग सौंदर्यामुळे हा त्रास बिलकुल जाणवत नाही. हिवाळ्यात बर्फवृष्टीत मात्र हा मार्ग बंद होतो. थोडं आधीपासूनच आपल्याला पॅनगाॅंग सरोवराचं दर्शन घडू लागतं. जेव्हा प्रत्यक्ष त्या सरोवरापाशी आपण पोहोचतो तेव्हा अक्षरशः भान हरपून पाहत राहतो. स्फटिकासारखं नितळ निळंशार पाणी आणि एका बाजूने असलेल्या पर्वतरांगा असलेलं हे अतिशय अप्रतिम असं हे सरोवर साऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे सरोवर खाऱ्या पाण्याचं असूनही हिवाळ्यात पूर्णपणे गोठतं. या सरोवराचा ३० टक्के भागच आपल्या भारतात आहे , उर्वरित ७० टक्के भाग चीनमध्ये आहे. हे अप्रतिम सरोवर पाहून आम्ही लेह येथे मुक्काम करण्यासाठी निघालो. पॅनगाॅंग सरोवर पाहून लेह ला येताना चांगला खिंड पार करावी लागते. ही खिंडही १७००० फूट उंचीवर आहे. इथेही ऑक्सिजन पातळी कमी असल्यामुळे १५-२० मिनीटांपेक्षा जास्त थांबणं‌ शक्य होत नाही. 

                  लेह ते नुब्रा व्हॅली या संपूर्ण प्रवासात आपल्याला श्योक नदी सदैव साथ देते.

                पॅनगाॅंग सरोवर ते लेह या पूर्ण प्रवासात लांब पर्वतमाथ्यांवर उतरलेले ढग आणि सुरु असलेली हलकी बर्फवृष्टी अनुभवायला मिळाली. लेहला लवकर पोहोचलो म्हणून खरेदीसाठी मार्केटमध्ये जायचं ठरवलं पण पूर्ण प्रवासातलं ढगाळ वातावरण लेहमध्ये ही अवतरलं होतं. तिथेही दूरवरच्या डोंगरात सुरु असलेली हलकी बर्फवृष्टी दिसत होती. गार वारा सुटलेला व थंडीचा कडाका वाढला होता. रात्रीतून तापमान उणे अंशात जाणार असल्याचं जाणवलं आणि मार्केटला जाणं रद्द केलं.

                पुन्हा सकाळी लवकर उठून निघालो ते थेट लेह-श्रीनगर मार्गावरील द्रास येथे. इथे जाताना दोन खिंडी लागतात - फोटू-ला खिंड (१३५०० फूट) आणि नामिका-ला खिंड (१२२०० फूट). द्रास हे भारतीय युध्दसैनिकांना दिलेली मानवंदना व युध्दाचा इतिहास सांगणारं हे युध्द स्मारक. १९९९ साली झालेल्या भारत - पाक कारगिल युध्दात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पवित्र स्मृती म्हणून इथे अखंड ज्योत तेवत असते. इथे सैनिकांना अभिवादन करुन आम्ही कारगिल येथे रिसॉर्टमध्ये मुक्काम करण्यासाठी आलो. त्या रात्री तापमान -२ अंशावर उतरलं होतं. अर्थात ही सुरुवात होती. द्रास कारगिलमध्ये हिवाळ्यात तापमान -४० अंशावर येतं. हिवाळ्यात सतत होणाऱ्या बर्फवृष्टीचे हे सहा महिने इथल्या लोकांसाठी अतिशय त्रासदायक असतात. ज्या लोकांना शक्य असतं ते जम्मू, गोवा, नेपाळ किंवा इतरत्र स्थलांतर करतात. पण ज्यांना हे शक्य नाही ते लोकं आणि आपले भारतीय सैनिक मात्र अतिशय कष्टप्रद जीवन जगतात.

                कारगिलहून सकाळी लवकर निघून पोहोचलो लामायुरु मठात. हा मठही खूप पूर्वीच्या काळातील आणि सर्वात मोठा आहे. इथे सर्वात जास्त प्रमाणात बौद्ध भिक्षू वास्तव्यास आहेत. या मठात जाण्यासाठी मात्र अगदी थोड्याच पाय-या चढाव्या लागतात.

 

                लामायुरु आणि आसपासचा भाग मूनलॅण्ड म्हणून ओळखला जातो. इथल्या अविश्वसनीय अशा वेगळ्या भौगोलिक रचनेमुळे या भागाला मूनलॅण्ड म्हणतात. अतिशय वेगळ्या प्रकारचे पर्वत आणि दरीखोरं इथे पहायला मिळतं.

                कारगिल हून येताना आधीच्या रात्री झालेल्या बर्फवृष्टी मुळे सारे पर्वत शुभ्र बर्फाची दुलई लपेटून बसलेले दिसत होते त्यामुळे वाटेत थांबून त्या बर्फात थोडंसं खेळायचा मोह आवरता आला नाही आणि ती हौसही पूर्ण झाली.

                यानंतर आम्ही पोहोचलो संगम येथे. इंडस आणि झंस्कार या दोन नद्यांचा हा संगम अतिशय सुंदर आहे. या संगमाच्या बाजूला उथे आहेत थंड वाळवंटातील पर्वत. इंडस ही संपूर्ण उत्तर भारतातून वाहणारी नदी आणि तिला मिळणारी लडाखमधील झंस्कार नदी. हा संगम लडाखमधील निमू गावात होतो. ही झंस्कार नदी हिवाळ्यात जेव्हा पूर्ण गोठते तेव्हा तिच्यावरुन पूर्ण चालत जाता येतं. हा चादर ट्रेक या नावानं प्रसिद्ध आहे. यासाठी दरवर्षी इथे खूप लोक जातात.

                तिथून पुढे निघून पोहोचलो ते मॅग्नेटिक हिल येथे. लेह- श्रीनगर मार्गावरील उंच सखल भूपृष्ठ असलेलं हे ठिकाण आहे. इथे उताराच्या दिशेने गियर विरहित स्थितीत उभी केलेली गाडी चढावाच्या दिशेने जाताना पहायला मिळते. चमत्कारारीक आणि दृष्टीभ्रम अशी वाटणारी ही घटना पहाण्यासाठी पर्यटक इथे येतात.

                लेह ते द्रास या पूर्ण प्रवासात आपल्याला इंडस नदीचं सुंदर दर्शन होत रहातं.

                 यानंतर परत आम्ही लेहला मुक्काम करण्यासाठी आलो. 

                दुपारीच लेहला पोहोचलो होतो. त्यादिवशी वातावरणही एकदम ठिक असल्यामुळे खरेदीसाठी मार्केटमध्ये जाणं शक्य झालं. लेहचं मार्केटही पहाण्यासारखं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. अतिशय गजबजलेल्या या मार्केटमध्ये स्थानिक लोकांबरोबर पर्यटकही आवर्जून खरेदी करतात. इथे तिबेटी कलाकुसरीच्या विविध वस्तू, चांदी व इतर धातूंच्या वस्तू,  मूर्ती, पश्मिना शाली, जर्दाळूचं तेल व जाम, सुकवलेले जर्दाळू, इतर सुकामेवा, गालिचे, ध्यानधारणेसाठी उपयुक्त धातूचे सिंगींग बाऊल्स इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्या खूप मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.

                 संपूर्ण प्रवासात प्रचंड थंडी होती. ६ अंशापासून सुरु झालेलं तापमान कारगिल मुक्कामात -२ अंशावर आलं होतं. परंतु आम्ही पूर्ण तयारीनिशी गेल्यामुळे थंडीचा आणि कमी ऑक्सिजन पातळीचा आम्हाला बिलकुल त्रास झाला नाही. आणि त्यामुळेच लेह लडाखचं विलक्षण पण नितांतसुंदर निसर्ग सौंदर्य आम्हाला मनसोक्त अनुभवता आलं. 

                  पुन्हा पुन्हा जावं असं वाटणारं लेह लडाख म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू. प्रत्येकाने किमान एकदातरी नक्की अनुभवावं.

- स्नेहल मोडक



Wednesday, September 22, 2021

आयुष्यात कधी...

                    आपल्या सगळ्यांचच आयुष्य ‌असंख्य स्वप्नांनी भरलेलं असतं. अर्थातच त्यातली काही स्वप्न पूर्ण होतात तर काही मात्र अपूर्णच राहतात. पण काहिही झालं तरी आपण मात्र 'मी' 'माझं' या कोषातंच गुंतून रहातो. खरंतर निसर्गही आपल्याला 'मी' पण विसरुन जगायची शिकवण देत असतो. निसर्ग स्वत: रिक्त होऊन आपल्याला सारं काही भरभरून देत असतो. आपल्यालाही असं 'मी' पण विसरुन जगता आलं तर...

  

आयुष्यात कधी पान अळवाचे व्हावे

विसरुन मानापमान सारे निर्लेप व्हावे

  आयुष्यात कधी नितळ जल‌ व्हावे

  सुखदुःखात अलगद विरघळावे

आयुष्यात कधी अथांग सागर व्हावे

जीवन भरती ओहोटीसम जाणावे

        आयुष्यात कधी झाड प्राजक्ताचे व्हावे

        लयलूट सुगंधाची करुनी रिक्त व्हावे

आयुष्यात कधी स्वच्छंद विहग व्हावे

क्रोध मोह सोडूनी मनमुक्त विहरावे

       आयुष्यात कधी छान फुलपाखरू व्हावे

       रंग ठेवूनी मनामध्ये क्षणात उडूनी जावे

  - स्नेहल मोडक

Wednesday, September 8, 2021

बाप्पा

           श्रावणाचा मास सरे भादवा आला

           खरंच श्रावण सरता सरता आपण सर्वजण भाद्रपद महिन्याची अतिशय आतुरतेने वाट पहात असतो. खरंतर सण आणि व्रतवैकल्यांनी श्रावण भरलेला असतो. पण आपल्या लाडक्या आराध्यदैवताचा, बाप्पाचा उत्सव भाद्रपद महिन्यात असतो. म्हणूनच आपण गणेश चतुर्थीसाठी, बाप्पाच्या सोहळ्यासाठी आसुसलेले असतो. 

           श्रावण संपायच्या आधीच गणरायाच्या स्वागताची तयारी सुरु झालेली असते. अगदी घराच्या साफसफाई पासून फराळाचे पदार्थ करणे, बाप्पासाठी सुंदर मखर, आरास करणे, पुजेची तयारी करणे सारं काही उत्साहात सुरु असतं.


           भाद्रपद सुरु होतो आणि आधी येतं हरितालिका व्रत. भाद्रपद तृतीयेला हे व्रत करतात. पार्वतीमातेनं भगवान महादेव आपल्याला पती म्हणून लाभावेत यासाठी बारा वर्षं अरण्यात राहून कठोर तपस्या केली. भाद्रपद तृतीयेला नदीतीरी वाळूचं शिवलिंग स्थापून विविध फुलं, पत्री अर्पून पूजन केलं. उपवास, जागरण केलं. तिच्या या तपाने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

           म्हणून भाद्रपद तृतीयेला सुवासिनी आणि कुमारिका सकाळी लवकर हरितालिका पुजन, दिवसभराचा उपवास, रात्री परत पुजन आणि थोडे खेळ खेळून, जागरण करुन हे व्रत करतात.

            आणि मग वेध लागतात ते गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केलं जाणारं हे महत्त्वाचं धार्मिक व्रत आहे. गणपतीच्या अवतारांपैकी गणेश या अवताराचा जन्म यादिवशी झाला असं मानलं जातं. या दिवशी गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली जाते. षोडशोपचारी पूजा करुन विविध फुलं दुर्वा, पत्री वाहिल्या जातात. 

            

            भाद्रपद चतुर्थीला सकाळी लवकर गणरायाची अशी षोडषोपचारी पूजा संपन्न होते. आणि मग अथर्वशीर्षांच्या आवर्तनांच्या तालावर मोदक करुन होतात. एकवीस मोदकांसह नैवेद्याचं सुरेख ताट बाप्पाला अर्पण केलं जातं. सकाळ संध्याकाळ बाप्पाची पूजाअर्चा, नैवेद्य अशी यथासांग सेवा सुरु असते.

           हरितालिकेच्या आणि गणपतीच्या पूजेला विविध फुलं, दुर्वा, पत्री लागतात. त्या खुडण्याच्या निमित्ताने आपलं निसर्गाच्या सान्निध्यात जाणं होत. या साऱ्या पत्रींमध्ये औषधी गुणधर्म असतात त्याचीही माहिती होते. श्रावण सरींनी मखमली हिरवाईची दुलई ल्यायलेल्या धरतीचं सुंदर रुप या निमित्ताने अनुभवता येतं. 

           गणांचा अधिपती अशा या गणपतीचा उत्सव सार्वजनिक स्वरुपात लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये सुरु केला. 

           काळाच्या ओघात गणेशोत्सव दिड, पाच, सात किंवा दहा दिवस साजरा केला जातो.

           गणरायाची सेवा उत्साहात सुरु असतानाच आगमन होतं गौरींच. आणि मग बाप्पाच्या पूजेबरोबरच गौरीपुजनाचीही लगबग सुरु होते. या गौरी विहिर, तलाव, नदी अशा पाणवठ्यावरुन आणायच्या असतात त्या निमित्तानेही आपलं निसर्गाजवळ जाणं होतं. 

           अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असं हे तीन दिवसाचं व्रत आहे. याला ' ज्येष्ठागौरी व्रत ' असं म्हणतात. गौरींच पूजन वेगवेगळ्या स्वरुपात केलं जातं. सोन्या चांदीचे, पितळेचे मुखवटे, तेरडयाची एकत्र बांधलेली रोपं किंवा पाच खडे अशा वेगवेगळ्या पध्दतीने हे गौरी पूजन केलं जातं. अशा या सोन्याच्या पावलांनी येणाऱ्या ज्येष्ठागौरींचं व्रत अखंड सौभाग्यासाठी सुवासिनी करतात.

           गौरी आगमन, पूजन, सुवासिनी भोजन, विसर्जन हे सारं मनापासून केलं जातं. 

        

           यानंतर येते अनंत चतुर्दशी, विसर्जनाचा दिवस. दहा दिवस घरी आलेल्या बाप्पाला अतिशय जड अंतःकरणाने निरोप दिला जातो तो पुढल्या वर्षी लवकर परत येण्याचं आश्वासन घेऊनच. 



भाद्रपद मासी असे खास गणेशचतुर्थी

दर्शन देण्या सदनी येई मंगलमूर्ती

     करुनी औक्षण होई स्वागत गणरायाचे

     विनायकासाठी सजे आसन खास मखराचे

तबकी हिरवी दुर्वादले जपाकुसुम रक्तवर्ण

विविध फुलपत्री लेऊनी सजे धुम्रवर्ण

      करुनी षोडशोपचारी पूजा आरतीचा थाट

      नैवेद्यासाठी अर्पण करावे मोदकांचे ताट

पूजन ओंकाराचे असे सुखद सोहळा

निमित्ते जमतो मैत्री नात्यांचा मेळा

       उत्सव गिरीजात्मजाचा जरी खास असे

       गणगोत जमल्याविना मात्र सुनासुना भासे

 गणाधीशा तू सुखकर्ता तू दूखहर्ता 

 संकटी रक्षावे शरण तुला विघ्नहर्ता

        लाभो आयुरारोग्य हेच ईशचरणी प्रार्थूया

        मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया


- स्नेहल मोडक


Thursday, August 19, 2021

ऋतु हिरवा

                    आषाढ श्रावण सरींनी सारी वसुंधरा हिरवीगार होते. अगदी पाचूसारखी पोपटी, हिरवी, गडद हिरवी अशा विविध रंगछटांनी सजते. या सुंदर साजाबरोबरच शुभ्र निर्झरांचा अवखळ नादही आपल्याला ऐकू येत असतो. मखमली हिरवाईवर उमललेल्या रंगगंधी फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरं रुंजी घालत असतात. वर्षाऋतुचा काळ म्हणजे फुलपाखरं, पक्षी यांच्या सृजनाचा काळ. पक्ष्यांचाही किलबिलाट अखंड सुरु असतो. अशा नितांतसुंदर सृष्टीसौंदर्याने आपलं मनही मोहोरतं, रानीवनी धावतं.


गंधाळले मन जणू मोगरा फुलला

संचार मुक्त हिरव्या रानी जाहला

         फुलपाखरासम मी वनी विहरले

         तनामनास माझिया जणू पंख लाभले

स्वच्छंद होऊनी मन माझे मोहरले

जणू नभी पुनवेचे चांदणे पसरले

        तरुवेली अन रानफुलांत मी रमले

        मधुगंधात त्या मी रोमरोमी फुलले

मन होऊन पाखरु आकाशी झेपावले

सप्तरंगात इंद्रधनूच्या तन माझे नाहले

        तृप्त मनात अलगद गीत उमलले

        अन पावलात नाचऱ्या नुपूर झंकारले

गंधाळले मन जणू मोगरा फुलला

संचार मुक्त हिरव्या रानी जाहला


-स्नेहल मोडक

Monday, August 9, 2021

आला श्रावण श्रावण

                एक अतिशय नादमधुर शब्द म्हणजे श्रावण. गर्द पाचुचा साज ल्यायलेली अवनी म्हणजे श्रावण. व्रतवैकल्यं, लेकीसुना, सख्यासयांचं एकत्र जमणं म्हणजे श्रावण. उन पावसाचा सुंदर खेळ म्हणजे श्रावण. 

                भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना म्हणजे श्रावण. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला श्रावण हे नांव देण्यात आलं. 

                 श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा / सणांचा राजा म्हटलं जातं. श्रावणातल्या प्रत्येक वारी एखादं व्रत किंवा देवदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावणात श्री महादेवाच्या  उपासनेला विशेष महत्त्व आहे.

                 श्रावणात शिवामुठ वाहणे, मंगलागौर पूजन, जिवती पूजन या व्रतांबरोबरच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी या सारखे महत्वाचे सण साजरे केले जातात. या निमित्ताने लेकीसुना, सख्यासया एकत्र येतात. मांगल्याचं प्रतिक असलेला उत्साहाने भरलेला , घननीळ बरसणारा असा हा श्रावण.



खेळ उनपावसाचा मास श्रावणाचा

थाट व्रतवैकल्यांचा मास श्रावणाचा

       बरसूनी सरी सोनपिवळे उन पसरे

       अलवार नभी मग इंद्रधनू अवतरे

हिरव्या पाचूची धरतीवर होई शिंपण

रंगगंधीत फुलांची असे त्यावर गुंफण

        दरीडोंगरी वाहती अवखळ नितळ झरे

        नाद खळाळता तयाचा थेंबातूनी पसरे

दिवस नागपंचमी अन मंगळागौरीचे

सख्यासयांनी सहजमुक्त खेळण्याचे

        अर्पावे श्रीफळ सागरा नारळी पुनवेला

        सोहळा कान्ह्याचा होई जन्माष्टमीला

 खेळ उनपावसाचा मास श्रावणाचा

 थाट व्रतवैकल्यांचा मास श्रावणाचा


- स्नेहल मोडक

Thursday, August 5, 2021

खेळ

                  भास आभासांचा, स्वप्नकल्पनांचा खेळ अविरत सुरु असतो मनात. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद मनात सतत उमटत असतात. मन जसं क्षणात सुखावतं तसं क्षणात दुखावतंही. कधी हळवं होतं तर कधी वेदनेनं तळमळतं. कधी कुणाच्या विरहात कातर होतं तर कधी कुणाची आसुसून वाट पहातं. कधी भावनांच्या खेळात हरवतं तर कधी आठवणीत रमतं. न सांगताही आपल्या माणसाला आपलं मन कळावं असं प्रत्येकाला वाटत असतंच, हो ना?

                  .

रात्रंदिन खेळ चाले गूढ स्वप्नांचा

संपेल ना कधीही भास कल्पनांचा

       अविरत असे मनात कल्लोळ भावनांचा

       अलवार हलतो हिंदोळा स्वप्न कल्पनांचा

मिटल्या अधरी होई शब्दावीण संवाद

अबोल संकेत नयनातुनी घालती साद

        आस भेटीची नित्य मनास लागते

        स्वप्नातल्या जगी मन झोपेत जागते

गुंफूनी भावनांना सुरेल गीत मोहरते

मनीमानसी भावशब्दांच्या स्वप्नी रमते

         मुग्ध कळ्या भावनांच्या उमलतील का

         स्वप्नवेडे मन कधी कुणास समजेल का

         स्वप्नवेडे मन कधी कुणास समजेल का

-स्नेहल मोडक

Sunday, August 1, 2021

मैत्री

            रेशीम बंधी, निरपेक्ष आणि हक्काचं नातं म्हणजे मैत्री. सदैव साथ देणारी, समजून घेणारी मैत्री कधी हक्काने रागावते, वादही घालते. पण तो राग वादावादी म्हणजे चहाच्या पेल्यातलं वादळच जणू. एका भेटीतच सारा रागरुसवा नाहीसा होतो. जिथं सगळ्या मनभावना व्यक्त करता येतात असं एकमेव नातं मैत्रीचं. अव्यक्त भावनाही जिला कळतात ती फक्त मैत्री. निरंतर विश्वासाचं नातं म्हणजे मैत्री. आयुष्यात असंख्य लोकांशी आपली ओळख होते, संबंध जुळतात पण घट्ट मैत्री मात्र काही जणांशीच जुळते. मैत्री म्हणजे जणू श्वासच.


सप्तसुर झंकारती जसे वीणेमधूनी

उलगडते मैत्रीही लयशब्दामधूनी

       उनपावसात जसे इंद्रधनू अवतरते

       लटक्या रुसव्यात मैत्री अधिक खुलते

गंध जसा चिरकाल असे बकुळीला

सुखदुःखात मैत्रीच असे सोबतीला

       दाटले मेघ बरसूनी जसे होती रिक्त

       व्यक्त होऊनी मैत्रीत व्हावे मन मुक्त

गंधभरले फुल चाफ्याचे जसे बागेतले

मैत्री म्हणजे अत्तर आठवणींच्या कुपीतले

       आदिपासून अंतापर्यंत एकच आस

       सदा असावी साथ मैत्री जणू श्वास


- स्नेहल मोडक





Monday, July 26, 2021

गुरुपौर्णिमा

नर्मदा मैय्या आणि गिरनार

            गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचं दर्शन आपल्याला व्हावं, गुरुपूजन करता यावं, गुरुसेवा घडावी हीच इच्छा असते. आणि गुरुपौर्णिमेला गिरनार शिखरी साक्षात श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडणं म्हणजे सुवर्ण योगच.

            यावर्षी गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं असं ठरवलं आणि नेमकं मुंबई, ठाणे, कोकणात पावसाचं थैमान सुरु झालं. मनात किंचित संभ्रम निर्माण झाला पण श्री दत्तगुरुंना प्रार्थना केली आणि गिरनारला जायचं नक्की केलं.

            गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधी आम्ही गिरनारला निघालो. सकाळी निघायच्या आधीपासूनच पाऊस कोसळत होता. त्या पावसातूनच प्रवासाला सुरुवात केली. महाराष्ट्राची हद्द ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश केला आणि पंधरा वीस मिनिटांतच अक्षरशः जादू घडावी तसा पाऊस पूर्ण थांबला. त्यानंतर पूर्ण प्रवासात पावसाचं विघ्न आलंच नाही.

             आम्ही अंकलेश्वरच्या पुढे पोहोचलो आणि मग सुरु झाली आमची मार्गशोध मोहीम. आम्हाला नर्मदा मैय्याचं किनाऱ्यावरुन प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं होतं. 

             नर्मदा नदी भारतातल्या प्रमुख नद्यांपैकी एक नदी. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यातून वाहणारी ही सर्वात मोठी पश्र्चिम वाहिनी नदी.  नर्मदा रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या या नावानींही ओळखली जाते.नर्मदेच्या काठावर मार्कंडेय, भृगु, व्यास, अगस्ती, जमदग्नी, दुर्वास, वशिष्ठ आणि अजून अनेक ऋषींनी तपोसाधना केल्याचं सांगितलं जातं. यापैकी मार्कंडेय ऋषींनी पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा केली. नर्मदेच्या उगमापासून ते मुखापर्यंत अनेक तीर्थस्थानं वसलेली आहेत. म्हणूनच नर्मदा परिक्रमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. भारतातील अनेक नद्यांपैकी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा करण्यात येते. हि नदी उत्तर आणि दक्षिण भारताच्या मधली सीमारेषा आहे. 

             अशा या पवित्र नदीचं दर्शन आम्हाला गिरनारला जातायेताना घडतंच पण ते फक्त पुलावरुन. म्हणूनच यावेळी गिरनारला जाताना नर्मदा मैय्याच्या किनाऱ्यावर जाऊन प्रत्क्ष दर्शन घ्यायचं ठरवलं. 

              आंतरजालावरुन सारी माहिती आधीच घेतली होती. पण तरी मैय्याच्या किनारी पोहोचण्याचा मार्ग प्रत्यक्षात थोडा बदललेला होता. मात्र त्यामुळे आम्हाला नर्मदा नदीवरील गोल्डन ब्रिजवरुन जाता आलं. अंकलेश्वरहून भरुचला जाण्यासाठी नर्मदा नदीवर १८८१ साली बांधलेला अतिशय सुंदर असा हा गोल्डन ब्रिज. या पुलाच्या बाजूलाच नंतर दुसरा मोठा पुल बांधलाय. गोल्डन ब्रिज ओलांडून आम्ही  तिथे असलेल्या सुरक्षा चौकीत जाऊन मार्गाची चौकशी करुन पुढे निघालो. गावात शिरुन गल्लीबोळातून थोडं फिरुन पोहोचलो ते भृगु ऋषींच्या आश्रमासमोरच. आश्रमात जाऊन दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथे थांबून तिथून बाजूच्याच गल्लीत असलेल्या नर्मदा माता मंदिरात गेलो. या मंदिरात नर्मदामातेची रेखीव मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीच्या खाली तळघरात श्री दत्तात्रेयांची मूर्ती आहे. तिथे दर्शन घेऊन बाहेर आलो. या मंदिराच्या बाजूनेच नर्मदेच्या किनारी जायला वाट आहे. त्या रस्त्याने गाडीनेच किनाऱ्यावर पोहोचलो. काठाशी गेलो आणि नर्मदा मैय्याचं विशाल रुप भान हरपून पहात राहिलो. काही क्षणांनतर मैय्याची पूजा करुन जलस्पर्श केला. आणि काही क्षणांपुरतं का होईना मन शांत झालं. 

                 थोडा वेळ नर्मदा किनारी थांबून पुढील प्रवासाला लागलो. त्यादिवशी वाटेतच एका ठिकाणी मुक्काम केला. 

                   दुसऱ्या दिवशी सकाळी गिरनारला निघालो. नर्मदा दर्शन झालं होतं, आता वेध लागले होते गिरनार शिखर दर्शनाचे. त्या विचारात दंग असतानाच भ्रमणध्वनी वाजला आणि बातमी कळली ती चिपळूण शहर पाण्याखाली गेल्याची. क्षणात चिंतेचं काहुर माजलं मनात. आमच्या जुन्या घरात पूर्ण पाणी भरलं होतं. पण बाजूलाच बांधलेल्या नवीन घराच्या पहिल्या मजल्यावर आमचे कुटुंबीय सुरक्षित होते. जुन्या घरात रहाणाऱ्या लोकांनाही त्यांनी नवीन घरात आणलं होतं. इतर नातेवाईकही सुरक्षित असल्याचं कळलं आणि चिंतेची एक रेघ कमी झाली. कोकणात पावसाने हाहाकार माजवला होता त्यामुळे सारखं मुंबई, ठाण्यात किती पाऊस आहे याचाही अंदाज घेणं सुरु होतं. 

                   या सगळ्या काळजीत गिरनारला उडन खटोलाच्या ( रोप वे ) कार्यालयात भ्रमणध्वनी वरुन चौकशी केली आणि कळलं गेले तीन दिवस उडन खटोला तुफान वारा, पाऊस, धुकं या कारणांमुळे बंद आहे. आम्ही प्रवासाला निघण्यापूर्वीच उडन खटोलाचं आरक्षण केलं होतं. आम्हाला गुजरातमध्ये पूर्ण प्रवासात अजिबात पाऊस लागला नाही. पण गिरनारवर मात्र तुफान वारा पाऊस सुरु होता. रोप वे बंद असला तरी दहा हजार पायऱ्या चढून जायचं आम्ही ठरवलंच होतं. आम्ही संध्याकाळी गिरनारला ( तलेटी ) पोहोचायच्या आधी परत उडन खटोलाच्या कार्यालयातून आम्ही गिरनारला नंतर यावं नाही तर मग आरक्षणाचे पैसे परत मिळतील असं सांगण्यात आलं आणि मग मात्र पहाटेच पायऱ्या चढायला सुरुवात करायची असं ठरवलं. तिथे पोहोचल्यावर प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांनी गुरुपौर्णिमेला रोप वे सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे मग रोप वे सुरु होतोय का बघायचं ठरवलं.

                   गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर निघून रिवाजाप्रमाणे लंबे हनुमानजींचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन, पूजा करुन उडन खटोलाच्या कार्यालयात गेलो. तिथे पाहिलं तर रोप वे हळूहळू सुरु करुन वारा पाऊस धुकं याच्या परिणामाचा अंदाज घेणं सुरु होतं. थोड्या वेळाने लोकांसाठी रोप वे सुरु करायचा निर्णय झाला. आणि पहिल्याच ट्रॉलीमधून आम्हाला जायला मिळालं. सुरुवातीला ढगाळ वातावरण होतं पण जेमतेम ७-८ मिनिटांतच वाऱ्याचा जोर वाढलेला जाणवू लागला. आणि काही क्षणातच आमची ट्रॉली धुक्याने वेढली. शुभ्र धुक्याशिवाय काहीही दिसत नव्हतं. नेहमी दहा मिनिटांत पोहोचणारी ट्रॉली त्यावेळी पंचवीस मिनीटांनी अंबाजी टुक वर पोहोचली. रोप वे सुरु करुन खूपच जोखीम घेतली होती. निघताना त्यांनी काळजी करु नका काही अडचण येणार नाही आणि आलीच तर ट्रॉलीत लावलेल्या क्रमांकावर संपर्क करायला सांगितलं होतं. रोप वे मधून उतरल्यावरही रोप वे कुठल्याही क्षणी बंद होऊ शकतो याची कल्पना देण्यात आली होती.

                    रोप वे मधून उतरुन पायऱ्या चढून वर आलो आणि थक्क झालो. पहाटेच जोरदार पाऊस पडून गेला होता.त्यामुळे संपूर्ण गिरनार सुस्नात होऊन धुक्याची दाट दुलई लपेटून आमच्या स्वागताला उभा होता. शुभ्र दाट धुकं, भन्नाट वारा आणि पावसामुळे ओलावलेला सारा परिसर अतिशय रमणीय दृश्य होतं.  जेमतेम सात-आठ फुटांपर्यंत दिसत होतं तेही किंचित धुसरच. वर्षाऋतूमध्ये खरंतर सगळ्याच पर्वतरांगा धुक्याने वेढलेल्या असतात. पण गिरनारची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तुफान वाऱ्यातही इथं खूप दाट धुकं असतं. अंबाजी मातेचं मंदिरही धुसरच दिसत होतं. प्रथम मातेचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. गोरक्षनाथ टुक ला पोहोचून गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि कमानीपर्यंत आलो. पौर्णिमा सुरु व्हायला खूपच वेळ होता म्हणून कमानीजवळच बराच वेळ थांबून मग परत चढायला सुरुवात केली. थोडयाच वेळात शिखरावर पोहोचलो. 

                    मंदिरात प्रवेश केला आणि श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाने साऱ्या जगाचा विसर पडला. दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन शांत तृप्त झालं.

                     दर्शन घेऊन परत  काही पायऱ्या उतरुन खाली अखंड धुनीजवळ आलो. तिथे नुकतीच श्री दत्तात्रेयांच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तिथलं दर्शन, प्रसाद घेऊन परत अंबाजी टुक कडे निघालो. रोप वे सुरु होता पण वाईट हवामानामुळे बंद करणार असल्याचं सांगितलं. पण आम्हाला रोप वे ने गिरनारच्या पायथ्याशी परत यायला मिळालं. बहुधा त्यानंतर काही वेळातच रोप वे बंद झाला असावा. 

                     श्री दत्तगुरुंना मी केलेली प्रार्थना पोहोचली असावी. कारण श्री दत्तगुरुंनी माझी इच्छा शब्दशः पूर्ण केली. आपण प्रार्थना करावी आणि अगदी लगेच ती शब्दशः पूर्ण व्हावी, गुरुदर्शन घडावं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे भाग्य आम्हाला कायम लाभावं आणि गिरनार दर्शनाचा योग वारंवार यावा हिच श्री दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.

- स्नेहल मोडक

 


  

 


Monday, July 19, 2021

वारी

          वारी दोन अक्षरी छोटासा शब्द पण अतिशय ऊर्जेने भरलेला. नुसत्या उल्लेखानेही क्षणात आपल्या नजरेसमोर पंढरीची वारी तरळते आणि दुसऱ्याच क्षणी साकार होतो तो पंढरीचा पांडुरंग.

          शके ११११ मध्ये बांधलेलं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सुरवातीला छोटंसंच होतं. शके ११९५ मध्ये श्रीरामचंद्र यादव आणि हेमाद्री पंडित यांनी हे मंदिर थोडं वाढवलं. आणि शके १९२५ मध्ये या मंदिराचा बराच विसतार झाला.

          पुंडलिकाच्या काळात पुर्वाभिमुख विठ्ठल मूर्ती आणि समोर भिमेच्या पात्रात पश्चिमाभिमुख हरिमूर्ती होती असं मानलं जातं. ते मंदिर आता वाहून गेलंय पण त्याचा चौथरा शिल्लक आहे. म्हणूनच वारकऱी संप्रदायाच्या घोषवाक्यात 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो.

          वारीची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. संत  ज्ञानेश्वर महाराजांचे वडील वारीला जात असत. तसंच संत  तुकाराम महाराज ही वारीला जात असत. नंतर हैबतराव बाबा हे संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरीला घेऊन जात असत. त्यानंतर १६८५ साली संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव संत श्री नारायण महाराजांनी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर आणि देहु येथून संत तुकाराम यांच्या पादुका पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली. या दोन दिंड्याप्रमाणेच इतर अनेक संतांच्या दिंड्या पंढरीस येतात. या सगळ्या दिंड्या वाखरी येथे एकत्र होतात. आणि आषाढ शुद्ध दशमीला सकाळी एकत्र पंढरपूरला निघतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही वेळा वारी निघते. परंतु वारकरी संप्रदायामध्ये आषाढ वारीचे महत्व जास्त आहे.

           वर्षभर सारे व्यवहार नियमित सुरु असतात. विठ्ठलाचे नामस्मरण सुरुच असते. वर्षाऋतू सुरु होताच मात्र साऱ्या वारकरी संप्रदायाला पंढरीचे वेध लागतात. आणि मग सुरु होते आषाढवारीची तयारी. मुखाने विठ्ठलाचा नामजप आणि कानी टाळमृदुंगाची धून वाजू लागते. 

                   पंढरीचा वास घंद्रभागे स्नान

                   आणिक दर्शन विठोबाचे

          याच अपार इच्छेने वारकरी वारीची आसुसून वाट पहात असतात. आणि तो दिवस उजाडतो पालखी प्रस्धानाचा. पालखीचे प्रस्थान म्हणजेही एक सोहळाच. टाळमृदुंगाच्या गजरात आणि पांडुरंगाच्या जयघोषात सोहळा संपन्न होतो. दिंडी पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ होते. दिवसभर नामस्मरण, भजन यात वारकरी तल्लिनन होतात. अंधार पडल्यावर विश्राम करतात. किर्तन, प्रवचन, एकमेकांच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करीत निद्रेच्या अधिन होतात. पहाटे उठून आवरुन पुन्हा मार्गस्थ होतात. या वारीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रिंगण. हे रिंगण ही  श्रध्देय आणि पवित्र संकल्पना आहे. वारी मार्गात कडुसफाटा,वेळापूर आणि वाखरी इथं रिंगण केलं जातं. मोकळ्या मैदानात वारकरी गोलाकार उभे राहतात, मधल्या मोकळ्या जागेत संत ज्ञानेश्वर महाराजांचा अश्व धावतो. स्वत: संत ज्ञानेश्वर महाराज  अश्वारुढ असतात अशी धारणा आहे. त्यामुळे त्याला 'माऊलींचा अश्व ' असं म्हणतात. 

                   मी तूपण गेले वाया

                   पाहता पंढरीच्या राया

                   नाही भेदाचे ते काम

                   पळोनि गेले क्रोधकाम

                   अवघा रंग एक झाला

             या आषाढवारीसाठी कुणी कुणाला आमंत्रण देत नाही. जातपात, उच्च नीच, क्रोध मोह सारं विसरुन लोकं वारीसाठी एकत्र येतात. युगानुयुगे भक्तासाठी वीटेवर उभ्या असलेल्या विठुरायाचं डोळेभरून दर्शन घेणं या एकाच भक्तिभावाने सारे वारकरी एकत्र येतात. आषाढी एकादशी दिवशी वारी पूर्ण करुन चंद्रभागेत स्नान करुन त्या सावळ्याच्या चरणी नतमस्तक होणं म्हणजे आयुष्याचं सार्थकच. 

            पूर्वापार चालत आलेली वारीची ही अतिशय सुंदर परंपरा कोरोना महामारीमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव गेल्या वर्षीपासून खंडित झालीय. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह इतर पालख्या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात पण अगदीच थोड्या वारकऱ्यांच्या उपस्थितित आणि त्याही वाहनातून. पण यामुळे सारे वारकरी मनोमनी अतिशय दुखावले आहेत. पण पांडुरंगावरच्या अपार श्रद्धेने नामस्मरणात दंग आहेत. 

                        बोलावा विठ्ठल 

                        पहावा विठ्ठल 

                        करावा विठ्ठल जीवभावे

            साऱ्या जगावरील  महामारीचे हे संकट पुर्णतः नष्ट व्हावं हिच विठ्ठल चरणी मनःपुर्वक प्रार्थना.



खिळ बसली परंपरेला नाही घडली आषाढवारी

पापण्या ओलावल्या अंतर्यामी दुखावला वारकरी

      किती केली प्रार्थना अन आळवणी विठुरायाची

      नाही झाली कामना पूर्ण विठ्ठलाच्या दर्शनाची

नाही झाला गजर टाळमृदुंगाचा चंद्रभागेतीरी

नाही नाचले कुणी घेऊनी तुळशीस डोईवरी

      नाही नाहली पंढरी घोषात विठुमाऊलींच्या

      नाही भिडल्या आसमंती ध्वजा वैष्णवांच्या

घेऊ आता दर्शन देवघरातल्या पंढरीरायाचे

करुया मानसपुजन त्या विठ्ठल रखुमाईचे

    अर्पूनी तुलसीपत्र करु पूजन सावळ्याचे

    कार्तिकवारीस घडावे दर्शन विठुचरणांचे


- स्नेहल मोडक





Sunday, July 11, 2021

आषाढ

              आषाढातील पहिला दिवस महाकवी कालिदास दिन. संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून कालिदासांना व्यापकपणे ओळखलं जातं. त्यांचं साहित्य प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत यांवर आधारित आहे. हे साहित्य हजारो वर्षांपासून सर्वांना प्रेरणादायी ठरलंय. या साहित्याचा अभ्यास सर्वत्र सातत्याने सुरु आहे. त्यांची सात महाकाव्यं प्रसिद्ध आहेत. त्यातील कुमारसंभवम, रघुवंशम, ऋतुसंहार आणि मेघदूत ही महाकाव्यं आणि शाकुंतल सारखी नाटकं यांमुळे त्यांना विद्वान संस्कृत लेखक, कवी म्हणून मान्यता मिळाली.

           आषाढ म्हटलं कि यातलंच एक महाकाव्य लगेच आठवतं ते म्हणजे मेघदूत.

           आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लीष्ट सानुम् ,

           वप्रक्रिडापरिणतगज प्रेक्षणियं ददर्श...

                 कुठल्यातरी प्रमादाची शिक्षा म्हणून नगराबाहेर काढलेला यक्ष सुरवातीचा काही काळ कसातरी व्यतीत करतो. पण आषाढ सुरु होतो आणि पहिल्याच दिवशी त्याचा संयम संपतो. रामगिरी पर्वतावर मदमस्त गजाप्रमाणे झुकलेल्या त्या कृष्णमेघालाच विरहव्याकुळ यक्ष आपलं कुशल पत्नीपर्यंत पोहोचविण्याची विनंती करतो. या मेघाची दूत बनण्याची अनुमतीही न घेता यक्ष मेघाला अलकापुरीपर्यंतच्या प्रवासासाठी वेगवेगळ्या श्लोकांमधून निसर्गातील रंगचित्रांचं अप्रतिम वर्णन करतो. 

                   म्हणूनच आषाढ म्हटलं कि महाकवी कालिदास आणि त्यांचं मेघदूत हे महाकाव्य मनात रुंजी घालू लागतं

                    आषाढ हा वर्षाऋतूमधला महत्वाचा महिना. ज्येष्ठ महिन्यातल्या कमी अधिक पावसाची उणिव आषाढ भरुन काढतो. धुवांधार आषाढसरींनी आपण आणि वसुंधरा दोघंही तृप्त होतो. पेरलेल्या बियाण्याची रुजवात जरी ज्येष्ठात झाली तरी त्या नाजुक हिरव्या पात्यांना सुफलता देण्याचं काम आषाढच करतो. चिखलभऱ्या भुईत लावणीचं काम  जोशात सुरु होतं ते आषाढातच. कडेकपारीतून फेसाळ धबधबे कोसळू लागतात तेही आषाढातच. आषाढसरींनी धरतीही हिरव्या मखमालीने सजते.

                     आषाढवारी आणि गुरुपौर्णिमा है आषाढ महिन्यातील अजून दोन महत्वाचे दिवस. 

                      याच आषाढाला थोडंसं श्ब्दकाव्यात गुंफून महाकवी कालिदासांना ही काव्यांजली अर्पण…



दिवस खास आषाढाचा पहिला आज

हिरवाईच्या मखमालीचा ल्यायला साज

          निळ्या आभाळी सारे कृष्णमेघ दाटले

          तेच दूत यक्षाने मग अलकेस धाडले

मेघमृदुंगासह बरसल्या रेशीमधारा

अमृत पिऊनी तृप्त झाली अवघी धरा

          थेंबांच्या साजशृंगारे नटल्या तरुवेली

          रानीवनी विविधरंगी फुले उमलली

झऱ्यातूनी येई ऐकू अनाहत नाद

फेसाळ जळात खेळाया घाली साद

         आषाढदिन जन्म महाकवी कालिदासांचा

         गुंफूनी शब्दफुलांना प्रयत्न आदरांजलीचा

 

-स्नेहल मोडक




Friday, July 2, 2021

मी एक झाड - शेवग्याचे

                     ऐका कथन आयुष्याचे

                 माझा जन्म एका मोठ्या गृहसंकुलाच्या आवारात झाला. तिथल्या कसदार मातीत मी छान रुजलो. दिसामाजी वाढू लागलो. बघता बघता माझ्या इवल्याशा रोपट्याचं झाडात रुपांतर होऊ लागलं. आवारात खूप हिरवाई असल्यामुळे विविध पक्ष्यांचा अधिवास होता. मी थोडासा मोठा होताच ते सगळे पक्षी माझ्याही अंगाखांद्यावर खेळू लागले, विसावू लागले. खूप खुश झालो मी. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटात दिवस कधी संपायचा कळायचही नाही.

                   सरत्या काळाबरोबर मी मोठा होत होतो. माझ्या फांद्याचा विस्तार आणि उंची छान वाढत होती. पक्ष्यांचं विसावणंही वाढलं होतं. त्याचबरोबर माझं अवनीशी जुळलेलं नातंही अधिक घट्ट, खोल झालं होतं.

                  अवघ्या काही काळातच माझं रुपांतर मोठ्ठया झाडात झालं अन एक दिवस माझ्या एका फांदीवर इवलीशी कळी आली. काही दिवसांतच कळ्याफुलांनी मोहरलो मी. आणि मग पक्ष्यांबरोबरच रंगीबेरंगी फुलपाखरं ही माझ्या फुलांभोवती रुंजी घालू लागली. खूपच सुखावलो मी. काही दिवसांनंतर हिरव्या लांबसडक आणि दळदार शेंगांनी अंगोपांग बहरलो.

                  कोवळी पालवी, फुलं आणि शेंगांचे औषधी गुणधर्म सर्वांनाच माहित असल्यामुळे इथली लोकं माझ्या पानाफुलांचा आणि शेंगांचा आहारात आवर्जून समावेश करत. दिवस खूप छान चालले होते. मी वारंवार शेंगानी बहरत होतो.  पक्षी, फुलपाखरं यांनाही माझा आधार हवासा वाटत असावा. माझ्या एका बाकदार फांदीवर एक बुलबुलची जोडी नियमित बसायची. हिंदोळ्यावर झुलल्यासारखं वाटायचं बहुधा त्यांना. फांदीवर बसून सुरेल कुजन करायची. खूप आवडायचं मला ते ऐकायला.

                  वादळ,वारा,पाऊस झेलत मी मुळं घट्ट रोवून ताठ उभा होतो बरेच वर्ष. अधुनमधून जोरदार वाऱ्यापावसात माझी एखादी फांदी तुटून बाजूच्या घराच्या खिडकीच्या पत्र्यावर पडायची. पण कुणाचं काही नुकसान होत नव्हतं.  तसंच त्या घरातील कुणाचीही काही तक्रार नसायची. एकंदरीत माझा कुणाला त्रास नव्हता पण उपयोग मात्र नक्की होता. त्यामुळे माझं जगणं बहरणं सुखनैव सुरु होतं.

नुकत्याच होऊन गेलेल्या मोठ्या वादळानंतरही मी ताठ उभा होतो.

                   अचानक एक दिवस माझ्या बाजूला इमारतीबाहेरच्या जाण्यायेण्याच्या रस्त्याचं काम सुरु झालं. यंत्राच्या सहाय्याने आधीचा कोबा तोडण्याचं काम सुरु झालं. आणि इतकी वर्षं मातीत घट्ट रुजलेल्या माझ्या मुळांना या यंत्राचे हादरे सहन करणं अवघड होऊ लागलं. पण तरीही मी धरणीच्या आधाराने घट्ट उभा होतो. मात्र इथल्या लोकांनाच बहुदा मी नकोसा झालो होतो. काम सुरु असतानाच एक दिवस मला काही कळायच्या आधीच माझी मुळं मातीतून अर्धवट वर काढली गेली आणि मुळांचा आधार सुटल्यामुळे मी बाजूच्या घराच्या खिडकीच्या पत्र्यावर कलंडलो. खरंतर खूप घाबरलो होतो मी पण कशाचातरी आधार देऊन मला परत उभं करतील ती लोकं असं वाटत होतं. पण व्यर्थ होतं ते वाटणं. कारण लगेच त्यांनी माझ्या भोवती जाड दोर गुंडाळला आणि खाली खेचून मला धराशयी केलं. खूप तडफडलो मी पण बाजूच्या घरातल्या लोकांशिवाय इतर कुणालाही माझं तडफडणं जाणवलंही नाही. धराशयी होऊनही आशेवर होतो मी पण काही क्षणातच माझ्या साऱ्या फांद्या माझ्यापासून विलग केल्या गेल्या. आणि जमिनीवर माझा फक्त असहाय्य बुंधा उरला. 

                 मधल्या काळात माझं शेंगांनी बहरणं सुरु असताना माझ्या अगदी जवळच अजून एक माझंच रोप रुजलं होतं. तेही छान वाढत होतं. मी जेव्हा कायमचा उध्वस्त झालो तेव्हा बाजूचं लहान झाड उभं आहे ते तरी मोठं होईल याचं समाधान होतं पण चार दिवसांनीच अचानक ते झाडही माझ्या अजूनही जमिनीवर पडलेल्या बुंध्यावरच तोडून टाकलं आणि काही वेळातच आम्हा दोघांचही अस्तित्व कायमचं संपवलं.


                 वाचलंत ना कथन शेवग्याच्या झाडाचं? एक झाड तोडलं त्याची कसली कथा असा विचार मनात आला असेल ना? पण निसर्गाशी एकरुप होणाऱ्या, हिरवाईचं महत्व जाणणाऱ्या लोकांना असं नक्कीच वाटणार नाही. झाडांनाही भावना, जाणीव असते, त्यांनाही वेदना होतात हेही विज्ञानाने सिध्द केलंय. ' झाडे लावा, झाडे जगवा' याकडे दुर्लक्ष करुन सगळीकडे हिरवाई कमी / नष्ट करण्याचे उद्योग सुरु आहेत. हे गृहसंकुलही याला अपवाद नाही असं खेदाने म्हणावं लागतंय. एवढं मोठं शेवग्याचं झाड तोडण्याचं कारण,' पडायलाच आलं होतं म्हणून पाडलं' असं सांगितल्यावर मनोवेदना अजूनच वाढली. नुकत्याच झालेल्या मोठ्या वादळातही ज्या झाडाची फांदीही न पडता ताठ उभं होतं ते झाड पडायला आलं होतं हे कारण खरं असू शकतं का? त्यानंतर दुसरं लहान झाड कुठलंही कारण न सांगता तोडलं तेव्हाही कुणी काही करु शकलं नाही.

- स्नेहल मोडक

Tuesday, June 22, 2021

सागरा ...

             सध्याच्या कोरोनाकाळात पर्यटनावर खूप निर्बंध घातले आहेत. अर्थात आपल्या सुरक्षिततेसाठीच हे निर्बंध असल्यामुळे पर्यटनाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. 

           कोकण + समुद्र + आंबे = मे महिना  हे समीकरणही गेल्या वर्षापासून जुळवणं अवघड झालंय. वर्षासहलींचाही आनंदानुभव घेता येत नाहीय. गडकिल्ल्यांवर जाणे, समुद्र किनारी फिरणे सारं काही सध्या जवळजवळ बंद आहे.

            कोकणात रहाणाऱ्या लोकांचा समुद्र हा नित्य जीवनाचाच एक भाग आहे. आपल्या मनोभावनेप्रमाणे प्रत्येक वेळी वेगळा भासणारा हा समुद्र वारंवार अनुभवण्यासारखाच असतो. पण काही कारणास्तव कोकणातून इतरत्र स्थायिक झालेल्या लोकांना समुद्र अधुनमधूनच अनुभवायला मिळतो.

             पण सध्याच्या काळातला सागराचा हा दुरावा मात्र कधी संपेल याचीच सगळे लोकं वाट बघत असतील, हो ना? 


      

विरह तुझा मज अपार झाला

सागरा  कधी भेटशील मला

            सरला काळ किती भेट न घडली

            तव दर्शनाची आस मज लागली

अथांग निळजळी नौका डोलती

शुभ्र फेसाळ लाटा किनारी खुलती

            जळात मत्स्य अन वरी समुद्रपक्षी

            ओल्या वाळूत रेखिती खेकडे नक्षी

 अस्ताचलास जेव्हा रविबिंब टेकते

 सागर निळाई मग सोनवर्खी होते

            उमटती पाऊलखुणा वाळूवरी

            स्पर्शजलाने शहारा येई तनुवरी

 वाळूत आठवणींची चित्रं रेखिते

 कधी अलगद शंखशिंपले वेचिते

            कातर हळव्या क्षणी स्तब्ध बसते

            उत्फुल्ल क्षणी शुभ्र लाटांशी खेळते

 येता किनारी तुझिया मी सुखावते

 कधी ऐकत गाज निद्राधीन होते

            किती काळ सुख हे ना लाभले

            दुरुनही तुझे दर्शनही ना घडले

 विरह तुझा मज अपार झाला

 सागरा कधी भेटशील मला

 

- स्नेहल मोडक




Tuesday, June 15, 2021

मृगधारा

            जसजशी वैशाखाची काहिली वाढत जाते तसतशी सगळ्यांना पावसाची आस लागते. पावसाची अगदी आतुरतेनं वाट पहाणं सुरु होतं आणि मग सुरु होतो वर्षा ऋतू.

            आपल्या आसुसलेल्या मनाला आणि धरतीला शांत करण्यासाठी मृगधारा बरसू लागतात. तृषार्त अवनी आणि आपणही तृप्त तृप्त होतो. नभी मृगमेघ दाटू लागताच आपल्या मनातही आठवणी दाटतात. आणि बरसत्या पर्जन्यधारेबरोबरच आठवणीही झरु लागतात. 

            मित्र-मैत्रिणी किंवा प्रिय व्यक्तीसह पावसात भिजण्याची मजा वेगळीच असते. ते क्षण पुन्हा अनुभवता आले तर खूपच सुंदर नाहीतर त्या आठवणीत मात्र रममाण होतो आपण.


मृगमेघांनी नभ हे आक्रमिले

बिजलीसंगे मेघमृदुंग कडाडले

       बरसल्या रेशीमधारा चिंब मी भिजले

       तुझिया आठवांचे काहुर मनी दाटले

भेट आपली स्मरते धुंद पावसातली

अवचित भेट घडली जणू स्वप्नातली

       रिमझिम जलधारांत आपण भिजलो

       अन मृदगंधाने मनोमनी मोहरलो

बरसता घन निळा मन मयुर जाहले

स्मरुनी ती प्रीत मन अलगद फुलले

        झेलुनी मृगधारा तन तृप्त जाहले

        आठवणीत तुझिया मन हे रमले

बरसल्या रेशीमधारा चिंब मी भिजले

तुझिया आठवांचे काहुर मनी दाटले

- स्नेहल मोडक





Sunday, June 6, 2021

मनसखा

                 मनसखा / सखी, अगदी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील खास व्यक्ती. आपण आपल्या साऱ्या भावभावना, घटना कुटुंबिय, आप्तस्वकिय, मित्र-मैत्रिणी यांच्याशी व्यक्त करतो, चर्चा करतो, निर्णय घेतो, साऱ्या सुखदुःखात एकत्र असतो. पण काही भावना, घटना मात्र अशा असतात की त्या आपण फक्त खास व्यक्ती जवळ म्हणजेच मनसख्याजवळच बोलू शकतो. तर कधी कधी आपण न बोलताही मनसख्याला त्या सहज कळतात.

                कधी विचारांच्या आवर्तात भरकटलेल्या मनाला मार्गावर आणायला मनसख्याची गरज असते. तर कधी सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर हिंदोळताना मनसख्याची साथ असेल तर हिंदोळाही वेडावाकडा होत नाही. कृष्णाप्रमाणे सदैव साथ देणारा एकतरी मनसखा/ सखी प्रत्येकाला असावाच.


भेटेल का कधी मज कृष्णसखा

होईल का तो माझा मनसखा

       चित्र कल्पनेतले संगे त्याच्या रेखावे

       कधी सुरेल गीतही दोघांनी गावे

गूज अंतरीचे मी त्यास सांगावे

अव्यक्त भाव मात्र त्याने जाणावे

       मौजमस्ती लटका रुसवा असावा

       परि नात्यात दुरावा कधी नसावा

कधी वाटे दोघांनी अबोल असावे

परि मूक अर्थ त्याने उलगडावे

       हिंदोळ्यावर सुखदुःखाच्या साथ झुलावे

       मधुगंधी मोगऱ्यासम मैत्र आमुचे फुलावे

भेटेल का कधी मज कृष्णसखा

होईल का तो माझा मनसखा


- स्नेहल मोडक

कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...