Pages

Thursday, August 19, 2021

ऋतु हिरवा

                    आषाढ श्रावण सरींनी सारी वसुंधरा हिरवीगार होते. अगदी पाचूसारखी पोपटी, हिरवी, गडद हिरवी अशा विविध रंगछटांनी सजते. या सुंदर साजाबरोबरच शुभ्र निर्झरांचा अवखळ नादही आपल्याला ऐकू येत असतो. मखमली हिरवाईवर उमललेल्या रंगगंधी फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरं रुंजी घालत असतात. वर्षाऋतुचा काळ म्हणजे फुलपाखरं, पक्षी यांच्या सृजनाचा काळ. पक्ष्यांचाही किलबिलाट अखंड सुरु असतो. अशा नितांतसुंदर सृष्टीसौंदर्याने आपलं मनही मोहोरतं, रानीवनी धावतं.


गंधाळले मन जणू मोगरा फुलला

संचार मुक्त हिरव्या रानी जाहला

         फुलपाखरासम मी वनी विहरले

         तनामनास माझिया जणू पंख लाभले

स्वच्छंद होऊनी मन माझे मोहरले

जणू नभी पुनवेचे चांदणे पसरले

        तरुवेली अन रानफुलांत मी रमले

        मधुगंधात त्या मी रोमरोमी फुलले

मन होऊन पाखरु आकाशी झेपावले

सप्तरंगात इंद्रधनूच्या तन माझे नाहले

        तृप्त मनात अलगद गीत उमलले

        अन पावलात नाचऱ्या नुपूर झंकारले

गंधाळले मन जणू मोगरा फुलला

संचार मुक्त हिरव्या रानी जाहला


-स्नेहल मोडक

Monday, August 9, 2021

आला श्रावण श्रावण

                एक अतिशय नादमधुर शब्द म्हणजे श्रावण. गर्द पाचुचा साज ल्यायलेली अवनी म्हणजे श्रावण. व्रतवैकल्यं, लेकीसुना, सख्यासयांचं एकत्र जमणं म्हणजे श्रावण. उन पावसाचा सुंदर खेळ म्हणजे श्रावण. 

                भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना म्हणजे श्रावण. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला श्रावण हे नांव देण्यात आलं. 

                 श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा / सणांचा राजा म्हटलं जातं. श्रावणातल्या प्रत्येक वारी एखादं व्रत किंवा देवदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावणात श्री महादेवाच्या  उपासनेला विशेष महत्त्व आहे.

                 श्रावणात शिवामुठ वाहणे, मंगलागौर पूजन, जिवती पूजन या व्रतांबरोबरच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी या सारखे महत्वाचे सण साजरे केले जातात. या निमित्ताने लेकीसुना, सख्यासया एकत्र येतात. मांगल्याचं प्रतिक असलेला उत्साहाने भरलेला , घननीळ बरसणारा असा हा श्रावण.



खेळ उनपावसाचा मास श्रावणाचा

थाट व्रतवैकल्यांचा मास श्रावणाचा

       बरसूनी सरी सोनपिवळे उन पसरे

       अलवार नभी मग इंद्रधनू अवतरे

हिरव्या पाचूची धरतीवर होई शिंपण

रंगगंधीत फुलांची असे त्यावर गुंफण

        दरीडोंगरी वाहती अवखळ नितळ झरे

        नाद खळाळता तयाचा थेंबातूनी पसरे

दिवस नागपंचमी अन मंगळागौरीचे

सख्यासयांनी सहजमुक्त खेळण्याचे

        अर्पावे श्रीफळ सागरा नारळी पुनवेला

        सोहळा कान्ह्याचा होई जन्माष्टमीला

 खेळ उनपावसाचा मास श्रावणाचा

 थाट व्रतवैकल्यांचा मास श्रावणाचा


- स्नेहल मोडक

Thursday, August 5, 2021

खेळ

                  भास आभासांचा, स्वप्नकल्पनांचा खेळ अविरत सुरु असतो मनात. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद मनात सतत उमटत असतात. मन जसं क्षणात सुखावतं तसं क्षणात दुखावतंही. कधी हळवं होतं तर कधी वेदनेनं तळमळतं. कधी कुणाच्या विरहात कातर होतं तर कधी कुणाची आसुसून वाट पहातं. कधी भावनांच्या खेळात हरवतं तर कधी आठवणीत रमतं. न सांगताही आपल्या माणसाला आपलं मन कळावं असं प्रत्येकाला वाटत असतंच, हो ना?

                  .

रात्रंदिन खेळ चाले गूढ स्वप्नांचा

संपेल ना कधीही भास कल्पनांचा

       अविरत असे मनात कल्लोळ भावनांचा

       अलवार हलतो हिंदोळा स्वप्न कल्पनांचा

मिटल्या अधरी होई शब्दावीण संवाद

अबोल संकेत नयनातुनी घालती साद

        आस भेटीची नित्य मनास लागते

        स्वप्नातल्या जगी मन झोपेत जागते

गुंफूनी भावनांना सुरेल गीत मोहरते

मनीमानसी भावशब्दांच्या स्वप्नी रमते

         मुग्ध कळ्या भावनांच्या उमलतील का

         स्वप्नवेडे मन कधी कुणास समजेल का

         स्वप्नवेडे मन कधी कुणास समजेल का

-स्नेहल मोडक

Sunday, August 1, 2021

मैत्री

            रेशीम बंधी, निरपेक्ष आणि हक्काचं नातं म्हणजे मैत्री. सदैव साथ देणारी, समजून घेणारी मैत्री कधी हक्काने रागावते, वादही घालते. पण तो राग वादावादी म्हणजे चहाच्या पेल्यातलं वादळच जणू. एका भेटीतच सारा रागरुसवा नाहीसा होतो. जिथं सगळ्या मनभावना व्यक्त करता येतात असं एकमेव नातं मैत्रीचं. अव्यक्त भावनाही जिला कळतात ती फक्त मैत्री. निरंतर विश्वासाचं नातं म्हणजे मैत्री. आयुष्यात असंख्य लोकांशी आपली ओळख होते, संबंध जुळतात पण घट्ट मैत्री मात्र काही जणांशीच जुळते. मैत्री म्हणजे जणू श्वासच.


सप्तसुर झंकारती जसे वीणेमधूनी

उलगडते मैत्रीही लयशब्दामधूनी

       उनपावसात जसे इंद्रधनू अवतरते

       लटक्या रुसव्यात मैत्री अधिक खुलते

गंध जसा चिरकाल असे बकुळीला

सुखदुःखात मैत्रीच असे सोबतीला

       दाटले मेघ बरसूनी जसे होती रिक्त

       व्यक्त होऊनी मैत्रीत व्हावे मन मुक्त

गंधभरले फुल चाफ्याचे जसे बागेतले

मैत्री म्हणजे अत्तर आठवणींच्या कुपीतले

       आदिपासून अंतापर्यंत एकच आस

       सदा असावी साथ मैत्री जणू श्वास


- स्नेहल मोडक





Monday, July 26, 2021

गुरुपौर्णिमा

नर्मदा मैय्या आणि गिरनार

            गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचं दर्शन आपल्याला व्हावं, गुरुपूजन करता यावं, गुरुसेवा घडावी हीच इच्छा असते. आणि गुरुपौर्णिमेला गिरनार शिखरी साक्षात श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडणं म्हणजे सुवर्ण योगच.

            यावर्षी गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं असं ठरवलं आणि नेमकं मुंबई, ठाणे, कोकणात पावसाचं थैमान सुरु झालं. मनात किंचित संभ्रम निर्माण झाला पण श्री दत्तगुरुंना प्रार्थना केली आणि गिरनारला जायचं नक्की केलं.

            गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधी आम्ही गिरनारला निघालो. सकाळी निघायच्या आधीपासूनच पाऊस कोसळत होता. त्या पावसातूनच प्रवासाला सुरुवात केली. महाराष्ट्राची हद्द ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश केला आणि पंधरा वीस मिनिटांतच अक्षरशः जादू घडावी तसा पाऊस पूर्ण थांबला. त्यानंतर पूर्ण प्रवासात पावसाचं विघ्न आलंच नाही.

             आम्ही अंकलेश्वरच्या पुढे पोहोचलो आणि मग सुरु झाली आमची मार्गशोध मोहीम. आम्हाला नर्मदा मैय्याचं किनाऱ्यावरुन प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं होतं. 

             नर्मदा नदी भारतातल्या प्रमुख नद्यांपैकी एक नदी. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यातून वाहणारी ही सर्वात मोठी पश्र्चिम वाहिनी नदी.  नर्मदा रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या या नावानींही ओळखली जाते.नर्मदेच्या काठावर मार्कंडेय, भृगु, व्यास, अगस्ती, जमदग्नी, दुर्वास, वशिष्ठ आणि अजून अनेक ऋषींनी तपोसाधना केल्याचं सांगितलं जातं. यापैकी मार्कंडेय ऋषींनी पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा केली. नर्मदेच्या उगमापासून ते मुखापर्यंत अनेक तीर्थस्थानं वसलेली आहेत. म्हणूनच नर्मदा परिक्रमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. भारतातील अनेक नद्यांपैकी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा करण्यात येते. हि नदी उत्तर आणि दक्षिण भारताच्या मधली सीमारेषा आहे. 

             अशा या पवित्र नदीचं दर्शन आम्हाला गिरनारला जातायेताना घडतंच पण ते फक्त पुलावरुन. म्हणूनच यावेळी गिरनारला जाताना नर्मदा मैय्याच्या किनाऱ्यावर जाऊन प्रत्क्ष दर्शन घ्यायचं ठरवलं. 

              आंतरजालावरुन सारी माहिती आधीच घेतली होती. पण तरी मैय्याच्या किनारी पोहोचण्याचा मार्ग प्रत्यक्षात थोडा बदललेला होता. मात्र त्यामुळे आम्हाला नर्मदा नदीवरील गोल्डन ब्रिजवरुन जाता आलं. अंकलेश्वरहून भरुचला जाण्यासाठी नर्मदा नदीवर १८८१ साली बांधलेला अतिशय सुंदर असा हा गोल्डन ब्रिज. या पुलाच्या बाजूलाच नंतर दुसरा मोठा पुल बांधलाय. गोल्डन ब्रिज ओलांडून आम्ही  तिथे असलेल्या सुरक्षा चौकीत जाऊन मार्गाची चौकशी करुन पुढे निघालो. गावात शिरुन गल्लीबोळातून थोडं फिरुन पोहोचलो ते भृगु ऋषींच्या आश्रमासमोरच. आश्रमात जाऊन दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथे थांबून तिथून बाजूच्याच गल्लीत असलेल्या नर्मदा माता मंदिरात गेलो. या मंदिरात नर्मदामातेची रेखीव मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीच्या खाली तळघरात श्री दत्तात्रेयांची मूर्ती आहे. तिथे दर्शन घेऊन बाहेर आलो. या मंदिराच्या बाजूनेच नर्मदेच्या किनारी जायला वाट आहे. त्या रस्त्याने गाडीनेच किनाऱ्यावर पोहोचलो. काठाशी गेलो आणि नर्मदा मैय्याचं विशाल रुप भान हरपून पहात राहिलो. काही क्षणांनतर मैय्याची पूजा करुन जलस्पर्श केला. आणि काही क्षणांपुरतं का होईना मन शांत झालं. 

                 थोडा वेळ नर्मदा किनारी थांबून पुढील प्रवासाला लागलो. त्यादिवशी वाटेतच एका ठिकाणी मुक्काम केला. 

                   दुसऱ्या दिवशी सकाळी गिरनारला निघालो. नर्मदा दर्शन झालं होतं, आता वेध लागले होते गिरनार शिखर दर्शनाचे. त्या विचारात दंग असतानाच भ्रमणध्वनी वाजला आणि बातमी कळली ती चिपळूण शहर पाण्याखाली गेल्याची. क्षणात चिंतेचं काहुर माजलं मनात. आमच्या जुन्या घरात पूर्ण पाणी भरलं होतं. पण बाजूलाच बांधलेल्या नवीन घराच्या पहिल्या मजल्यावर आमचे कुटुंबीय सुरक्षित होते. जुन्या घरात रहाणाऱ्या लोकांनाही त्यांनी नवीन घरात आणलं होतं. इतर नातेवाईकही सुरक्षित असल्याचं कळलं आणि चिंतेची एक रेघ कमी झाली. कोकणात पावसाने हाहाकार माजवला होता त्यामुळे सारखं मुंबई, ठाण्यात किती पाऊस आहे याचाही अंदाज घेणं सुरु होतं. 

                   या सगळ्या काळजीत गिरनारला उडन खटोलाच्या ( रोप वे ) कार्यालयात भ्रमणध्वनी वरुन चौकशी केली आणि कळलं गेले तीन दिवस उडन खटोला तुफान वारा, पाऊस, धुकं या कारणांमुळे बंद आहे. आम्ही प्रवासाला निघण्यापूर्वीच उडन खटोलाचं आरक्षण केलं होतं. आम्हाला गुजरातमध्ये पूर्ण प्रवासात अजिबात पाऊस लागला नाही. पण गिरनारवर मात्र तुफान वारा पाऊस सुरु होता. रोप वे बंद असला तरी दहा हजार पायऱ्या चढून जायचं आम्ही ठरवलंच होतं. आम्ही संध्याकाळी गिरनारला ( तलेटी ) पोहोचायच्या आधी परत उडन खटोलाच्या कार्यालयातून आम्ही गिरनारला नंतर यावं नाही तर मग आरक्षणाचे पैसे परत मिळतील असं सांगण्यात आलं आणि मग मात्र पहाटेच पायऱ्या चढायला सुरुवात करायची असं ठरवलं. तिथे पोहोचल्यावर प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांनी गुरुपौर्णिमेला रोप वे सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे मग रोप वे सुरु होतोय का बघायचं ठरवलं.

                   गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर निघून रिवाजाप्रमाणे लंबे हनुमानजींचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन, पूजा करुन उडन खटोलाच्या कार्यालयात गेलो. तिथे पाहिलं तर रोप वे हळूहळू सुरु करुन वारा पाऊस धुकं याच्या परिणामाचा अंदाज घेणं सुरु होतं. थोड्या वेळाने लोकांसाठी रोप वे सुरु करायचा निर्णय झाला. आणि पहिल्याच ट्रॉलीमधून आम्हाला जायला मिळालं. सुरुवातीला ढगाळ वातावरण होतं पण जेमतेम ७-८ मिनिटांतच वाऱ्याचा जोर वाढलेला जाणवू लागला. आणि काही क्षणातच आमची ट्रॉली धुक्याने वेढली. शुभ्र धुक्याशिवाय काहीही दिसत नव्हतं. नेहमी दहा मिनिटांत पोहोचणारी ट्रॉली त्यावेळी पंचवीस मिनीटांनी अंबाजी टुक वर पोहोचली. रोप वे सुरु करुन खूपच जोखीम घेतली होती. निघताना त्यांनी काळजी करु नका काही अडचण येणार नाही आणि आलीच तर ट्रॉलीत लावलेल्या क्रमांकावर संपर्क करायला सांगितलं होतं. रोप वे मधून उतरल्यावरही रोप वे कुठल्याही क्षणी बंद होऊ शकतो याची कल्पना देण्यात आली होती.

                    रोप वे मधून उतरुन पायऱ्या चढून वर आलो आणि थक्क झालो. पहाटेच जोरदार पाऊस पडून गेला होता.त्यामुळे संपूर्ण गिरनार सुस्नात होऊन धुक्याची दाट दुलई लपेटून आमच्या स्वागताला उभा होता. शुभ्र दाट धुकं, भन्नाट वारा आणि पावसामुळे ओलावलेला सारा परिसर अतिशय रमणीय दृश्य होतं.  जेमतेम सात-आठ फुटांपर्यंत दिसत होतं तेही किंचित धुसरच. वर्षाऋतूमध्ये खरंतर सगळ्याच पर्वतरांगा धुक्याने वेढलेल्या असतात. पण गिरनारची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तुफान वाऱ्यातही इथं खूप दाट धुकं असतं. अंबाजी मातेचं मंदिरही धुसरच दिसत होतं. प्रथम मातेचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. गोरक्षनाथ टुक ला पोहोचून गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि कमानीपर्यंत आलो. पौर्णिमा सुरु व्हायला खूपच वेळ होता म्हणून कमानीजवळच बराच वेळ थांबून मग परत चढायला सुरुवात केली. थोडयाच वेळात शिखरावर पोहोचलो. 

                    मंदिरात प्रवेश केला आणि श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाने साऱ्या जगाचा विसर पडला. दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन शांत तृप्त झालं.

                     दर्शन घेऊन परत  काही पायऱ्या उतरुन खाली अखंड धुनीजवळ आलो. तिथे नुकतीच श्री दत्तात्रेयांच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तिथलं दर्शन, प्रसाद घेऊन परत अंबाजी टुक कडे निघालो. रोप वे सुरु होता पण वाईट हवामानामुळे बंद करणार असल्याचं सांगितलं. पण आम्हाला रोप वे ने गिरनारच्या पायथ्याशी परत यायला मिळालं. बहुधा त्यानंतर काही वेळातच रोप वे बंद झाला असावा. 

                     श्री दत्तगुरुंना मी केलेली प्रार्थना पोहोचली असावी. कारण श्री दत्तगुरुंनी माझी इच्छा शब्दशः पूर्ण केली. आपण प्रार्थना करावी आणि अगदी लगेच ती शब्दशः पूर्ण व्हावी, गुरुदर्शन घडावं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे भाग्य आम्हाला कायम लाभावं आणि गिरनार दर्शनाचा योग वारंवार यावा हिच श्री दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.

- स्नेहल मोडक

 


  

 


Monday, July 19, 2021

वारी

          वारी दोन अक्षरी छोटासा शब्द पण अतिशय ऊर्जेने भरलेला. नुसत्या उल्लेखानेही क्षणात आपल्या नजरेसमोर पंढरीची वारी तरळते आणि दुसऱ्याच क्षणी साकार होतो तो पंढरीचा पांडुरंग.

          शके ११११ मध्ये बांधलेलं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सुरवातीला छोटंसंच होतं. शके ११९५ मध्ये श्रीरामचंद्र यादव आणि हेमाद्री पंडित यांनी हे मंदिर थोडं वाढवलं. आणि शके १९२५ मध्ये या मंदिराचा बराच विसतार झाला.

          पुंडलिकाच्या काळात पुर्वाभिमुख विठ्ठल मूर्ती आणि समोर भिमेच्या पात्रात पश्चिमाभिमुख हरिमूर्ती होती असं मानलं जातं. ते मंदिर आता वाहून गेलंय पण त्याचा चौथरा शिल्लक आहे. म्हणूनच वारकऱी संप्रदायाच्या घोषवाक्यात 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो.

          वारीची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. संत  ज्ञानेश्वर महाराजांचे वडील वारीला जात असत. तसंच संत  तुकाराम महाराज ही वारीला जात असत. नंतर हैबतराव बाबा हे संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरीला घेऊन जात असत. त्यानंतर १६८५ साली संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव संत श्री नारायण महाराजांनी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर आणि देहु येथून संत तुकाराम यांच्या पादुका पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली. या दोन दिंड्याप्रमाणेच इतर अनेक संतांच्या दिंड्या पंढरीस येतात. या सगळ्या दिंड्या वाखरी येथे एकत्र होतात. आणि आषाढ शुद्ध दशमीला सकाळी एकत्र पंढरपूरला निघतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही वेळा वारी निघते. परंतु वारकरी संप्रदायामध्ये आषाढ वारीचे महत्व जास्त आहे.

           वर्षभर सारे व्यवहार नियमित सुरु असतात. विठ्ठलाचे नामस्मरण सुरुच असते. वर्षाऋतू सुरु होताच मात्र साऱ्या वारकरी संप्रदायाला पंढरीचे वेध लागतात. आणि मग सुरु होते आषाढवारीची तयारी. मुखाने विठ्ठलाचा नामजप आणि कानी टाळमृदुंगाची धून वाजू लागते. 

                   पंढरीचा वास घंद्रभागे स्नान

                   आणिक दर्शन विठोबाचे

          याच अपार इच्छेने वारकरी वारीची आसुसून वाट पहात असतात. आणि तो दिवस उजाडतो पालखी प्रस्धानाचा. पालखीचे प्रस्थान म्हणजेही एक सोहळाच. टाळमृदुंगाच्या गजरात आणि पांडुरंगाच्या जयघोषात सोहळा संपन्न होतो. दिंडी पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ होते. दिवसभर नामस्मरण, भजन यात वारकरी तल्लिनन होतात. अंधार पडल्यावर विश्राम करतात. किर्तन, प्रवचन, एकमेकांच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करीत निद्रेच्या अधिन होतात. पहाटे उठून आवरुन पुन्हा मार्गस्थ होतात. या वारीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रिंगण. हे रिंगण ही  श्रध्देय आणि पवित्र संकल्पना आहे. वारी मार्गात कडुसफाटा,वेळापूर आणि वाखरी इथं रिंगण केलं जातं. मोकळ्या मैदानात वारकरी गोलाकार उभे राहतात, मधल्या मोकळ्या जागेत संत ज्ञानेश्वर महाराजांचा अश्व धावतो. स्वत: संत ज्ञानेश्वर महाराज  अश्वारुढ असतात अशी धारणा आहे. त्यामुळे त्याला 'माऊलींचा अश्व ' असं म्हणतात. 

                   मी तूपण गेले वाया

                   पाहता पंढरीच्या राया

                   नाही भेदाचे ते काम

                   पळोनि गेले क्रोधकाम

                   अवघा रंग एक झाला

             या आषाढवारीसाठी कुणी कुणाला आमंत्रण देत नाही. जातपात, उच्च नीच, क्रोध मोह सारं विसरुन लोकं वारीसाठी एकत्र येतात. युगानुयुगे भक्तासाठी वीटेवर उभ्या असलेल्या विठुरायाचं डोळेभरून दर्शन घेणं या एकाच भक्तिभावाने सारे वारकरी एकत्र येतात. आषाढी एकादशी दिवशी वारी पूर्ण करुन चंद्रभागेत स्नान करुन त्या सावळ्याच्या चरणी नतमस्तक होणं म्हणजे आयुष्याचं सार्थकच. 

            पूर्वापार चालत आलेली वारीची ही अतिशय सुंदर परंपरा कोरोना महामारीमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव गेल्या वर्षीपासून खंडित झालीय. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह इतर पालख्या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात पण अगदीच थोड्या वारकऱ्यांच्या उपस्थितित आणि त्याही वाहनातून. पण यामुळे सारे वारकरी मनोमनी अतिशय दुखावले आहेत. पण पांडुरंगावरच्या अपार श्रद्धेने नामस्मरणात दंग आहेत. 

                        बोलावा विठ्ठल 

                        पहावा विठ्ठल 

                        करावा विठ्ठल जीवभावे

            साऱ्या जगावरील  महामारीचे हे संकट पुर्णतः नष्ट व्हावं हिच विठ्ठल चरणी मनःपुर्वक प्रार्थना.



खिळ बसली परंपरेला नाही घडली आषाढवारी

पापण्या ओलावल्या अंतर्यामी दुखावला वारकरी

      किती केली प्रार्थना अन आळवणी विठुरायाची

      नाही झाली कामना पूर्ण विठ्ठलाच्या दर्शनाची

नाही झाला गजर टाळमृदुंगाचा चंद्रभागेतीरी

नाही नाचले कुणी घेऊनी तुळशीस डोईवरी

      नाही नाहली पंढरी घोषात विठुमाऊलींच्या

      नाही भिडल्या आसमंती ध्वजा वैष्णवांच्या

घेऊ आता दर्शन देवघरातल्या पंढरीरायाचे

करुया मानसपुजन त्या विठ्ठल रखुमाईचे

    अर्पूनी तुलसीपत्र करु पूजन सावळ्याचे

    कार्तिकवारीस घडावे दर्शन विठुचरणांचे


- स्नेहल मोडक





Sunday, July 11, 2021

आषाढ

              आषाढातील पहिला दिवस महाकवी कालिदास दिन. संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून कालिदासांना व्यापकपणे ओळखलं जातं. त्यांचं साहित्य प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत यांवर आधारित आहे. हे साहित्य हजारो वर्षांपासून सर्वांना प्रेरणादायी ठरलंय. या साहित्याचा अभ्यास सर्वत्र सातत्याने सुरु आहे. त्यांची सात महाकाव्यं प्रसिद्ध आहेत. त्यातील कुमारसंभवम, रघुवंशम, ऋतुसंहार आणि मेघदूत ही महाकाव्यं आणि शाकुंतल सारखी नाटकं यांमुळे त्यांना विद्वान संस्कृत लेखक, कवी म्हणून मान्यता मिळाली.

           आषाढ म्हटलं कि यातलंच एक महाकाव्य लगेच आठवतं ते म्हणजे मेघदूत.

           आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लीष्ट सानुम् ,

           वप्रक्रिडापरिणतगज प्रेक्षणियं ददर्श...

                 कुठल्यातरी प्रमादाची शिक्षा म्हणून नगराबाहेर काढलेला यक्ष सुरवातीचा काही काळ कसातरी व्यतीत करतो. पण आषाढ सुरु होतो आणि पहिल्याच दिवशी त्याचा संयम संपतो. रामगिरी पर्वतावर मदमस्त गजाप्रमाणे झुकलेल्या त्या कृष्णमेघालाच विरहव्याकुळ यक्ष आपलं कुशल पत्नीपर्यंत पोहोचविण्याची विनंती करतो. या मेघाची दूत बनण्याची अनुमतीही न घेता यक्ष मेघाला अलकापुरीपर्यंतच्या प्रवासासाठी वेगवेगळ्या श्लोकांमधून निसर्गातील रंगचित्रांचं अप्रतिम वर्णन करतो. 

                   म्हणूनच आषाढ म्हटलं कि महाकवी कालिदास आणि त्यांचं मेघदूत हे महाकाव्य मनात रुंजी घालू लागतं

                    आषाढ हा वर्षाऋतूमधला महत्वाचा महिना. ज्येष्ठ महिन्यातल्या कमी अधिक पावसाची उणिव आषाढ भरुन काढतो. धुवांधार आषाढसरींनी आपण आणि वसुंधरा दोघंही तृप्त होतो. पेरलेल्या बियाण्याची रुजवात जरी ज्येष्ठात झाली तरी त्या नाजुक हिरव्या पात्यांना सुफलता देण्याचं काम आषाढच करतो. चिखलभऱ्या भुईत लावणीचं काम  जोशात सुरु होतं ते आषाढातच. कडेकपारीतून फेसाळ धबधबे कोसळू लागतात तेही आषाढातच. आषाढसरींनी धरतीही हिरव्या मखमालीने सजते.

                     आषाढवारी आणि गुरुपौर्णिमा है आषाढ महिन्यातील अजून दोन महत्वाचे दिवस. 

                      याच आषाढाला थोडंसं श्ब्दकाव्यात गुंफून महाकवी कालिदासांना ही काव्यांजली अर्पण…



दिवस खास आषाढाचा पहिला आज

हिरवाईच्या मखमालीचा ल्यायला साज

          निळ्या आभाळी सारे कृष्णमेघ दाटले

          तेच दूत यक्षाने मग अलकेस धाडले

मेघमृदुंगासह बरसल्या रेशीमधारा

अमृत पिऊनी तृप्त झाली अवघी धरा

          थेंबांच्या साजशृंगारे नटल्या तरुवेली

          रानीवनी विविधरंगी फुले उमलली

झऱ्यातूनी येई ऐकू अनाहत नाद

फेसाळ जळात खेळाया घाली साद

         आषाढदिन जन्म महाकवी कालिदासांचा

         गुंफूनी शब्दफुलांना प्रयत्न आदरांजलीचा

 

-स्नेहल मोडक




Friday, July 2, 2021

मी एक झाड - शेवग्याचे

                     ऐका कथन आयुष्याचे

                 माझा जन्म एका मोठ्या गृहसंकुलाच्या आवारात झाला. तिथल्या कसदार मातीत मी छान रुजलो. दिसामाजी वाढू लागलो. बघता बघता माझ्या इवल्याशा रोपट्याचं झाडात रुपांतर होऊ लागलं. आवारात खूप हिरवाई असल्यामुळे विविध पक्ष्यांचा अधिवास होता. मी थोडासा मोठा होताच ते सगळे पक्षी माझ्याही अंगाखांद्यावर खेळू लागले, विसावू लागले. खूप खुश झालो मी. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटात दिवस कधी संपायचा कळायचही नाही.

                   सरत्या काळाबरोबर मी मोठा होत होतो. माझ्या फांद्याचा विस्तार आणि उंची छान वाढत होती. पक्ष्यांचं विसावणंही वाढलं होतं. त्याचबरोबर माझं अवनीशी जुळलेलं नातंही अधिक घट्ट, खोल झालं होतं.

                  अवघ्या काही काळातच माझं रुपांतर मोठ्ठया झाडात झालं अन एक दिवस माझ्या एका फांदीवर इवलीशी कळी आली. काही दिवसांतच कळ्याफुलांनी मोहरलो मी. आणि मग पक्ष्यांबरोबरच रंगीबेरंगी फुलपाखरं ही माझ्या फुलांभोवती रुंजी घालू लागली. खूपच सुखावलो मी. काही दिवसांनंतर हिरव्या लांबसडक आणि दळदार शेंगांनी अंगोपांग बहरलो.

                  कोवळी पालवी, फुलं आणि शेंगांचे औषधी गुणधर्म सर्वांनाच माहित असल्यामुळे इथली लोकं माझ्या पानाफुलांचा आणि शेंगांचा आहारात आवर्जून समावेश करत. दिवस खूप छान चालले होते. मी वारंवार शेंगानी बहरत होतो.  पक्षी, फुलपाखरं यांनाही माझा आधार हवासा वाटत असावा. माझ्या एका बाकदार फांदीवर एक बुलबुलची जोडी नियमित बसायची. हिंदोळ्यावर झुलल्यासारखं वाटायचं बहुधा त्यांना. फांदीवर बसून सुरेल कुजन करायची. खूप आवडायचं मला ते ऐकायला.

                  वादळ,वारा,पाऊस झेलत मी मुळं घट्ट रोवून ताठ उभा होतो बरेच वर्ष. अधुनमधून जोरदार वाऱ्यापावसात माझी एखादी फांदी तुटून बाजूच्या घराच्या खिडकीच्या पत्र्यावर पडायची. पण कुणाचं काही नुकसान होत नव्हतं.  तसंच त्या घरातील कुणाचीही काही तक्रार नसायची. एकंदरीत माझा कुणाला त्रास नव्हता पण उपयोग मात्र नक्की होता. त्यामुळे माझं जगणं बहरणं सुखनैव सुरु होतं.

नुकत्याच होऊन गेलेल्या मोठ्या वादळानंतरही मी ताठ उभा होतो.

                   अचानक एक दिवस माझ्या बाजूला इमारतीबाहेरच्या जाण्यायेण्याच्या रस्त्याचं काम सुरु झालं. यंत्राच्या सहाय्याने आधीचा कोबा तोडण्याचं काम सुरु झालं. आणि इतकी वर्षं मातीत घट्ट रुजलेल्या माझ्या मुळांना या यंत्राचे हादरे सहन करणं अवघड होऊ लागलं. पण तरीही मी धरणीच्या आधाराने घट्ट उभा होतो. मात्र इथल्या लोकांनाच बहुदा मी नकोसा झालो होतो. काम सुरु असतानाच एक दिवस मला काही कळायच्या आधीच माझी मुळं मातीतून अर्धवट वर काढली गेली आणि मुळांचा आधार सुटल्यामुळे मी बाजूच्या घराच्या खिडकीच्या पत्र्यावर कलंडलो. खरंतर खूप घाबरलो होतो मी पण कशाचातरी आधार देऊन मला परत उभं करतील ती लोकं असं वाटत होतं. पण व्यर्थ होतं ते वाटणं. कारण लगेच त्यांनी माझ्या भोवती जाड दोर गुंडाळला आणि खाली खेचून मला धराशयी केलं. खूप तडफडलो मी पण बाजूच्या घरातल्या लोकांशिवाय इतर कुणालाही माझं तडफडणं जाणवलंही नाही. धराशयी होऊनही आशेवर होतो मी पण काही क्षणातच माझ्या साऱ्या फांद्या माझ्यापासून विलग केल्या गेल्या. आणि जमिनीवर माझा फक्त असहाय्य बुंधा उरला. 

                 मधल्या काळात माझं शेंगांनी बहरणं सुरु असताना माझ्या अगदी जवळच अजून एक माझंच रोप रुजलं होतं. तेही छान वाढत होतं. मी जेव्हा कायमचा उध्वस्त झालो तेव्हा बाजूचं लहान झाड उभं आहे ते तरी मोठं होईल याचं समाधान होतं पण चार दिवसांनीच अचानक ते झाडही माझ्या अजूनही जमिनीवर पडलेल्या बुंध्यावरच तोडून टाकलं आणि काही वेळातच आम्हा दोघांचही अस्तित्व कायमचं संपवलं.


                 वाचलंत ना कथन शेवग्याच्या झाडाचं? एक झाड तोडलं त्याची कसली कथा असा विचार मनात आला असेल ना? पण निसर्गाशी एकरुप होणाऱ्या, हिरवाईचं महत्व जाणणाऱ्या लोकांना असं नक्कीच वाटणार नाही. झाडांनाही भावना, जाणीव असते, त्यांनाही वेदना होतात हेही विज्ञानाने सिध्द केलंय. ' झाडे लावा, झाडे जगवा' याकडे दुर्लक्ष करुन सगळीकडे हिरवाई कमी / नष्ट करण्याचे उद्योग सुरु आहेत. हे गृहसंकुलही याला अपवाद नाही असं खेदाने म्हणावं लागतंय. एवढं मोठं शेवग्याचं झाड तोडण्याचं कारण,' पडायलाच आलं होतं म्हणून पाडलं' असं सांगितल्यावर मनोवेदना अजूनच वाढली. नुकत्याच झालेल्या मोठ्या वादळातही ज्या झाडाची फांदीही न पडता ताठ उभं होतं ते झाड पडायला आलं होतं हे कारण खरं असू शकतं का? त्यानंतर दुसरं लहान झाड कुठलंही कारण न सांगता तोडलं तेव्हाही कुणी काही करु शकलं नाही.

- स्नेहल मोडक

Tuesday, June 22, 2021

सागरा ...

             सध्याच्या कोरोनाकाळात पर्यटनावर खूप निर्बंध घातले आहेत. अर्थात आपल्या सुरक्षिततेसाठीच हे निर्बंध असल्यामुळे पर्यटनाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. 

           कोकण + समुद्र + आंबे = मे महिना  हे समीकरणही गेल्या वर्षापासून जुळवणं अवघड झालंय. वर्षासहलींचाही आनंदानुभव घेता येत नाहीय. गडकिल्ल्यांवर जाणे, समुद्र किनारी फिरणे सारं काही सध्या जवळजवळ बंद आहे.

            कोकणात रहाणाऱ्या लोकांचा समुद्र हा नित्य जीवनाचाच एक भाग आहे. आपल्या मनोभावनेप्रमाणे प्रत्येक वेळी वेगळा भासणारा हा समुद्र वारंवार अनुभवण्यासारखाच असतो. पण काही कारणास्तव कोकणातून इतरत्र स्थायिक झालेल्या लोकांना समुद्र अधुनमधूनच अनुभवायला मिळतो.

             पण सध्याच्या काळातला सागराचा हा दुरावा मात्र कधी संपेल याचीच सगळे लोकं वाट बघत असतील, हो ना? 


      

विरह तुझा मज अपार झाला

सागरा  कधी भेटशील मला

            सरला काळ किती भेट न घडली

            तव दर्शनाची आस मज लागली

अथांग निळजळी नौका डोलती

शुभ्र फेसाळ लाटा किनारी खुलती

            जळात मत्स्य अन वरी समुद्रपक्षी

            ओल्या वाळूत रेखिती खेकडे नक्षी

 अस्ताचलास जेव्हा रविबिंब टेकते

 सागर निळाई मग सोनवर्खी होते

            उमटती पाऊलखुणा वाळूवरी

            स्पर्शजलाने शहारा येई तनुवरी

 वाळूत आठवणींची चित्रं रेखिते

 कधी अलगद शंखशिंपले वेचिते

            कातर हळव्या क्षणी स्तब्ध बसते

            उत्फुल्ल क्षणी शुभ्र लाटांशी खेळते

 येता किनारी तुझिया मी सुखावते

 कधी ऐकत गाज निद्राधीन होते

            किती काळ सुख हे ना लाभले

            दुरुनही तुझे दर्शनही ना घडले

 विरह तुझा मज अपार झाला

 सागरा कधी भेटशील मला

 

- स्नेहल मोडक




Tuesday, June 15, 2021

मृगधारा

            जसजशी वैशाखाची काहिली वाढत जाते तसतशी सगळ्यांना पावसाची आस लागते. पावसाची अगदी आतुरतेनं वाट पहाणं सुरु होतं आणि मग सुरु होतो वर्षा ऋतू.

            आपल्या आसुसलेल्या मनाला आणि धरतीला शांत करण्यासाठी मृगधारा बरसू लागतात. तृषार्त अवनी आणि आपणही तृप्त तृप्त होतो. नभी मृगमेघ दाटू लागताच आपल्या मनातही आठवणी दाटतात. आणि बरसत्या पर्जन्यधारेबरोबरच आठवणीही झरु लागतात. 

            मित्र-मैत्रिणी किंवा प्रिय व्यक्तीसह पावसात भिजण्याची मजा वेगळीच असते. ते क्षण पुन्हा अनुभवता आले तर खूपच सुंदर नाहीतर त्या आठवणीत मात्र रममाण होतो आपण.


मृगमेघांनी नभ हे आक्रमिले

बिजलीसंगे मेघमृदुंग कडाडले

       बरसल्या रेशीमधारा चिंब मी भिजले

       तुझिया आठवांचे काहुर मनी दाटले

भेट आपली स्मरते धुंद पावसातली

अवचित भेट घडली जणू स्वप्नातली

       रिमझिम जलधारांत आपण भिजलो

       अन मृदगंधाने मनोमनी मोहरलो

बरसता घन निळा मन मयुर जाहले

स्मरुनी ती प्रीत मन अलगद फुलले

        झेलुनी मृगधारा तन तृप्त जाहले

        आठवणीत तुझिया मन हे रमले

बरसल्या रेशीमधारा चिंब मी भिजले

तुझिया आठवांचे काहुर मनी दाटले

- स्नेहल मोडक





Sunday, June 6, 2021

मनसखा

                 मनसखा / सखी, अगदी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील खास व्यक्ती. आपण आपल्या साऱ्या भावभावना, घटना कुटुंबिय, आप्तस्वकिय, मित्र-मैत्रिणी यांच्याशी व्यक्त करतो, चर्चा करतो, निर्णय घेतो, साऱ्या सुखदुःखात एकत्र असतो. पण काही भावना, घटना मात्र अशा असतात की त्या आपण फक्त खास व्यक्ती जवळ म्हणजेच मनसख्याजवळच बोलू शकतो. तर कधी कधी आपण न बोलताही मनसख्याला त्या सहज कळतात.

                कधी विचारांच्या आवर्तात भरकटलेल्या मनाला मार्गावर आणायला मनसख्याची गरज असते. तर कधी सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर हिंदोळताना मनसख्याची साथ असेल तर हिंदोळाही वेडावाकडा होत नाही. कृष्णाप्रमाणे सदैव साथ देणारा एकतरी मनसखा/ सखी प्रत्येकाला असावाच.


भेटेल का कधी मज कृष्णसखा

होईल का तो माझा मनसखा

       चित्र कल्पनेतले संगे त्याच्या रेखावे

       कधी सुरेल गीतही दोघांनी गावे

गूज अंतरीचे मी त्यास सांगावे

अव्यक्त भाव मात्र त्याने जाणावे

       मौजमस्ती लटका रुसवा असावा

       परि नात्यात दुरावा कधी नसावा

कधी वाटे दोघांनी अबोल असावे

परि मूक अर्थ त्याने उलगडावे

       हिंदोळ्यावर सुखदुःखाच्या साथ झुलावे

       मधुगंधी मोगऱ्यासम मैत्र आमुचे फुलावे

भेटेल का कधी मज कृष्णसखा

होईल का तो माझा मनसखा


- स्नेहल मोडक

Sunday, May 30, 2021

वळीव

               वैशाख अर्धा सरलाय पण रणरणतं उन आणि जीवाची तगमग काही कमी होत नाहीय. पावसाळा सुरु व्हायलाही अजून थोडा काळ बाकी आहे. या रखरखीत उन्हाने भुई भेगाळलीय, जीवाची काहिली होतेय त्यामुळे मनाला पर्जन्यसरींची आस लागलीय. वर्षाऋतूच्या आगमनाला जरी वेळ असला तरी त्या आधीच्या वळवाच्या पावसाची मन आसुसून वाट पहातय. अगदी अचानकपणे पण वाजत गाजत येणारा, थोडा बरसुन निघून जाणारा असा हा वळवाचा पाऊस. धरती अन मनाला सुखावणाऱ्या या अवचित पावसासाठी मन फारच आसुसलंय.


दाह धरतीचा अति जाहला

वनी वैशाखवणवा पेटला

         तनामनाची जणू काहिली झाली

        अवचित पावसाची आस लागली

पाऊस मृगाचा जरी तो नसेल

दाह धरतीचा किंचीत शमेल

        क्षणिक गारवा जरी त्याने पसरेल

        मृदगंधाने मग मन हे मोहरेल

 नभी मृदुंग तो कडाडेल का

 नर्तन विद्युल्लता करेल का

        पाऊस असा अवचित येईल का

        धरती अन मनास भिजवेल का

- स्नेहल मोडक

Tuesday, May 25, 2021

ओढ ...


          दत्तजयंती पासून सलग तीन पौर्णिमा श्री दत्तगुरुंच्या कृपेने गिरनार दर्शनाचा योग आला. आणि मग होळी पौर्णिमेलाही गिरनारला जायची ओढ लागली, रेल्वेचं आरक्षणही केलं पण अंतर्मनाला मात्र तो दर्शनयोग येणार नसल्याची जाणीव झाली होती. अखेर तसंच झालं. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रवासावरील निर्बंध वाढले आणि आम्हाला गिरनार यात्रा रहित करावी लागली.

        सध्या जरी गिरनारला प्रत्यक्ष दर्शनाला जाणं शक्य नसलं तरी दर पौर्णिमेला गिरनारची मानसयात्रा मात्र नक्की घडते. आणि त्या मानसपुजेने मनाला क्षणिक समाधान लाभते. सारं पुर्ववत सुरळीत सुरु व्हावं आणि आम्हालाही गिरनार यात्रा घडावी हिच श्री दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना.



जडला छंद मनास गिरनार दर्शनाचा

दशसहस्र पायरी ही सहज चढायचा

       ध्यानी मनी नित्य गुरुशिखर वसे

       मिटल्या चक्षूंस त्रिगुणात्मक दिसे

तिन्ही त्रिकाळ दत्तगुरुंचे नाम स्मरावे

गुरुकृपे संकट महामारीचे नष्ट व्हावे

        कळिकाळास आता तुम्ही थांबवावे

        सौख्य आरोग्याचे कवचकुंडल द्यावे

दर्शन अन परिक्रमेचे योग नित्य यावे

अखंड धुनीमध्ये स्वयं दत्तगुरु दिसावे

         तुजवीण कैसे हे संकट सरेल

         नामस्मरणे तुझिया मोद भरेल

संपूनी दु:स्वप्न पुन्हा सौख्य समृध्दी यावी

आस गिरनार दर्शनाची तुम्ही पूर्ण करावी

- स्नेहल मोडक

Monday, May 10, 2021

प्रिय झिंगु



       


        


        


            रात्रीचे सव्वादोन वाजले होते. मी नित्याप्रमाणे निद्रादेवीची आराधनाच करत होते. रोजच्या सारखी एवढ्या अपरात्रीही कावळ्यांची कावकाव सुरु होती. त्यात अजून एका आवाजाची भर पडली होती ती बुलबुलच्या कलकलाटाची.पण त्या सगळ्या आवाजांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत मी निद्रेच्या अधीन होण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात लेक विचारत आलीच बुलबुल एवढा कलकलाट का करतायत. मग मात्र थोडं लक्ष देऊन आवाज ऐकला आणि जाणवलं त्यातलं वेगळेपण.  नंतर मात्र लगेच आम्ही दोघी बाहेर गेलो. 

           समोरच दोन मांजरं दिसली आणि लक्षात आलं बुलबुल त्या मांजरांवरच ओरडतायत. आम्ही मांजरांना तिथून हाकलून दोन पावलं पुढे गेलो आणि आमचा अंदाज खरा ठरला. (बुलबुलचं पिल्लू ) तू घरट्यातून खाली पडला होतास आणि तुला पकडायला ती दोन्ही मांजरं आली होती. मी चटकन तुला उचलून घेतलं आणि ताबडतोब बुलबुलचा कलकलाट थांबला. अतिशय घाबरलेल्या तुला  शांत करण्याचा प्रयत्न केला. मग तुझं घरटं शोधण्याचा खूप प्रयत्न केला. अर्थात घरटं सापडलंच नाही. मधल्या वेळेत लेकीने घरातून पुठ्ठयाचा छोटा खोका आणला होता. त्यात झाडाची पानं घालून तुला आम्ही त्यात ठेवलं होतं. मादी बुलबुल सारखी घिरट्या घालत शांतपणे बहुतेक आम्हाला घरटं दाखवायचा प्रयत्न करत होती. पण आम्हाला घरटं दिसलंच नाही. अखेर बुलबुलच्या जोडीला जाता येईल पण इतर कुणी जाऊ शकणार नाही याची काळजी घेत तुझ्यासहित तो खोका झुडुपात थोडा उंचावर ठेवला. बुलबुलच्या मादीला तिचं पिल्लू तिथं असल्याचं कळलंय याची खात्री करुन आम्ही घरात आलो.

           या सगळ्या प्रकारात पहाटेचे साडेचार वाजले होते. झोप येणं शक्यच नव्हतं. तासभर आराम करुन मी उठलेच. गुढीपाडवा होता त्यादिवशी. त्यामुळे कामांची जरा गडबडच होती. पण त्या गडबडीतही दोन-तीन वेळा तू झुडुपात सुरक्षित असल्याची खात्री करुन आले. दुपारी जेमतेम जेवण झालं आणि परत बुलबुलचा जोरदार कलकलाट सुरु झाला. बाहेर जाऊन बघितलं तर खोका झुडुपातून खाली पडला होता आणि तू दिसत नव्हतास. अखेर खूप शोधल्यावर जवळच्याच एका झाडाच्या बुंध्याशी तू सापडलास आणि मग मात्र मी तुला खोक्यात ठेवून सरळ घरात घेऊन आले. बुलबुलच्या जोडीला मी पिल्लू घरात आणल्याचं कळलं होतं ते दोघं खिडकीवर शांत बसून राहिले होते.

           तुला घरात आणलं पण आता खायला काय द्यायचं कळेना. मग एक लेक आंतरजालावर माहिती काढायला लागली तर दुसरी जवळच्या दुकानात ( पेट शॉप ) तुझ्यासाठी खाऊ आणायला धावली. नंतर तुला खोक्यासह खिडकीतल्या जाळीत सुरक्षित ठेवलं. तिथे बुलबुल तुला खाणं भरवायला सहज येऊ शकत होते. पण इतर पक्षी, मांजरं येणं शक्य नव्हतं.

           आपल्या घरात लहान बाळ आल्यावर जसं आपलं सगळं जग बाळाभोवती एकवटतं अगदी तसंच आम्हीही सतत तुझ्या भोवती राहू लागलो. सुरुवातीचे दोन- तीन दिवस तुला तळव्यावर घेऊन तुझ्या डोक्यावरुन हळूवार बोट फिरवलं की तू छान झोपायचास. ज्या सहजतेने तू झोपायचास त्या सहजतेने तुझं नामकरण झालं ' झिंगु '.

            तुला आम्ही न दिसता हाक मारली शीळ घातली तरी लगेच कळायचं आम्ही दिसेपर्यंत मान तिरकी करत करत तू आम्हाला शोधायचास आणि आमच्या हातावर येऊन बसायचास. तुला आमच्या तळहातावर आणि खांद्यावर बसायला फारच आवडायचं आणि आम्हालाही आवडायचं तुझं असं बिनधास्त खांद्यावर येऊन बसणं.  मादी बुलबुल दिवसभर खाणं आणून भरवायची तरी आम्हीही भरवायला हवं असायचं तुला. भात, पोळी, केळं, चिकू हे तुझं आवडतं खाद्य.याशिवाय मादी किडे-मकोडेही आणून तुला भरवत होती.

            तुझी वाढ आणि प्रगती हळूहळू सुरु होती. आम्हाला तू  मिळालास तेव्हा साधारण ८-१० दिवसांचा होतास. खरंतर १५-२० दिवसांचं पिल्लू बऱ्यापैकी उडायला लागतं. पण तेवढा अजून तू प्रयत्न करत नव्हतास. कदाचित उंचावरुन पडल्यामुळे तुझी प्रगती थोडी हळू होत असावी. तुला छान उडता यावं म्हणून आमच्यापरिने आम्ही प्रयत्न करतच होतो. तुला आकाशात छान विहरताना पहायचं होतं आम्हाला. मात्र तुझी मस्ती, उड्या मारणं छान सुरु होतं. छोट्या झाकणात ठेवलेलं पाणी प्यायला आणि मोठ्या डब्यातल्या पाण्यात मस्त खेळत अंघोळही करायला शिकला होतास तू.

            तुला खिडकीत ठेवल्यापासून भल्या पहाटे बुलबुलची जोडी खिडकीत यायची. आधी कलकलाटाने आणि मग मंजूळ स्वरांनी तुला आणि आम्हालाही उठवयाची. मग सुरु व्हायचा त्यांचा तुला  खाद्य भरवण्याचा कार्यक्रम. तुलाही  चार दिवसांत छान कंठ फुटला होता त्यामुळे तुही मस्त किलबिलाट करायचास. ८ मे च्या पहाटेही नेहमीप्रमाणे तुझ्या मंजुळ स्वरांनी मला जाग आली. मी उठून रोजच्या कामात गुंतले. पहाटेची कामाची गडबड संपवून मी तुझ्याजवळ आले.तुला खाणं देताच तुझं उड्या मारणं सुरु झालं. समोरच्या झाडावर बुलबुलची जोडी बघून तू उडायचा प्रयत्न करतोस का बघावं म्हणून तुला खिडकीच्या जाळीवर ठेवलं. लेक तुझ्याजवळ होती आणि मी तुझ्यावर लक्ष ठेवायला बाहेर गेले.  दोन तीन मिनिटांनी जोडीचा आवाज ऐकून तू उडायच्या ऐवजी खाली उडी मारलीस. आणि नुसत्या उड्या मारतच पुढे जाऊ लागलास .

                मांजराची चाहूल लागताच मी तुला उचललं आणि खिडकीत ठेवायच्या आतच तू माझ्या हातातून निसटलास आणि खाली उडी मारलीस. मी परत तुला उचलणार त्याक्षणीच नियतीने डाव साधला. मांजराच्या रुपात काळाने तुझ्यावर झडप घातली. मी तुला वाचवण्यासाठी मांजराच्या मागे धावले पण माऊ झाडावर चढून पलिकडे निघून गेलं. आमच्या डोळ्यांदेखत आमच्या झिंगुला माऊने कायमचं हिरावून नेलं. अतिशय लळा लावून तू पुढल्या प्रवासाला निघून गेलास. तुझा पुढला प्रवास सुखाचा होवो हीच प्रार्थना. तू प्रत्यक्षात जरी आता या जगात नसलास तरी सदैव आमच्या स्मरणात राहशील.

            'जीवो जीवस्य जीवनम्' हा जरी सृष्टीचा नियमच असला तरी स्विकारणं कठीण आहे.         

            


अर्ध्या रात्रीच्या कलकलाटाने बाहेर पाहिलं

घरट्यातून खाली पडलेल्या तुला घरात आणलं

       भल्या पहाटे जागवायचास किलबिलाटाने

       नाही येत झोप खिडकीतल्या सुन्या घरट्याने

भरवत होतो खाऊ तुला करीत होतो रक्षण

एकाच  इच्छेने करु नये कुणी तुझे भक्षण

        पहात तुझी मस्ती ओंजळीत तुला घेत होतो

        सारा दिवस तुझ्याच अवतीभोवती रहात होतो

मुक्त गगनभरारी घेताना तुला पहायचं होतं

फांदीवर बसलेल्या तुला ओळखायचं होतं

         पंखातलं बळ पहाण्यासाठी क्षणभर तुला सोडले

         क्षणात माऊने तुजवर घातली झडप अन मी हरले

तुझ्यासाठी आकांताने धावले मी माऊच्या मागे

परि चपळाईने माऊ झाडावरून गेली छतामागे

         का रे इतका लळा लावूनी गेलास तू कायमचा

         जाताजाता मात्र झालास घास माऊच्या पिल्लाचा

 

- स्नेहल मोडक


Monday, May 3, 2021

भावपूर्ण

           सद्यस्थितीत कोरोनाबद्दल वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा, लिखाण सातत्याने सुरु आहे. अर्थात परिस्थिती फारच भयावह आहे. प्रत्येकजण मनातून प्रचंड धास्तावलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सतत होणाऱ्या उलटसुलट चर्चा. लेखन आणि चित्रफिती यांनी सगळे गोंधळलेल्या बावरलेल्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे आता आपण व्यक्त व्हायचं नाही असं ठरवलं होतं पण नुकत्याच वाचनात आलेल्या एका वाक्याने विचारचक्र सुरु झालं आणि मन शांत होणं अवघड होऊन बसलं. अखेर शब्दबद्ध करायचं ठरवलंच.

           'जितक्या सहजतेने आपण thank you किंवा sorry म्हणतो तितक्याच सहजतेने आपण आता भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणायला लागलोय'. हे वाक्य वाचताक्षणीच मन सुन्न झालं. आणि काही क्षणांनंतर जाणवली ती सद्यपरिस्थितीतली भीषणता. अक्षरशः मृत्यूचं तांडव सुरु आहे सध्या.

           नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच कुठल्याही परिस्थितीलाही दोन बाजू असतात. कोरोनामृत्यूचं प्रमाण जरी अधिक असलं तरी त्यातून बरं होणाऱ्यांचं प्रमाण त्याहून नक्कीच जास्त आहे. विविध माध्यमांतून आपल्या समोर नकारात्मक घटनाच येत आहेत. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे ज्या काही सकारात्मक घटना घडतायत त्या आपल्यापर्यंत फारशा येत नाहीयेत. 

           हा आजार फार भयावह आहे हे जरी खरं असलं तरी यातून माणुसकी, सद्सदविवेक बुध्दी संपत चाललीय ही या आजाराहून भयंकर वाईट गोष्ट आहे. अर्थात याचीच दुसरी बाजू म्हणजे कुठेतरी काही प्रमाणात तरी माणुसकी अजून जिवंत आहे. एखाद्या वादळी रात्री दूरवर लुकलुकणारा दिवाही आपल्याला त्या वादळाला ठामपणे सामोरं जाण्याची शक्ती देतो अगदी तसंच या आजारात सुरक्षेची काळजी, जिवंत असलेली माणुसकी, सकारात्मक घटना, आपली मन:शक्ती आणि प्रार्थना यांच्या आधारानेच आपल्याला या कोरोनाच्या भयप्रद संकटावर मात करायची आहे. या आजारापासून सुरक्षित रहाण्यासाठी शारीरिक अंतराची गरज असली तरीही भावनिक अंतर पडू न देता एकमेकांना आधार देणं आणि काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

          आपल्या मन:शक्तीचा आपल्या शरीरावर खूप मोठा परीणाम होत असतो. त्यामुळे कितीही संकटं आली तरी आपण मनाने खंबीर रहायलाच हवं म्हणजे नक्की आपण संकटावर मात करु शकू. सध्या आपण सगळेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अतिशय भयावह परिस्थितीतून जातोय.पण एकत्रितपणे सकारात्मक विचार,प्रयत्न आणि प्रार्थनेच्या आधारावरच आपण या दु:स्वप्नातून बाहेर येणार आहोत. 

           आपली सद्सदविवेकबुध्दी आणि माणुसकी चिरंतन रहावी आणि उदंड आयुरारोग्य लाभावं हिच ईशचरणी प्रार्थना.


आयुष्य थांबलंय की संपलंय

जमेल का परत हसत खेळत जगणं

कि उरेल ते फक्त स्वप्नात पहाणं

       धावत होतो सारे आपण पैशासाठी

       कुटुंबासाठी, सुखाने जगण्यासाठी

धावपळीच्या जगण्यातून काढून वेळ

जमवत होतो मैत्री अन नात्यांचा मेळ

        करुन साजरे नित्य उत्सव आणि सण

        वेचत होतो मिळून सारे आनंदाचे क्षण

 शोधात नवनवीन बिघडला तोल निसर्गाचा

 होणार का आता त्यातच ऱ्हास मानवाचा

         चिंता सोडून काळजी घेणं गरजेचं झालंय

         प्रयत्न अन प्रार्थना एवढंच हाती उरलंय

         आयुष्य थांबलंय की संपलंय........

स्नेहल मोडक

कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...