Pages

Monday, February 22, 2021

वादळ - विचारांचं


वादळ आणि तेही मनातल्या विचारांचं...

            सगळ्यांच्याच मनात ही विचारांची वादळं अगदी वारंवार येत असतात. आपण कितीही कामात गुंतलेले असलो तरी खूप वेळा मनात काही वेगळेच विचार सुरु असतात. कधी कधी विचारांचं हे वादळ एवढं जोरदार असतं कि हातातलं कामही बाजूला ठेवून आपल्याला त्या वादळाला संयमाने शांत करावं लागतं. अर्थात सारं काही छान मनासारखं घडेल या आशेवरच ते वादळ शमतं.

        

मनातल्या विचारांचं वादळ कधी शमेल का

सारं काही अगदी मनासारखं कधी घडेल का

      आयुष्याच्या पडद्यावर मनासारखं चित्र साकारेल का

      कल्पनेच्या कुंचल्यातून सप्तरंग तयात भरतील का

नातीगोती अन मैत्री निरंतर जपता येईल का

क्षणी सुखदुःखाच्या साथ सर्वाची लाभेल का

       चालताना तमातुनी संगतीस कुणी असेल का

       तिमीरातूनी तेजाचे त्या भाग्य कधी लाभेल का

 तप्त रणातूनी सदैव चालणे कधी संपेल का

 बरसूनी अमृतधारा तनमन तृप्त होईल का

        झोपेतल्या जगी सुखस्वप्ने कधी दिसतील का

        सत्यातल्या जगी स्वप्नपुर्ती सारी होईल का

 मनातल्या विचारांचं वादळ कधी शमेल का

 सारं काही अगदी मनासारखं कधी घडेल का


                   - स्नेहल मोडक

Thursday, February 18, 2021

खिद्रापूर

          कोल्हापूरपासून ६० किलोमीटरवर आणि नरसोबाच्या वाडी पासून अवघ्या २० किलोमीटरवर वसलेलं शिरोळ तालुक्यातील एक छोटसं गांव खिद्रापूर. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेलं हे गांव.

            या गावाला भेट द्यायची इच्छा आजवर काही ना काही कारणाने पुढे जात होती अखेर नुकताच तो योग आला आणि मनाला व दृष्टीला जणू शाही मेजवानीच मिळाली.

             भारतीय स्थापत्य कलेतलं एक सुवर्णपर्ण म्हणजे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. बाराव्या शतकात शिलाहार राजांच्या काळात बांधलेलं हे कोपेश्वराचं अप्रतिम, देखणं मंदिर. 

              मंदिराचा प्रवेशमार्ग अगदी साधाच. त्यामुळे सुरुवातीला आत काय पहायला मिळणार याची किंचितही कल्पना येत नाही. मात्र प्रवेशद्वारातुन शिरल्यावर आपल्या समोरच उभं असतं ते काळ्या पाषाणातलं अप्रतिम शिल्पमंदिर.

               खरंतर मंदिरात प्रवेश केल्यावर आपण सर्वप्रथम देवदर्शन करतो. मात्र इथे आल्यावर मी आधी मंदिराच्या बाह्यभागाच्या निरिक्षणातच दंग झाले. अर्थात नंतर काही क्षणातच आत जाऊन आधी देवदर्शन घेतलं.

                मंदिराची रचना ताऱ्याच्या आकाराची आहे. संपूर्ण मंदिर ९५ हत्तींच्या पाठीवर उभं आहे. प्रत्येक हत्तीच्या पाठीवर देवदेवता कोरलेल्या आहेत. पुर्ण मंदिरात अप्रतिम अशा कोरीवकामाने नटलेले १०८ खांब आहेत. आणि या सर्वावर कळस म्हणजे ४८ खांबांवर तोललेला १३ फुट व्यासाचा स्वर्गमंडप. आणि त्याखाली असलेली तेवढ्याच व्यासाची गुळगुळीत काळ्या पाषाणाचीच रंगशीळा. छतविरहित असा हा स्वर्गमंडप एकमेवाद्वितीय म्हणावा असाच आहे. त्या आकाशगवाक्षातून पहाताना अक्षरशः भान हरपून जातं. त्याच्या ४८ खांबांवरचं कोरीवकाम म्हणजे स्थापत्य कलेचा देखणा आविष्कारच. प्रत्येक खांब वेगळ्या पद्धतीने कोरलेला आहे. गोलाकार, चौकोन, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपल्याला प्रत्येक खांबात पहायला मिळतात.

                मुख्य मंदिरापासून काहीसा विलग असलेला हा स्वर्गमंडप, त्यानंतर आच्छादित सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.

                कोपेश्वर म्हणजेच शंभू महादेव. अर्धांगिनी दक्ष कन्या सतीच्या जाण्याने दक्ष राजावर कोपलेला तो कोपेश्वर. त्यांची समजूत काढण्यासाठी तिथे आले ते भगवान विष्णू. श्री विष्णूंचं नांव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर आणि त्यांच्या बाजूलाच थोडा उंच धोपेश्वर. 

                   गर्भगृहातील सर्व भिंती आणि खांबांवर अतिशय रेखीव अशा देवदेवता कोरलेल्या आहेत. गर्भगृहात प्रकाश थोडा कमी आहे. परंतु काही क्षणांनी आपल्याला मुर्तींचे व्यवस्थित अवलोकन करता येते. 

                   मंदिराचा अंतर्भागच नाही तर बाह्यभागही अप्रतिम अशा शिल्पसौदर्याने सजलेला आहे. बाह्य भागावर व्याल, किर्तीमुख, गणेश, विष्णूचे अवतार, दुर्गा, सुरसुंदरी हे सारे अत्यंत रेखीव असे कोरलेले आहेत.

                     याचबरोबर मंदिराच्या बाह्य भागावर रामायण महाभारतातील काही कथाही कोरलेल्या आहेत. संपूर्ण मंदिरच अशा विविध प्रकारच्या शिल्पकलेने नटलेले आहे.

                    भारतीय स्थापत्यकला, विज्ञान, गणित, संस्कृती यांचा सुरेख संगम म्हणजे हे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. ९०० वर्षांपूर्वीही हे सारं किती प्रगत होतं याचं हे एक उत्तम उदाहरण.

                    मोगलांच्या आक्रमण काळात बऱ्याच मुर्तींचे चेहरे उध्वस्त केले गेले आहेत. पण तरीही मंदिराचे सौंदर्य अबाधित आहे.

                    भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने हे मंदिर महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

                    अतिशय सुबक, सुंदर आणि रेखीव असं हे शिल्पमंदिर प्रत्येकाने आवर्जून पहावं असंच आहे.


                                                         - स्नेहल मोडक


           


            


                    






Saturday, February 6, 2021

समुद्रपक्षी ( Seagull )


        आमच्या गिरनार यात्रेत गिरनार दर्शनानंतर आणखी काही तीर्थस्थानी आम्ही नेहमीच जातो. त्यातलंच एक स्थान द्वारका.

         द्वारकाधिशांच्या द्वारकेचे गोमती द्वारका आणि बेट द्वारका असे दोन भाग आहेत. द्वारकाधिश गोमती द्वारका येथून राज्यकारभार चालवत होते. आणि बेट द्वारका येथे त्यांचे वास्तव्य होते. बेट द्वारका भर समुद्रात आहे. अर्थातच तिथे नावेतून जावे लागते. साधारण वीस मिनिटांचा नावेचा प्रवास आहे. 

          बेट द्वारकेला जाता येतानाच्या या छोट्या समुद्र सफरीचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यावाच. ही छोटी सफर नितांतसुंदर बनवण्यासाठी आपल्या संगतीला असतात सुंदर समुद्रपक्षी. खूप मोठ्या प्रमाणात हे समुद्रपक्षी या नावेच्या प्रवासात आपल्याला पहायला मिळतात. शुभ्र पांढरा रंग अन पंखाजवळ थोडा राखाडी काळा रंग  आणि कर्कश आवाज ही यांची ओळख.

मासे टिपण्यासाठी लांब अंतरापर्यंत उडत जाणे ही खासियत.

..

     

            बेट द्वारकेला जाताना नावेत चढण्याआधी तिथे विक्रीस असलेले समुद्रपक्ष्यांचे खाद्य बरोबर घेतात. नाव किनाऱ्यापासून आत समुद्रात जाऊ लागते आणि मग सुरु होतो एक रमणीय खेळ. आपण घालत असलेले खाद्य खाण्यासाठी समुद्रपक्ष्यांचे थवेच्या थवे आपल्या नावेच्या आजूबाजूला ऊडू लागतात.हवेतल्या हवेतच खाद्य पकडून खाणारे समुद्रपक्षी पहाणे अतिशय मनोरंजक असते. आपण घातलेले खाद्य खाण्यासाठी मासे येतात आणि खरंतर त्या माशांना खाण्यासाठी हे समुद्रपक्षी आपल्या नावेबरोबर येतात. एकूणच अतिशय विलोभनीय दृश्य असते. या रमणीय खेळात नावेचा प्रवास संपवून आपण बेट द्वारकेला कधी पोहोचतो ते कळतही नाही.

            समुद्रपक्षी सर्वत्र सहज आढळतात. मात्र इतक्या जवळून त्यांना पहाण्याची संधी बेट द्वारकेला जाता येताना नक्की मिळते. एकदा तरी हा अनुभव जरुर घ्यावा.


                               - स्नेहल मोडक


 

Thursday, February 4, 2021

गंध केशर अष्टगंधाचा - गिरनार

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

..


            नोव्हेंबर २०२० मध्ये कार्तिकी एकादशीच्या दरम्यान गिरनार परिक्रमा आणि गुरुशिखर दर्शन अशी यात्रा ठरवली होती. यावेळी मोठा ग्रुप बरोबर घेऊन जाणार होतो. परंतु आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध वाढल्यामुळे ऐनवेळी यात्रा स्थगित करावी लागली.

             नंतर आमचा दत्तजयंती निमित्त गिरनारला जायचा योग आला. उत्तम दर्शन झालं.

             मग सर्वांची विचारणा सुरु झाली आमचा गिरनार यात्रेचा योग कधी येणार. अखेर परिस्थिती थोडी सुधारल्यावर श्री दत्तगुरुंच्या कृपेने आताच्या पौष पौर्णिमेला गिरनार यात्रा संपन्न झाली.

            पहिल्यांदाच एवढा मोठा ग्रुप बरोबर घेऊन जाणार होतो म्हणून आम्हाला थोडी काळजी वाटत होती पण श्री दत्तगुरुंची कृपा आणि काही सहकारी मित्रांनी घेतलेली अथक मेहनत यामुळे एकूणच यात्रा ऊत्तम रितीने पूर्ण झाली.

            आम्हाला एकूण यात्रेबद्दल जी काळजी वाटत होती ती दूर करण्याचं काम मात्र श्री दत्तगुरुंनी अगदी सहज केलं होतं. प्रवासाला निघायच्या २-३ दिवस आधी माझ्या स्वप्नी गिरनार ची श्री दत्तात्रेयांची मोहक मुर्ती आली आणि पहाता पहाता विशाल होत गेली. क्षणात झोपेतून जाग आली आणि जाणवलं हो मी येतेय हे माझे शब्द आणि असीम तृप्तता.

            प्रथेप्रमाणे लंबे हनुमानजींच आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली. यावेळी पहिल्यांदाच गिरनार ला आलेल्या सर्वांना बरोबर घेऊन सावकाश पायऱ्या चढून जात होतो. सर्वांना दहा हजार पायऱ्या चढून जाऊन दर्शन होईल ना ही काळजी मनात होती. मनातल्या मनात नामस्मरण सुरुच होते. पण जेव्हा जेव्हा मी मनोमनी दत्तगुरुंना "दत्तगुरु आमच्या बरोबर आहात ना ?" अशी साद घालत होते त्याक्षणी केशर अष्टगंधाचा सुरेख परिमळ मला जाणवत होता. अर्थातच स्वयं श्री दत्तगुरु सतत आमच्याबरोबर असल्याची सुगंधी साक्षच होती ती.

               श्री दत्तगुरंच्या कृपाशीर्वादाने आम्हा सर्वांची यात्रा पूर्ण झाली. 

               हा गिरनार दर्शनाचा योग श्री दत्तात्रेयांच्या कृपेने वारंवार यावा आणि त्यातून असीम शांती लाभावी हिच दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना....

..

जय गिरनारी      जय गिरनारी      जय गिरनारी


                                                                  - स्नेहल मोडक

Saturday, January 16, 2021

व्यक्त - अव्यक्त


            अगदी प्रत्येकाच्या मनातली ही भावना. कित्येकवेळा प्रत्येकाला व्यक्त व्हावं कि अव्यक्तच रहावं या संभ्रमाला सामोरं जावंच लागतं. कधी अगदी छोटीशी गोष्ट असते किंवा गप्पांमधला एखादा विषय असतो पण त्यात एक क्षण असा येतो की त्यावेळी आपण व्यक्त व्हावं की नाही हा संभ्रम निर्माण होतो. आपल्या बोलण्यामुळे नात्यात अंतर तर येणार नाही ना अशी भिती अतिविचार, अतिकाळजी करणाऱ्या व्यक्तीच्या मनात नक्कीच येते. आणि मग अव्यक्त रहाणंच योग्य असं वाटायला लागतं.



            व्यक्त अव्यक्ताच्या हिंदोळ्यावर मन हे झुलते

            दुखावले मन माझे तरीही नाते मी जपते

                     कधी कधी वाटते अव्यक्तच रहावे

                     आपल्याच मनाच्या गाभाऱ्यात रमावे

            भावभावना किती आल्या जरी दाटूनी

            व्यक्त न व्हावे मनाचे कवाड उघडूनी

                      कधी वाटते मनास व्हावे व्यक्त

                      अव्यक्ताच्या बंधातूनी व्हावे मुक्त

             होता व्यक्त भाव मनाचे शब्दातूनी

             रुचतील ना ते साऱ्यांना मनातूनी

                      मन करावे मोकळे होऊनी सहज व्यक्त

                      कि घालूनी लगाम मनास रहावे अव्यक्त

             व्यक अव्यक्ताच्या हिंदोळ्यावर मन हे झुलते

             दुखावले मन माझे तरीही मी नाते जपते


                                                                           - स्नेहल मोडक

Saturday, January 2, 2021

दत्तजयंती - गिरनारी

त्रिगुणात्मक त्रैमुर्ती असे दत्तगुरु

ॐ द्राम ॐ मंत्र तयांचा नित्य स्मरु


      यावर्षी दत्तजंयती किती तारखेला आहे एवढेच फक्त दिनदर्शिकेत पाहिले होते. दत्तजयंतीच्या सोहळ्यासाठी कुठे जायचा विचारही मनात नव्हता.

       नात्यांमधले विवाह सोहळे आणि इतर कार्यक्रम यातच मन गुंतलं होतं. त्या गडबडीतच एकदा काम करताना अचानक मनचक्षूंसमोर गिरनारच्या गुरुशिखरावरची श्री दत्तात्रेयांची अतिशय मोहक अशी मुर्ती साकार झाली. कामात गुंतलेले माझे हात आणि मन एकदम स्तब्ध झाले. अगदी काही क्षणांसाठी विद्युल्लता लखलखावी तसं झालं. आणि जाणिव झाली ती स्वयं दत्तगुरुंनी दिलेल्या संकेताची. दत्तजयंतीला गिरनार दर्शन आम्ही करावं हे तत्क्षणीच जाणवलं.

         गिरनारला जायचंच असं जरी मनाने ठरवलं तरी वेळेचा प्रश्न होता. पण अखेर त्यातून मार्ग काढून ऐनवेळी जायचं नक्की केलं. अर्थात आम्ही गिरनारला यावं ही स्वयं दत्तगुरुंचीच इच्छा असल्यामुळे जाणं शक्य झालं.

          दत्तजयंती दिवशी पहाटे गिरनार चढायला सुरुवात केली. रिवाजानुसार लंबे हनुमानजी आणि पहिल्या पायरीचे दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली. मग उत्साहाने पायऱ्या चढायला सुरुवात केली.

           पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि क्षणार्धात मन गुरुशिखरी दत्तगुरुंच्या चरणी पोहोचलं. का कुणास ठाऊक पण साधारण पाच-सहाशे पायऱ्या चढल्यावर उत्साहाची जागा संभ्रमाने घेतली. शरिराची साथ कमी पडतेय की काय असं वाटायला लागलं. परंतु मनाची जिद्द, सर्वांचं प्रोत्साहनआणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयं पवनपुत्रांनी दिलेली साथ यामुळे पुन्हा ऊत्साह वाढला.

              पहिल्या पायरीपासूनच तुफान वारा सुटला होता. जणू आमची प्रार्थना ऐकून स्वयं पवनपुत्रच आम्हाला गुरुशिखरी न्यायला आले होते. 

               अंबाजीमातेचं दर्शन घेऊन पुढे निघालो. गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन गुरुशिखरी पोहोचलो.


                दत्तजयंती निमित्त दर्शनासाठी खूप गर्दी होती. पण आम्हाला अतिशय सुंदर दर्शन झालं. ज्याक्षणी मी दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले त्याचक्षणी पापण्यांचे बंधन झुगारून आसू ओघळले. पहिल्या दोन्हीवेळेसारखंच यावेळीही मी अश्रु थांबवू शकले नाही. मन शांत तृप्त झालं.

                 दत्तगुरुंचे दर्शन घेऊन अखंड धुनीचे दर्शन घेतलं. दत्तजयंती निमित्त तिथे केलेल्या दत्तयागाच्या दर्शनाचा लाभ झाला त्याचबरोबर भोजन प्रसादाचाही लाभ झाला.

                  भोजन ग्रहण करुन परतीच्या मार्गाला लागलो.थोड्या वेळाने पहिल्या पायरीपासून आमच्यासमवेत असणारे पवनपुत्र अचानक गुप्त झाले. काही वेळाने नेहमीचा हलका वारा सुटला. आणि स्वयं हनुमानजीच एवढा वेळ आमच्यासमवेत होते याची परत एकदा खात्री पटली.


                    अंबाजीमातेच्या मंदिरापर्यत परत आलो. वेळेच्या कमतरतेमुळे आणि औत्सुक्यामुळे नुकत्याच सुरु झालेल्या रोप-वे ने गिरनारच्या पायथ्याशी पोहोचलो. रोप-वे ची अतिशय उत्तम सोय गिरनारला झाली आहे. अवघ्या दहा मिनिटांत पाच हजार पायऱ्या रोप-वे ने चढता उतरता येतात. अर्थात दहा हजार पायऱ्या चढा-उतरायचा अनुभव वेगळाच अन हवाहवासा वाटणाराच आहे.

                      गिरनार दर्शनाचा योग असाच नेहमी यावा आणि मन शांत तृप्त व्हावं हिच दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.


अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

जय गिरनारी


                                                                          - स्नेहल मोडक

Friday, December 25, 2020

गुलाबी थंडी ...

अहाहा काय थंडी आहे गुलाबी जणू

येताच कानी शब्द रोमांचित होते तनू



         खरंच सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी ही थंडी आणि या गारव्यातलं सृष्टी सौंदर्य. खरंतर प्रत्येक ऋतुमधलं निसर्गाचं रुप वेगळंच असतं. सदैव अनंतहस्ताने सौंदर्याची उधळण करीत असतो हा निसर्ग.  

        अशा गुलाबी थंडीमध्ये कुणाला दुलई लपेटून मस्त झोपायला आवडतं. तर माझ्यासारख्या अजून कुणाला उबदार कपड्यांत बाहेर जाऊन सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घ्यायला आवडतं. अशावेळी संगतीस कुणी असेल तर जणू दुग्धशर्करा योगच.

         निगर्गाच्या सानिध्यात रममाण होताना मन नि:शब्द होतं. अन पावलांना मात्र रानवाटेवर फिरत राहावंसं वाटतं. गुलाबी थंडीचा एक वेगळा हवाहवासा अनुभव येतो.

         सहस्ररश्मीची स्वारी अवतरल्यावर मात्र हा गुलाबी गारवा आणि शुभ्र धुकं हळूहळू वितळायला लागतं. नि:शब्द मनात हलकेच शब्द फेर धरायला लागतात. आणि मग गुंफली जाते कविता.


    धुक्याची दुलई अन गुलाबी गारवा

    भासे जणू सृष्टी छेडिते सुरेल मारवा

              अवखळ मन हे फुलपंखी होते

              ऐकत मारवा धुक्यातूनी फिरते

    मखमलीवर दवबिंदू विलसती

    अलवार मग पावलांना बिलगती

               गंधाळती फुले आसमंत दरवळते

              धुंदावतो श्वास अन मन मोहरते

     सोनकिरणे ऊधळित रवी येतो

     साज सोनेरी अवनीस लाभतो

     साज सोनेरी अवनीस लाभतो


                                                             - स्नेहल मोडक




Tuesday, December 15, 2020

आयुष्य...

             दोन घडीचा हा डाव

             तयाला आयुष्य हे नांव

  प्रत्येकाच्या आयुष्याची दुलई ही थोड्याफार फरकाने पण सुखदुःखाच्या धाग्यानेच विणलेली आहे.

  जसा प्रत्येक साडीचा पोत वेगळा , रंग अन काठ पदरही वेगळा अगदी तसंच आयुष्याच्या दुलईच्या दु:खाची किनारही कमी अधिक रुंद.

    आपण आपल्याबरोबरच दुसऱ्यांच्या मनाचा विचार करुन जर आपली कृती केली तर मला वाटतं नक्कीच प्रत्येकाच्या दु:खाची किनार नाहिशी जरी झाली नाही तरी जरतारी नक्कीच होईल.

      आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारावर जर आपल्या माणसांची साथ लाभली तर यशाचे शिखर सहजसाध्य होईलच आणि स्वप्नपूर्तीही होईल.

       साधूसंतांप्रमाणे आपण जरी षडरिपू मुक्त होऊ शकत नसलो तरी आपल्या भावभावनांवर नियंत्रण नक्कीच ठेवू शकतो. आणि स्वता: बरोबरच सर्वाच्या सौख्यासाठी प्रयत्न करु शकतो.



    गीत सुरेल आयुष्याचे चला गाऊया

    मिळूनी सारे आयुष्यावर काही बोलूया

                कूजन पक्ष्यांचे गीत झऱ्याचे ऐकूया

                चिंता काळजी सारे विसरुन जाऊया

    सुगंधात फुलांच्या धुंद सारे होऊया

    तरुलते सम जणू एकरुप सारे होऊया

                रंग सौख्याचे आयुष्यात चला भरुया

                अन दुःखालाही हलकेच वाळूवर रेखूया

    कधी आयुष्यात आलाच अंधार अवसेचा

    ठेवूया विश्वास येईल प्रकाशही पौर्णिमेचा

                 यत्न षडरिपूंच्या त्यागाचा आपण करुया

                 आयुष्याच्या ऊनपावसात एक इंद्रधनू फुलवूया

    गीत सुरेल आयुष्याचे चला गाऊया

    मिळूनी सारे आयुष्यावर काही बोलूया

         

                             ‌‌                                    - स्नेहल मोडक

Monday, November 30, 2020

गिरनार परिक्रमा आणि दर्शन - एक विलक्षण अनुभूती

गिरनार

       गिरनार या शब्दाचा नुसता उल्लेख जरी कानावर आला तरी तत्क्षणीच त्रिगुणात्मक त्रैमुर्ती नजरेसमोर येते. हा फक्त माझाच अनुभव नाही तर गिरनार ला जाऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीचाच असेल. गिरनार परिक्रमा आणि दर्शनाचा अनुभव एकदा तरी घ्यावा.

       गिरनार दर्शनासाठी दहा हजार पायऱ्या चढाव्या आणि तितक्याच परत उतराव्या लागतात. अगदी पहिल्यांदा जाताना हे खूपच अवघड वाटतं. पण जर तुम्ही पुन्हा गेलात तर मात्र तुम्हाला नक्कीच थोडं सोपं वाटतं. अर्थात हा माझा अनुभव आहे.

       आम्ही नोव्हेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदा गिरनार दर्शन आणि परिक्रमा केली आणि एक विलक्षण अनुभूती घेतली. गिरनारला जाऊन आलेल्या काही लोकांकडून त्यांना आलेल्या प्रचितीबद्दल ऐकलं होतं. त्यामुळे आमच्या मनात थोडं औत्सुक्य आणि थोडी साशंकता अशी संमिश्र भावना होती. मात्र पूर्ण श्रध्देने गिरनार दर्शन आणि परिक्रमेस गेलेल्या प्रत्येकाला श्री दत्तगुरु कुठल्या ना कुठल्यातरी तरी रुपात दर्शन देतातच याची विलक्षण प्रचिती आम्हालाही आली.


लंबे हनुमानजी मंदिर
पहिली पायरी

           रात्री श्री मारुतीरायांचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन पायऱ्या चढायला उत्साहात सुरुवात केली. मात्र सुरुवातीला असलेला ऊत्साह दोन अडिचशे पायऱ्या चढल्यावर हळूहळू कमी होत साशंकता वाढू लागली. दहा हजार पायऱ्या चढून उतरणं आपल्याला नक्की जमेल ना या विचारातच साधारण पाचशे पायऱ्या चढून गेलो. मनातल्या मनात श्री दत्तगुरुंचे नामस्मरण सुरुच होते.

            पाचशे पायऱ्यांवर एक युवक आमच्या बरोबर चालू लागला. काळजी करु नका तुम्हाला छान दर्शन होईल, मी सहसा रात्री चढायला सुरुवात करत नाही पण तुम्हाला बघुन तुमच्याबरोबर यावंसं वाटलं असं बोलत आणि आमची पूर्ण काळजी घेत तो शिखरदर्शन घेऊन अखंड धूनीचं दर्शन करुन परत गिरनार उतरायला सुरुवात करेपर्यंत पूर्ण वेळ आमच्याबरोबर होता.

             पायऱ्या उतरायला सुरुवात केल्यावर जितक्या अचानकपणे तो आमच्या बरोबर चालू लागला होता तितकाच अचानक तो गायब झाला. नंतर परत एकदाही तो आम्हाला दिसला नाही. अतिशय मृदू आवाजात बोलणारा तो हिंदी भाषिक युवक आमच्या मनात कायमचं घर करुन गेला. श्री दत्तगुरु स्वत: त्या युवकाच्या रुपात पूर्ण वेळ आमच्याबरोबर होते आणि हे सुरुवातीलाच आमच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे अतिशय उत्साहाने आणि पूर्ण श्रद्धेने आम्ही गिरनार दर्शन घेऊन आलो. याहून मोठं भाग्य ते कोणतं....


         


             गिरनार परिक्रमा ही अडतीस किलोमीटरची असून तिचा मार्ग जंगलांतून असल्यामुळे ती वर्षातून एकदाच कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच करता येते.
    
         दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. तेव्हाही अखंड नामस्मरणासह आमचा उत्साह टिकवून ठेवण्याचे काम श्री दत्तगुरुंनी असेच वेगवेगळ्या मार्गाने केले आणि अवघड असणारी परिक्रमा संध्याकाळपर्यंत आमच्याकडून सहजपणे पूर्ण करुन घेतली.

               अखंड धुनी ही फक्त दर सोमवारी सकाळी सहा वाजता आपोआप पेटते. दर सोमवारी सकाळी सहा वाजण्यापूर्वी पिंपळाच्या झाडाची लाकडं रचतात आणि आपोआप धुनी पेटते. ते दर्शन घेण्यासाठी आम्ही परत यावर्षी (२०२०) होळी पौर्णिमेला गिरनार शिखर दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हाही पहिल्या पायरीचे आणि श्री मारुतीरायांचे दर्शन घेताना श्री दत्तगुरुनी एका साधू महाराजांच्या रुपात काळजी करु नका छान दर्शन होईल असा आशीर्वाद दिलाच आणि पायऱ्या चढत असताना मधून मधून त्याच रुपात दर्शन देत आमचा उत्साह वाढवला. त्यांच्या कृपेने परत एकदा शिखर दर्शन आणि पेटत्या अखंड धुनीचे दर्शन घेऊन आम्ही परत आलो.

               आम्ही गिरनारला जाण्यापूर्वी लोकांकडून ऐकलेले विलक्षण अनुभव आणि नंतर प्रत्यक्ष आम्हाला आलेली प्रचिती. खरंच पूर्ण श्रध्देने हाती घेतलेलं कार्य श्री दत्तगुरु पूर्णत्वाला नेतातच.

                नामस्मरण नित्य करावे,

                भवभय ते सहज हरावे.


                                                   - स्नेहल मोडक



      लागतसे ध्यास सदैव दत्तदर्शनाचा

      असे अवतार जो ब्रम्हा विष्णू शंकराचा

              पीठापूर गाणगापूर स्थान जरी दत्तगुरुंचे

              परि लागती वेध गिरनार दर्शनाचे

       दशसहस्त्र पायरी जरी असती गिरनारी

       चढता पहिली पायरी दत्तगुरु स्वये नेती शिखरी

               पाऊले चालती गिरनार परिक्रमा करावया

               दत्तगुरु कृपेने पार होती जंगले लिलया

       अवघड वाट जरी असे परिक्रमेची

       मार्गी होती दर्शने सर्व देवदेवतांची

                होतसे यात्रा पूर्ण ठेवता श्रद्धा दत्तगुरुंवरी

                जय गिरनारी जय गिरनारी जय गिरनारी


                                                 - स्नेहल मोडक

Wednesday, October 21, 2020

पिलू उडोनिया गेले


                    त्यादिवशीची तिन्हिसांज खरंतर नेहमीसारखीच पण आम्हाला मात्र एक वेगळाच नाट्यानुभव देऊन गेली.

                    तिन्हिसांज सरुन अंधारायलाच लागलं होतं. मी लेकीबरोबर घराच्या गॅलरीत सहज गप्पा मारत उभी होते. समोरच्या झाडावर बुलबुल पक्ष्यांच्या जोडीचा किलबिलाट सुरु होता. आणि अचानक एका वेगळ्याच नाट्याला सुरुवात झाली.

                    बुलबुलच्या जोडीच्या जवळ आलेल्या एका कावळ्याला ती जोडी जोरात कलकलाट करत हुसकावून लावत होती. बुलबुलच्या जोडीच्या रोजच्या किलबिलाटामुळे आम्हाला त्यांचे घरटे जवळच कुठेतरी असल्याचा अंदाज होताच. पण त्यांच्या या कृतीने मात्र खात्रीच पटली.


                    बुलबुल कावळ्याला हुसकावून लावत असतानाच अचानक आमच्या दिशेने एक छोटंसं पाखरु फडफडत येऊन कुंडीतल्या झाडावर विसावलं. आणि क्षणात सारा खेळ आमच्या लक्षात आला. कारण ते बुलबुलच्या जोडीचं अगदी छोटं पिल्लू होतं आणि कावळा त्याच पिल्लाच्या मागे लागला होता. पण अजून त्या पिल्लाच्या पंखात पुरेसं बळ नसल्याने त्या जोडीला त्याची काळजी वाटत होती.


                    थोड्या वेळाने कावळा निघून गेला. पण ते पिल्लू मात्र कुंडीतल्या झाडावरुन उडायला तयार होईना. मग सुरु झाले त्या जोडीचे पिल्लाला आपल्या घरट्यात परत नेण्यासाठीचे प्रयत्न. दर १०-१५ मिनीटांनी ते पिल्लाला खाणं आणून भरवू लागले. आणि उडून दुसऱ्या झाडावर बसून पिल्लाला बोलावू लागले. पण ते मात्र तिथल्या तिथेच उडत शेवटी गॅलरीच्या ग्रीलच्या एका अ‍ॅंगलवर जाऊन सुरक्षित बसून राहिले.


 


                    रात्री खूप उशिरापर्यंत त्या जोडीचे पिल्लाला घरट्यात परत नेण्यासाठीचे प्रयत्न सुरु होते. पण शेवटी दमून ते पिल्लू तिथेच झोपून गेले. मधल्या वेळेत आम्ही त्यांच्यासाठी पुठ्ठ्याच्या खोक्याचे घरटे बनवून टांगून ठेवले. पण त्यांनी त्याचा उपयोग केला नाही. रात्रभर ते पिल्लू ग्रीलवरच झोपून होते. मी मात्र रात्रीतून सारखी ते पिल्लू सुरक्षित असल्याची खात्री करत होते.



                    पहाटे परत बुलबुलच्या जोडीचा किलबिलाट सुरु झाला. त्यांच्या किलबिलाटाने पिल्लू जागं झालं आणि तेही अगदी नाजूक आवाजात ओरडू लागलं. लगेचच बुलबुलची जोडी येऊन त्याला खाणं भरवू लागली आणि त्याला घरट्यात परत नेण्यासाठी प्रयत्न करु लागली.

                    थोड्यावेळाने अचानक माझ्यासमोरुन ते पिल्लू उडून बाहेरच्या दुसऱ्या एका झाडावर जाऊन बसलं. आणि एक वेगळंच नाट्य आमच्यापुरतं संपलं असं वाटत असतानाच बराच वेळ झाला तरी अजून ते पिल्लू त्याच झाडावर बसलेलं आणि ती जोडी त्याला खाणं भरवत असलेली दिसली. काहीवेळानंतर मात्र ते पिल्लू सुरक्षित घरट्यात परतलेलं कळलं आणि मन शांत झालं.

                    खरंच जीवनमृत्यूचा संघर्ष माणूस आणि पशूपक्षी साऱ्यांसाठी सारखाच , नाही का...


- स्नेहल मोडक                     

टिपूर चांदण्या राती

                    टिपूर चांदणं पाहताच किती उल्हसित होतं ना मन आणि येते प्रिय व्यक्तीची आठवण.

                    चांदण्या रात्री सागरकिनारी फिरण्याची मजा काही वेगळीच. अमावस्येच्या रात्री धीरगंभीर भासणारा समुद्र पौर्णिमेच्या चांदण्यात मात्र अगदी उत्साहाने फेसाळणारा भासतो.

                    अशा चांदणराती सागरकिनारी फिरताना प्रिय व्यक्तीचा हात हाती असेल तर मग....




कधी टिपूर चांदण्या राती

जावे सहज सागरतीरावरती

                ओल्या वाळूवरी मुक्त फिरावे

                हलकेच पावलांचे ठसे उमटावे

तरंग उठती मग मनावरी

जशी लहर हलकी सागरावरी

                होताच लाटांचा पावलाना स्पर्श

                तनमनास होई असीम हर्ष

नभी टिपूर चांदणे चमचमते

समुद्री पाणी शुभ्र फेसाळते

                 अशात तू असता मजसंगे

                  मन वेडे माझे स्वप्नी रंगे

हात तुझा हाती असता जन्मभरी

भय न मजला कसले क्षणभरी

                  कधी टिपूर चांदण्या राती

                  जावे सहज सागरतीरावरती


- स्नेहल मोडक

Sunday, October 4, 2020

स्वर्गीय पारिजात


    

                      पारिजात नुसतं नांवही त्याच्या नाजूक सुगंधी फुलाइतकंच लयदार आहे ना. प्राजक्त, हरसिंगार, शिऊली, शेफालिका, रागपुष्पी, खरपत्रक, नालकुंकुमा ही या झाडाची आणखी काही सुंदर नांवं.

         पण एक सुगंधी फुलाचं झाड एवढीच याची ओळख नाही बरं का. याचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. पारिजातकाच्या पानांचा काढा मलेरिया, सांधेदुखी, गुडघेदुखी, सायटिका या आजारांवर उपयुक्त आहे. 

         पारिजातकाचं हे झाड, खरं तर वृक्षच हिमालयाच्या पायथ्याशी खूप जास्त प्रमाणात आणि इतरत्रही नैसर्गिक रित्या उगवतं. घराच्या अंगणातही हौसेने हे झाड लावलेलं पहायला मिळतं.

          पारिजातकाचं हे सुंदर, बहुगुणी व स्वर्गीय झाड पृथ्वी वर कसं आलं याच्या काही कथा पुराणकाळापासून आपण ऐकत आलो आहोत. त्यातलीच एक कथा मी काव्यात गुंफली आहे.


        हट्ट सत्यभामेचा असे पूर्ण जाहला

        स्वर्गीय पारिजात तिच्या अंगणी फुलला

                     नाजूक गंधकेशरी पखरण होई अंगणी

                     मात्र अंगणातल्या महाली वसे रुक्मिणी

        सौख्य प्राजक्ताचे दोघींस न लाभले

        शोधिती मुळ अन कुठे पडती फुले

                      राहिली का अशीच प्रीतीची तृष्णा

                      जाणले ना कधी ह्रुदयीच्या कृष्णा

        राज्ञीपद हरीने रुक्मिणी भामेस दिधले

        परि असीम प्रेम कान्ह्याचे राधेस लाभले


                                                         - स्नेहल मोडक



            

पारिजातक / प्राजक्त


            प्राजक्त असा नुसता शब्द जरी ऐकू आला तरी लगेच आपल्या नजरेसमोर येतं ते पारिजातकाचं नाजूक फुल, आणि होते त्याच्या मधुगंधाची आठवण.

                 तिन्हिसांज सरुन निषेचा अंधार गडद होत असतानाच प्राजक्ताची फुलं अलवार उमलू लागतात अन मधुगंधाची उधळण करत सारा आसमंत धुंद करतात. ऊष:काली या फुलांची पखरण धरतीवर करुन हे झाड रिक्त होतं ते पुन्हा फुलण्यासाठीच.

                                              


        अंगणी माझिया सुरेख पारिजात फुलतो

        पहाटसमयी पखरण गंधकेशराची करतो

                      अलवार हाती मी फुले वेचिते

                      रचुनी विविध कल्पना साकारते

        पाहता मोहक रचना मन सुखावते

        अन सुंदर सकाळ सुगंधीत होते

                     मांडते चित्रण मी साकार कल्पनांचे

                     सुगंधी व्हावे क्षण आपणा सर्वांचे


                                                                   - स्नेहल मोडक








    

Saturday, October 3, 2020

Easy Kundan Meherap / Mahirap

      


                                                         

For any Auspicious Program or Function like Marriage or Munj (Thread Ceremony) there is a method of making beautiful Rangolis around the Plate or around the Chaurang.

But in today's fast paced life it is sometimes not that possible to make Rangoli by hand.


लग्न , मुंज अश्या कुठल्याही शुभ कार्यासाठी पानाभोवती किंवा चौरंगाभोवती सुंदर सुंदर रांगोळी काढायची पध्दत आहे.

पण सध्याच्या या धावपळीच्या जीवनात हाताने रांगोळी काढणे कधी कधी शक्य होत नाही.



              


In this case, Kundan Rangoli, made using minimal items and in less time, is a great option.

It is very easy to make and we can use this Kundan Rangoli not only once but over and over again.

This reusable Rangoli is sometimes useful as Mahirap / Meherap and sometimes as Rangoli, to be placed around a chowrang or a plate.






मग अशावेळी ही कमीत कमी साहित्य वापरून आणि कमी वेळात तयार केलेली कुंदन रांगोळी हा एक उत्तम पर्याय.

बनवायला तर एकदम सोपी आहे आणि एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा आपल्याला या कुंदन रांगोळीचा वापर करता येऊ शकतो.

ही परत परत वापरता येण्यासारखी रांगोळी कधी महिरप / मेहेरप तर कधी रांगोळी म्हणून चौरंग किंवा ताटाभोवती ठेवायला उपयोगी पडते.




                        


This rangoli can also be made using paper / cardboard or OHP sheet. To decorate it we can also use colourful and different sized Kundans or Beads to paste on different sheets. 


ही रांगोळी कागद / पुठ्ठा किंवा OHP Sheet वापरून पण बनवू शकतो. सजावटीसाठी रंगीत व वेगवेगळ्या आकाराचे कुंदन किंवा मणी ही वापरू शकतो.



                  



                                                                          - By SnehalModakArt


 

Sunday, September 20, 2020

कोकण - सृष्टीसौंदर्याने नटलेली देवभूमी

    





           हिरवीगार वनराई आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा लाभलेले कोकण ही देवभूमीच , हेच खरंतर कोकणचं सार्थ वर्णन.  कोकण म्हटलं की लगेच नजरेसमोर येतात ती कौलारु घरं , स्वच्छ सारवलेली अंगणं आणि माडपोफळीची झाडं.

याच देवभूमीचं हे वर्णन काव्यरुपात ....


 वाट ही वळणावळणाची गावाकडच्या घराची

 लाल कौलांची आणि चिरेबंदी भिंतीची

           सुरेख सारवल्या अंगणात तुळस डोलते

           पुजून तिला माय सांजेला दिवा लावते

  मेरेवर फुलती शेवंती मोगरा अन जाईजुई

  सुगंधाने त्यांच्या आसमंत भरून जाई

           विहिरीच्या पाण्याची गोडीच असते वेगळी

           आजूबाजूला वाढती केळी अन माड पोफळी

  आंबा फणस रतांबे अन जांभूळ काजू

  वेगवेगळी झाडे असती घराच्या आजूबाजू

             तोरणं बोरं अन करवंद कोकणचा रानमेवा

             कुंपणावरच्या जाळीवरुन मनमुराद खावा

  शांत रात्री गाज सागराची कानी येते

  काजव्यांच्या प्रकाशाने जणू रात्र सजते

             वाट ही वळणावळणाची गावाकडच्या घराची

             लाल कौलांची आणि चिरेबंदी भिंतीची


                                                                - स्नेहल मोडक


                     

मन पाखरू पाखरू ...


       
                     




मन  दोन अक्षरी अगदी ईवलासा शब्द पण त्याची व्याप्ती मात्र अमर्याद.

          मनाचे व्यापार सहजासहजी कळत नाहीत हे मात्र अगदी खरं. कधी हसू तर कधी आसू, कधी आतुर तर कधी होते कातर. अगदी एका क्षणात कुठल्याकुठे पोहोचते मन.चंचल मन आवरायला साधनाच करावी लागते.

          बघा ना, मी हे लिहित असताना माझं मन मात्र तुमच्याजवळ पोचलंय. मनाचे हेच अनोखे विभ्रम मी काव्यात गुंफले आहेत.

आवडेल ना तुम्हाला...?

         

मन पाखरू पाखरू त्याला कसे आवरु

      क्षणात जाय उंच आभाळा

      होऊनी पतंग नीळा

क्षणात फुलावरी लागे भिरभिरु

होऊनी रंगीत फुलपाखरू

       क्षणात होई नभीचे इंद्रधनू

       होऊनी सप्तरंगी तनू

क्षणात डोलवी आसमंत सारा

होऊनी खट्याळ वारा

        क्षणात होई निर्झर खळाळते

        होऊनी पाणी शुभ्र फेसाळते

 क्षणात कातर क्षणात आतुर

 होऊनी हळवे माजते काहूर

         क्षणात फिरे मुक्त दशदिशात

         कळेना कसे ठेवू बंधनात

 मन पाखरू पाखरू त्याला कसे आवरु

 

                        - स्नेहल मोडक


कविता

श्रावण - दर्शन

               ' अधिकस्य अधिक फलम् ' म्हणजे हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक महिन्यात केलं जाणारं नामस्मरण, जपत...